loader image

आठवणीतील पाऊले

बालमोहनमधील शालेय जीवन

दादांनी मला १९४०च्या सुरुवातीस सांगितले, “बापू, आपण ही माटुंग्याची जागा सोडणार आहोत आणि शिवाजीपार्क येथील जागेत राहायला जाणार आहोत. मी तुला माझ्या नवीन शाळेत घालणार आहे.” मी त्या वेळी ९ वर्षांचा असल्याने मला नवीन जागा आणि नवीन शाळा एवढेच समजले होते. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आम्ही घरातले सगळे ओसरीवर बसलो असताना दादांनी सांगितले, की शिवाजी पार्कला मी शाळा काढतो आहे. त्या वसाहतीतील दोन प्रतिष्ठित व्यक्ती, श्री. शंकरराव आणि श्री. वामनराव वर्दे या दोन्ही बंधूंनी त्यांच्या घराजवळच्या भाड्याच्या जागेत शाळा काढण्याचा आग्रह धरला असून ते मला सर्व प्रकारची मदत करणार आहेत.

शाळा ३ जून १९४० रोजी सुरू झाली. त्यापूर्वी एकदा शाळेची जागा दाखवायला दादा मला बरोबर घेऊन गेले होते. त्या वेळी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील दर्शनी गॅलरीच्या बाहेरच्या बाजूला रंगीत अक्षरांची एक पाटी होती. त्यावर ‘अभिनव विद्यामंदिर’ असे नाव लिहिले होते. त्यानंतर शाळा सुरू झाली तेव्हा ‘बालमोहन विद्यामंदिर’ असे शाळेचे नाव झाले. १९४०-४१ साली मी इयत्ता चौथीमध्ये होतो. आमचा वर्ग मैदानाच्या बाजूला असल्यामुळे हवेशीर आणि भरपूर उजेडाचा होता. आमच्या वर्गात फक्त १० बाके होती. दादांनी फक्त २० मुलांची सोय त्या वर्गात केली होती. प्रत्येक बाक फक्त दोन मुलांसाठी होता. समोर टेबल आणि खुर्ची आणि त्याच्या मागे मोठा फळा. पहिले काही दिवस आम्ही थोडी मुले होतो. त्यामध्ये काही मुलीही होत्या. घंटा झाल्यावर एक बाई वर्गात आल्या. त्यांनी आमचे स्वागत केले. त्यांनी स्वतःचे नाव कुसुम नाडकर्णी असे आम्हाला सांगितले. प्रार्थनेला आम्ही हात जोडून उभे राहिलो. मला आठवते, की कुसुमताईंनी आम्हाला हात कसे जोडावेत हे प्रत्यक्ष दाखवले होते. नंतर त्यांनी आम्हाला प्रार्थना सांगितली. ‘सृष्टी तुला पाहुनि धन्य माते…’ ही ती प्रार्थना. आम्ही प्रार्थना कुसुमताईंच्या मागोमाग म्हणालो. नंतर दादा वर्गात आले. दादांनी आम्हाला सांगितले, “तुम्ही नव्या शाळेत आला आहात. चांगला अभ्यास करा. तुम्ही चांगले विद्यार्थी होणार.’ नंतर त्यांनी आम्हाला शाळेविषयी माहिती सांगितली. तसेच शाळेच्या माहितीचे एक पत्रकही कुसुमताईंनी आम्हा प्रत्येकाला दिले. ते पत्रक अजून मी जपून ठेवले आहे. शाळा संपल्यावर आम्ही मित्रांनी सर्व शाळा पाहिली. प्रत्येक वर्गात चित्रे, तक्ते लावले होते. शाळा दोन ब्लॉकमध्ये भरली होती. मध्यभागी एक मोठा आरसा लावला होता. मी आरशासमोर उभा राहिलो. स्वत:ला पाहिले. मला गंमत वाटली. नंतर मी मित्रांबरोबर बाहेर खेळायला गेलो.

