loader image

आठवणीतील पाऊले

पी. एच.डी चा प्रबंध लिहिताना

मला यशस्वी शिक्षक व्हायचे होते. शिक्षकीपेशाला जशी बी.ए., एम.ए.ची शैक्षणिक पात्रता लागते, तशी व्यावसायिक प्रशिक्षणाने समृद्ध होणेही आवश्यक असते. म्हणून मी बी.टी.चे प्रशिक्षण १९५५-५६ या वर्षी Secondary Training College मध्ये उत्साहाने पुरे केले. बी.टी. झाल्यावर मी शाळेत प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेण्यास सुरुवात केली. त्यात आनंदाने रमलो. मुलांशी मैत्री केली. मुलांना शिकवताशिकवता मुलांकडून मीही शिकलो. मुलांमध्ये मी अक्षरशः रमलो होतो.
पण या शिक्षकीपेशाला पूरक असे शिक्षण घ्यावे असे मला सारखे वाटत होते. पुढे काय करावे असा विचार मनात घोळत असताना मला शाळेचे शैक्षणिक सल्लागार श्री. रा. वि. तथा भाऊसाहेब परुळेकर आठवले. ते शाळेतील एका खोलीत बसून काम करीत असत. मी दादांमार्फत त्यांना भेटण्याचे ठरवले आणि भेटलोही. माझी इच्छा मी त्यांना मनमोकळेपणी सांगितली. ते म्हणाले, “बापू, दादांनी तुम्हा मुलांसाठी शिक्षणाची सेवा करण्यासाठी शाळेसारखं फार मोठं क्षेत्र निर्माण केलं आहे. मला वाटतं, तू प्रबंधानं एम.एड. व्हावं. त्यासाठी ‘रत्नागिरी जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास’ हा विषय तू घ्यावास.” खरे म्हटले तर एम.एड. पेपर लिहून होणे हे प्रबंधापेक्षा जास्त सोपे; परंतु प्रबंधाने एम.एड. होणे मला आव्हानात्मक वाटले. भाऊसाहेबांचीही तशीच इच्छा होती. त्यामुळे मी प्रबंधाने एम.एड. होण्याचे ठरवले. मनात कोणतीही गोष्ट आली की ती लगेच अमलात आणायची असा भाऊसाहेबांचा स्वभाव होता. त्यांनी मला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’चे डिरेक्टर प्रा. वा.पां. खानोलकर यांच्याकडून एम.एड.चा फॉर्म आणण्यास सांगितले. मी तो फॉर्म आणला व त्यातील माहिती भरून भाऊसाहेबांना दाखविण्यासाठी भरून ठेवला.

प्रबंधासंबंधी विचार करण्यास दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. माझा उत्साह व जिद्द पाहून त्यांनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना दिलेली उत्तरे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यासंबंधी मी त्यांना विचारलेली माहिती हे लक्षात घेऊन त्यांनी मला एक दिवस अचानक आपल्या खोलीत बोलावले व सांगितले, “तू हा प्रबंध पीएच.डी.साठी लिहावास असं मला वाटतं. याचं कारण तुला संशोधनाची दृष्टी येईल. ती शाळेला खूप उपयोगी पडेल. तुझ्या एम.एड.च्या फॉर्मऐवजी तू पीएच.डी.साठी फॉर्म भरून इंडियन इन्स्टिट्यूटकडे दे.”

फॉर्म सुपूर्द केल्यानंतर प्रबंधासंबंधी विचार करण्यास लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. कोकणातील तीन जिल्ह्यांचा (ठाणे, कुलाबा,रत्नागिरी) शैक्षणिक इतिहास स्वतः लिहिण्याचा आपला प्रथम मानस होता असे मला भाऊसाहेबांनी सांगितले. पण कार्यबाहुल्यामुळे त्यांना ते शक्य न झाल्याने विद्यार्थ्यांना हाताशी धरून ते काम पूर्ण करण्याचे त्यांनी ठरविले होते. या तीन जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास प्रा. न. रा. पारसनीस यांच्याकरवी भाऊंनी पुरा केला होता. आता ते रत्नागिरी जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास लिहिण्यास माझ्याकरवी हात घालत होते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रबंधासाठी ‘History and Survey of Education in the Ratnagiri District (From 1818 to 1960)’ हा विषय भाऊसाहेबांनी निश्चित केला आणि ते पुढे म्हणाले, की हा प्रबंध तू लिहिल्यास तुझ्या जिल्ह्याची सेवा केल्याससारखे होईल.

भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला पीएच.डी.चा अभ्यास करायला मिळणार ह्या कल्पनेने मी आनंदून गेलो होतो. प्रथम ‘प्रबंध’ ह्या संकल्पनेला मी घाबरलो होतो; पण पहिल्या आठवड्यात भाऊसाहेबांशी गप्पा केल्यानंतर मला प्रबंध लिहिण्याचा आत्मविश्वास वाटू लागला. ते नेहमी आपुलकीने आणि कळकळीने कोणतीही गोष्ट सांगत. त्यांचे मार्गदर्शन अचूक असे. हा प्रबंध लिहिताना मी खूप शिकलो आहे.

त्यांनी माझ्यामध्ये प्रथम रत्नागिरी जिल्ह्यासंबंधी आपुलकी निर्माण केली आणि मला डी.पी.आय.च्या वार्षिक रिपोर्टातील रत्नागिरी जिल्ह्यासंबंधी जेजे उल्लेख आढळतील ते ते उल्लेख गोळा करण्यास सांगितले. दररोज किती काम झाले हे ते विचारीत आणि त्यासंबंधी दररोज थोडीफार चर्चा होत असे. भाऊंच्या बरोबर चर्चा करताना मला फार समाधान मिळे.
माझ्यासाठी भाऊसाहेबांनी शाळेच्या आपल्या खोलीत १८४० ते १८५४ सालापर्यंतचे Board of Educationचे वार्षिक रिपोर्ट्स, तसेच १८५५ ते १९५५ सालापर्यंतचे Director of Public Instructionचे वार्षिक रिपोर्ट्स आणून ठेवले होते. तसेच शासनाचा शिक्षणावरील Centenery Volume तर त्यांनी संदर्भासाठी माझ्याकडे दिला होता. त्या समितीचे संपादक श्री. जे.पी. नाईक होते आणि समितीचे सदस्य स्वतः भाऊसाहेब परुळेकर होते.

भाऊसाहेबांची स्मरणशक्ती उतारवयातदेखील तल्लख होती. त्यांनी स्वतः ते रिपोर्ट पुष्कळदा चाळले असल्यामुळे कोणता संदर्भ कोणत्या रिपोर्टच्या कोणत्या पानावर आहे हे ते अचूक सांगत. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा इतिहास लिहिताना त्यांच्या जुन्या आठवणीने त्यांचे हृदय भरून येत असे. विशेषतः मालवणचे टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, राजापूर हायस्कूल, रत्नागिरीचे पटवर्धन हायस्कूल, इत्यादी शाळांसंबंधी विचार करताना त्यांचा त्या शाळांशी संबंध कसा आला, त्या वेळी शिक्षणाची पद्धत कशी होती यासंबधी विवेचन करताना ते रंगून जात असत.

मार्गदर्शन करण्याची भाऊसाहेबांची एक विशिष्ट पद्धत होती. त्यांनी कधीही तू हा ग्रंथ वाच, तो वाच असे मला अलिप्तपणे सांगितले नाही. “बापू, साक्षरतेसंबधी लिहावयाचं आपलं राहिलं आहे. ती माहिती आपण आता एकत्र करूया,” अशा आर्जवाने ते मला सांगत. जणू काही ते व मी, आम्ही दोघेही प्रबंध लिहीत होतो. भाऊ माझ्यासमवेत अभ्यास करीत होते. त्यांचे मार्गदर्शन खरोखरच जसे आपुलकीचे तसे कळकळीचे असे.

आमच्या चर्चेमध्ये श्री. जे. पी. नाईक नेहमी येत असत. त्यांच्याविषयी भाऊसाहेबांना फार आदर वाटे. त्यांच्या ग्रंथातील शैक्षणिक विचारासंबंधी चर्चा करताना भाऊसाहेब त्यांच्या सखोल चिंतनाबद्दल, तीव्र बुद्धिमत्तेबद्दल त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल व त्यांना शिक्षणासंबंधी वाटणाऱ्या जिव्हाळ्याबद्दल मोठ्या अभिमानाने उल्लेख करीत.

