चौकटीबाहेर
बालमोहनमध्ये फक्त चार भिंतींच्या आतील शिक्षणावर भर नसतो, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या ज्या संधी उपलब्ध करून देता येतील त्या त्या दिल्या जातात.
चौकटीबाहेर
बालमोहनची शिक्षणाची व्याख्या म्हणजे मुलांना अभ्यासक्रमातील पुस्तकांतून ज्ञान देणं इतकी मर्यादित नाही, तर ही बालमनं विचारक्षम हवीत हा देखील आहे. विचारक्षम मनं ही चौकटीत घडणार नाहीत. त्यासाठी बालमोहनने चौकटीबाहेरच्या शिक्षणावर देखील भर दिला आहे. अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या अंगभूत गुणांना त्यांच्या छंदांना जर प्रोत्साहन दिलं नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही. ह्यासाठीच बालमोहनने ‘कम्युनिटी स्कुल’ ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. मुलांच्यातील विविध कौशल्य विकसित व्हावीत, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावं, खेळांच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणातून शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांचा विकास व्हावा ही ‘कम्युनिटी स्कूल’ची उद्दिष्ट्ये आहेत.
कलेची जोपासना करणे. परकीय भाषा अवगत करणे, विविध खेळांचे सुनियोजित प्रशिक्षण, विविध वाद्य शिक्षण, कौशल्य विकास यांचा समावेश यात होतो. या उपक्रमातून आनंद घेता घेता संबंधित कला विद्यापीठाच्या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास संधी उपलब्ध करून दिली जाते.
स्पर्धात्मक परीक्षा
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी शालेय जीवनापासून करून घेण्यासाठी होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, गणित प्रभुत्व परीक्षा, स्कॉलरशिप National Talent Search(NTS), National Merit-Cum Means Scholarship (NMMS) अशा अनेक परीक्षांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
प्रत्येक विद्यार्थी अर्थसाक्षर असावा यासाठी भारत सरकारच्या वित्तविभाग आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या NFLAT या अर्थसाक्षरता परीक्षेस विद्यार्थी बसतात. या परीक्षेचा अभ्यास करताना विधार्थी बँकांशी संबंधित व्यवहार, शेअर्स, विमा नियोजन, पेन्शन नियोजन, आर्थिक तक्रार निवारण असे विविध विषय अभ्यासतात. त्यामुळे भावी आयुष्यात हा विद्यार्थी सक्षम अर्थसाक्षर झालेला असतो.
आर्थिकदृष्या जागरूक आणि सशक्त भारत निर्माणात बालमोहन विद्यामंदिरचे योगदान महत्त्वाचे आहे. भारत सरकारच्या वित्त विषयक संस्थाद्वारा प्रचलित, National Centre for Finance Education (NCFE) संस्थेमार्फत सन २०२१ मध्ये शाळेला ‘Money Smart School’ म्हणून घोषित करण्यात आले.
बुद्धिबळ
बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा बुद्धिबळ हा पाश्चिमात्य खेळ म्हणून ओळखला जातो. या सर्व वयोगटातील लोकांची स्मरणशक्ती तल्लख होते. तसेच तर्कशास्त्राला धरून विचार करण्याची क्षमता या खेळामुळे वाढते. एकाग्रता, स्वतंत्र विचारशक्ती वाढवण्यास मदत होते. कल्पनाशक्ती आणि कल्पकतेला वाव मिळतो. मुलांना शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्यास या खेळाचा उपयोग होतो.
भाषा
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजी भाषेचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यासाठी प्रत्येकाने या भाषेचे ज्ञान आत्मसात करून त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इंग्रजी भाषा आज विश्वव्यापी झाली आहे, ही भाषा आत्मसात केल्याने आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतीलच. शिवाय त्यातून प्रगतीचे नवनवीन प्रांत गाठणे शक्य होणार आहे. प्रत्येकाने इंग्रजी शिकणे आणि या भाषेचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे. मराठी, हिंदी, संस्कृतसारख्या भारतीय भाषा असोत किंवा इंग्लिश आणि स्पॅनिशसारख्या जागतिक भाषा असोत, त्या उत्तम याव्यात यासाठी बालमोहन संधी उपलब्ध करून देते. आपल्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर आमचे विद्यार्थी स्पॅनिश आणि संवादात्मक इंग्रजी भाषा शिकतात.
Trinity School London Graded Examinations (GESE) :
बालमोहन विद्यामंदिर आमच्या विद्यार्थ्यांच्या ट्रिनिटी स्कूल लंडन श्रेणीबद्ध परीक्षा (GESE) आयोजित करते. आम्ही विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो.
अबॅकस
लहान वयात मुलांचा योग्य बौद्धिक विकास ‘अबॅकस’ मुळे साधता येतो. ह्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ‘अबॅकस’ मुळे काही सेकंदात मोठया संख्यांचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणिती क्रिया करणे शक्य होते. हिशेब किंवा गणिताच्या कलेत पारंगत होण्यासह मुले कोणत्याही कलेत एकाग्र होण्यास अव्वल ठरतात.
