आठवणीतील पाऊले
आमचे कोचरे गाव
आमचे मूळ गाव कोचरे’. या गावी आमचे पूर्वज फार पूर्वी येऊन राहिले. आम्ही मूळचे गोव्याचे. गोव्यात पोर्तुगीज शिरले आणि गोव्यातील धार्मिक, सांस्कृतिक गोष्टींना तडा पडला. पोर्तुगीजांच्या हल्ल्यामुळे गोव्यातील सर्व लोक संरक्षणासाठी गोव्याच्या उत्तरेस आणि दक्षिणेस पलायन करून तेथे स्थायिक झाले. जे लोक गोव्याची हद्द ओलांडून सावंतवाडीकडे आले, त्यात आमचे पूर्वजही होते. सोळाव्या शतकापासून गोव्यातून निघालेले रेगे घराणे कोचरे येथे स्थायिक झाले. अशा रीतीने स्थायिक झालेला आमच्या घराण्यातील मूळ पुरुष ‘रघू शेणवी’ होय. रेगे घराण्याने पुढच्या अनेक पिढ्यांत लोकांना शिक्षण देऊन संस्कृतीचे बीज गावात पेरले आणि ते रोपटे वाढवले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेले कोचरे हे छोटेसे गाव. ते वेंगुर्ले तालुक्याच्या उत्तर टोकास आहे. पूर्वेस केळूस, म्हापण, पाट, तर उत्तरेस शेवटचे गाव परुळे आणि दक्षिण आणि पश्चिमेच्या बाजूला अरबी समुद्र अशा साधारणपणे चतुःसीमा आहेत. गावाच्या दक्षिण, उत्तर व पश्चिम बाजूस हिरवेगार डोंगर आहेत. पश्चिम बाजूस लहानसाच पण स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा आहे. पश्चिमेच्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूस इतिहास प्रसिद्ध निवती किल्ला आहे, तर समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे सहा मैलभर, समुद्रात ब्रिटिशांनी सुमारे २०० वर्षांपूर्वी बांधलेले व अद्यापही संपूर्ण रात्रभर जहाजांना धोक्याची जाणीव देऊन मार्गदर्शन करणारे आशियातील मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे दीपगृह आहे. अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांनी आमचा कोचरे गाव नटलेला आहे.
आमच्या गावचे प्रमुख ग्रामदैवत श्री रवळनाथ आहे. त्याच्याबरोबर श्री वेतोबा, श्री भावईदेवी, श्री रामेश्वर याही अन्य ग्रामदेवता मानल्या जातात. यांचे वार्षिक उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी अत्यंत श्रद्धापूर्वक उत्साहाने व धुमधडाक्याने साजरे करतात. ही फार पुरातन मंदिरे आहेत.
सुमारे हजाराच्या आसपास घरे व पाच हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात पूर्वी उन्हाळी, पावसाळी थोडीशी डोंगरी शेती, बागायती, मासेमारी आणि थोडासा व्यापारउदीम व बाहेरगावी मुंबईस गेलेल्या चाकरमान्यांकडून येणारी मनी ऑर्डर यावर गावातले व्यवहार चालत. आता फारच फरक पडला आहे. गावात वीज आल्याने विजेवर चालणारे काही उद्योग सुरू झाले. विहीरीवर पंप बसवल्यामुळे कमी श्रमात शेती, बागायती होऊ लागली. मत्स्यशेतीचेही यशस्वी प्रयोग होऊ लागले. नगदी उत्पन्नासाठी आंबे, काजू, नारळ, पोफळी यांची जाणीवपूर्वक लागवड होत आहे. रस्त्यांची संख्या वाढल्याने, आधुनिक वाहनांची वर्दळ वाढून दळणवळण सोपे झाले आहे. जवळच ‘पाट’ या गावी माध्यमिक शाळा व तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालये झाल्याने मुले जिद्दीने रोज जाऊन-येऊन शिक्षण पुरे करीत आहेत. साक्षरता बहुतेक पूर्णत्वास गेली आहे. वीज आल्याने काही ठिकाणी दूरध्वनी आले आहेत. बहुतेक सधन घरात दूरचित्रवाणीचे संच आले आहेत. त्यामुळे बाह्य जगाशी नित्य संपर्क वाढून ज्ञानात भर पडत आहे. त्यामुळे कोचरे गावाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रांतही विकास होऊन त्याला जिल्ह्यामध्ये मानाचे स्थान प्राप्त होत आहे.
