loader image

आठवणीतील पाऊले

बालमोहनचा रौप्यमहोत्सव

१९६५-६६ साली बालमोहनचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. शाळेला ३ जून १९६५ रोजी २५ वर्षे झाली होती. त्यादिवशी आम्ही सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरवर्ग अत्यंत आनंदात होतो. दादांचा आनंद तर पाहण्यासारखा होता. त्यांनी उत्साहाने स्वत:च्या हाताने सर्वांना पेढे वाटले. काही पालकही दादांना भेटायला आले होते.

काही शिक्षकांना दादांनी आपल्या खोलीत बोलावले आणि शाळेच्या स्थापनेच्या आणि त्यानंतरच्या काही आठवणी सांगितल्या. मुले, शिक्षक आणि पालक ह्यांच्या सहकार्याने शाळा कशी मोठी झाली; शाळा नावारूपाला कशी भाली ह्यासंबंधी दादा भरभरून बोलत होते. मी इंग्रजी तिसरीपर्यंत बालमोहनचा विद्यार्थी होतो. दादांनी जे जे सांगितले ते ते मी स्वतः पाहिले होते. शाळेला इमारतीसाठी भूखंड कसा मिळाला, दोन्ही इमारती उभारताना निरनिराळ्या आव्हानांना दादांनी कसे तोंड दिले, हे दादा सांगत होते. दादांचे कथन म्हणजे मला पुनःप्रत्ययाचा आगळा आनंद होता.

आमच्या बरोबर दादांच्या गप्पा ऐकायला १९४१ सालापासून शाळेचे एक निष्ठावंत गायन शिक्षकही होते. ते एकदम दादांना म्हणाले, की दादा आपण मुलांची दोन-तीन नाटके चांगली बसवून ती सर्व पालकांना दाखवावीत असे मला वाटते. दादांना त्यांची सूचना एकदम पसंत पडली. वि.दा. जोगळेकरसरांना नाट्य आणि संगीत ह्यांची आवड होती. ते दादांना म्हणाले, की बापू आणि मी एकत्र बसून एक योजना आखतो.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ‘सुंदर मी होणार’, ‘बेबंदशाही’ आणि ‘संगीत स्वयंवर’ ही तीन नाटके निवडली. जोगळेकरसरांनी मुलांची निवड शाळा सुरू झाल्यावर केली आणि लगेचच तालमीला सुरुवात झाली. मुळात मला ‘नाटक’ आवडत असल्यामुळे या नाटकांच्या तालमीला मी मधूनमधून उपस्थित राहात असे.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही नाटके पूर्ण बसवून झाली होती. नोव्हेंबर महिन्यात दर शनिवारी आणि रविवारी ही नाटके सर्व पालकांना आमंत्रित करून दाखवावीत असे ठरले. प्रत्येक नाटकाचे तीन प्रयोग करण्याची योजना आम्ही आखली. प्रत्येक पालकाला दोन प्रवेशपत्रिका देऊन, शाळेच्या सभागृहात नाटके दाखवण्याचे निश्चित झाले.

ह्या बालनाट्योत्सवाच्या उद्घाटनाला कोणते पाहुणे आणावेत, ह्यासंबंधी जोगळेकरसर आणि मी चर्चा करत होतो. मी त्यांना म्हणालो, की नट म्हणून प्रसिद्ध असलेली व्यक्ती पाहुणे म्हणून आणावी. जोगळेकरसरांनी एकदम केशवराव दाते यांचे नाव सुचवले. जोगळेकरसर म्हणाले की त्यांची आणि माझी ओळख आहे. आपण त्यांना विचारूया. जोगळेकरसर आणि मी त्यांच्या घरी गेलो. ते दादरच्या कबुतरखान्याजवळ राहत होते. दातेसाहेबांनी आमचे स्वागत केले. बालनाट्योत्सवासंबंधी जोगळेकरसरांनी त्यांना माहिती दिली व कोणती तीन नाटके बसवली अहोत यासंबंधीही सांगितले. दातेसाहेब म्हणाले, “या नाटकात मुलगे आणि मुली दोन्ही एकत्र काम करणार का?” जोगळेकरसरांनी होकारार्थी मान हलवली. ते एकदम म्हणाले, “मुलगे आणि मुली जर नाटकात एकत्र काम करणार असतील तर मी पाहुणा म्हणून नाटकाच्या प्रयोगांचं उद्घाटन करायला येणार नाही. दोन्ही प्रकारच्या मुलांनी एकत्र काम करणं मला पसंत नाही.” तरीपण आम्ही त्यांना सांगितले, “मुलगे-मुली नाटकात असल्या तरी ते वाह्यातपणा करत नाहीत. त्यांचं वागणं शिस्तीला धरून असते. आमचे त्यांच्यावर लक्ष असते. या बाबतीत दातेसाहेब, तुम्ही निश्चिंत राहा.” शेवटी त्यांनी माझा निर्णय मी तुम्हाला उद्या सांगतो असे सांगितले. जोगळेकरसर म्हणाले, “बापू, तू काळजी करू नकोस. मी उद्या त्यांच्याकडे जाऊन येतो.” दुसऱ्या दिवशी सर दातेसाहेबांकडे जाऊन आले ते होकार घेऊनच.