मुले शाळेत यावीत यासाठी दादा आजूबाजूच्या घराघरांत जाऊन पालकांना भेटत असत. मुलांना बसने शाळेत यायला आवडेल म्हणून दादांनी ५०० रुपयांना श्री. पंथकी नावाच्या व्यक्तीकडून शाळेसाठी एक बस विकत घेतली. त्यासाठी लागणारा ड्रायव्हर दादांनी कोचरे गावाहून आणला होता. त्याचे नाव महादेव होते. दादा दररोज ड्रायव्हरच्या शेजारीबसून, परळ ते वांद्रे या परिसरातील मुलांना आणण्यासाठी स्वतः जात आणि ११च्या सुमारास शाळेत आले की स्वतः शाळेची घंटा देत असत. माझ्या बालवयात मोटार, बस ह्या गोष्टींचे मला विशेष आकर्षण होते. मी दादांच्या बरोबर बसने मुलांना आणण्यासाठी जात असे. मला मजा वाटायची. काही वेळा महादेवच्या शेजारी बसून तो मोटार चालवतो कशी? पेट्रोल कुठे असते? बसला टायर असतात म्हणजे काय? बस एकदम थांबते कशी? असे अनेक प्रश्न मी त्याला विचारत असे. महादेव तितक्याच आवडीने मला माहिती देत असे. जिज्ञासू वृत्तीतून, कुतूहलातून मिळालेली माहिती माझ्या चांगली लक्षात राहायची.

माझे ते वर्ष मजा करण्यात गेले. मला कुसुमताई आवडायच्या. त्या छान अक्षरात फळ्यावर लिहीत असत. कुसुमताई आम्हाला अगदी हळू आवाजात, पण प्रत्येकाला ऐकू जाईल असे शिकवीत असत. मराठी शिकवताना, त्या कविता गाऊन शिकवीत. आम्हाला केशव शंकर प्रभू नावाचे एक शिक्षक होते. ते इंग्रजी शिकवीत असत. ते इंग्रजी भाषेतील मोठी अक्षरे व लहान अक्षरे कशी असतात ते सांगत व ती ओळखायला सांगत. मधूनमधून ते इंग्रजी वर्तमानपत्र प्रत्येकाच्या हातात देत असत. प्रत्येकाला त्यातील इंग्रजी अक्षरे ओळखायला व मोठ्याने म्हणायला लावत असत. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आम्हाला ती अक्षरे वहीत कशी काढावीत हेही सांगितले. तीन ओळींची वही त्यांनी आम्हाला प्रत्येकाला दिली होती.

दादांना ज्यांनी शाळा काढायला मदत केली ते, शंकरभाऊ वर्दे, दर शनिवारी आमच्या वर्गात यायचे. प्रथम प्रश्न विचारायचे, “What day is today?’ नंतर तेच म्हणत, ‘Today is Saturday.’ ‘Today is Saturday’ हे वाक्य ते प्रथम सर्वांकडून एकदम व नंतर प्रत्येकाकडून म्हणवून घ्यायचे व नंतर जायचे. काही आठवडे “Today is Saturday’ ची सवय झाली की त्यानंतरचे काही आठवडे ‘Yesterday was Friday’ आणि त्यानंतर ‘Tomorrow will be Sunday’ ही वाक्ये ते आमच्याकडून म्हणवून घेत असत.

एकदा दादा वर्गात आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले, की बाळांनो, तुम्ही चौथीत आहात ना! चौथीच्या एका वर्षात तुम्ही दोन इयत्तांचा अभ्यास करणार आहात. इयत्ता चौथीचा आणि इयत्ता इंग्रजी पहिलीचा. तुम्ही पुढच्या वर्षी एकदम इंग्रजी २रीत जाणार आहात. तेव्हा दोन वर्षांचा अभ्यास या वर्षी चांगला करा. आमच्या मनात त्या वेळी, ‘एकदम दुसरीत जाणार म्हणजे काय?’ असा प्रश्न घोळत राहिला. आम्ही तो प्रश्न कुसुमताईंना विचारला. त्या म्हणाल्या, “तुम्ही इंग्रजी पहिलीत जाण्याऐवजी एकदम दुसरीत जाणार. तेव्हा तुम्ही अभ्यास चांगला करा.” आम्हाला वत्सलाताई नाडकर्णी गाणी शिकवायच्या. चालीवर गाणी म्हणताना आम्हाला खूप मजा यायची.

काही दिवस गेल्यावर पगडी आणि लांब कोट घातलेले एक पाहुणे आमच्या वर्गात आले. दादा त्यांना घेऊन आले होते. दादांनी आम्हाला सांगितले, “हे फार मोठे आहेत. हे परुळेकरसाहेब. उठून उभे राहा आणि टाळ्या वाजवा.” आम्ही तसे केले.

