loader image

बाळ सर

ग्रामीण व शहरी जीवनाचा संगम साधणारे शिक्षण मुलांना द्यावे हे दादांचे गुरू व शिक्षणतज्ञ डॉ. रामभाऊ परुळेकर यांचे स्वप्न. दादांनी पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे, ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ ही वसतीगृहयुक्त शाळा स्थापन करून पूर्ण केले. ही शाळा म्हणजे रामभाऊंचे स्मारकच. ह्या शाळेला नावारूपाला आणण्यासाठी बाळसरांनी अथक परिश्रम केले.

डॉ. श्रीपाद शिवराम रेगे म्हणजेच बाळ सर, डॉ. बाळासाहेब रेगे

डॉ. श्रीपाद शिवराम रेगे उर्फ डॉ. बाळासाहेब रेगे हे दादासाहेबांचे द्वितीय चिरंजीव. दादांचे गुरू व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शिक्षणतज्ञ कै. डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ परुळेकर यांचे ग्रामीण व शहरी जीवनाचा संगम साधणारे शिक्षण मुलांना द्यावे हे स्वप्न. ते स्वप्न साकार करण्याच्या भावनेने दादांनी दि. २२ जून १९७० रोजी त्यांच्याच नावाने ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ ही वसतीगृहयुक्त शाळा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे स्थापन केली आणि मोठ्या विश्वासाने ती बाळासाहेबांच्या हाती सुपूर्द केली.

डॉ. बाळासाहेब रेगे हे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या त्यांच्याच घरातल्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ मध्ये झाले. डॉ.बाळासाहेबांनाही सर्वजण ‘बाळसर’ या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या नावाने संबोधत असत. बाळसरांच्या घरात त्यांच्या लहानपणापासून घरी सतत येणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील उपक्रमांविषयी दादांशी चर्चा करीत असत त्यामुळे बाळसरांवर कळत नकळत संस्कार होत गेले. एस.एस.सी झाल्यावर कॉलेज सुरू असतानाच ते शाळेतील शैक्षणिक वातावरणामुळे आणि दादांच्या सहवासामुळे शिक्षकी पेशाकडे ओढले गेले. बालमोहनचे व्यवस्थापन, मुलांच्या सहली, खेळ, दिनविशेष, जनसंपर्क, पालकांशी हितगुज यामध्ये बाळसर दिवसभर गढून जात असत. १९६१ साली बी. एड. झाल्यानंतर जवळजवळ बारा वर्षे बालमोहन विद्यामंदिर येथे त्यांनी दर्जेदार तज्ञ विषयशिक्षकांच्या सानिध्यात अध्यापनाचे कार्य केलेले असल्यामुळे तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनमध्ये सुरुवातीपासूनच शाळेचे मुख्याध्यापक व वसतीगृहप्रमुख म्हणून दादांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पेलू शकले.

दादांनी बाळासाहेबांमधील नेतृत्वगुण, परोपकारी वृत्ती, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, प्रसंगी कठोरता हे सर्व गुण हेरूनच त्यांच्या हातात विश्वासाने ही शाळा दिली व दादांच्या विश्वासाला शिरसावंद्य मानून समर्थपणे त्यांनी ती  शाळा व वसतिगृह एका उंचीवर नेऊन ठेवले. या सर्व घडामोडींमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती श्रीलेखा रेगे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. दादांचे स्वप्न साकार करण्याचे शिवधनुष्य समर्थपणे उचलताना बाळसरांनी अथक मेहनत केली. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समर्पित शिक्षकांची फळी उभी केली. त्यांच्याच पुढाकाराने या शाळेमध्ये अभ्यासक्रमानुवर्ती व अभ्यासेतर असे अनेक उपक्रम सुरु झाले, जे आजवर राबवले जातात. त्यामध्ये आषाढी एकादशी, दिंडी, बालदिन ,मातृदिन, तज्ञ मार्गदर्शकांद्वारे घेतली जाणारी शिबीरे, गोकुळाष्टमी यासारखे संस्कार देणारे कार्यक्रम, हस्ताक्षर, चित्रकला, नाट्य, गायन इत्यादी विद्यार्थ्यांमधील विविध गुणदर्शनांचे कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

प्रामुख्याने शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांचा समन्वय होऊन विचारांची व संस्कृतीची देवाण-घेवाण होऊन त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हाही या वसतीगृह निर्मितीमध्ये हेतू होता व तो बऱ्याच अंशी सफलही झाला. या सर्व गोष्टींची शासनाने नोंद घेऊन डॉ. बाळासाहेब रेगे यांना ५ सप्टेंबर १९८८ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. शरद पवार यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान केला. पण बाळसरांसाठी त्यांच्या विदयार्थ्यांच्या मनातलं प्रेम आणि आदर हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. त्याच वर्षी म्हणजे १९८८ साली बाळसरांना संस्कृत विषयात डॉक्टरेट (Ph.D) मिळाली.

तळेगावच्या माळरानावर शहरी आणि ग्रामीण जीवनाचा योग्य संगम साधून भारताचा उद्याचा सुजाण नागरिक घडवायचे व्रत बाळसरांनी आयुष्यभर घेतले. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे घर सोडून वसतिगृहात शिकायला आलेल्या शेकडो मुलांचे त्यांनी पालकत्व स्वीकारले. त्यांच्यावर आईच्या मायेची पारख घालतानाच त्यांना वडिलांच्या शिस्तीचा संस्कार द्यायलाही बाळसर विसरले नाहीत. म्हणूनच आजही आपापल्या आयुष्यात यशस्वी झालेली मुले केवळ आपल्या शाळेच्या किंवा वसतिगृहाच्या आठवणींनी हळवी होतात. आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या इतकेच बाळसरांना देखील देतात.

अशा रीतीने आपले संपूर्ण जीवन शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना समर्पित करून दि. ७ मे २०१० रोजी बाळसर अनंतात विलीन झाले. बाळसरांना देवाज्ञा झाली तेव्हा ते बालमोहनचे कार्यकारी विश्वस्त होते. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतःचे देहदानही त्यांनी केले आणि स्वतःचा देह सोडल्यानंतरही ते विद्यार्थ्यांचेच राहिले.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.