अशा कोचरे गावाचे आकर्षण मला बालपणापासून आहे. माझ्या बालपणी मी एक-दोन वर्षांच्या आड कोचरे गावी माझ्या दादांच्या बरोबर, तर काही वेळा दाजीकाकांच्या बरोबर जात असे. सर्वसाधारणपणे मे महिन्यात जेव्हा कोचाऱ्याला जात होतो, त्यावेळी आंबे, फणस, काजू, करवंदे, इत्यादी कोकणचा मेवा खाण्यात आमचे दिवस मजेत गेले. तसेच शहाळ्याचे पाणी आणि मलई खाणे आमच्या आवडीचे असायचे. डुंगलीवर फिरायला जाणे हा तर माझा नित्यक्रमच असायचा.
मी प्रथम कोचऱ्याला १९३९ च्या सुमारास मुंबईहून बोटीने गेलो. माझे आजोबा-आजी त्यावेळी गावात स्थायिक होऊन राहिले होते. मला आठवते, त्यावेळी मी, दादा व दाजीकाका ह्यांच्याबरोबर बोटीतून गेलो होतो. भाऊच्या धक्क्यावर बोटीत बसलो. मला तो नवीनच अनुभव होता. बोट सकाळी सुमारे १० वाजता सुटली. आम्ही घरांतील चार-पाच माणसे एक सतरंजी वरच्या डेकवर पसरून प्रथम जागा अडवल्या. जसजशी बोट समुद्रातून जाताना वेग घेऊ लागली तसतशी मला मजा वाट लागली. फेसाळलेले पाणी डेकवरून बघताना, काही वेळाने जरा दूर गेलो की मागे पडलेली मुंबई पाहताना विलक्षण गंमत वाटे. आम्ही घरून जेवण नेले होते. जेवण झाल्यावर मात्र काही वेळाने पोटात कसे तरी होऊ लागले. एकदा दोनदा मला पोटात ढवळून उलट्याही झाल्या. मी सबंध दिवस झोपूनच होतो.
ही बोट वेंगुर्ला बंदराजवळ यायला दुसऱ्या दिवशीची पहाट झाली. बंदर जवळ आल्यावर समुद्रातच बोट थांबल्यावर आम्ही खालच्या डेकवर गेलो. तेथून पाहिले तर काही पडाव आमच्या बोटीजवळ येत होते. पडावातून आम्हाला वेंगुर्ला बंदराकडे जायचे होते. आम्ही सर्वजण एकमेकांचा आधार घेत हळूहळू पडावात बसलो व धक्क्याला पोचलो. बंदरावर शेजारीच एक खाणावळ होती तेथे चहा आणि थोडेसे खायला घेतले आणि कोचऱ्याला जाणाऱ्या खाजगी बसमध्ये बसलो.
त्यावेळचे रस्ते म्हणजे धुळीचे तांबडे रस्ते. बाजूला पाहिले तर निळे निळे सुंदर डोंगर. आम्ही सुमारे दीड तासाने म्हापणवरून कोचऱ्याच्या सीमेजवळ पोहोचलो. आम्ही पाणंदीतून उतरणीवरून चालत चालत घराकडे गेलो. आमचे घर रस्त्याच्या खालच्या बाजूला होते. म्हणून उंचावरून घराचा भाग दिसला. माझ्या आजोबांना व आजीला आम्हाला पाहन खुप आनंद झाला. दाजीकाका, दादा, माझी आत्या आणि माझ्या चुलतबहिणी घरात आल्यावर आजोबांशी मालवणीतून गप्पा मारण्यात गुंग झालो होतो. आजीही आम्हाला पाहून माजघरातून ओटीवर बाहेर आली.
माझे आजोबा तलाठी होते. त्यांना गावात खूप मान होता. त्यांची खोली उजव्या बाजूला होती व ते तेथे आपले काम करत असत. डाव्या बाजूला मोठे देवघर होते. घरासमोर मोठे खळे होते. ते शेणाने सारवून ठेवले जात असे. खळ्यात तुळशीवृदांवनही होते. आमच्या घरात माजघर, स्वयंपाकघर कोठीची खोली, बाळंतीणीची खोली, मागच्या बाजूला गुरांसाठी गोठाही होता. आमच्या दोन विहीरी होत्या. एक वरची विहीर. तेथे, कळशीने पाणी काढले जायचे आणि खालची विहीर म्हणजे खालची बाव’, ती व्यवस्थित बांधून काढलेली. त्या विहीरीचे पाणी कोळंब्याने काढत. त्या बावीला छोट्या पायऱ्याही होत्या.