उद्घाटनाचा दिवस उजाडला. मी दातेसाहेबांना टॅक्सीतून घेऊन आलो. पहिल्यादिवशी ‘सुंदर मी होणार’ हे नाटक होते. नाटक सुरू झाले. मध्यांतरामध्ये दातेसाहेबांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात दातेसाहेबांनी मुलांचे कौतुक केले. शाळेला शुभेच्छा दिल्या. हा उद्घाटन सोहळा २८ नोव्हेंबर १९६५ रोजी संपन्न झाला होता. नंतर त्यांच्याबरोबर नाटकात काम करणाऱ्या मुलांचा ग्रूप फोटोही काढला. सर्वश्री दाजी भाटवडेकर, भालचंद्र पेंढारकर, विद्याधर गोखले यांसारख्या मान्यवर व्यक्तींनी पाहुणे म्हणून या नाट्यप्रयोगांना उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले.

रौप्यमहोत्सवाच्या मुख्य समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आमंत्रित करावे, असे दादांच्या मनात आले. त्यांना वाटले, शाळेची वास्तू ह्या ज्ञानतपस्व्याच्या, आदर्श शिक्षकाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली पाहिजे. दादांनी नेहमीप्रमाणे आपली इच्छा सांगण्यासाठी मला व माझे बंधू श्रीपाद तथा बाळासाहेब यांना आपल्या खोलीत बोलावले. राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी शाळेची माहिती आणि विविध उपक्रमांची छायाचित्रे, आम्ही दोघांनी एकत्रित करून, त्याची एक फाईल तयार केली. तसेच राष्ट्रपतींचे कॅबिनेट सेक्रेटरी श्री. द.श्री. जोशी यांना दादांनी १८ जून १९६५ रोजी एक सविस्तर पत्र तयार केले. त्यांनी जोशीसाहेबांना लिहिलेले पत्र, शाळेच्या माहितीची फाईल आणि राष्ट्रपतींना लिहिलेले आमंत्रणपत्र घेऊन, दिल्लीला जाऊन द.श्री. जोशी यांना भेटण्याची महत्त्वाची कामगिरी दादांनी मला पार पाडायला सांगितली. मी ऑगस्टच्या २० तारखेस, दिल्लीला स्थायिक असलेले माझे मेहुणे मनोहर वरेरकर ह्यांना जाऊन भेटलो. त्यांनी द.श्री. जोशींना फोन लावून त्यांना भेटण्याचा दिवस व वेळ ठरवून घेतली. त्याप्रमाणे आम्ही ठरलेल्या दिवशी रात्रौ ८ वाजता त्यांच्या घरी गेलो. त्यांना माझी ओळख करून दिली आणि दादांचे पत्र व फाईल त्यांना दिली. जोशीसाहेबांनी, ते शाळेत १९४९ च्या जानेवारी महिन्यात शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभासाठी आल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, की मी दादांना आणि शाळेला चांगले ओळखतो. राष्ट्रपतींनी रौप्यमहोत्सवाला यावे म्हणून मी अवश्य प्रयत्न करीन असे त्यांनी दादांना सांगायला सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपतींना शिफारसपत्र गेले पाहिजे असे ते म्हणाले. दादांनी शाळेच्या माहितीच्या दोन फायली मुख्यमंत्री महोदयांना दिल्या. मुख्यमंत्र्यांचे २६ नोव्हेंबर १९६६ रोजी दादांना पत्र आले त्यात राष्ट्रपती ३१ डिसेंबर १९६६ रोजी रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमासाठी सकाळी १५ मिनिटे येतील असे लिहिले होते. राष्ट्रपतींनी आमंत्रण स्वीकारल्याचे दादांना खूप समाधान वाटले. सोहळ्याची तयारी उत्साहाने सुरू झाली. परंतु २६ डिसेंबर १९६६ रोजी मुख्यमंत्र्यांचे दुसरे पत्र आले, की त्यांचा महाराष्ट्राचा दौरा रद्द झाल्यामुळे ते शाळेच्या समारंभाला येऊ शकत नाहीत. दादांना खूप वाईट वाटले. बालमोहनचे सर्वच निराश झाले होते. माझ्या प्रयत्नांना यश आले नाही, म्हणून मी तर खूप नाराज झालो होतो.

