आठवणीतील पाऊले
शाळेची स्वत:ची पहिली बैठी इमारत
ती जागा मोकळी होती. लांबच लांब होती. तेथे माडाची झाडे पुष्कळ होती. दूर कोपऱ्यावर पिंपळाचे झाड व जरा अलीकडे आंब्याचे झाड होते. इमारत बांधताना माडाची काही झाडे तोडावी लागली. त्या जागेवर सिमेंटच्या पत्र्यांची बैठी इमारत बांधली जाणार होती. दादा इमारत बांधून पुरी करण्याच्या कामात एवढे दंग झाले होते, की ते तहानभूक विसरले होते. हळूहळू इमारतीचे बांधकाम जोरात चालू झाले. मार्च १९४६च्या मानाने ती इमारत जवळजवळ पूर्ण झाली होती. शाळेच्या मालकीची ती पहिली इमारत होती. ती बैठी व ठुसकी इमारत होती. वर सिमेंटचे पत्रे आणि बाहेरून लाल विटा लावलेल्या. अगदी लांबलचक लाल आगगाडीसारखी इमारत दिसायची. या इमारतीच्या आवारात दोन पटांगणे होती. एक दक्षिणेकडील व दुसरे उत्तरेकडील. अगदी रस्त्याच्या बाजूला कंपाउण्ड कसले केले असेल? इमारत बांधताना माडाची झाडे तोडली होती, त्या माडांच्या खोडांचे फुगीर भाग रस्त्याच्या बाजूला एकापुढे एक लावून छान कंपाउण्ड केले होते. इमारतीच्या मध्यभागी दादा व परुळेकरसाहेब ह्यांची कार्यालये होती. शिक्षकांसाठी एक मोठी खोली. ती दादांच्या खोलीला लागूनच होती. दर्शनी भागाच्या समोर पश्चिमेला छपराशिवाय असलेल्या मोकळ्या जागेत दगडमातीचा ६-७ फूट उंचीचा उंचवटा करून त्यात छोट्या वनस्पती, दुर्वा लावल्या होत्या. इमारतीचे प्रवेशद्वार छानच दिसत होते. शाळेच्या नावाचा नवीन फलक इमारतीच्या मध्यभागी लावला होता. शाळेचे नेहमीचे पेंटर ‘पोवार ब्रदर्स’ यांनी तो तयार केला होता. आत शिरल्यावर दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये सिमेंटचे फळे तयार केले होते. इमारतीची उभारणी आणि आतील सजावट माझ्या देखत झाल्यामुळे मी त्या परिसरात उत्साहाने वावरत असे.
अशा रीतीने नटवलेल्या आणि सजवलेल्या इमारतीचे उद्घाटन दादांनी १६ जून १९४६ रोजी निश्चित केले होते. दादांची महत्त्वाकांक्षा फार मोठी! ह्या बैठ्या इमारतीच्या उद्घाटनाला दादांनी लोकसभेचे सभापती खासदार श्री.ग.वा. मावळकर यांना आमंत्रित केले होते. त्यांचा होकारही आला. जसजसा उद्घाटनाचा दिवस जवळ येऊ लागला, तसतसा दादांच्या धावपळीचा वेग वाढत होता.
उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उत्तरेकडील प्रांगण खुर्च्या व कुंड्या लावून व छोटेसे स्टेज बांधून सजविले होते. पाहुण्यांना माहिती देत दादांनी शाळा दाखविली. त्यानंतर त्यांना प्रांगणात आणले. प्रथम मुलांचे विविध मनोरंजक कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मास्टर विनायक (कर्नाटकी) हाच्या दोन मुलींचे (मीनाक्षी व नंदिनी) राधाकृष्ण नृत्य फार सुंदर झाले. त्या कार्यक्रमात श्रीमती लता मंगेशकर ह्यांनी त्या नृत्याला योग्य असे पार्श्वगायनही केल्याचे मला आठवते. त्यावेळी त्यांना मी अगदी जवळून पाहिले होते. मीनाक्षी आणि नंदिनी शाळेत शिकत होत्या. आशाताई, हृदयनाथ, मीनाताई आणि उषाताई ही लतादीदींची सर्व भावंडेही काही वर्षे बालमोहन विद्यामंदिरात शिकत होती.
श्री. ग.वा. मावळंकरांच्या हस्ते बक्षीस समारंभही झाला. त्यांनी आपल्या भाषणात शाळेचा गौरव केला आणि शाळेच्या इमारतीचे उदघाटन झाल्याचे जाहीर करून शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा उद्घाटनसोहळा शिवाजीपार्क परिसर आणि सबंध दादर विभाग यामध्ये खूप गाजला. या सोहळ्यामुळे शिवाजीपार्क वसाहतीतील पालकांना शाळेविषयी जास्त आपुलकी आणि प्रेम वाटू लागले. शाळा त्यानंतर प्रगतिपथाकडे भरधाव धावू लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शाळेतील सर्व मुले उत्तरेकडील पटांगणात जमली. अर्धवर्तुळाकार रांगेत मुले शिस्तीने उभी राहिली. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक श्री. गो.आ. कुळकर्णी यांनी तिरंगी झेंडा फडकावण्यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी केली होती. दादांच्या हस्ते ध्वज फडकावला आणि सर्व मुलांनी एकसाथ झेंड्याला मानवंदना दिली. ‘विजयी विश्वतिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा’ हे ध्वजगीत सर्व मुलांनी गायले. दादांनी आपल्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास सांगून त्या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी देशभक्तांची आणि वीरांची आठवण मुलांना करून दिली आणि सहस्रावधी ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीला अभिवादन केले पाहिजे असे मुलांना सांगितले. शेवटी रवीन्द्रनाथ टागोरांचे ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत सर्व मुलांनी एका सुरात म्हटले आणि झेंडावंदनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
त्या दिवशीची विशेष गोष्ट म्हणजे शाळेने सर्व मुलांना जेवण दिले आणि मुलांनी सहभोजनाचा आस्वाद घेत १९४७चा पहिला स्वातंत्र्यदिन उत्साहाने सणासारखा साजरा केला.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.