आम्ही एक दिवस तर सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत काम करीत बसलो होतो. संदर्भग्रंथ चाळायचे, माहिती घ्यायची आणि चर्चा करायची. त्या दिवशी त्यांनी शाळेच्या कॅन्टिनमधून सहा वेळा चहा मागविला; पण चहा आला की ते “येथे ठेव हं,” असे आमच्या शाळेतील रामा शिपायास सांगत आणि पुन्हा आम्ही चर्चेत रंगून जात असू. सहा कपांपैकी प्रत्यक्ष एक पूर्ण कपदेखील त्यांनी घेतला असेल की नाही याची शंका आहे; पण चहा समोर असला की त्यांना शक्ती येत असे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोणीही माणूस येवो, मग ते दापोलीचे श्री. द. सी. सामंत असोत, राजापूरचे श्री. द. ज. सरदेशपांडे असोत, डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डाचे चेअरमन श्री. शिखरेगुरुजी असोत, की पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अच्युतराव पटवर्धन असोत. ते भेटले रे भेटले की रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षणासंबंधी त्यांनी माहिती विचारलीच म्हणून समजा. प्रबंध लेखनाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही विषय त्यांच्या डोक्यात नव्हता.

भाऊसाहेब माझे मार्गदर्शक होते, म्हणूनच हा प्रबंध मी तीन वर्षांत पुरा करू आगलो, ते माझ्या पाठीमागे लागत. एकदा तर ते माझ्यावर फारच रागावले. त्या वेळी मला थोडेसे वाईट वाटले. थोड्या वेळाने त्यांना काय वाटले कोणास ठाऊक! ते लगेच म्हणाले, “मला माहीत आहे तुला शाळेची कामं असतात; पण मला तसं नाइलाजानं बोलावं लागलं. काम लवकर संपवलं पाहिजे. शाळेचं कामही महत्वाचं आहे; पण प्रबंधाकडे तू आता जास्त लक्ष दे.” असे म्हणून माझ्या वाईट वाटण्यावर भाऊसाहेबांनी प्रेमाच्या शब्दांचा वर्षाव केला.

मी ज्या वेळी प्रथम रत्नागिरीला माहिती मिळविण्यासाठी गेलो, तेव्हा भाऊसाहेबांनी मला जो धीर दिला तो मी विसरू शकणार नाही. रत्नागिरीच्या लोकल बोर्डाच्या ऑफिसमधून कशा प्रकारची माहिती पाहिजे, त्याची मला त्या वेळी काहीही कल्पना नव्हती. मी रत्नागिरीला प्रथमच जात होतो. त्या वेळी भाऊसाहेबांनी मला सांगितले, “तू मिळेल ती माहिती आण. जरी एखादी माहिती मिळाली नाही तरी चालेल, त्याची काळजी करू नकोस.” भाऊसाहेबांनी असे सांगितल्यावर मला पुष्कळ आत्मविश्वास आला. ‘सर्व माहिती आणणे आवश्यक आहे’ या कल्पनेचे ओझे हलके झाले व त्या भाऊसाहेबांच्या शब्दांच्या जोरावर मी रत्नागिरीला गेलो.

