loader image

माणूस घडवण्यासाठी

बालशिक्षणाला अग्रक्रम द्या!

डॉ. मो. शि. रेगे

। बालमोहन विश्वस्त

आज बालशिक्षण क्षेत्रापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांचा साधक-बाधक खोलवर विचार करणे आवश्यक असूनही तसा विचार होत नाही, भरमसाठ विधाने कानावर पडतात. त्यामुळे पालकांचा आणि शिक्षकांचा बुद्धिभेद होऊ लागला आहे. आज खरोखरीच का बालशिक्षणाचा ऱ्हास होत चालला आहे? आजचं बालशिक्षण खऱ्या अर्थानं बालकांच्या नैसर्गिक प्रवृत्ती लक्षात घेऊन अनौपचारिकपणे दिलं जातंय का? बालशिक्षण हे पूर्वप्राथमिक स्वरूपाचं शिक्षण आहे, की शाळापूर्व स्वरूपाचे शिक्षण आहे? बालशिक्षण वैयक्तिक स्वरूपाचं असावं की सामूहिक उपक्रमांच्या वातावरणाचं असावं की दोन्ही पद्धतींचं असावं? स्वतः अनुभव घेण्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं बालकांना आजच्या बालमंदिर, बालवाडी आणि बालकांचं सुंदर घर’ यामध्ये मिळत आहे का? आजच्या बालवाड्यांमध्ये शारीरिक वाढीबरोबर बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास समतोल पद्धतीनं होण्यासाठी वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केलं जात आहे का? कुणीही, कोठेही आणि कशाही प्रकारे बालशाळा सुरू करतो, यावर बंधनं घालणं आवश्यक आहे का? आजच्या बालवाड्यांत शिक्षक-प्रशिक्षणाचा अभाव, भौतिक सुविधांचा अभाव, गरजेच्या शैक्षणिक साधनांचा अभाव आणि उपयुक्त साहित्याचा अभाव – अशा प्रकारे आजचं बालशिक्षण अभावग्रस्त झालं आहे का? बालमंदिरात बालकांना प्रवेश देण्याची प्रचलित कार्यपद्धती बदलणं आवश्यक आहे का? सर्व बालशिक्षण-संस्थांमध्ये एकच अभ्यासक्रम असावा की त्या त्या बालवाडीला अभ्यासक्रम तयार करण्याचं स्वातंत्र्य असावं? आमच्या बालवाडी शाळांत प्रयोगशीलतेला वाव असूनही तसे होत नाही, हे खरे आहे का? बालवाडीतील मुलांचं मूल्यमापन कसं करावं? याबाबतीत पालक-शिक्षकसंपर्क आमच्या बालवाडीत आज साधला जात आहे का? वाचन, लेखन आणि गणन या विषयांना बालशिक्षणात स्थान असावं का? बालवाडीमध्ये बक्षिसे, शिक्षा, परीक्षा आणि स्पर्धा यांचा अवलंब बालशिक्षणात केला, तर बालमनाला धक्का तर लागणार नाही ना?

या आणि अशा अनेक प्रश्नांचा बालशिक्षणतज्ज्ञांनी आणि बालशिक्षणावर प्रेम करणाऱ्या शिक्षक-पालकांनी शांत मनाने विचार केला, तरच आजची गोंधळाची परिस्थिती सुधारेल. खरे म्हटले तर बालशिक्षणाला अग्रक्रम मिळालाच पाहिजे.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.