काही दिवसांनी आम्हाला समजले, की ते पाहुणे शाळा चांगली सुरू झाली आहे असे सांगायला आले होते. त्यांनी १६ जून १९४० रोजी आमच्या बालमोहन शाळेचे उद्घाटन केले. त्यांचे नाव रा. वि. परुळेकर होते. बॉम्बे म्युनिसिपल स्कूल कमिटीचे ते सेक्रेटरी होते. त्यांनी शाळेला चांगला शेरा दिला होता. त्यातील काही वाक्ये मला येथे उघृत करावीशी वाटतात.
“ही संस्था लवकरच जनतेचे प्रेम, आदर संपादून नावारूपास चढेल, याबद्दल माझी खात्री आहे. कारण ह्या संस्थेच्या चालकांच्या कर्तबगारीची मला पूर्ण ओळख आहे. मुंबईचे नागरिक ह्या बालमोहन विद्यामंदिराचा भरपूर फायदा घेतील अशी मी आशा करतो. ही संस्था जनतेच्या आदरास पात्र होवो व तिची उत्तरोत्तर भरभराट होवो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.”

दादांनी १० ऑक्टोबर १९४० रोजी दसरा संमेलनाला मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. बा. गं. खेर ह्यांना आमंत्रित केले होते. त्यांच्याकडे शिक्षणखाते असल्यामुळे त्यांनी शाळेच्या संमेलनाला येणे अत्यंत महत्त्वाचे होते.

त्या दसरा संमेलनाची शाळेत जोरदार पूर्वतयारी सुरू झाली. दसरा संमेलन शिवाजी पार्कच्या मैदानात होणार होते. त्यासाठी वत्सलाताई नाडकर्णी ह्या गायनाच्या बाईंनी आमचे निरनिराळे कार्यक्रम बसवले. त्यामध्ये नृत्य, हावभावयुक्त गाणी, शारीरिक शिक्षणाची कवायत, इत्यादी कार्यक्रम होते. ह्या कार्यक्रमांची तयारी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील जागेत होत असे. मला आठवते, की शाळेतील प्रत्येक मुलाला ह्या कार्यक्रमात वत्सलाताईंनी घेतले होते. कार्यक्रम छान झाला.
तो ज्या मंडपात झाला, तो मंडप रिफॉर्मेटरी स्कूलमधील दादांचा विद्यार्थी आप्पा शेलार नावाच्या मुलाने घातला होता. त्याच्या रेगेमास्टरां’च्या शाळेचा कार्यक्रम होता ना! अतिशय उत्साहाने त्याने तो सजवला होता.
दसरा संमेलनाला अनेक प्रतिष्ठित नागरिक आले होते. आम्ही त्यांच्यासमोर मनोरंजक कार्यक्रम सादर केले. मुख्यमंत्री खेरसाहेबांनी शेरेबुकात लिहिलेला शेरा शाळेचे वैशिष्ट्य सांगणारा आहे. तो असा :
“अगोदर शाळा फिरून पाहिली. कार्यक्रमात मुलामुलींची कामे पाहिली. शिस्त, दक्षता, कळकळ या गुणांनी शाळेचे चालक उत्तम शिक्षण देण्याची तजवीज करीत आहेत.”

आमच्या शाळेने १५ जानेवारी १९४१ रोजी ‘बालदिन उत्साहात साजरा करायचे ठरवले. मकरसंक्रांतीचा दुसरा दिवस ‘मुलांचा सामुदायिक वाढदिवस’ म्हणून साजरा करावा व मुलांना आनंद द्यावा ही कल्पना दादांच्या मनात आली आणि त्यांनी अगोदर दोनतीन दिवस शिक्षकांना आपली कल्पना सांगून, त्यामध्ये त्यांचा सहभाग घेण्याचे ठरविले.

कुसुमताईंनी आमच्या वर्गाला सांगितले, की आपली शाळा १५ जानेवारीला तुम्हा सर्वांचा वाढदिवस एकत्रित साजरा करणार आहे. त्या दिवशी तुम्ही शाळेत छान छान कपडे घालून यायचे. ह्या दिवशी आपले दादा तुमची सर्वांची एक सुंदर मिरवणूक काढणार आहेत. दोन मुलांची एक रांग अशा पद्धतीने तुम्ही रस्त्यावरून जाणार आहात. तुमचे आई-वडील आणि इतर लोक तुमच्याकडे कौतुकाने पाहतील. अत्यंत शिस्तीने तुम्ही चाला. तुम्हाला काही घोषणा मोठ्याने म्हणायला सांगितल्या जातील. त्या मोठ्या आवाजात म्हणायच्या.