रत्नागिरीला जाताना दादा म्हणाले, “तू रत्नागिरीला जाण्यापूर्वी दापोलीला जा. तेथे द. सी. सामंत नावाची व्यक्ती कुणब्याच्या बरोबर हॉस्टेलमध्ये राहते. त्यांना तू प्रथम भेट. दापोलीचे Alfred Gadney High School अवश्य पाहा. या बाबतीत द.सी. सामंत तुला मदत करतील.” दादांनी रत्नागिरीला जाताना मुंबई म्युनिसिपल शाळेतील एक निवृत्त शिक्षक श्री. गो. बा. भोसले माझ्यासोबत रत्नागिरीला जाण्यासाठी मदतीला दिले होते. आम्ही दापोलीला श्री. द.सी. सामंत यांना भेटलो. ते कुणबी विद्यार्थ्यांच्या सोबत एका झोपडीवजा वसतिगृहात राहत होते, त्यांनी कुणबी समाजाची खूप सेवा केली आहे. मी त्यांना रत्नागिरीला जाण्याचा माझा उद्देश सांगितला. रात्री त्या खोपट्यातच आम्ही सामंतांबरोबर झोपलो. आम्ही सकाळी उठून त्यांच्याबरोबर चहा घेताना त्यांनी माझ्या हातात एक पत्र व टिपणाचा कागद दिला. पत्र लोकल बोर्डाचे अध्यक्ष श्री.शिखरेगुरुजी यांना होते व टिपणीमध्ये लोकल बोर्डाच्या कार्यालयातील श्री. संभाजी सावंत ह्यांना भेटल्यावर कोणती माहिती मागायची, त्याचा तपशील होता. त्यांनी रात्री जागून हे दोन कागद लिहून तयार ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही ए. जी. हायस्कूलमध्ये गेलो. तेथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, रँगलर र. पु. परांजपे यांसारख्या थोर व्यक्ती शिकल्या होत्या. त्यांची नावे जनरल रजिस्टर’मध्ये मी उत्सुकतेने पाहिली. आम्हा दोघांना धन्य वाटले. मी मुख्याध्यापकांनाही सदर शाळेची अधिक माहिती विचारून त्याचे टिपण केले.

त्यानंतर आम्ही एस.टी.ने रत्नागिरीला पोहोचलो. आम्ही ‘गिरीविहार’ हॉटेलमध्ये राहिलो होतो. तेथे एक दिवस पटवर्धन हायस्कूलचे श्री. अच्युतराव पटवर्धनही भेटले. त्यांच्याकडून मी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणासंबंधी अधिक माहिती मिळवली.
दुसऱ्या दिवशी आम्ही लोकल बोर्डाच्या कार्यालयात गेलो. तेथे संभाजी सावंत या हेडक्लार्कना भेटलो. मला १९५८-५९ व १९५९-६० या दोन वर्षांतील पहिली ते चौथीची किती मुले नवीन म्हणून दाखल झाली आणि त्यांपैकी किती मुलांनी चौथ्या इयत्तेत पोहोचण्याआधी शाळा सोडली, या माहितीचा तपशील हवा होता आणि तसे मी श्री. सावंत यांना सांगितले. त्यांनी प्रथम जास्त काम करावे लागेल म्हणून टाळाटाळ केली. मला हवी असलेली आकडेवारी मिळत नाही असे मला त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना सांगितले, की मला तसे लिहून द्या. मी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाचा इतिहास लिहीत आहे म्हणून सदर आकडेवारीची गरज आहे. आजूबाजूला जरा हशा पिकला. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर बाहेर आलो, तर आमच्या कोचरे गावचे जिल्हा लोकल बोर्डमधील ज्येष्ठ सदस्य श्री. दत्तात्रय सखाराम ऊर्फ आप्पा भेंडे मला अचानक भेटले. ते ओळखीचे होते. त्यांनी माझी व दादांची विचारपूस केली व मी या कार्यालयात येण्याचे कारण विचारले. “मी संभाजी सावंत यांना भेटलो आहे. तुम्ही त्यांना मला मुलांच्या संख्यांचे आकडे द्यायला सांगितलंत तर बरं होईल,” असे मी म्हणालो. “मी त्यांच्याशी बोलतो,” असे श्री. आप्पासाहेब भेंडे यांनी मला सांगितले. आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना परत भेटलो. त्या वेळी त्यांनी माझे काम केले होते. त्यामुळे माझ्या प्रबंधाच्या कामाला चांगली मदत झाली. योगायोगाच्या घटनांनी माझा प्रबंध पूर्ण करायला चांगले साहाय्य केले हे निश्चित.

मी रत्नागिरीहून परत आल्यावर भाऊसाहेबांना भेटलो. सर्व हकिगत सांगितली. त्यांनी माझे मनापासून कौतुक केले. माझा उत्साह वाढला आणि मी प्रबंधाची पुढील प्रकरणे लिहून काढली.

प्रबंधाच्या कामासाठी मी पुण्यालाही गेलो होतो. पुण्याच्या शिक्षण विभागात मोठ्या हुद्यावर असलेले श्री. एस. आर. रायरीकर यांची मला पुष्कळ मदत झाली. त्यांनी मला रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची नावे व मुलांच्या संख्येची, शिक्षकवर्गाची आकडेवारी आणि जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची आकडेवारी प्रत्यक्ष शासनाच्या रेकॉर्डमधून काढून देण्यास मदत केली. त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. इतकी मौलिक मदत त्यांनी केलेली आहे.

