मुलांच्या मनाचा मागोवा ३६० अंशातून
२००७ साली बालमोहन शाळेच्या आवारातच ‘३६०° अंशातून मनाचा मागोवा’ हा प्रकल्प आम्ही सुरु केला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रयत्न बालमोहन करते.

भावविश्व ३६०°
वाढत्या वयात पाल्याची काळजी आपल्याला विविध कारणांमुळे वाटत असते. घरातल्या अडचणी, नातेवाईक, भावंडांमधले आणि मित्र-मैत्रिणींमधले परस्पर संबंध, वयानुसार घडणारे शारीरिक – मानसिक बदल, टी .व्ही. व मोबाईल यांसारख्या प्रलोभनांपासून दूर ठेवणे असे अनेक प्रश्न पालकांबरोबर मुलांना ही सतत भंडावून सोडत असतात. पर्यायाने त्यांची विचारसरणी आणि वर्तणूक सदोष होऊ शकते. अभ्यास आणि तब्येतीवर जर दुष्परिणाम दिसू लागले तर आपली चिंता अधिकच वाढते. तारुण्यात पदार्पण करत असलेल्या मुलांचा चिडचिडेपणा, खट्याळपणा, स्वप्नात रमणे, पालकांशी सुसंवाद टाळणे, बऱ्याचदा मुले आवाक्या बाहेर जातात .
हे आणि असे बरेच प्रश्न मुलांच्या बाबतीत सगळ्यांनाच थोड्या फार फरकाने निर्माण होत असतात. आणि या विविध प्रश्नांकडे केवळ समजावून सांगितले की होईल सारे बरोबर, असा दृष्टिकोन ठेवून आता चालणार नाही. तर मुलांच्या बरोबरीने पालकांनाही त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे आणि हे जाणूनच बालमोहनमध्ये ‘समुपदेशनकेंद्र’ (Counselling Center)सुरू करण्यात आले आहे. मुलांचा मेंदू उत्क्रांत होत असताना तो पिढी दर पिढी अधिकाधिक सजग होत आहे, प्रगल्भ होत आहे, असा अनुभव येतो. मेंदूमध्ये बौद्धिकआणि भावनिक दोन्ही केंद्रे असतात. त्यामुळे वाढत्या वयात बुद्धिमत्तेला आव्हान पेलणारी, चालना देणारी तसेच मुलांच्या भावनांना मोकळ्या वाटा करून देणारी शाळा हीच एक उत्तम समुपदेशन केंद्र ठरू शकते.
आता पूर्वीच्या शिक्षणावर बसलेली धूळ झटकायला हवी. मुलांचे मानसशास्त्र नव्याने जाणून घेऊन, शिक्षण क्षेत्रात रोज नव्याने काय घडतंय याबद्दल जागरूक होऊन, नवीन पिढीला सामोरे जाताना उत्तम अध्यापन, वाचन, निरीक्षण, संशोधन या सर्वांबरोबर समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प बालमोहन विद्यामंदिर , मराठी माध्यमाने सुरू केला आहे. हा नव्या काळाबरोबर नव्या वाटेने चालण्याचा एक शुभसुचक समंजस प्रारंभ आहे.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.