loader image

ओळख मुलांची, आपली…

दृष्टिकोन विकसित करायला हवा !

श्रीमती संगीता पाटणकर

बी.ए., बी.एड्.

  • इंडियन एजुकेशन सोसायटीच्या संस्थेत विविध पदांवरील ४० वर्षांचा अनुभव तसेच त्या संस्थेच्या पूर्वप्राथमिक अध्यापक विद्यालयाच्या माजी प्राचार्य.
  • राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्टान पुरस्कारांच्या मानकरी (१९८९)
  • बालशिक्षणाच्या प्रबोधनासाठी सुमारे २०० शिबिरे, व्याख्याने यात मार्गदर्शकतज्ज्ञ म्हणून सहभाग
  • महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या संस्थापक सदस्य.
  • डहाणू येथील ‘ऐना’ या गावी ‘ग्राममंगल’ संशोधन कार्यात सहभाग.
  • बालमोहन विद्यामंदिरच्या विद्यमान प्रशासकीय अधिकारी.

शिक्षणाचा विचार करताना पूर्वीचा काळ आपण पाहिला, तर पूर्वी बालमंदिरं वगैरे काही नव्हती. बिनधास्तपणे पहिलीपासून आपलं शिक्षण सुरू व्हायच. पण आता परिस्थिती बदलली आहे.. सर्वसाधारणपणे असं एक दृश्य आपल्या नजरेसमोर येतं की साधारण, वयाच्या दुसया वर्षापासून मुलाच्या पाठीमागे कुठच्या न कुठच्या शाळेचा लकडा लावला जातो. त्याचा शाळाप्रवेश हा सर्वसाधारणपणे दोन – अडीच वर्षांपासून अधिकृतरीत्या सुरू होतो. त्या वेळचा त्याच्या शैक्षणिक कार्याचा थोडासा आढावा जर आपण घेतला, तर त्याचे पहिले वहिले गुरू म्हणून आपल्याला त्याचे आई-वडील यांचा उल्लेख करावा लागतो.

बालमंदिरात येताना बालकाच्या बऱ्याचशा शारीरिक विकासाच्या मर्यादा पार पडलेल्या असतात. ‘शी’, ‘सू’ वर त्याचं नियंत्रण असतं. बऱ्याचशा गोष्टी तो स्वतंत्रपणे करू लागलेला असतो. आणि अशाच वेळेला तो एका नामवंत बालशाळेची वाटचाल करू लागलेला असतो. या अशा विशिष्ट टप्प्यावरती मुलं जेव्हा शाळेमध्ये येतात, त्या वेळेला त्यांची जी कौटुंबिक परिस्थिती असते, त्याचा आम्हा शिक्षकांना अतिशय उपयोग होतो. सर्वसाधारणपणे आमच्या वर्गामध्ये येणारे बालक कोणत्या स्तरातून आलेले आहे, त्याच्यावर झालेले संस्कार काय आहेत, त्याच्या आजूबाजूला वावरणारी मुलं कोणती आहेत, या सर्व गोष्टींचं चित्र शिक्षिकेला हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं. परंतु तरीही बाल – शिक्षिका म्हणून तिला त्याचा सर्वांगीण विकास घडवण्याची जबाबदारी पार पाडायची असते. तीन वर्षांचं मूल बालमंदिरामध्ये जास्तीत जास्त दर दिवशी तीन तास असतं. दिवसाचे २४ तास. २१ तास हे बालक आपल्या घरामध्ये आजूबाजूच्या, मोठ्या माणसांच्या सान्निध्यामध्ये वावरत असतं आणि म्हणूनच त्यांच्यावरती जो काही संस्काराचा पगडा असतो तो किंवा त्यांची बोलीभाषा नकळतपणे विकसित होत असते. या ना त्या निमित्ताने हे सगळेच जण त्याचे गुरू असतात. मग कुणी म्हणेल, एवढ्या लवकर आम्ही बालमंदिरात मुलं पाठवायचीच कशाला?