माझ्या या तीन वर्षांतील १९६१चा मे महिना मला आठवतो. मला भाऊसाहेब दर दोन-तीन दिवसांनी नवीन प्रकरण लिहून आणावयास सांगत. मीही त्यांच्या इच्छेप्रमाणे मे महिनाभर काम केले. नवीन प्रकरण लिहून आणले की त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची छटा मला दुप्पट उत्साह देत असे. प्रंबधाच्या प्रकरणांचे टंकलेखन वेळोवेळी करून श्री. नगरकर ह्यांनी जे मला साहाय्य केले त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

ऑगस्ट महिन्यात भाऊसाहेबांनी माझा सर्व प्रबंध बारकाईने वाचला आणि तो पीएच.डी.साठी योग्य झाला आहे असे मला मोठ्या संतोषाने सांगितले.

हा प्रबंध लिहिताना मी खूप शिकलो. शिक्षणातले संदर्भग्रंथ कसे चाळायचे, डॉक्युमेण्टेशनचा निर्देश प्रबंध लिहिताना थोडक्यात कसा करायचा, उपलब्ध आकडेवारीवरून निष्कर्ष (conclusions) कसे काढायचे, निरनिराळ्या ठिकाणी जाऊन मुलाखतीच्या माध्यमातून माहिती कशी गोळा करायची, इत्यादी गोष्टी प्रबंध लिहिताना मला शिकता आल्या. प्रबंध इंग्रजीतून लिहिल्यामुळे मला इंग्रजीतून लिहिण्याचा पुष्कळ सरावही झाला. हा प्रबंध ५०० पृष्ठांचा झाला होता.

माझा प्रबंध म्हणजे भाऊसाहेबांच्या अखेरच्या दिवसांतील विरंगुळा होता. “नुसती विश्रांती घेत बसण्यापेक्षा प्रबंधाच्या निमित्तानं होणाऱ्या शैक्षणिक चर्चेत मला खरा विरंगुळा वाटतो,” असे ते मला नेहमी म्हणत असत.

भाऊसाहेबांनी काळाची पावले ओळखली होती की काय कोण जाणे. शेवटीशेवटी त्यांनी प्रबंध संपविण्याची फार घाई केली. “सिनॉप्सिस लवकर तयार कर. परीक्षेचा फॉर्म लवकर भरून दे,” असे ते सारखे माझ्या मागे लागत. शेवटी १० ऑक्टोबरला मुंबई विद्यापीठातून पीएच.डी.चा फॉर्म आणला आणि ११ ऑक्टोबर १९६१ रोजी सकाळी त्यांनी ‘सिनॉप्सिस’ व ‘फॉर्म’ यांवर सही केली. सही करताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते. त्यांनी त्या वेळी मला सांगितले, “बापू, आता माझं काम संपलं. सर्व प्रबंध लिहून पूर्ण झाला आहे. आता पुढचं तुझंच काम उरलेलं आहे.” मी भाऊंच्या पायांवर डोके ठेवले, दादांना नमस्कार केला आणि आमचे कुलदैवत श्री शांतादुर्गादेवीचा आशीर्वाद घेतला आणि तो फॉर्म व सिनॉप्सिस त्याच दिवशी विद्यापीठाकडे सादर केला.

मला अजून खरे वाटत नाही. ऑक्टोबरच्या ११ तारखेला ते सिनॉप्सिसवर सही काय करतात आणि १४ तारखेस ते जगातून चटदिशी निघून काय जातात. मला हे सर्व स्वप्नवत वाटत आहे. केवळ ते माझ्या पीएच.डी.च्या परीक्षेच्या फॉर्मवर आणि सिनॉप्सिसवर सही करण्यासाठीच राहिले होते. याची मला आठवण झाली की माझे डोळे पटकन भरतात.

