loader image

आठवणीतील पाऊले

किंग जॉर्जमधील शालेय जीवन

दादांनी मला १९४३मधील जूनच्या सुरुवातीस आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. मला कळेना, का बोलावले असेल? त्यांनी मला जवळ घेतले व सांगितले, “बापू, तू आता दुसऱ्या शाळेत जाणार.’

“दादा, कोणत्या शाळेत?” मी विचारले.

ते म्हणाले, “हिंदू कॉलनीत एक मोठी शाळा आहे. शाळेचे नाव आहे, King George English School. त्या शाळेत भाऊकाका व गंपूकाका शिकले. त्या शाळेत तू इंग्रजी चौथीच्या वर्गात बसायचं. तुला माझे स्नेही, त्या शाळेचे प्रमुख वैद्य आणि नाबर यांनी शाळेत प्रवेश देतो असं मला सांगितलं आहे. तू माझा मुलगा आणि बालमोहन विद्यामंदिरचा विद्यार्थी. त्या शाळेत मन लावून अभ्यास करायचा. चांगलं वागायचं. त्याच शाळेतून तू मॅट्रिक होणार आणि मग कॉलेजमध्ये जाणार.”

आता मी मोठ्या इंग्रजी शाळेत शिकणार! मला उत्साह आला. पहिल्या दिवशी दादा मला त्या शाळेत घेऊन गेले होते. त्या शाळेचे भव्य प्रवेशद्वार पाहून मला जरा भीतीच वाटली. प्रवेशद्वारातून शाळेच्या आवारात गेलो, तर भव्य पटांगण होते. पटांगण कसले, ते मैदानच होते. डाव्या बाजूला शाळेची एकमजली लांबलचक कौलारू इमारत होती. पटांगणाच्या दुसऱ्या बाजूला एक छोटीशी बैठी इमारत आणि तिच्या बाजूला दोनमजली शाळेची आणखी एक निराळी इमारत, अशा शाळेच्या तीनच इमारती होत्या. माझी शाळा फक्त मुलांसाठीच होती. त्या शाळेत मुली शिकत नव्हत्या. मुलींसाठी त्याच आवारात दोनमजली स्वतंत्र शाळा होती.

दादांबरोबर मी त्या शाळेच्या ऑफिसमध्ये गेलो. टेबलाजवळ बसलेल्या दोन मुख्य गुरुजींना मी वाकून नमस्कार केला. माझे नाव त्यांनी विचारले. मला त्यांनी बाहेर बाकावर बसायला सांगितले. काही वेळाने दादा बाहेर आल्यावर आम्ही घरी आलो. आम्ही शाळेतून परत येताना सहज माझे लक्ष रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांकडे गेले. झाडांची लांबच लांब रांग, त्या झाडांच्या दोन्ही बाजूंच्या फांद्या आपली हिरवी पाने हलवून मला जणू शुभेच्छाच देत आहेत असे मला वाटले. मी घरी आल्यावर आईला सांगितले, की मी आता जूनपासून गोठ्या इंग्रजी शाळेत जाणार. दादा आणि मी आताच ती शाळा पाहून आलो. आईने, ‘वा, छान’ असे म्हणून मला जवळ घेतले.

शाळेच्या पहिल्या दिवशी मी सर्व पहिला मजला फिरून बघितला. मोठेमोठे वर्ग, प्रत्येक वर्गाला दोनदोन भव्य दरवाजे. माझा इंग्रजी चौथीचा वर्ग इमारतीच्या मध्यभागी होता. मी माझ्या वर्गात गेलो. काही मुले वर्गात आली होती. मला नवीन मित्र मिळाले. वर्गात लांब बाक होते. त्यातील एका बाकावर सर्वांत पुढे मी बसलो. समोर शिक्षकांसाठी उंच प्लॅटफॉर्म होता. त्यावर टेबल आणि खुर्ची होती. त्याच्यामागे मोठा फळा होता. तो लाकडी फळा नव्हता, म्हणून जवळ जाऊन हात लावून पाहिले. तो भिंतीतला सिमेंटचा फळा होता. तशा प्रकारचा फळा मी पहिल्यांदाच पाहत होतो. थोड्या वेळाने शाळेची दीर्घ घंटा झाली. काही वेळाने शिक्षक वर्गात आले. त्यांनी आपणहून स्वतःचे नाव ‘गुप्ते’ आहे असे आम्हाला सांगितले. आमची हजेरी घेतली. इतर मुले नाव घेतल्यावर, ‘yes sir’ म्हणून हात वर करत होती. माझे नाव मी ऐकले, ‘मोरेश्वर शिवराम रेगे’. इतर मुलांप्रमाणे मी उठून उभा राहिलो व मोठ्या आवाजात ‘yes sir’ म्हणालो.