रवळनाथाच्या देवळाजवळ असलेली शाळा दादांनी दाखवली आणि सांगितले, की या शाळेत मी शिकलो. देवळाच्या बाजूला पांढऱ्या चाफ्याचे झाड होते. त्या बाजूची जागा दादांनी मला दाखवली आणि सांगितले की या ठिकाणी आमच्या शाळेतील मुलांचा ग्रुप फोटो काढला होता. तो या गावचे दुसरे प्रतिष्ठित श्री. भाऊसाहेब भेंडे यांनी वेंगुर्लाहून फोटो काढणारा माणूस आणला होता. (तो फोटो दादांच्या “माझे जीवन : माझी बाळं” ह्या आत्मचरित्रात समाविष्ट केला आहे.)
दुसऱ्या दिवशी आजोबांनी मला पोस्ट ऑफिस दाखवले. त्या पोस्ट ऑफिसकडे जाताना डाव्या बाजूला कोचरे नं.१ ची कौलारू शाळा लागली. आजोबांनी सांगितले, की या शाळेत तुझे ‘दादा’ शिकले. त्यानंतर पोस्ट ऑफिसकडे नेले. आजोबांना फिरण्याची फार हौस होती.
मी १९५० पर्यंत जवळजवळ एक वर्षाआड कोचऱ्याला मे महिन्यात जात असे. अर्थात माझ्याबरोबर घरची मंडळी असायची. मी कोचऱ्याला जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन शिकून आलो आहे.
आजोबा मला सोबत घेऊन देवांची पूजा करत असत. त्यांची गणपतीवर खूप श्रद्धा होती. त्यामुळे गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने ते रोज म्हणत असत. मीही त्यांच्याबरोबर म्हणायला सुरुवात केली आणि साहजिकच माझे अथर्वशीर्ष पाठ झाले. देवपूजेसाठी लागणारे तांबड्या आणि पांढऱ्या रंगाचे गंध सहाणीवर झरवून देण्याची कलाही मी अवगत केली. अलिकडे आपण ताटामध्ये जेवतो. गावाला मात्र वडाच्या, फणसाच्या किंवा कुड्याच्या पानांच्या पत्रावळीवर जेवत असत. त्या पत्रावळी कशा तयार करतात हे मला माझ्या आजीने शिकवले. त्यामुळे मी जेवणासाठी लागणाऱ्या पत्रावळी तयार करायला लागलो.
मी विहिरीतून कळशीने पाणी काढायला शिकलो. घराच्या खालच्या बाजूला जी विहीर होती जिला ‘बाव’ म्हणत असत. त्या बावीचे पाणी अतिशय गोड असे. ते कधीही आटत नसे. त्या बावीचे पाणी काढताना एक निराळे साधन मी पाहिले. त्याला ‘लाट’ म्हणत असत. त्या लाटेला एक जाडजूड बांबू आणि पत्र्याचे कोळंबे’ लावलेले असे. एकदा आमचा भागेली आना दाभोळकर लाटेने पाणी काढताना मी पाहिले. मी त्याला म्हटले, की तू मला लाटेने पाणी काढायला शिकव. तो माझ्याकडे पाहतच राहिला. तो म्हणाला, “बापूनूं, ह्या तुझा म्हणणा ऐकून माका आनंद झालो. मी तुका लाटेन पाणी काढूक उद्या शिकवान.” दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता मी आणि आना त्या बावीकडे गेलो. त्याने कोळंब्याचा बांबू आपल्या हातात घेतला आणि विहिरीतल्या आडव्या तिरप्या वाशावर कोळंब्यावर पाय ठेवून एकदम उडी मारली आणि हातातला बांबू पाण्यापर्यंत नेला. बांबू थोडासा हालवून कोळंब्यात पाणी भरले आणि तो बांबू वर करत करत वाशावरून परत बावीच्या पृष्ठभागाकडे आला. ते पाहून मीही काठी आणि कोळंबे हातात घेतले आणि स्वत:ला सावरत सावरत तिरप्या वाशावरून चालत चालत विहिरीच्या मध्यभागी आलो आणि नंतर आनाने जसे केले तसे मी करण्याचा प्रयत्न केला. कोळंबे थोडे आडवे केल्याने पाणी त्यात शिरले, पण कोळंबे पूर्ण भरले नव्हते. मी विचार केला, पुढच्या वेळी कोळंबे पाण्याने पूर्ण भरायचे. हातातील बांबूला घट्ट धरत वाशावरून चालत चालत मी बावीच्या पृष्ठभागावर आलो. खरोखरच ते फार मोठे कसब होते. त्यानंतर मी आनाच्या समोरच पुढील आठ दिवसात चार-पाच वेळा कोळंब्याने त्या बावीचे पाणी काढू शकलो. याचा मला खूप आनंद झाला.