आपण आपल्या मुलांचा घरी विचार करत असतो, त्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर आपलं एकुलतं एक मूल असतं आणि ज्या वेळेला ते शाळेमध्ये प्रवेश करतं, त्या वेळेला त्याचा समवयस्कांशी संबंध येतो. त्यांच्या मनातले विचार, त्याची आवड – निवड, त्याचे खेळ, एवढंच नव्हे तर त्याचा संवाद हा जास्त सुकरपणे त्याच्या सहाध्यायांशी होत असतो. आपण जितक्या मोकळेपणाने, जितक्या खुलेपणाने आपल्या मित्रमंडळींशी बोलतो, तितके आपण वडीलधाऱ्यांशी बोलत नाही. हीच परिस्थिती बालकांच्या बाबतीत असते.

आपल्या बाळाचा विकास थोड्याफार प्रमाणात का होईना, घरामध्ये सुरू झालेला असतो. फक्त त्याला एक नीटनेटकं वळण देण्याचं काम शाळा करत असते. थोडंफार मूल्यशिक्षण करत असते. सहाध्यायाच्या बरोबर वागताना आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं, याचं शिक्षण आमच्या या छोट्याला शाळेतून कळत – नकळत मिळत असतं.

घरी दिसणारं दृश्य काय असतं? छोट्या जीवाला आजी, आजोबा, आत्या, मामा, काका सतत सूचना करत असतात. त्या बऱ्याचदा नकारात्मक असतात. हे करू नकोस, ते करू नकोस. त्यामुळे मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. तो सतत साध्या साध्या गोष्टींसाठी मोठ्या माणसांवर अवलंबून राहतो.

चाळीस – पन्नास वर्षांपूर्वी या गोष्टी होत्या का? मुलं घरात सहजपणे वावरत होती. मोठी माणसं त्यांच्या अंगावर ओरडायची. तरी त्यांचा विकास होण्याचं थांबलं का? त्या वेळी घरामध्ये लहान मुलांची संख्या बरीच असायची. सुखदुःख वाटली जायची. त्यातूनच ते मूल स्वत:ला विकसित करायचं.

आज परिस्थिती बदलली आहे. प्रसारमाध्यमांचा प्रचंड मारा सगळीकडून होत आहे. वातवरण बदललेलं आहे. आईबाबा, दोघंही अर्थार्जनात गुंतलेत. त्यामुळे बाळाचं ज्या पद्धतीने संगोपन केलं पाहिजे, त्या पद्धतीने त्यांना करता येत नाही. सध्याच युग स्पर्धेचे आहे. ठराविक टक्के मिळवावे लागतात. या सर्व गोष्टींमुळे मुल गुदमरलं जातं.

आमच्या बालशिक्षणात काही सिद्धांत मांडलेले आहेत. मुलांना स्वातंत्र्य द्या, मुलांना स्वयंस्फूर्तीने काम करू द्या, मुलांना स्वयंशिक्षण द्या. स्वातंत्र्य, स्वयंस्फूर्ती, स्वयंशिक्षण, स्वयंशिस्त, स्वावलंबन ही पाच सूत्रं आहेत.

मुलाची योग्य रीतीने वाढ व्हायची असेल, विकास व्हायचा असेल, तर शाळेत बाईंनी आणि घरी आईने कंबर कसली पाहिजे. एक उदाहरणच द्यायचं झालं, तर तुम्ही पार्टीला निघालेले असता. तुमच्या छोटीसाठी तुम्ही फ्रॉक काढलेला असतो. त्याला मॅचिंग सॉक्स असतात. पण तिला ठराविक रंगाचा घालायचा असतो. पण आपल्याला मूल शिस्तीत हवं. खरं तर अशा वेळी त्याच्या मनाप्रमाणे करायला हवं. त्याला त्याचे कपडे निवडायची संधी द्या. रोज शाळेतून आल्यावर त्याला त्याचा सेट काढू द्या. त्यानंतर समारंभाच्या वेळी त्याच्यासाठी ठराविक कपडे का काढले, हे त्याला सांगा. तिथे कुठली माणसं येणार, मुलं येणार ते सांगा. सुसंवाद निर्माण करा.

अनेकदा तुम्ही बाजारातून फळं, भाज्या आणलेल्या असतात. मूल ती पिशवी उपडी करतं. आईचा पारा चढतो. अशा वेळी ती फळं, भाज्या नायलॉनच्या छोट्या पिशव्यांत मुलाला भरायला सांगा. त्यायोगे त्याला फळांची, भाज्यांची ओळखही होईल.

