loader image

अभिनव समारंभ

भारतीय संस्कृतीत सणांना असाधारण महत्व आहे. मुलांच्या मनावर याचे महत्व बिंबवणं ही बालमोहन आपली जबाबदारी समजते. काळानुरूप आज घराघरात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरी, शाळेत ते पारंपारिक पद्धतीने आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग ठेवूनच केले जातात.

बालदिन

मकरसंक्रातीनंतरचा दुसरा दिवस हा बालमोहनच्या विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्याचा दिवस. शाळा पतंगांनी आणि पताकांनी सजलेली असते, मुलांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असते आणि म्हणूनच तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी म्हणून दिला जाणारा दहावीच्या विद्यार्थिनींनी बनविलेला ‘तिळाचा लाडू’ खाऊ म्हणून दिला जातो.

भातुकली

स्वश्रमातून बनलेल्या भोजनाचं महत्व पटवून देणारी भातुकली. भातुकलीच्या एक दिवस आधी मुले शाळेत मटार सोलण्यासारख्या लहान लहान कामात मदत करतात. आणि हो, टेबल-खुर्चीच्या काळात पण मांडी घालून रांगोळ्या आणि उदबत्तीच्या सुवासात सहभोजनाची गंमत अनुभवतात.

बालकोत्सव – स्नेहसंमेलन

शालेय शिक्षण आणि त्याबरोबर होणाऱ्या बौद्धिक प्रगतीत हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची नकळत बीजं रोवण्यास कारणीभूत ठरतात. त्यायोगे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पैलू पडतात. बालमोहनमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील ‘बालकोत्सव’ आणि प्राथमिक-माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देते.

कला प्रदर्शन

विद्यार्थ्यांमधील हस्तकला, चित्रकला, शिल्पकला वृद्धिंगत व्हावी तसंच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी ह्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलाकृती व प्रयोग ह्यांना प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळणं नितांत आवश्यक असतं आणि बालमोहनमध्ये अशी सुसज्ज कला-विज्ञान प्रदर्शने आवर्जून भरवली जातात.

क्रीडा

बालवयात सर्वात जिव्हाळ्याचं काय असेल तर खेळणं-बागडणं आणि ह्याच काळात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता रुजवणं, खिलाडूवृत्ती वाढवणं, खेळाडू घडवणं, त्याला प्रोत्साहन देणं ह्यासाठी बालमोहन कायम आग्रही आहे. म्हणूनच बालमोहनचे विद्यार्थीही अनेक शालेय-आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून बालमोहनची विजयी पताका डौलाने फडकवितात.

गोकुळाष्टमी

आपल्या संस्कृतीत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत श्रीकृष्णचरित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात मार्गक्रमण करताना श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राची ओळख होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गोकुळाष्टमीच्या औचित्याने गोकुळातील पारंपरिक वेष परिधान करून विद्यार्थी दहीहंडी फोडतात. हा सण साजरा करताना विद्यार्थ्यांना संघशक्तीचीही प्रचिती येते.

नवरात्र – भोंडला

नवरात्रीतील ‘जोगवा गीत’ स्त्री-शक्तीचे दर्शन घडवितो. पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळावेगळा उत्सव. हत्ती हे वैभवाचं प्रतिक. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची ही पूजा. भोंडल्याचा हा सण साजरा करण्यामागे पावसाबद्दलची कृतज्ञता, जुन्या काळातील चालीरीती, देवदेवतांची स्तुती यांचे दर्शन घडविले जाते.

दसरा

दसरा हा तर बालमोहनच्या आजीमाजी विद्यार्थांच्या भेटीचा दिवस. शाळेत सरस्वती पूजन झाले की मग सारेजण एकमेकाना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. माजी विद्यार्थी आवर्जून या दिवशी शाळेला भेट देतात. सारी वास्तू पारंपारिक पोशाखात सजलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी बहरून जाते.

दिवाळी

दीपावलीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण, विद्यार्थ्यांना शाळेकडून पणत्या दिल्या जातात आणि दिवाळीच्या चार दिवसांत विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत शाळेत येऊन त्यांना दिलेली पणती लावतात. बुंदीच्या लाडवाचा खाऊ खात आपल्या मित्र-मैत्रिणीनी लावलेल्या पणत्या पाहत मुलं प्रकाशोत्सवात दंग होऊन जातात.

शिक्षकदिन

शिक्षकांचे शैक्षणिक अनुभव, त्यांची जीवनविषयक दृष्टी, त्यांनी केलेले शैक्षणिक प्रयोग, त्यांनी स्वीकारलेली जीवनमूल्ये, सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य, त्यांना मिळालेल्या प्रेरणा, त्यांनी घडविलेले विद्यार्थी ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बालमोहनमध्ये शिक्षकदिन आवर्जून साजरा केला जातो.

राष्ट्रीय सण : ध्वजारोहण सोहळा

गुलामगिरीत जखडलेला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ साली संपूर्णतः स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताला लोकशाहीप्रधान संविधान लाभलं हे दोन क्षण बालमोहनमध्ये राष्ट्रीय सणासारखे साजरे केले जातात. शाळेच्या आवारात ध्वजारोहण केलं जातं, विद्यार्थी संचलन, समूहगायन करतात. मान्यवर मार्गदर्शन करतात आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जागवल्या जातात.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.