रौप्यमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे दादांच्या मनात होते. त्यादृष्टीने त्यांनी वर्षभर आधीपासून पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यांनी नेहमीप्रमाणे आम्हा दोन्ही बंधूंना आणि काही शिक्षकांना बोलावले.

रौप्यमहोत्सवासाठी शिक्षकांची सभा घेतली. त्यात कायकाय करायचे ते ठरले. शाळेच्या माहितीची स्मरणिका काढायची, तसेच शैक्षणिक विचारदर्शन’ नावाची शिक्षणविषयक लेखांची संग्रहपुस्तिकाही तयार करायची असे ठरले.

समारंभ शिवाजी पार्कमध्ये उघड्या जागेत बंदिस्त स्वरूपात करायचा हेही निश्चित झाले. त्याबाबतीत शाळेचे जुने हितचिंतक लक्ष्मी डेकोरेशन सर्व्हिसचे मोहन हिंगोराणी ह्यांच्याशी बोलायचे ठरले. तसेच शाळेच्या मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तयार करण्याचे काम त्यांनी गायनशिक्षक वि.दा. जोगळेकर, म.प. जोशी, वसंत पाटकर, गो.आ. कुळकर्णी आणि उर्मिला देसाई यांच्याकडे सोपवले. प्रत्येकजण उत्साहाने आपणावर सोपवलेल्या कामाच्या अंमलबजावणीस लागला.

दादांनी माझ्यावर स्मरणिकेचे आणि शैक्षणिक लेखसंग्रहाचे काम सोपवले होते. ही स्मरणिका व शैक्षणिक लेखसंग्रहाच्या पुस्तकाचे छपाईचे काम मौज प्रिंटिंग ब्युरोचे वि.पु. भागवत यांच्याकडे द्यायचे दादांनी ठरवले आणि मजुकराचे प्रूफ-करेक्शन करण्याच्या कामाची जबाबदारी दादांनी माझ्यावर टाकली. मी मौजमध्ये गॅलीप्रूफ आणायला आणि दुरुस्त करून दिलेली गॅली परत द्यायला जात असे. एक गोष्ट मात्र मौजमध्ये शिकलो आणि ती म्हणजे प्रूफ करेक्शनच्या निरनिराळ्या खुणा. तसेच पृष्ठे कशी तयार करतात, परिच्छेद कसे पाडतात ह्या गोष्टींचेही मी निरीक्षण केले. मला खूप अनुभव मिळाला. श्री. वि. पु. भागवतांनी शाळेच्या दोन्ही पुस्तकांची छपाई सुबक रीतीने करून दिली. त्यांचे संस्थेतर्फे आभार मानणे माझे कर्तव्य समजतो. तसेच मौजच्या इमारतीतच बसत असलेले सुप्रसिद्ध कलाकार श्री. दीनानाथ दलाल यांच्याकडे मला भागवतसाहेबांनी भेटण्यासाठी पाठवले. त्यांनी दोन्ही पुस्तकांची मुखपृष्ठे आणि आतली सजावट विनामूल्य करून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच होतील. तसेच शालेय दर्शनाचे सुंदर ब्लॉक्स अल्पावधीत व विनामूल्य करून दिल्याबद्दल बॉम्बे प्रोसेस स्टुडिओचे संचालक श्री. मोहनराव कामत यांची संस्था ऋणी आहे. त्यांच्याकडे मी केव्हाही गेलो, तरी नेहमीची कामे बाजूला ठेवून बालमोहनच्या कामाकडे ते आस्थेने पाहत असत.

स्मरणिका शाळेसंबंधी विविध प्रकारच्या माहितीने, उपक्रमांनी, शाळेला भेट देणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांच्या अभिप्रायांनी आणि शाळेचे दर्शन देणाऱ्या छायाचित्रांनी सजलेली आहे. ‘

स्मरणिकेसाठी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, उपराष्ट्रपती डॉ. झकीर हुसेन, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, गृहमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण, रेल्वेमंत्री श्री. स.का. पाटील, राज्यपाल डॉ. चेरियन, मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक, महसूलमंत्री श्री. रा.अ. पाटील, दादांचे गुरुवर्य प्रिन्सिपॉल श्री. सी.रा. तावडे आणि युनेस्कोचे आशिया विभागाचे शैक्षणिक सल्लागार श्री. टी. के. एन. मेनन या मान्यवरांचे आलेले संदेश वाचून तर मी खूप आनंदून गेलो. ह्या स्मरणिकेचे संपादन माझ्या हातून झाले त्याबद्दल मला धन्यता वाटते.

