loader image

नकळत संस्कार

बालमोहनचा नकळत संस्कारावर खूप भर आहे. त्यामुळे शाळेचा परिसर देखील अशा पद्धतीने सजवला आहे की, मुलांना शाळेत यावंसं वाटलं पाहिजे आणि शाळेत वावरताना त्यांच्यावर नकळत संस्कार झाले पाहिजेत.

नकळत संस्कार

बालमोहनच्या नकळत संस्कारांच्या खांबाला टेकून विद्यार्थ्यांना जगण्यातील आनंद शोधता यावा या एकमेव विचाराने दादांनी शाळेच्या सभोवतालात, तिच्या अस्तित्वात नकळत संस्कार रुजवले.

  • रोज झाडून पुसून स्वच्छ केलेल्या आणि प्रसंगी रांगोळ्यांनी सजलेल्या शाळेत शिक्षकांकडून हसतमुख चेहऱ्याने मुलांचे स्वागत होते, ज्यातून आपोआपच प्रसन्नतेचे आणि स्वच्छतेचे धडे दिले जातात.
  • शाळेच्या आवारातील ले. दिलीप हेमचंद्र गुप्ते, ले. प्रकाशनारायण श्रीधर कोटणीस ह्यांचे पुतळे त्यागाचे आणि समर्पणाचे संस्कार देतात आणि आपल्या सैन्यदलाबद्दलचा आदर वाढवतात.
  • आपण ‘का आणि कसं जगावं’ ह्याचा वस्तुपाठ ज्यांनी घालून दिला आहे अशा आपल्या छत्रपती शिवराय, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांचे अर्धाकृती पुतळे उत्तुंग जगण्याची प्रेरणा देतात.
  • कपाटातली मानचिन्हे, चषक आणि ढाली शाळेच्या अजिंक्यतेची साक्ष देतात आणि पुढील पिढीला खेळण्यास प्रवृत्त करतात.
  • प्रयोगशाळेतली मधमाश्यांची पोळी, रोपटी, धान्याची कणसे नकळतपणे निसर्गासोबत जगण्याची जाणीव करून देतात.
  • ‘वाईट हस्ताक्षर ही अपूर्ण शिक्षणाची ओळख आहे’ असं महात्मा गांधी म्हणायचे. शाळेच्या आवारातले सुंदर अक्षरातले फलक असोत की कपाटांमध्ये लावलेली मुलांच्या हस्ताक्षरातील हस्तलिखिते असोत, ही मुलांना आजच्या संगणकाच्या जगात देखील सुंदर हस्ताक्षराचे महत्व पटवून देतात. मनाची सुंदरता ही तुमच्या सुंदर हस्ताक्षरातून उमटते हे त्यांच्यावर बिंबवले जाते.
  • दसऱ्याला शाळा झेंडूच्या फुलांनी सजविली जाते, तर शाळेच्या दीपोत्सवाला मुलं शाळेत येऊन त्यांच्याकडची पणती लावून जातात. ‘आयुष्य हे एखाद्या सणासारखं जगा ज्यामुळे तुम्हाला रोजच आनंद मिळेल आणि हा आनंदच तुमची आत्मिक शक्ती वाढवेल’ हा नकळत संस्कार रुजवण्यासाठी शाळेत प्रत्येक सण पारंपारिक पद्धतीने आणि मुलांच्या सहभागातून साजरा केला जातो.
  • प्रार्थनेची सवय असलेलं मन हे स्वतःशी किंवा जगाशी देखील द्वंद्व करत नाही. हे लक्षात घेऊन दादांनी काही सुंदर प्रार्थना आणि स्तोत्रांचे नित्यपठण शाळेत सुरु केले जे आजवर चालू आहे.
  • मुलांचे ‘मी’पण घडले पाहिजे पण त्यांच्यात ‘मी’पणा येता कामा नये ह्यासाठी शाळेत विविध स्पर्धा घेतल्या जातात, जेणेकरून प्रत्येक मूल कशाततरी प्राविण्य शोधू शकेल, ज्यातून त्याचे ‘मी’पण घडेल पण बहुरंगी आणि बहुढंगी मित्र आणि त्यांचे यश पाहून ‘मी’पणा मात्र त्याच्यात कधीच शिरणार नाही.

नकळत संस्कार

बालमोहनची पवित्र वास्तू मुलांच्या भावविश्वावर कळत नकळत संस्कार करत असते. शालेय जीवनातील संस्कार ही कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्यभराची शिदोरी असते.
या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.