loader image

समाजाभिमुख उपक्रम

शालेय जीवन हे भावविश्व घडविण्याचा काळ असला तरी सामाजिक जाणिवेची रुजवण ह्याच वयात झाली तर उद्याचे नागरिक सजग घडतील ह्या धारणेवर बालमोहनचा ठाम विश्वास आहे.

समाजाभिमुख उपक्रम

जागतिक महिला दिन : निर्भया

पुरातन कालापासून अबला मानलेली स्त्री ही संवेदनशील आणि सक्षम आहे. आपली शक्ती आपणच ओळखली पाहिजे आणि गुन्ह्यांबाबत प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, याबाबत विद्यार्थ्यांना सजग करणे गरजेचे आहे. कोणाच्याही धमक्यांना न घाबरता पोलिसांची मदत घेण्यात काही वावगे नाही, तर यात पूर्णपणे गोपनीयता ठेवूनच मदत केली जाते. पोलीस हे आपल्यासाठी पोलीस दादा आणि पोलीस ताई असतात, असे सांगणारा कार्यक्रम महिला दिनाच्या निमित्ताने केला गेला.  पोलीस दलाच्या  ‘निर्भया पथका’ तर्फे शाळेमध्ये विद्यार्थिनींकरिता ‘जागतिक महिला दिन’ साजरा करताना विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिला सक्षमीकरण करण्याच्या तसेच गुन्हेगारीला नष्ट करण्याच्या दृष्टीने उचललेले सक्षम पाउल म्हणजेच ‘निर्भया पथक’ आणि त्याचे कामकाज कसे असते या विषयी मार्गदर्शन केले गेले. पोलिसांविषयी विद्यार्थिनींच्या मनात विश्वास आणि आपुलकी निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम बालमोहन शाळेत नेहमीच आयोजित केले जातात.

भारतीय सैनिकांना स्नेहपत्र

सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दल समाज म्हणून आपण कृतज्ञ तर असलंच पाहिजे पण आपलं सर्वस्व पणाला लावून रक्षण करणाऱ्या सैनिकाप्रती आपण प्रेमही व्यक्त केलं पाहिजे आणि ते त्यांच्यापर्यंत पत्राच्या अभिव्यक्तीतून पोहचावं म्हणून हा अभिनव उपक्रम. दिवाळीचा फराळ देखील ऐन युद्धाच्या धामधुमीच्या प्रसंगी बालमोहनमध्ये तयार करून पाठविला तेव्हा तो नेण्यासाठी लष्कराचे विमान विमानतळावर तैनात होते.

अंधश्रद्धा निर्मुलन

वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजला पाहिजे. त्यादृष्टीने श्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या अंधश्रद्धेच्या मागील विज्ञान उलगडून दाखविण्याचा प्रयत्न शाळेत वेळोवेळी केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे अंधश्रद्धे मागील विज्ञान उलगडून दाखविले.

समाजात वावरताना प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव समजून आचरण करणारा प्रत्येक विद्यार्थी असावा यासाठी ही कार्यशाळा.

निरामय आयुष्य

फिट्सच्या आजाराबद्दल जागरूकता (Purple Day Epilepsy Awareness Program) :एपिलेप्सीबद्दल जनजागृती आणि त्यांच्या रूग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी दरवर्षी २६मार्चला ‘पर्पल डे’ साजरा करण्यात येतो.

पिढ्यानपिढ्या समाजात रूजलेले एपिलेप्सी संबंधीचे गैरसमज दूर करणे, लोकांना या आजाराच्या चिकित्सा आणि निदानासाठी पुढे आणणे, समाजाचा आणि रुग्णांचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, शिक्षण, व्यवसाय, विवाह इत्यादीबाबींमध्ये रूग्णास भावनात्मक आधार देणे इत्यादी कामांसाठी ‘पर्पल डे इंटरनॅशनल’ तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. जनक नाथन, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.