शाळेतही जेव्हा ते बाळ येतं, तेव्हा आम्ही शिक्षकांना सांगतो, आल्या आल्या त्याचा मूड खराब होणार नाही अशी गोष्ट त्याला करू द्या. आल्या आल्या मित्र- मैत्रिणींशी गप्पा मारू द्या किंवा खेळ मांडला असेल तर त्या खेळाशी खेळू द्या. कातरकाम करायची इच्छा झाली असेल तर ते त्याला करू द्या. चित्रकलेची इच्छा असली तर ते साहित्य त्याला पुरवा. मुलांना त्याच त्याच गोष्टी करायला कंटाळा येतो.

दुसरा भाग आहे स्वयंस्फूर्ती. कोणतीही कृती करताना मुलांचं मन तयार पाहिजे. जबरदस्तीने त्याला बसवलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले येत नाहीत. सर्वसाधारणपणे आमच्या असं लक्षात येते की शाळेत कितीही सांगितले की लेखन घेऊ नका, तरी घरोघरी विद्यार्थी वह्या घेऊन बसलेले असतात. आम्हाला हे बालशिक्षण अपेक्षित नाही. प्रत्येक वेळी तुम्ही त्याला म्हणणार, “बरोबर सात वाजता तू घरात ये. ‘शुभंकरोती’ म्हटली की टेबलवर बसायचं. जे काही मी लिहून काढलंय, ते तू लिही. तोपर्यंत मी स्वयंपाक करते.” तुम्ही जर का कांदे – बटाट्याची भाजी करणार असाल तर ‘पाच बटाटे टोपलीतून काढून दे रे, दोन कांदे काढून दे रे, फ्रीजमध्ये मिरच्या आहेत का ते बघ’, असं सांगितलं तर त्याची आकड्यांची संकल्पना स्पष्ट होईल. कशाला ते पानभर लिहायला हवं?

मुलाला कृती करण्याची भावना निर्माण होईल, या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर घड्याळ असल्यामुळे आपण त्याला डावलत असतो. त्याला उत्सुकता असते. ती पूर्ण करू द्या.

वर्गामध्ये शिक्षकांना एकच कृती सर्वांना देणं भाग पडतं. परंतु आमची मुलं पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त बसू शकत नाहीत. त्यांची स्वयंस्फूर्ती क्षणिक असते. शाळेत आम्ही बालशिक्षकांना सांगतो, मणी ओवून त्यांना कंटाळा आलेला आहे ना, मग आता त्याला खडू फळे द्या. रात्री घरात त्याला गादीवर खेळू द्या. रात्री आपल्याला कुटली गाडी पकडायला जायचं असतं? मुलाला स्वत:चा पेला धरायला, कप धरायला शिकू द्या. सुरुवातीला दूध सांडेल. पण मग हळूहळू त्याच्या बोटांवर ताबा येईल.

तिसरं म्हणजे स्वयंशिक्षण. हे स्वयंशिक्षण खरं तर आपण मुलांना देत नाही. मूल आंघोळ करून आलं की आपणच त्याला कपडे घालतो. पावडरच्या डब्यातून पावडर कशी पडते, याबद्दल त्याला उत्सुकता असते. मग ते टेबल असो, गादी असो, नाही तर बिछाना. पावडरचा त्यावर वर्षाव करते. आणि मग ठिणगी पडते. पण यामागे बाळाची भावना आपण विसरून जातो. मुलाला जन्म दिल्यानंतर पहिली सहा वर्षे घरामध्ये रंग काढायचा नाही. बाळाला भिंती रंगवायच्या आहेत तर रंगवू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. अशाने घरातले ताणतणावही कमी होऊ शकतील.

प्रत्येक गोष्ट स्वत: करण्यात मुलांची जी धडपड असते, तिला आपण मान देऊ या. परवा माझ्या नातवाने कोपऱ्यातली केरसुणी हातात घेतली. त्याचं केर काढणं, म्हणजे उडवणं. घरातले नाराज झाले. ते म्हणाले, ‘अरे, हे काय आपलं काम आहे का? अनसूयाला कशाला नेमलंय आपण?’ खरं तर हे श्रमप्रतिष्ठेचं बीज. पण लहानपणापासून आपण त्याचं खच्चीकरण करतो. हीच कामं शाळेत स्काऊटमध्ये ती आनंदाने करतात. श्रमप्रतिष्ठेची बीजं त्यांच्या मनात योग्य वेळी पेरली तर कुठल्याही वयात कागदाचा कपटा उचलताना त्यांना लाज वाटणार नाही.