आम्ही १५ जानेवारीला छान कपडे घालून शाळेत आलो. दादांनी आम्हाला एकत्र बसवले. दादांनी आम्हाला ‘बाळांनो’ असे प्रेमाने संबोधून आम्हाला बालदिनासंबंधी सांगितले. ते म्हणाले, की “तुम्ही खूप मोठे आहात. तुम्हाला खूप महत्त्व आहे. तुम्ही घराचे बहुमोल अलंकार आहात, तुम्ही राष्ट्राची खरी संपत्ती आहात, तुम्ही राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहात,” असे सांगून आम्हाला चांगले वागण्यासंबंधी, वडीलमाणसे आणि शिक्षक यांना मान देण्यासंबंधी, त्यांच्या आज्ञा पाळण्यासंबंधी, प्राणिमात्रांवर दया करण्यासंबंधी, गरीब असलेल्या लोकांकडे सहानुभूतीने पाहण्यासंबंधी सांगितले आणि हा दिवस तुमचा आहे, तुमचा सर्वांचा वाढदिवस आहे; म्हणून तो सणासारखा पाळा व आनंदात घालवा असे कळकळीने सांगितले. नंतर आमची छान मिरवणूक निघाली. ‘मुले हे घराचे बहुमोल अलंकार, मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती, मुले हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ’ अशा घोषणा आम्ही मोठ्या आवाजात देत होतो. मिरवणुकीच्या सर्वांत पुढे आमचे दादा होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुलांचे आई-वडील, आजूबाजूचे लोक आमच्याकडे कौतुकाने पाहत होते. मिरवणूक त्यांच्याजवळ आली की ते टाळ्या वाजवीत असत. आम्हाला खूप आनंद होत होता. ही मिरवणूक मागच्या रस्त्यावरून पुन्हा शाळेच्या रस्त्यावरून शाळेत परत आली. आम्ही आपापल्या वर्गात बसलो. कुसुमताईंनी आम्हाला ‘तिळगूळ’ वाटला. त्यानंतर आम्ही आईवडिलांबरोबर घरी गेलो. अशा रीतीने शाळेचा पहिला बालदिन आम्ही अत्यंत आनंदात आणि मजेत घालवला.

 

आम्ही मुलांकडून १९४०-४१ ह्या वर्षात कुसुमताई व दादांनी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास खूप व्यवसाय सोडवून घेऊन चांगला करवून घेतला होता. आम्हाला दादांनी सांगितले होते, की एका तासात गणिताचे १०० प्रश्न सोडवायचे असतात. मराठीच्या पेपरात ‘मनात वाचावयाचा उतारा’ देऊन, तो आठवून लिहायचा असतो. अशा महत्त्वाच्या गोष्टींची आम्हाला सवय केली होती. आमच्या वर्गातील सर्वच्या सर्व मुले दादांनी स्कॉलरशिप परीक्षेला बसविली होती. परीक्षेच्या ठिकाणी (एलफिन्स्टन हायस्कूल, धोबीतलाव) आम्हाला नेले होते. आम्हाला परीक्षेची भीती मुळीच वाटली नाही. आम्ही जणू एखाद्या सहलीला जात आहोत अशा उत्साहात गेलो. पेपर लिहिले व तसेच शाळेत संध्याकाळी परतलो.

आनंदाची गोष्ट म्हणजे, आमच्या वर्गातील शारदा बाजीराव जाधव ही मुलगी परीक्षेत दुसरी आली. तिला ‘टाकी प्राइझ’ मिळाले. त्या वेळी फक्त एकच स्कॉलरशिप होती. दुसरा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला म्युनिसिपालिटीने हे टाकी प्राइझ ठेवले होते. यामुळे आमच्या शाळेच्या प्रतिष्ठेत भर पडली. शाळेचे नाव हळूहळू सगळीकडे झाले.

