
आठवणीतील पाऊले
दादांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन | शासनातर्फे आगळा सत्कार
ह्या योजनेच्या संदर्भात त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणसंचालक श्री. वि. वि. चिपळूणकर यांनी महाराष्ट्रातील काही शिक्षकांचे एक शिबिर तळेगावच्या रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन येथे घेतले होते आणि आराखडा तयार केला होता. हे शिबिर एप्रिल-मे दरम्यान आयोजित केले होते. त्या शिबिराला दादा अर्थातच होते.
दादांच्या आत्मचरित्रासंबंधी ज्या वेळी जूनमध्ये दूरदर्शनवरून वृत्त प्रसृत झाले, त्या वेळी हे आत्मचरित्र शिक्षकवर्गाला नवी दिशा दाखवणारे असले पाहिजे असे मला वाटले. मी या बाबतीत दादांशी बोललो तेव्हा दादा म्हणाले, “बापू, तुला माहीत आहे, की १९७८च्या सुमारास मी माझ्या आयुष्यातील काही आठवणी लिहून काढल्या आहेत. मजकूर तयार आहे. मात्र तो शासनाच्या आराखड्यात बसवायचा.” मी दादांना म्हटले, “तुमच्या अमृतवर्षातला हा महत्त्वाचा योग आहे. त्या टंकलिखित आठवणी मी वाचतो आणि नंतर आपण आराखड्यासंबंधी बोलू या.” माझ्या या म्हणण्याला दादांनी कबुली दिली.
शासनाला सदर आत्मचरित्र सप्टेंबरअखेरपर्यंत निवडसमितीपुढे ठेवायचे होते. मला हे निराळ्या प्रकारचे आव्हान वाटले. त्यानंतर दादांनी आणि मी आत्मचरित्राच्या रूपरेषेचा विचार केला आणि ती रूपरेषा दादांचे स्नेही श्री. ग.रा. कामत ह्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाठविली. शाळेचे दोन माजी विद्यार्थी श्री. सदानंद घासकडवी आणि श्री. शशिकांत बांबर्डेकर ह्यांच्या मदतीने पुस्तकाची रूपरेषा निश्चित केली. दादांच्या आठवणी वाचताना, कोणत्या आठवणी आत्मचरित्रात घ्यायच्या त्या पृष्ठांवर खुणा केल्या. त्या दादांना दाखवल्या. दादांनी त्यातील काही आठवणी निश्चित केल्या. त्यानंतर प्रकरणे कोणती असावीत यावर आमची चर्चा झाली आणि आत्मचरित्राचा मसुदा नक्की केला. दादांच्या सल्ल्याने तयार झालेल्या आत्मचरित्राच्या तीन प्रती तयार केल्या.
दादांनी आत्मचरित्राचा तो मसदा, एका दिवशी रात्री १०च्या सुमारास वाचण्यासाठी घेतला. दादा सकाळ ४ वाजेपर्यंत आपले चरित्र वाचत होते. काही खुणाही करत होते. मी पहाटे चारच्या सुमारास झोपेत होतो. दादांनी मला उठवले व आपल्या झोपण्याच्या खोलीत बोलावले. दादा म्हणाले, “सर्व आत्मचरित्र रात्रभर वाचलं. आता ते निवडसमितीकडे द्यायला हरकत नाही.’ दुसऱ्या दिवशी आत्मचरित्राच्या निवडसमितीचे सदस्य श्री. श्री. पु. भागवत आणि श्री. प्रभाकर नेरूरकर ह्यांच्याकडे आत्मचरित्राच्या दोन प्रती सायनला श्रीपुंच्या घरी मी नेऊन दिल्या. दादांच्या आत्मचरित्र लेखनासंबंधी आमच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मी घरी आलो.
दादा ८ जून१९८२ रोजी अकस्मात निवर्तले. त्यांच्या हयातीत त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले असते तर फार चांगले झाले असते. मला येथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे, की श्री. श्री. पु. भागवतांनी सदर आत्मचरित्र प्रकाशित होईपर्यंत त्यात जातीने लक्ष घातले. त्यांनी प्रूफ करेक्शन केल्यावर ते मलाही त्यावरून नजर टाकण्यास सांगत असत.
आत्मचरित्राचे मुखपृष्ठ श्री. गजानन भागवत यांनी आत्मीयतेने केले. दादांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले शिक्षणविषयक विचार, बालमोहन विद्यामंदिर ही स्वतंत्र शाळा काढण्याकरिता दादांनी स्वतःसमोर ठेवलेली उद्दिष्टे, दादांचा १९ मार्च १९८१ रोजी लिहिलेला स्वहस्ताक्षरातील संदेश ‘आनंदी राहा आणि मुलांना आनंदी करा,’ इत्यादी गोष्टी मी श्री. गजानन भागवत ह्यांच्या हवाली केल्या. त्याचाही उपयोग भागवतांना पुस्तक सजावटीसाठी झाला. आता राहिला पुस्तकाच्या नावाचा प्रश्न. “माझे जीवन : माझी ‘बाळं’ ” हे नाव श्री.पु. भागवतांनी श्री. मंगेश पाडगावकरांशी बोलून निश्चित केले आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत दादांचे सुंदर आत्मचरित्र प्रकाशनासाठी तयार झाले.
पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक डॉ. रा. सो. सराफ ह्यांनी सदर आत्मचरित्र प्रकाशित करण्याचा दिवस कोणता असावा असे मला विचारले. मी त्यांना सांगितले, की ८ जून १९८३ हा दिवस योग्य होईल. कारण त्या दिवशी दादांचा प्रथम स्मृतिदिन आहे.
“माझे जीवन : माझी ‘बाळं’ ” ह्या दादांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन ८ जून १९८३ रोजी दादांच्या प्रथम स्मृतिदिनी सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या शुभहस्ते बालमोहनच्या सभागारात करण्यात आले. ह्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रा. सो. सराफ, संचालक, पाठ्यपुस्तक मंडळ, शिक्षण संचालक श्री. वि. वि. चिपळूणकर, श्री. श्री. पु. भागवत, श्री. प्रभाकर नेरूरकर ह्या मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली. शेवटी मी संस्थेचा कार्यकारी विश्वस्त व दादांचा मुलगा या नात्याने आत्मचरित्र प्रकाशित होण्यास ज्या ज्या व्यक्तींनी साहाय्य केले आहे, त्यांचे मन:पूर्वक आभार मानून त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रगीताने या प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.
शाळेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. जगन्नाथ परब ह्यांच्याकडून, अतीव दुःखातून एका कलाकृतीची निर्मिती झाली. त्यांनी बनवलेल्या दादांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण रँग्लर के.आर. गुजीकर ह्यांच्या हस्ते ५ सप्टेंबर, १९८४ रोजी झाले. हा दादांचा मरणोत्तर सन्मानच होता.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.