गावच्या वास्तव्यात मी आणखी एक गोष्ट शिकलो. बाबल्या माडकर, आत्माराम तेली, नारो म्हापणकर, इत्यादी आमचे भागेली, आम्ही गावाला आलो की शहाळी घेऊन यायचे. त्या शहाळ्याच्या पाण्याची चव काही निराळीच असायची. शहाळ्यातील कोवळे खोबरे (आम्ही त्याला मलई म्हणतो) खायला मजा येत असे. एकदा मला भागेल्याने चार-पाच असोले नारळ आजोबांपुढे ठेवले. त्या भागेल्याने आमच्या खळ्यात असलेल्या सुळक्यावर ते असोले नारळ सोलले. (बाहेरील साल म्हणजे नारळाचे सोडण) सुळक्यावर जोराने असोला नारळ आपटून तो संपूर्ण नारळ सोलला जायचा. मला वाटले, आपणही असा प्रयत्न करून असोला नारळ सोलावा. असोला नारळाचे सोडण काढून नारळ बाहेर काढणे हे खरोखरच फार मोठे कौशल्य होते. असोला नारळ सुळक्यावर सोलायला शक्तीही बऱ्यापैकी लागते. पण मी हे करायला चार-पाच दिवसांत शिकलो आणि मग असोला नारळ सुळक्यावर सोलायचा मला नादच लागला. अजून मी जेव्हा कोचऱ्याला जातो तेव्हा सुळक्याच्या साहाय्याने दोन तरी असोले नारळ सोलतोच सोलतो.
एकदा पावसाच्या दिवसात आना दाभोळकर आणि त्याचा मुलगा गणप्या यांनी मला डुंगलीवर नेले. पाऊस पडत असल्याने घोंगडीची खोळ करून मी ते घोंगळे डोक्यावर घेतले होते. आनाने मला भाताचे रोप लावायला शिकवले. मी पंचवीसहून अधिक भाताची रोपे लावली. हा मला अगदी नवीन अनुभव होता.
आजोबांना फुलझाडांचा छंद होता. घरच्या दर्शनी भागात गुलाबाची पुष्कळ झाडे लावलेली होती. बाजूला देवकेळीची झाडे होती. घराच्या वरील बाजूच्या परसात जाईजुईचे मंडप, सफेद, लाल सदाफुली, लाल पिवळ्या रंगाच्या गुलबक्षी, अगस्ता, चाफा, जास्वंदीची लाल, पांढऱ्या रंगाची फुले असलेली छोटी झाडे लावलेली होती. त्या बागेच्या बाजूला तुळशीची रोपेही होती. हे सर्व पाहण्यात आणि त्यांचा सुगंध घेण्यात मला मजा वाटे. वरच्या परड्यात पारिजातकाचेही झाड होते. देवपूजेला लागणारी फुले, तुळशी, दुर्वा मी तेथून परडीत घालून आणीत असे. मी परड्यातून फिरताना मला लाजाळूची पसरट झुडपेही पाहायला मिळाली. त्याच्या पानांना हात लावला की त्या एकदम मिटत असत. असे निसर्गाचे चमत्कार मला आमच्या घरच्या फुलबागेत पाहायला मिळाले.
घराच्या आजुबाजूला रायवळ आंब्याची बरीच झाडे होती. आंब्याच्या झाडांपैकी एक पेरव्या आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या प्रकाराला पेरूवरून ते नाव पडले असावे, कारण त्या आंब्याची साल पेरूसारखी लागे. आम्ही मे महिन्यात बऱ्याच वेळा गावी असायचो. फणस, आंबे आणि काजू यावर यथेच्छ ताव मारत असू, तसेच डुंगलीवरील काजूच्या झाडाचे बोंड तोडून घरी आणत असू. त्या बोंडाच्या खालच्या बाजूला काजूचे बी असे. घरी आजी आम्हाला बोंडाचे लहान तुकडे करून, त्याला तिखट-मीठ लावून ‘कर्माटे’ करून खायला द्यायची. त्याची चव काही निराळीच असायची.
एकदा मी आजोबांना विचारले की काजूच्या बीमध्ये काजू असतो ना? मग तो कसा बाहेर काढतात. त्यांनी लगेच आनाला बोलावले व एक दिवस आनाने मोठी चूल पेटवून काजूच्या बिया त्या चुलीत टाकल्या. त्या भाजल्यावर त्या बिया बाहेर काढल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला बरोबर घेऊन त्या काजूच्या बिया फोडल्या व त्यातून काजू काढायला सुरुवात केली. मला तर मजाच वाटली. मी काजू खाल्लेले असले, तरी ते, काजूच्या बीमधून कसे बाहेर काढतात ते मी पहिल्यांदाच पाहत होतो.