दादांनी वार्षिक परीक्षा अगदी निराळ्या पद्धतीने घेतली होती. शाळेतील मुले इंग्रजी दुसरीत जाण्यास योग्य आहेत असे बाहेरच्या तज्ज्ञ लोकांनी म्हटले पाहिजे म्हणून दादांनी त्यांचे पुण्याचे ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म.का. कारखानीस आणि धुळे ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल का. ब. घाटे यांना आमची परीक्षा घेण्यास बोलाविले होते. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या मूल्यांची सर्व त-हेने पाहणी केली. त्यांनी आमच्या चौथीच्या वर्गाच्या परीक्षेचे पेपर्स काढले व तपासूनही दिले. इंग्रजीचा पेपर परदेशातून शिक्षण घेऊन आलेले श्री. डी. जे. लिमये यांनी काढला होता. आम्ही इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळवले होते. आम्ही इंग्रजी दुसरीमध्ये जाण्यास योग्य आहोत असा शेराही ह्या परीक्षकांनी दिला.

आम्हाला वार्षिक प्रगतीचा अहवाल एप्रिलमध्ये दिला गेला. मला माझा अहवाल ज्या वेळी मिळाला त्या वेळी वार्षिक परीक्षेचे मार्क पाहून मला खूप आनंद झाला. शेवटी शेरा होता ह्र “इंग्रजी दुसरीमध्ये प्रवेश दिला आहे.” जूनपासून मी इंग्रजी दुसरीत बसणार ह्या विचाराने मला उत्साह आला. धावत जाऊन, तो अहवाल दादांना ऑफिसमध्ये दाखवला. तेथे कुसुमताईही होत्या. त्यांनी मला शाबासकी दिली. मी लगेच घरी गेलो. शाळेच्या एका खोलीत आमचे घर होते. मी तो अहवाल आईलाही दाखवला. तिने मला जवळ घेतले आणि असाच चांगला अभ्यास कर असे सांगितले. शाळेच्या पहिल्या वर्षात आम्ही अशी आनंदाने प्रगती केली.

आमची शाळा ९ जून १९४१ला सुरू झाली. शाळेचे नवीन वर्ष, नवीन उत्साह, नवीन उमेद घेऊन आले होते. आमचा सर्व चौथीचा वर्ग इंग्रजी दुसरीत गेला होता. दादांनी इंग्रजी पहिली, दुसरी व तिसरीचे वर्ग एकदम सुरू केले होते. हे वर्ग पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या ब्लॉकमध्ये भरू लागले. इयत्ता पहिलीला मनोरमा वागळे, इयत्ता दुसरीला राजाध्यक्षसर, इयत्ता तिसरीला माझे धाकटे काका, गंपूकाका अशा तीन शिक्षकांनी शाळा सुरू झाली. जोगळेकरसर गायनासाठी आणि गो. आ. कुळकर्णीसर खेळासाठी शिक्षक होते. गंपूकाका हे या वर्गाचे मुख्याध्यापक होते.

शाळेची सुरुवात जोगळेकरसरांच्या पेटीवादनाने होई. ‘अंतर मम विकसित करी, हे परात्परा’ किंवा ‘सृष्टी तुला पाहुनि धन्य माते’ यांपैकी एक प्रार्थना आम्ही सगळे एकत्रितपणे, एका चालीत, एका सुरात म्हणत असू. त्यानंतर रोज अर्धा तास राजाध्यक्षसर आमचे तिन्ही वर्ग एकत्रित करून आम्हाला सामान्यज्ञान, विविध संशोधक आणि त्यांचे संशोधन यांची माहिती देत. वागळेबाई ‘चार मिनार’ ह्या बालकादंबरीचे क्रमशः वाचन करीत. गंपूसर (गंपूकाका) मिनू मसानींच्या पुस्तकांच्या आधारे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला पाहिजेत, यासंबंधी सांगत. त्यानंतर आम्ही सर्व आपापल्या वर्गात जात असू. अभ्यासाची सुरुवात आनंद देणारी असायची. इंग्रजी गंपूकाका घेत. त्यांचे शिकवणे आम्हा सर्वांना खूप आवडत असे. ते हळू आवाजात, विनोद करीत इंग्रजी शिकवीत. ते आम्हाला प्रश्न विचारीत. त्यांची उत्तरे आम्ही इंग्रजीतून देत असू. ते प्रत्येकाला इंग्रजीतून उत्तरे देण्याची संधी देत. आम्ही मोकळेपणाने, हसतखेळत, मजा करत शिकलो. आम्ही हट्ट केले तसेच कौतुकही करून घेतले. आमच्या शिक्षकांनी आम्हाला नवीननवीन गोष्टी सहजपणे शिकण्याची सवय लावली. वर्गपाठ सुरू होऊन तास कसा संपे हे कळतही नसे. अभ्यासाशिवाय लेखनात टापटीप, हस्ताक्षर सुंदर काढणे, स्वच्छता, वक्तशीरपणा, नियमितपणा, इत्यादी गुण आमच्यामध्ये आपोआप बाणले.

