loader image

बापू सर

बालमोहनला महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था बनवण्यासाठी बापूसरांनी अथक मेहनत केली. आपल्या नेतृत्वगुणांमुळे त्यांनी शिक्षणाला वाहून घेतलेल्या शिक्षकांची फळी विकसित केली.

डॉ. मोरेश्वर शिवराम तथा बापूसाहेब रेगे

दादांच्या या सुपुत्राचा जन्म २१ जुलै १९३१ रोजी माटुंग्याच्या रिफॉर्मेटरी स्कूलच्या सिमेंटच्या चाळीत झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालय येथे पार पडले. १९५७ मध्ये त्यांनी रूपारेल महाविद्यालय, दादर येथून मुंबई विद्यापीठाची एम.ए. (मराठी व संस्कृत) पदवी मिळविली. १९६२ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. (शिक्षण) अर्जित केली.

लहानपणापासून दादांबरोबर असल्याने त्यांच्या आजूबाजूचे वातावरण नेहमीच शैक्षणिक होते. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षापासून ते दादांबरोबर सावलीसारखे होते. या वातावरणामुळे आणि दादांच्या सहवासामुळे अत्यंत नैसर्गिकपणे ते शिक्षकी पेशाकडे आकर्षित झाले. त्यांचा व्यासंग आणि अथक मेहनत यांची दादांची स्वप्ने साकार होण्यासाठी फार मोलाची मदत झाली. बालमोहनला महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था बनवण्यासाठी बापूसरांनी अथक मेहनत केली. आपल्या नेतृत्वगुणांमुळे त्यांनी शिक्षणाला वाहून घेतलेल्या शिक्षकांची फळी विकसित केली.

त्यांच्या मेहनतीवर आणि नेतृत्वगुणांवर विश्वास दाखवून दादांनी अत्यंत विश्वासाने बालमोहनची धुरा बापूसाहेबांच्या हाती सोपवली आणि दादांचा हा विश्वास खरा ठरवत त्यांनी शाळेचा मानसन्मान वाढवला. काळाच्या पुढे असलेले अनेक आदर्श उपक्रम बालमोहनमध्ये सुरु करण्यामागे त्यांची भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी दिसून येते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बालमोहनने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली.

दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बालमोहनमध्ये अध्यापन आणि प्रशासकीय अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. १९५४ ते १९७० ही १६ वर्षे शिक्षक म्हणून, १९६३ ते १९८९ ही २६ वर्षे उपअधीक्षक म्हणून, १९७० ते १९८९ ही १९ वर्षे मुख्याध्यापक म्हणून आणि १९८९ ते २००९ ही २० वर्षे अधीक्षक म्हणून त्यांनी बालमोहनमध्ये काम केले. १९७० ते १९८२ या कालावधीत ते बालमोहन विद्यामंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य होते तर १९८२ ते २००८ या कालावधीत त्यांनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त पदाची जबाबदारी पार पाडली. त्यांनतर २००८ पासून अखेरपर्यंत ते संस्थेचे विश्वस्त आणि प्रमुख मार्गदर्शक सल्लागार होते.

 

‘युनेस्को’ ह्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या ‘International Understanding Project’ मध्ये त्यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून सहभाग घेतला होता. मुंबईच्या लोककल्याण शिक्षणसंस्थेचे नियामक मंडळ सदस्य, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या नात्याने १९७८ ते २००८ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव येथील शिक्षण संस्थांचा विकास साधताना त्यांनी केलेली शिक्षणसेवा आजही स्थानिकांच्या स्मरणात आहे. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य, कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष या नात्याने त्यांचा बालशिक्षणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग होता. अनेक शासकीय समित्यांवर शासननियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले.

बालमोहनच्या अनेक प्रकाशनांचे संपादक म्हणून त्यांनी आपले योगदान दिले. २००६ साली प्रकाशित झालेल्या ‘किमयागार दादा’ या शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी स्मृतीग्रंथाच्या लेखन, संकलन आणि संपादनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. वृत्तपत्रे व नियतकालिके यांमधून मार्गदर्शनाच्या स्वरूपात त्यांचे अनेक शैक्षणिक लेख प्रसिद्ध झाले. ‘आठवणीतील पाउले’ हे त्यांचे आत्मचरित्र ग्रंथालीने २०१२ साली प्रकाशित केले.

१९६४ पासून त्यांनी इंग्रजी अध्यापनावर महाराष्ट्र राज्यात वसई, नाशिक, सटाणा, नंदूरबार, रत्नागिरी, इत्यादी निरनिराळ्या ठिकाणी विविध प्रकारची शिबीरे घेतली, तसेच विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वाचे आठवडाभराचे शिक्षण शिबीर देवळाली येथे १९७४ ते १९७८ या कालावधीत घेतले. शासकीय योजनेच्या अंतर्गत १९७५ ते १९७९ या कालावधीत शाळा समूह योजना बालमोहनमध्ये आयोजित करून महानगरपालिकेतील २० शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून इंग्रजी अध्यापनाचे प्रशिक्षण दिले.

शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना ‘मुंबई सकाळ’ ह्या दैनिक वृत्तपत्रातर्फे ‘सकाळ’च्या वर्धापनदिनी शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान (१९९३); मुंबई वृत्तपत्र लेखक संघातर्फे शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘समाजभूषण पुरस्कार’ (१९९४); दादरकरांतर्फे ‘समाजभूषण पुरस्कार’ (२००४); मुंबई लक्षदीपतर्फे मराठी अस्मितेसाठी आदर्श योगदान केल्याबद्दल ‘सप्तरत्न पुरस्कार’ (२००७); सारस्वत चैतन्यतर्फे शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान (२०१०) असे अनेक सन्मान मिळाले.

२४ नोव्हेंबर २०१३ रोजी बालमोहनच्या या सुपुत्राचे देहावसान झाले.

बापू सर

बापू सरांची मेहनत, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुणांवर विश्वास दाखवून दादांनी अत्यंत विश्वासाने बालमोहनची धुरा बापूसरांच्या हाती सोपवली आणि काळाच्या पुढे असलेल्या बापू सरांनी अनेक आदर्श उपक्रम बालमोहनमध्ये राबविल्याने ‘बालमोहन’चा वटवृक्ष अधिक पल्लवीत होऊन बहरला.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.