भाऊसाहेब गेले. माझा आधार गेला. माझ्या मनावर फार मोठा ताण आला होता. पुढे काय करायचे ते सुचत नव्हते. दादा मला मधूनमधून धीर देत होते. मी पुढील चौकशीसाठी मुंबई विद्यापीठात गेलो. माहिती मिळवण्यासाठी मी सैरावैरा फिरत होतो. सुदैवाने माझ्या अडचणी हळूहळू नाहीशा झाल्या. मला नशिबाने श्री. एन.वाय. चव्हाण व दादांचे जुने स्नेही, श्री. आपा कुळकर्णी यांचे जावई श्री. दाभोळकर भेटले. ते पीएच.डी.च्या विभागाचे प्रमुख अधिकारी होते. त्यांनी मला मुंबई विद्यापीठात पीएच.डी.च्या गाइडच्या पॅनेलवर कोण आहेत याची यादी दाखवली. पॅनेलवर प्राध्यापक वा. पां. खानोलकर ह्यांचे नाव होते.
मी दुसऱ्या दिवशी चेंबूर येथील खानोलकरसाहेबांच्या घरी गेलो. रा. वि. परुळेकरांविषयी त्यांना खूप आदर होता. परुळेकरसाहेबांचे निधन झालेले त्यांना माहीत होते. मी ‘इंटरनल गाइड’ म्हणून त्यांचे नाव विद्यापीठाला सुचवण्यासंबधी खानोलकरसाहेबांना विचारले. त्यांनी गाइड होण्याचे लगेच मान्य केले. मी त्यांचे आभार मानले आणि मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारना अर्ज केला. विद्यापीठाने माझ्या अर्जातील सुचवलेल्या गाइडच्या नावाला मान्यता दिली. माझा जीव भांड्यात पडला.

सिनॉप्सिस सादर केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत प्रबंध चार प्रतींमध्ये विद्यापीठाच्या नियमानुसार सादर केला. माझा प्रबंध परीक्षकांकडे विद्यापीठातर्फे पाठवण्यात आला. पण प्रबंध परीक्षकांकडून परीक्षण होऊन यायला जवळजवळ वर्ष लागले. १९६२ साली विद्यापीठातून मला तोंडी परीक्षेसाठी उपस्थित राहण्याकरिता पत्र आले आणि २० ऑक्टोबर १९६२ रोजीच्या पत्राने मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने पीएच.डी.च्या (एज्युकेशन) पदवीस पात्र आहे असे मला कळवले. ते पत्र मी जेव्हा दादांना दाखवले, तेव्हा त्यांना झालेला आनंद माझ्या नजरेसमोर आहे. ते मला म्हणाले, “माझ्या शाळेतील शिक्षक शिक्षणातील पीएच.डी.चा उच्च पदवीधर झाला. याबद्दल मला अभिमान तर वाटतोच. पण मला माझा मुलगा पीएच.डी. झाला याचं समाधान खूप आहे.”

मी ह्या पीएच.डी. पदवीचे प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाच्या १९६२ सालच्या पदवीदान समारंभास प्रत्यक्ष उपस्थित राहून गणवेशामध्ये स्वीकारले.

मला पीएच.डी. ही शिक्षणातील पदवी माझ्या ३०व्या वर्षी मिळाली, हा माझ्या आयुष्यातील फार मोठा आनंदाचा क्षण होता. ह्या प्रबंधलेखनामुळे मला संशोधनाची एक आगळी दृष्टी लाभली. ही दृष्टी मला शिक्षणकार्य करताना पदोपदी उपयोगी पडत आहे.

दादांनी एकदा आपल्या शिक्षणप्रेमी स्नेह्यांना घरी चहाला निमंत्रित केले होते. त्यामध्ये श्री. जे.पी. नाईक, डॉ. चित्राताई नाईक, श्री. नी.बा. रांगणेकर आणि श्री. र.स. गायतोंडे हे मान्यवर होते. चहापाणी चालू असताना शिक्षणावर मनमोकळेपणी गप्पा झाल्या. मीही ह्या गप्पांत सहभागी झालो होतो. शेवटी नाईकसाहेबांनी मला डॉक्टरेट मिळाल्याबद्दल माझे अभिनंदन केले. लगेच दादा त्यांना म्हणाले, “जे.पी. माझंही अभिनंदन करा. आता मी पीएच.डी.चा बाप झालो आहे!” दादांच्या वाक्याला सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.