हस्तलिखित मासिक हे शाळेचे एक वैशिष्ट्य होते. बालदिन जवळ यायला लागला की हस्तलिखित तयार करण्याच्या मागे आम्ही लागत असू. गोष्टी, सुविचार, चित्रे, लेख यांनी आमचे हस्तलिखित सजायचे. १९४२ सालच्या १५ जानेवारी रोजी बालदिन समारंभाला प्रल्हाद केशव अत्रे आले होते. आम्हाला त्यांनी एक गोष्ट सांगितली. त्यानंतर बालमोहन’ नावाच्या आमच्या हस्तलिखिताचे प्रकाशन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी आमचे अभिनंदन केले. त्यांनी अभिप्रायात असे लिहिले आहे, की हे मासिक म्हणजे भावी लेखक, कवी, चित्रकार, कथाकार निर्माण करण्याची शाळा आहे.’ एका महान लेखकाचा हा अभिप्राय दादांना आणि आमच्या शाळेला खूप स्फूर्तिदायक होता.

आपल्या भाषणात त्यांनी, मी लिहिलेल्या लेखाचा उल्लेख करून, तो लेख आवडल्याचे सांगितल्याचे आठवते. माझा तो लेख लिहायला दादांनी उत्तेजन दिले होते. मी दादांना सांगितले, “मासिकात मला लेख लिहायचा आहे. कसा लिहू?” दादांना माझे म्हणणे ऐकून खूप बरे वाटले. “बापू, तुला लेख लिहावासा वाटतो ना! मग तू रोपटे वाढतानाचे निरीक्षण कर. तुला कुंडी आणून देतो. ‘बी’सुद्धा देतो. कुंडीत माती घाल. लहानसा खड्डा करून त्यात बी लाव. कुंडी उन्हात व उजेडात ठेव. रोज थोडेथोडे पाणी घाल. बीला कोंब केव्हा फुटला, कोंबाला पहिले पान केव्हा आले, रोप लहान असताना त्याला दुसरे पान केव्हा आले, हळूहळू ते रोप किती उंच वाढते ह्याचे निरीक्षण कर. रोप सहा इंच उंच झाले की मग तू केलेले निरीक्षण लिहून काढ.” मी दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे रोजचे निरीक्षण करून एका छोट्या वहीत तारीखवार लिहून ठेवत होतो. त्यानंतर माझ्या रोपाच्या निरीक्षणाचा अनुभव मी लिहून काढला. दादांना तो आवडला. नंतर सावकाशपणे चांगल्या अक्षरात तो अनुभव मासिकाच्या कागदावर लिहिला व दादांकडे दिला. पाहुण्यांनी माझ्या लेखाचा उल्लेख केला, तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू!

मला आठवते, की दादा निरनिराळ्या पाहुण्यांना शाळा दाखवण्यासाठी आणत. शाळा पाहून पाहुणे खूश होत असत. वर्गात आमचा अभ्यास तर चालू होताच; शिवाय वक्तृत्व, खेळ, गाणी, इत्यादी कार्यक्रमही आम्ही करत होतो. आमचा चित्रकलेचा तासही मजेत जात असे.

