loader image

मुख्याध्यापकांचे मनोगत

शैक्षणिक प्रगती बरोबरच व्यावहारिक अनुभव, जबाबदारी आणि समाजाविषयीची संवेदना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या प्रवासात आम्ही शिक्षक सदैव त्यांच्यासोबत असतो. त्यांची आवड आणि आकांक्षा ओळखून त्यांना उंच भरारी घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो.

माध्यमिक विभाग

शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे यांच्या शैक्षणिक विचारावर आधारित बालमोहन विद्यामंदिर ही नुसती एक शाळा नसून ते एक संस्कारपीठ आहे.

१९४० साली स्थापन झालेल्या या शाळेने समाजाला सदैव सुजाण नागरिक दिले आहेत. समाजाला केंद्रस्थानी ठेवून सामर्थ्यवान, वैश्विक नागरिक निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी बालमोहन सदैव प्रयत्नशील राहिली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा खास मानून प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या बरोबरच विशेष गरजा असणाऱ्या बालकांपर्यंत सर्वांना सामावून घेऊन येथे शिक्षणाचा यज्ञ अव्याहत चालू असतो.

विद्यार्थ्यांच्या उपक्रमांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसनावर बालमोहनचा भर असतो. तार्किक आणि शास्त्रीय वैचारिकता प्रगल्भ होण्यासाठी गणित आणि विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमांना पूरक असे अनेक उपक्रम शाळेत राबविले जातात. त्यामुळे प्रत्येक घटनेमागील कार्यकारण भाव शोधण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढते.

उद्याच्या जगाला अभिप्रेत असलेले शिक्षण हा आमच्या शिक्षणाचा गाभा आहे. येथे शिकताना ‘न शिकता, कसे शिकावे’ हे शिकणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच बालमोहन विद्यामंदिरचा प्रत्येक विद्यार्थी हा ‘बालमोहन’ नावाचा एक संस्कार घेऊनच आयुष्यभर जगतो. तो त्याचा स्वाभिमान बनतो.

थोडक्यात आमचा विश्वास आहे, की आमच्या शाळेमधील अध्ययन-अध्यापनात चिकित्सक विचार, समस्या निराकरण आणि क्षमता विकसनाबरोबर नैतिक, सामाजिक , भावनिक क्षमता आणि भाषिक विकास विद्यार्थ्यात घडून येईल. याच माध्यमातून बालमोहन जगासाठी अव्याहतपणे सुजाण नागरिक घडवित आहे आणि यापुढेही त्यासाठी वचनबद्ध आहे.

प्राथमिक विभाग

प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालमोहनमध्ये मुल हेच शाळेचे व शिक्षणाचे केंदबिंदू असून प्रत्येक विद्यार्थ्यामधील जन्मजात बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील क्षमता बालवयापासूनच ओळखणे व त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी दिशा दाखवणे यावर आम्ही भर देतो.

बालमोहनचे संस्थापक स्व. दादासाहेब रेगेंच्या विचारानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आपण स्वागतार्ह असल्याची, तसेच स्वतःची दखल घेतली जात असल्याची भावना जोपासणे हा बालमोहनच्या शैक्षणिक धोरणाचा अविभाज्य भाग आहे. एक सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याला विविध प्रकारचे अध्ययन अनुभव उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. वाचन, लेखन, भाषण, शारीरिक शिक्षण, कला, भाषा, विज्ञान आणि गणित समाविष्ट असलेल्या विषयांच्या पायाभरणीचे भरीव काम अनुभवात्मक अध्ययनाच्या माध्यमातून प्राथमिक विभागात होते.

आमचे उद्दिष्ट केवळ आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देणे इतकेच मर्यादित नाही तर ज्ञानाबरोबरच करुणा, निसर्गप्रेम, मानवतावादी मूल्ये आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विश्वप्रेम विकसित करणे हे आहे. ज्यामुळे मुले त्यांच्या पूर्ण क्षमतेने पुढील शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास सक्षम असतील. बालमोहनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण देण्याच्या आमच्या ध्येयाचा आम्हाला अभिमान आहे.

पूर्व प्राथमिक विभाग

शालेय शिक्षण हा आयुष्यभराचा अनुभव असावा असा बालमोहनचे संस्थापक स्व.दादासाहेब रेगे यांचा आग्रह होता. बालमोहनचा हा विश्वास आहे, की शाळेचा अनुभव पुढील आयुष्यात यशाचा टप्पा निश्चित करतो आणि विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर सकारात्मक आठवणी जागवतो.

पूर्व प्राथमिक शिक्षणात बालकाच्या मेंदूचा ८५% विकास होतो. त्यामुळे मेंदूच्या विकासास चालना देऊन योग्य बौद्धिक विकास साधता येतो या धारणेवर बालमोहनचा पूर्व प्राथमिक विभाग कार्यरत असतो. शिशुकेंद्री वातावरणात आंतरक्रियात्मक अध्ययनाच्या संधी या विभागात उपलब्ध करून दिल्या जातात. अनुभवात्मक अध्ययनावर भर दिला जातो.

शिक्षणसंस्था ही एक संस्कारक्षम आणि प्रगतीशील असावी ह्यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही नावीन्यपूर्णतेला महत्व देतो. आमचे विद्यार्थी खोलवर रुजलेल्या मानवी मूल्यासह स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करायला शकतील ही देखील आम्हाला खात्री आहे. आम्ही मुलांना सहिष्णुता आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करण्याचे महत्त्व शिकवतो. ‘योग्य तेच करणे’ याचे महत्व बालवयापासूनच रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

उत्कृष्टतेच्या शोधात असलेल्या आमच्या प्रवासात, प्रत्‍येक मुलामध्‍ये प्रेरक, आणि उत्‍तम गुण अंगीकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मुलांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्याची सवय बालवयातच लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यांच्या ज्ञानाची आणि कौशल्यांची क्षितिजे विकसित करण्याचा पाया रुजवणे याच वयात शक्य आहे आणि तोच आमचा प्रयत्न असतो.

बालमोहन मुलांना दोन गोष्टींचा वारसा देते; भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडून ठेवणारी मूळं आणि गगनाला गवसणी घालणारे पंख.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.