कराटे प्रशिक्षण वर्ग
शस्त्राविना आत्मसंरक्षणाची कला म्हणजे कराटे हा व्यायाम प्रकार. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक विकासाकरिता आणि व्यक्तिमत्व घडविण्याकरिता ‘कराटे’ हा शास्त्रीय बैठकीवर आधारलेला वैयक्तिक स्वसंरक्षणाच्या दृष्टीने पूर्ण विकसित झालेला व्यायाम प्रकार आहे. ह्या प्रकारात चार मुलभूत कौशल्ये अंतर्भूत आहेत. उदा. ब्लॉकिंग (Blocking), पंचिंग (Punching), किकिंग (Kicking),आणि स्ट्रायकिंग (Striking). शिवाय ताकद, श्वासोच्छवास, गती, वेळ, तालबद्धता, आत्मविश्वास आणि एकाग्रता विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला आवश्यक असलेल्या बाबी ‘कराटे’ च्या प्रशिक्षणात अंतर्भूत आहेत. स्वसंरक्षणामध्ये प्राविण्य देणारा हा विशेष अभ्यासक्रम विद्यार्थी कमी कालावधीत आत्मसात करू शकतात. ह्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल होऊन आत्मविश्वास निर्माण होतो.
शिकाई मार्शल आर्ट
शिकाई मार्शल आर्ट ही प्राचीन युद्धकला आहे. हजारो वर्षांपूर्वी काश्मीरचा राजा धोरया दवयाने त्यांच्या योद्ध्यांनाही ही कला शिकवली होती. शिकाई मार्शल आर्ट ही कला भारतातील २० वेगवेगळ्या राज्यात शिकविली जाते. शिकाई मार्शल आर्ट ही कला शालेय स्पर्धांमध्ये समाविष्ट असून जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवली जाते. इंटरनॅशनल कॉउंसिल ऑफ शिकाई मार्शल आर्ट आणि ऑर्गनायझेशन ऑफ एशियन शिकाई, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, शिकाई फेडरेशन ऑफ इंडिया, शिकाई असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि शिकाई असोसिएशन मुंबई ह्या संस्थांकडून शिकाई मार्शल आर्ट ह्या कलेस मान्यता प्राप्त झाली आहे. ह्या प्रशिक्षणामुळे शरीराची झीज भरून निघते तसेच शरीर सुदृढ बनते.
बेसबॉल
बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. बेसबॉल या खेळाचे प्रमुख उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा जमवणे हे असते. बेसबॉलच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये नैपुण्य मिळविण्यासाठी खेळाडूस अनेकविध तंत्रे आणि कौशल्ये आत्मसात करावी लागतात. हा खेळ विलक्षण गतिमान आणि रोमहर्षक होतो.
कॅलिग्राफी
भारत हा सांस्कृतिक वारशाने संपन्न देश आहे. भारतीय कला आणि संगीताला इतिहासात स्वतःचे विशिष्ट स्थान आहे. कॅलिग्राफी ही भारतीय कलेपैकी एक महत्त्वाची कला आहे. अशोकाच्या स्तुपांवर असे दिसून येते की कॅलिग्राफीची कला प्राचीन भारतात खूप विकसित झाली होती आणि मध्ययुगीन भारतातही ती विकसित होत राहिली. तसेच त्या काळातील चित्रांमध्येही ती दिसून येते. आधुनिक भारतातही, संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेली भारतीय राज्यघटनेची पहिली प्रत या प्रसंगी खास कॅलिग्राफ केलेली होती. कॅलिग्राफीची संकल्पना हस्तलेखनाच्या कल्पनेमध्ये कलात्मकतेच्या संबंधित आहे. ही एक अशी कला आहे जी माणसाला सुंदर हस्ताक्षरात लिहिण्यास सक्षम करते.
सजग जीवनशैली
व्यवहारज्ञानातून शिक्षण आणि त्यासाठी संबंधित ठिकाणी मुलांना घेऊन जाणे म्हणजेच फील्ड ट्रीप. भाजीबाजार, अग्निशमन केंद्र आणि पोस्ट ऑफिस येथे विद्यार्थ्यांना नेले जाते, आणि तिथे चालणारे कामकाज मुलांना प्रत्यक्ष दाखविले जाते.
तसेच, विद्यार्थाना ऋतूबदलानुसार आहारात होणारा बदल तसेच त्याचे महत्व पटवून देण्यासाठी शाळेत उन्हाळा सुरु होताना आंबेडाळ व कलिंगड विद्यार्थ्यांना दिले जाते. छोटी मुले त्याप्रमाणे त्या रंगांचे कपडे घालतात जेणे करून त्यांना रंगांचे ज्ञान व्हावे. बालकांच्या विकासामध्ये सकस आहाराचे अत्यंत महत्व आहे. विद्यार्थ्याना सकस आहाराची गोडी बालपणापासूनच लागावी या उद्देशाने त्यांना आठवड्याच्या डब्यातील आहार पण वाराप्रमाणे आखून दिला जातो.
दादासाहेब रेगे संगणक ज्ञानांगण
बदल हा जसा जगण्याचा स्थायीभाव आहे तसंच जगात घडणारे नवे आणि चांगले बदल विवेकी मूल्यांच्या घट्ट धाटणीसह अंगीकारणे हा बालमोहनचा स्थायीभाव आहे. त्यामुळे बालमोहन कधीही कालबाह्य झाली नाही. १९ व्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती झाली आणि संगणक आपल्या आयुष्यात प्रवेशला. हे येणारे नवे तंत्रज्ञान बालमोहनच्या विद्यार्थ्यांना शिकता यावे ह्यासाठी १९८५ साली बालमोहन संगणक वर्ग सुरु करण्यात आला.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.