आम्हाला खेळासाठी असलेले संत व निकम ह्या शिक्षकांना मी विसरू शकणार नाही. त्यांनी आम्हाला निरनिराळे खेळ शिकवले. ते कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांना आम्ही सगळेच घाबरत असू. संतमास्तर दर शनिवारी आम्हाला समोरच्या बैठ्या इमारतीत बोलावीत व सूर्यनमस्कार घालायला शिकवीत. संतसर आणि निकमसरांची ही जोडी शाळेच्या मैदानात सर्वांची मधूनमधून सांघिक कवायत घेत असे. निकमसरांचा आवाज पहाडी होता. त्यांचा आवाज या टोकापासून त्या टोकापर्यंत घुमत असे. संत आणि निकमसरांनी आम्हा काही विद्यार्थ्यांकडून शाळेच्या मैदानात क्रिकेटचे पीच करून घेतले होते. आम्ही तेथे मधूमधून क्रिकेटच्या मॅचेसही खेळलेलो आहोत.

१९४४-४५ साली पाचव्या इयत्तेत गेलो. आमचा वर्ग तळमजल्यावरील खोलीत होता. श्री. व्ही.एम. सबनीस (इंग्रजी), श्री. एस.व्ही. नाबर (भूगोल), श्री. राव (सायन्स) ही काही शिक्षकांची नावे आठवतात. मला नाबरमास्तर प्रकर्षाने आठवतात. त्यांना मी कधी मुलांना रागावताना पाहिलेले नाही. ते अगदी हळू आवाजात शिकवायचे. ते आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आमच्या भूगोलाच्या अडचणी सोडवीत. ते हाडाचे शिक्षक होते. ते मुलांवर निरनिराळे प्रयोग करीत. शिकवताना निरनिराळ्या प्रकारे शिकवीत. त्यामुळे आम्हाला शिकण्याचा कधी कंटाळा आला नाही. वर्षाच्या सुरुवातीला ते जेव्हा प्रथम वर्गात आले तेव्हा त्यांना आम्हाला काहीतरी सांगायचे होते, असे त्यांच्या हालचालीवरून, वर्गातील दोन बाकांच्या रांगांमधून फिरण्यावरून लक्षात आले. नंतर ते प्लॅटफॉर्मवर गेले आणि आपल्या खुर्चीवर बसले. 

“मुलांनो, या वर्षी मी तुम्हाला भूगोल शिकवणार आहे. शिकवणार नव्हे तर तुम्ही स्वतःचा स्वतः भूगोल शिकणार आहात. त्यातील आनंद घेणार आहात. तुम्ही भूगोलासाठी दोन वह्या करायच्या. एक वही वर्गात आणायची व दुसरी वही फेअर वही म्हणून वापरायची. मी दर आठवड्याला माझ्या तासाला तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून असलेली काही अवांतर पुस्तकं टेबलावर आणून ठेवणार आहे. त्यातील ठरावीक पोर्शनवर आधारित एक प्रश्न फळ्यावर लिहिणार आहे. तो प्रश्न तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहून घ्यायचा. टेबलावरील एक पुस्तक घ्यायचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या पृष्ठावर आहे ते पाहायचं, त्याचं वाचन करायचं, त्या पुस्तकातील आकृत्या, चित्रं यांचं निरीक्षण करायचं व विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. नंतर घरी जाऊन ते फेअर वहीत लिहून काढायचं व एका आठवड्यानं भूगोलाच्या तासाला त्या फेअर वहीवर माझी सही घ्यायची. वर्षाच्या शेवटी ती तुमची सर्व उत्तरं वाचून मी श्रेणी देणार आहे. या वर्षी तुमची भूगोलाची सहामाही परीक्षा नाही आणि वार्षिक परीक्षाही नाही.”

नाबरमास्तरांची ही गोष्ट आम्हाला आवडली. आम्ही लगेच ‘होऽऽ’ असे आनंदाने ओरडलो. नाबरमास्तरांनी आम्हाला ओरडू दिले. आजही तो आत्मविश्वास मला स्वयंअध्ययनाची प्रेरणा देत आहे.