स्वावलंबनाने मूल बऱ्याचशा गोष्टी शिकत असतं. त्याचे काही आराखडे तयार
होत असतात. कोणती गोष्ट किती काळाने चुकत गेलो आणि कोणत्या वेळेला ती बरोबर आली, की त्यामुळे मला आईबाबांची शाबासकी मिळाली, हा अनुभव त्याला मिळत असतो. त्यासाठी लागणा-या संधी पुरवणं हे पालकांचं आणि शिक्षकांच काम असतं. कृती करायला मुलांना द्यायचीच नाही, अशा निर्णयापर्यंत आपण आलो, तर ते सगळे गोवर – गणेश होतील.

छोट्या बाळांचं शिक्षण पंचेंद्रियातून चाललेलं असतं. आपण त्याच्या पाळण्यावर चिमण्या कशासाटी टांगतो? फिरत्या चिमणीला पाहूनही ते मूल काही तरी शिकत असतं.

बऱ्याचवेळा रस्त्याने जाताना मुलाच्या चालीने किती जण चालतात? बऱ्याचदा त्याला फरफटत नेलं जातं. तसं होऊ नये. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा छोट्यांना बाहेर घेऊन जा. पोस्ट ऑफिसमध्ये न्या, भाजी बाजारात न्या, दुकानावरच्या पाट्या दाखवा. त्यांच्या कलाने घ्या. हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच असतं. तुम्ही ऑफीसमधून येता आणि वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसता. तुमचं मूल येऊन त्यात डोकावतं, तुम्ही वैतागता. मोठ्या अक्षरातल्या मथळ्यातली त्याच्या ओळखीची अक्षरं त्याला वाचू द्या.

मुलाला सगळे अनुभव घेऊ द्या. स्वयंपाकघरातल्या वासांचं ज्ञान त्याला होऊ द्या. त्यामुळे वेगवेगळे शब्द त्याच्या संग्रही येतात.

आपण मुलांना अनेकदा कार्टून चॅनेल लावून देतो. म्हणजे आपण मोकळे! परंतु एखादा ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कार्यक्रम त्याला बघू द्या. त्याला त्यात सहभागी करून घ्या. घरामध्ये आपण महिन्याचं सामान भरतो. नाना तऱ्हेच्या पुड्या घरामध्ये आलेल्या असतात. अशा वेळेला सामान भरताना आपलं हे छोट बाळ मध्ये मध्ये लुडबूड करत असतं. मग त्याला एका कोपऱ्यामध्ये जी चण्याची डाळ आणलेली आहे ती द्या. एक डबा रिकामा द्या, एक वाटी द्या. भरू द्या त्याला धान्य. धान्य भरणं त्याची कृती होईल. त्याच्या बोटांना व्यायाम मिळेल. न सांडता एखादी गोष्ट कशी भरावी याचं ज्ञान स्वता:हून त्याला मिळेल.

बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये ज्ञान – विकासाच्या दृष्टीने उपलब्ध असतात. पण त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपल्याला कळत नाही. आपण मुलावर ओरडत बसतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेजारच्या मुलांशी आपण त्यांची तुलना करतो. ते बरोबर नाही.

घरामध्ये एकुलतं एक बाळ आहे. त्याला अतिशय सुशिक्षित पालक मंडळी लाभली आहेत म्हणून आम्ही शिक्षिका बालमंदिराच्या दृष्टीने फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. रंगाची संकल्पना शाळेत शिकवली जाते. घरी मुलाला कुठल्या रंगाचे कपडे कुठले ते ओळखायला सांगा.

परिसर हा मोठा स्रोत असतो. सर्वसाधारण घरात वृद्ध आजी – आजोबा असतात. मूल्यशिक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. या सर्वांना मदत करण्याची ऊर्मी मुलांमध्ये असते. दारावर येणारे फेरीवाले, दूधवाला, पेपरवाला, पाववाला ही सगळी मंडळी आपल्याला मदत करतात. त्यांच्याशी उद्धटपणे वागायचं नाही, याचं शिक्षणही होतं. छोट्यांना बरोबर घेऊन मोठ्या माणसांनी त्यांचा दृष्टिकोन विकसित कसा करायचा यातच सर्व मर्म आहे.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.