शाळेची लोकप्रियता वाढत होती. पण १९४२ साल म्हणजे जागतिक लढाईचा जोरदार काळ होता. मुंबईवर बॉम्ब पडतील म्हणून लोकांची पळापळ झाली. लोक गावाला जाऊ लागले. परीक्षा न घेता मुलांना मुंबईबाहेर गावाला पाठवा असा सरकारी आदेश आला. परीक्षा न घेताच दादांनी शाळेतील सर्व मुलांना वरच्या वर्गात घातले; पण ती मुले जूनमध्ये परत आली पाहिजेत यासाठी, आम्हा मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून, दादांनी १२ आठवड्यांचे सर्व विषयांचे व्यवसाय छापून आम्हाला दिले. दादांनी आम्हाला सांगितले, “मी तुमच्यासाठी व्यवसाय तयार केले आहेत. ते चांगल्या अक्षरात सोडवा व शाळेकडे पाठवा.” दादांनी मुलांचे नुकसान होऊ दिले नाही. याचा परिणाम योग्य तोच झाला. सर्व मुले १९४२च्या जूनमध्ये आनंदाने शाळेत परत आली. शाळा परत जोमाने प्रगती करू लागली. या काळात आमच्या शिक्षकांनी दादांवर व शाळेवर निष्ठा ठेवून, शाळा सोडून न जाण्याचे ठरविले. म्हणून आम्हा मुलांना आमच्या शाळेत शिक्षकांच्या सहवासात पुन्हा अभ्यास करायला मिळाला.
शाळा झपाट्याने वाढत होती. आमची पहिल्या मजल्यावरची जागा शाळेला पुरत नव्हती म्हणून दादांनी आमचे इंग्रजी पहिली ते तिसरीचे वर्ग केळुसकर रोडच्या कोपऱ्यावर असलेल्या डहाणूकरांच्या ‘कॉर्नर हाउस’मध्ये नेले. त्यातील तीन खोल्यांत आमची शाळा चालू झाली. आमच्या वर्गात एका तासाला जोगळेकरसर पेटी घेऊन आले. ते नुकतेच आफ्रिकेहून आले होते. “सुप्रसिद्ध गायक श्री. जी. एन. जोशी यांनी आपल्याबरोबर मला आफ्रिकेला नेलं होतं,” असे सरांनी आम्हाला सांगितले व आफ्रिकेच्या वास्तव्यातील गमतीजमती, जनावरे, इत्यादी माहिती आम्हाला सांगितली. शेवटी तेथून आणलेली एक काठीही आम्हाला दाखवली. त्या काठीला काटे होते. काठीला हात लावला की ते काटे हाताला खोलवर बोचतील अशी भीतीही त्यांनी आम्हाला घातली. अशा गप्पागोष्टी आमच्याशी केल्यावर त्यांनी आमचे एक सुंदर गाणे घेतले. जोगळेकरसरांचा गोड आवाज व त्या गाण्याची चाल अजून माझ्या कानात घोळते आहे.

त्याच वर्षी (१९४२) गुरुदेव टागोर यांचे ८ ऑगस्ट रोजी देहावसान झाल्याची बातमी आम्हाला दादांनी सांगितली. दादांनी आम्हाला एकत्र केले व टागोरांची माहिती सांगितली. १९४३ सालच्या बालदिनाला १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध कवी श्री.बा. रानडे आले होते. बालदिन सोहळा ‘वनिता समाज’च्या हॉलमध्ये झाला होता. त्यांनी आम्ही तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन केले. त्यातील हस्ताक्षर त्यांना आवडल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. आमच्यापैकी काही मुलांनी कविताही केल्या होत्या. पाहुण्यांनी प्रथम आम्हाला एक गोष्ट सांगितली व आपली एक कविताही म्हणून दाखवली. तिच्या पहिल्या दोन ओळी मला आठवतात. त्या अशा होत्या ‘मनुताई, मनुताई तुमच्या घरी कोण बिचारी आजारी?’

त्यानंतर मासिकाच्या संपादक मंडळाचा त्यांच्यासमवेत एक फोटोही काढला. १९४२-४३ साल हे आमचे बालमोहन विद्यामंदिरातील शेवटचे वर्ष. शाळा इंग्रजी तिसरीपर्यंत होती. त्यामुळे आमचा निरोपसमारंभही झाला. वनिता समाजमध्ये आमच्या वर्गातील मुलांचा दादा व गंपुकाकांसह फोटो काढला. त्या वेळी वर्गात २६ मुले होती. त्यानंतर दादांनी दुसऱ्या शाळेत गेल्यावर अभ्यास कसा करावा, कसे चांगले वागावे ह्यासंबंधी सांगितले. बालमोहनमधील ते दिवस आठवले की वाटते, शाळेने आम्हाला खूप काही दिले आहे. आपण त्याच शाळेत पुढे शिकावे असे वाटत होते. शाळा इंग्रजी तिसरीपर्यंतच होती. नाइलाजाने आम्हाला दुसऱ्या शाळेत शिकायला जावे लागणार होते. दादांचा एक महत्त्वाचा संदेश मला आठवतो. दादा भाषणात शेवटी म्हणाले होते, “बाळांनो, तुम्ही कुठल्याही शाळेत जा. तुम्हाला बालमोहनची हुशार आणि चांगली मुले म्हणूनच ओळखतील.”

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.