मी सहावी व सातवी या वर्गांत गेलो. शिक्षक आम्हाला शाळेतील इतिहासाचा आणि भूगोलाचा हॉल नेहमी पाहायला सांगायचे. ते दोन हॉल म्हणजे इतिहास आणि भूगोल या विषयांचे ज्ञान देणाऱ्या वास्तू होत्या. तेथे तक्ते, माहिती, मॉडेल्स सुंदर रीतीने मांडलेली असायची. तसेच आणखी एक गोष्ट मला आवडली. पहिला मजला चढताना तळमजल्याच्या एका बाजूला फळ्यावर श्री. बी. आर. प्रभूसर बातम्या लिहीत असत. त्या वाचून आम्ही दुसरा जिना चढायच्या पूर्वीच उंचावर मध्यभागी एक फ्रेम होती. त्यामध्ये लिहिलेले असायचे : ATHOUGHT FOR TODAY आणि त्याखाली इंग्रजीतून एक सुविचार असायचा. मी माझ्या वहीत तो सुविचार लिहून घेत असे. घरी गेल्यावर त्याचा अर्थ गंपूकाकांना विचारत असे. सर्वश्री कात्रेकर (इंग्रजी), बेंबळकर (संस्कृत), दत्तप्रसन्न कारखानीस (मराठी), धनवटे (भूगोल), कर्णिक (मॅथ्स), राव (सायन्स) यांसारखे चांगले व अनुभवी शिक्षक आम्हाला लाभले म्हणूनच इयत्ता ७वी मध्ये आमची मॅट्रिकच्या परीयोची तयारी चांगली झाली, असे कृतज्ञतेच्या भावनेने म्हणावेसे वाटते.

माझे मॅट्रिकचे वर्ष मला आठवते. मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो. मॅट्रिकचे माझे वर्ष मला अतिशय महत्त्वाचे वाटायचे. खूप परिश्रम घ्यायला लागले तरी चालतील; पण दादांची इच्छा पूर्ण करायची असे माझ्या मनाने घेतले होते. खूप अभ्यास करायचा आणि पहिल्या खेपेला मॅट्रिक व्हायचे हे एकच ध्येय माझ्यासमोर होते.

दादांनी मला वर्षभर अभ्यास करण्याचे वेळापत्रक तयार करून दिले होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही सरावासाठी आणल्या होत्या. परीक्षा लेखनाची असल्यामुळे लेखनसराव कसा करावा, निबंध मधूनमधून लिहिणे का आवश्यक आहे याचे दादांनी मार्गदर्शन केलेले मला अजूनही आठवते. त्याचप्रमाणे गणित व सायन्स इंग्रजीतून असल्यामुळे त्यातील चौथी ते सहावी इयत्तांमधील कोणता भाग समजला नाही हेही दादांनी मला लिहून काढायला सांगितले होते. सकाळी ६ ते रात्रौ ८ या कालावधीत विषयांची विभागणी कशी करावी व प्रत्येक विषयाला कमीत कमी दीड तास देणे का आवश्यक आहे हेही मला त्यांनी सांगितले होते. पाठांतर रोज सकाळी १ तास आणि लेखन रात्रौ १ तास करण्याचा नियमच त्यांनी घालून दिला होता.

आम्हाला मॅट्रिकला जनरल इंग्लिश होते. Fifty-one Test papers मधील प्रश्नपत्रिका मी नियमाने सोडवीत असे. दादांनी दर महिन्याला प्रकाशित होणारे Kutmutiaचे मासिक माझ्यासाठी सुरू केले होते. ही दोन्ही पुस्तके म्हणजे व्यवसायाचे मोठे संग्रह होते आणि ते सोडवणे आवश्यकच होते. एवढेच नव्हे, तर इंग्रजीमधून Maths, Science असल्यामुळे मला याची जास्त जरुरी होती. बॉम्बे ग्लास वर्क्सच्या चाळीत राहणारे श्री. पटवर्धन यांच्याकडे दररोज सकाळी एक तास मॅथ्स व सायन्स शिकण्यासाठी मी जात असे. त्यांनी माझे हे दोन्ही विषय चांगले तयार करून घेतले. तसेच दुसऱ्या सहामाहीत त्याच दोन विषयांचा लेखनसराव होण्यासाठी दादर टीटी येथील जेष्टाराम बागेच्या जागेत श्री. भा. के. सोहोनी ह्या शाळेतील शिक्षकांकडेही मी जात असे. याशिवाय मी दररोज सुमारे चार तास स्वतः अभ्यास करून परीक्षेची तयारी केली. मी पहिल्याच वेळी मॅट्रिक व्हावे ही दादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यामुळे माझ्या श्रमावर, इच्छाशक्तीवर माझा विश्वास बसला. याचा मला कॉलेजमधील शिक्षण घेण्यास निश्चितच उपयोग झाला.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.