फणसाचे झाडही मी प्रथम पाहत होतो. फणस झाडाच्या खोडावर लागायचे. त्यातले दोन प्रकार मला माहिती झाले. एक ‘कापा’ फणस आणि दुसरा ‘बरका फणस’. कच्च्या फणसाला फणसाची कुयरी म्हणतात.
आमच्या घराच्या दुसऱ्या जागेत माडाची, पोफळीची झाडे होती. पोफळीची झाडे म्हणजे सुपारीची झाडे. माडाची झाडे म्हणजे नारळाची झाडे. परड्यात फिरत असताना मला रातांब्याचीही झाडे पाहायला मिळाली. रातांब्याची फळे, आंबट. त्या झाडांची पानेही मी खाऊन पाहिली. तीही आंबट होती. तसेच माडाच्या भोवती वरपर्यंत चढत गेलेल्या पानवेलीही पाहिल्या. खरोखरच ही उघडी निसर्गशाळाच नव्हे काय?
१९५२ साली दादांबरोबर कोचऱ्याला जाण्याचा योग आला. हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा योग होता. दादांची रवळनाथावर असीम श्रद्धा.शाळेच्या पहिल्या इमारतीसाठी कर्ज काढायला सुरुवात करतेवेळी श्री रवळनाथाकडे दादा बोलले होते की मी कर्जमुक्त लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी कर्जमुक्त झालो की तुझ्या दारात एक मोठी घंटा बांधीन. दादा कर्जमुक्त झाले आणि त्यांनी ठरवले की एप्रिल महिन्यात कोचऱ्याला सहकुटुंब जायचे. आम्ही वरच्या वाटेने म्हणजे बेळगावमार्गे कोचऱ्याला निघालो. दादा वाटेत आम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग अभिमानाने सांगत होते. आम्ही कोचऱ्याला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी श्री देव रवळनाथाच्या देवळात गेलो. देवळात प्रवेश करताना नेहमीचा देवाला गा-हाणे घालणारा सेवक बरोबर घेतला होता. गाभाऱ्यातील समईची ज्योत पुजाऱ्याने जरा मोठी करून आम्हाला देवाचे दर्शन दिले. दादांनी देवळात येण्याचे कारणही त्या सेवकाला सांगितले. बरोबर आणलेली फुले देवाच्या चरणी वाहिली आणि मनोभावे श्री देवरवळनाथाला नमस्कार केला. सोबत आणलेली घंटा त्याच्या चरणी ठेवली. आम्ही सर्वांनी प्रदक्षिणा घातली आणि देवासमोर हात जोडून उभे राहिलो. त्या सेवकाने बादेवा महाराजा… अशी देवाला साद घालून रवळनाथाला गा-हाणे सांगायला सुरुवात केली. सुमारे पाच मिनिटे गा-हाणे नेहमीच्या प्रथेप्रमाणे चालू होते. त्या गाऱ्हाण्यात दादा देवळात का आले आहेत, त्यांची कोणती इच्छा आहे, इत्यादीपासून सुरुवात करून, दादांकडून अशीच सेवा करून घेवची अशी देवास विनंती करून शेवटी शाळेची यापुढे नेहमी अशीच भरभराट होवो अशी इच्छा व्यक्त केली. आणि होय महाराजा असे बोलून गा-हाण्याची सांगता केली. त्यांनतर त्याने दादांकडे देवावरची फुले, नारळ, हळदकुंकू आणि अंगारा दिला. आम्ही पुन्हा एकदा श्री रवळनाथाला साष्टांग नमस्कार घातला आणि देवळाच्या प्रवेशद्वारी आलो. बरोबर आलेल्या ग्रामस्थांच्या साक्षीने दादांनी ती घंटा देवळाच्या प्रवेशद्वारी लावली. आम्ही सर्वांनी घंटा वाजवली. त्यानंतर थोडा वेळ देवळातील सभागृहात बसलो आणि नंतर घरी गेलो.
श्री देवरवळनाथाच्या देवळातून बरोबर आणलेल्या भक्तीभावना आमच्या कुटुंबाला शाळेची सेवा करण्यासाठी स्फूर्ती देत होत्या. त्याचवेळी मी ठरवले की दादांच्या बालमोहनला व शिक्षणाला आपण आयुष्यभर वाहून घ्यायचे आणि दादांना जास्तीतजास्त मदत करायची.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.