loader image

यशोगाथा

एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत तुम्ही सर्वोत्तम ठरालच असे नाही पण सर्वोत्तम स्पर्धक म्हणून तुमची नोंद घेतली तरी पुढचा मार्ग सोपा होतो हा विचार बालमोहनमध्ये रुजवला जातो. सर्वोत्तम स्पर्धक आणि सर्वोत्तम विजयी स्पर्धक घडवण्याची बालमोहनची ही यशोगाथा.

यशोगाथा

बालमोहन ही मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीवर नितांत श्रद्धा ठेवणारी महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून ओळखली जाते. बालमोहनची शिक्षणपद्धती ही ‘समृद्ध, सक्षम आणि एक चांगला नागरिक’ घडविण्याची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. बालमोहनमध्ये जे काही शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्यात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सर्जनशीलतेला वाव मिळतो.

विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत हा आमचा उद्देश आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन निरीक्षणशक्ती, चिकाटी, जिद्द, सचोटी, प्रसंगावधान, स्वावलंबन, त्याग, सहकार्य, दुसऱ्याशी संवाद साधण्याची कला इत्यादी गुण हे शालेय वयातच मुलांच्या अंगी बाणवण्यावरही आमचा भर आहे.

मूर्तिकाराला जशी दगडात सुंदर मूर्ती दिसत असते, त्याचप्रमाणे बालमोहनच्या माध्यमातून दादांनी प्रत्येक विद्यार्थ्यात असलेल्या सुंदर मूर्तीला आकार देऊन आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य अविरत चालू ठेवले. ह्या कार्याचा नावलौकिक थेट दिल्लीपर्यंत पसरला आणि १९६२ साली दादांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

बालमोहनच्या अध्यायातील अजून एक गौरवशाली दिवस म्हणजे ५ सप्टेंबर २००२. ह्या शिक्षक दिनाच्या औचित्याने बालमोहनला ‘शैक्षणिक व समाजकल्याण’ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ‘सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्था’ म्हणून सन्मानित केले.

उल्लेखनीय कामगिरी

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सुमी’ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी दिव्येश इंदुलकर ह्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांस सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले, संपूर्ण बालमोहन परिवारातर्फे त्याचे मन:पूर्वक अभिनंदन.

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३ : श्री. विलास नारायण परब (बालमोहन विद्यामंदिर – माध्यमिक विभाग)

बालमोहन विद्यामंदिरमधील सक्रिय बालसेवा तसंच दुर्गम भागातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचा ‘क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ बालमोहन विद्यामंदिरच्या माध्यमिक विभागाचे शिक्षक श्री. विलास नारायण परब यांना प्रदान करण्यात आला. संपूर्ण बालमोहन परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

‘बालमोहन’ ही आमच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची अस्मिता आहे. ‘बालमोहन’ मधली जडणघडण त्यांच्या आयुष्याची शिदोरी ठरते. त्यामुळे माजी विद्यार्थी जिथे शक्य होईल तिथे ‘बालमोहन’प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. अशाच एका अवलिया माजी विद्यार्थ्याने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या शुभ दिवशी ‘बालमोहन’ची पताका म्हणजेच ‘बालमोहन ध्वज’, संपूर्ण युरोप खंडातील एल्ब्रस ५६४२ मीटर उंच शिखर सर करत शिखर माथ्यावर फडकावला. त्या विद्यार्थ्यांचं नाव प्रणित शेळके. संपूर्ण बालमोहन परिवारातर्फे त्याचं मन:पूर्वक अभिनंदन.

यशोगाथा

साचेबद्ध शिक्षणाशी विद्यार्थ्याने जुळवून घेण्यापेक्षा शाळेने साचा मोडून विद्यार्थ्याला आवडेल, आनंद मिळेल असा त्याच्या आवडीचा साचा निर्माण करणं हे शाळेचं खरं कर्तव्य.
या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.