दादांनी रौप्यमहोत्सवासाठी शिक्षणमंत्री नामदार श्री. मधुकरराव चौधरी यांना आमंत्रित करायचे ठरवले व त्यांनी ते आमंत्रण आनंदाने स्वीकारले. हा आनंदसोहळा १५ जानेवारी १९६७ रोजी, शिवाजी पार्कच्या मैदानावर करण्याचे ठरले.

शिवाजीपार्कमध्ये, स्काऊट हॉलसमोर उघडी पण बंदिस्त अशी समारंभासाठी जागा निवडली होती. शाळेचे भूगोलाचे शिक्षक श्री. रामचंद्र इनामदार यांनी व्यासपीठावरील मागच्या बाजूला फुलांनी सजवलेला भारत काढला होता आणि उरलेल्या पडद्यावर सुवासिक फुलांच्या माळा लावलेल्या होत्या. उभारलेल्या भव्य व्यासपीठावर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम अप्रतिम झाले. हे कार्यक्रम बसवण्याचे काम वि.दा. जोगळेकर, वसंतराव पाटकर आणि म.प. जोशी यांनी केले होते. मुलांची सांघिक गीते बसवताना संगीत दिग्दर्शक श्री. वसंत देसाई यांची खूप मदत झाली. समारंभाला ठीक ५ वाजता सुरुवात झाली. निवेदन करीत होत्या, अनेक वर्षे शाळेशी संबंधित असलेल्या स्काऊट कमिशनर श्रीमती सुमनताई भिडे.

त्यानंतर शिक्षणमंत्री नामदार श्री. मधुकरराव चौधरी व त्यांच्या पत्नी सौ. कुसुमताई व्यासपीठावर आसनस्थ झाले. व्यासपीठावर माझे ९६ वर्षांचे आजोबा, माझी आई, मुख्याध्यापक श्री. अ. रा. आठल्ये, आम्ही दोघे बंधू बसलो होतो. प्रथम दादांनी प्रास्ताविक भाषण केले. मी व्यासपीठावर बसल्यावर सहज प्रेक्षकांकडे व त्याच्या दोन्ही बाजूंना उभारलेल्या स्टॅण्डवर बसलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहिले. क्षणभर माझी छाती धडधडली. दादांचे प्रास्ताविक झाल्यावर माझे अहवाल वाचन होते. सर्वांनी शांतपणे माझे अहवाल वाचन उत्सुकतेने ऐकले. सुमारे १२ हजार प्रेक्षकांसमोर बोलण्याचा माझा पहिला प्रसंग होता. मी टाळ्यांच्या गजरात आसनस्थ झालो याचे मला समाधान वाटले. त्यानंतर पाहुण्यांच्या शुभहस्ते ‘बालमोहन’ स्मरणिकेचे आणि शैक्षणिक विचारदर्शनाचे प्रकाशन झाले. त्यानंतर बक्षीस समारंभ संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणात नामदार श्री. मधुकररावांनी शाळेचा गौरव केला व म्हटले, की राम-रावणाचे युद्ध कसे झाले? राम-रावणाच्या युद्धासारखे झाले. आजचा बालमोहनचा कार्यक्रम कसा झाला? बालमोहनमधील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासारखा झाला. म्हणजे मुलांचा कार्यक्रम अतुलनीय असाच झाला. त्यांनी आपल्या भाषणात दादांचा आणि शाळेचा गौरवही केला.

त्याच वेळी, १९४० साली दादांना शाळा सुरू करण्याच्या बाबतीत आर्थिक साहाय्य, शिवाजीपार्क वसाहतीतील ज्या प्रतिष्ठित व्यक्तीने केले होते, ते बँकमहर्षी श्री. वामनराव वर्दे व्यासपीठावर आले आणि दादांचे अभिनंदन करीत त्यांनी शाळेला २५ हजार रुपयांचा धनादेश देणगी म्हणून दिला. मला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटते.

समारंभाची सांगता तीन हजार मुलांनी राष्ट्रगीत एका सुरात, एका तालात गाऊन झाली.

बालमोहनचा हा रौप्यमहोत्सवाचा आनंदसोहळा शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा अपूर्व सोहळा होता.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.