loader image

आठवणीतील पाऊले

कॉलेज जीवन

१९४७ साली मी मॅट्रिक झालो. रिझल्ट जूनच्या सुरुवातीलाच लागला. आदल्या दिवशी मी पास होईन की नाही या विचाराने माझे मन अस्वस्थ झाले होते; पण माझ्या हातात काही नव्हते. मी देवाला सांगत होतो, की मी पास झालो पाहिजे. नाही तर दादांना काय वाटेल? माझे मित्र माझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील? ज्या शाळेने व शिक्षकांनी मला शिकवले त्यांना काय वाटेल? मी दादांच्या अवतीभवती घुटमळत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. आंघोळ केली आणि दादांजवळ गेलो. त्या काळात मॅट्रिकचा रिझल्ट सीट नंबरसह वर्तमानपत्रातून येत असे. दादांनी परीक्षेत मी पास झाल्याचे सांगितले आणि जवळ घेतले, “बापू, तू पहिल्या खेपेला मॅट्रिक व्हावं ही माझी इच्छा आज तू पूर्ण केलीस. तुला माझे आशीर्वाद आहेत.” प्रथम माझा विश्वासच बसेना; पण वर्तमानपत्रातला माझा सीट नंबर दादांनी मला दाखवला. मला खूप आनंद झाला. मी प्रथम देवाला नमस्कार केला, नंतर मी दादांना आणि आईला नमस्कार केला. दादांनी पेढे आणायला सांगितले.

नंतर मी शाळेच्या नवीन इमारतीकडे मित्रांबरोबर जायला निघालो. वाटेत आमच्या ओळखीच्या एका माणसाने मला congratulations दिले. मला काय बोलावे ते कळेना. मी लगेच त्यांना No mention म्हटले आणि पुढे गेलो! नंतर मला माझी, गडबडीत चूक झाल्याचे लक्षात येऊन हसू आले. मला मॅट्रिकच्या परीक्षेने मोठे केले होते, म्हणून congratulations स्वीकारण्याचा हा प्रसंग मला महत्वाचा वाटला.

आमचे कॉलेज २० जूनला सुरू व्हायचे होते. मी आर्ट्सला प्रवेश घेणार होतो. हिंदू कॉलनीमधील राम नारायण रुइया कॉलेज प्रसिद्ध होते. मी प्रवेश घेतला. आम्ही शाळेत शॉर्ट्स घालून जायचो, पण कॉलेजमध्ये जायचे तर निराळे कपडे घालावे लागणार. मी ठरवले की शर्ट आणि लेंगा घालून कॉलेजमध्ये जायचे. दादा मला कॉलेजमध्ये सोडायला आले होते. नोटीस बोर्डावर माझे नाव वाचले आणि तळमजल्यावरील एका हॉलमध्ये, जेथे माझा वर्ग होता, तेथे गेलो. “तुझं कॉलेज संपलं की तू व्यवस्थित येशील ना?” दादांनी विचारले. “दादा, मी माझ्या मित्रांबरोबर घरी येईन. तुम्ही मुळीच काळजी करू नका,’ असे मी दादांना सांगून वर्गात गेलो.

त्यानंतर मी कोपऱ्यावरील त्या मोठ्या वर्गात अगदी पुढच्या बाकावर बसलो. माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता. तो बुशशर्ट व पॅण्ट घालून आला होता. माझ्या कपड्यांकडे पाहून मला कसेतरी वाटले. “मी राजा कारळे,” असे त्याने आपले नाव सांगितले.आमची हळूहळू चांगली ओळख झाली.थोड्या वेळाने मधुकर साळवी नावाच्या मुलाशी ओळख झाली. प्रोफेसर वर्गात आले. त्यांनी इंग्लिशमधून स्वतःची व कॉलेजची माहिती सांगितली. कॉलेजमध्ये अभ्यास कसा करायचा असतो ह्यासंबंधी ते बोलले. लेक्चर्स काळजीपूर्वक ऐकून त्यांच्या नोट्स वहीत घेण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे असे त्यांनी आम्हाला सांगितले. आमच्या वर्गात सुमारे १०० मुले होती. त्यातील मुलींची संख्या अर्धी होती. त्या दिवशी तीन तास झाले आणि कॉलेज सुटले.

मी घरी जाताना कॉलेजचा परिसर पाहिला. कॉलेजच्या बाजूला मोठे मैदान होते. तेथे क्रिकेट, फूटबॉल, इत्यादी खेळ खेळले जात. पोदार कॉलेज आमच्या कॉलेजला लागूनच होते. या दोन कॉलेजांच्या मधल्या जागेत बॅडमिंटन कोर्ट होते. कॉलेजच्या समोर दोन्ही बाजूंना इराण्याची हॉटेले होती. पाठीमागच्या बाजूला ‘मणी’चे एक उपाहारगृह होते. अजूनही मणीचे हॉटेल उपाहारासाठी प्रसिद्ध आहे. हळूहळू कॉलेजची व परिसराची ओळख मला आपोआप झाली.

मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी. कॉलेजमधील शिकणे आणि शिकवणे इंग्रजीतून असल्यामुळे इंग्रजीतून ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे ह्या गोष्टींचा मला जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक होते. कोणतीही गोष्ट प्राध्यापकांना विचारायची म्हणजे प्रथम मनातल्या मनात इंग्रजी वाक्यरचना तयार करून नंतर प्राध्यापकांशी बोलायचे असे मी ठरवून टाकले होते. इंग्रजी बोलायला शिकण्याचा ध्यासच लागला होता. काही वेळा मी मित्रांचीही मदत घेत असे. माझे काही मित्र इंग्रजीतून अस्खलितपणे बोलायचे. मीही तसा प्रयत्न करायचो. इंग्रजीतून बोलणाऱ्या मित्रांशी मी दोस्ती करण्याचे ठरवले आणि हळूहळू मला इंग्रजीतून व्यक्त करायच्या शिष्टाचाराच्या पद्धती समजू लागल्या. तसेच सलग वाक्ये बोलण्याचा मी प्रयत्न करू लागलो. हळूहळू इंग्रजीतून मला सफाईदारपणे बोलता येऊ लागले आणि माझा न्यूनगंड कमी व्हायला लागला.

माझी खरी पंचाईत झाली ती वर्गामध्ये व्याख्यात्यांची व्याख्याने ऐकताना, ती लिहून घेताना. व्याख्यान ऐकताऐकता व्याख्यानाची टिपणे करायची म्हणजे माथी तारांबळ उडायची. मला कसरतच करावी लागे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी जी पहिल्या बाकावर बसलो होतो. प्रथम एकदोन मिनिटे व्याख्यान ऐकले. नंतर वाटले, ऐकताऐकता लिहून घ्यावे. तसाही प्रयत्न झाला. व्याख्यान ऐकताऐकता लिहून घेण्याची माझी गती आणि व्याख्यात्यांची बोलण्याची गती यात बराच फरक पडू लागला. काही मुद्दे निसटून जाऊ लागले. मी विचार केला आणि ठरवले, की पाच मिनिटे फक्त व्याख्यान ऐकायचे. त्यातील महत्त्वाच्या मुद्यांचे फक्त टिपण करायचे. टिपण मी प्रथम मराठीतून करीत असे. त्यानंतर लिहिलेले पुढे परी वाचून व्याख्यानाचा सारांश इंग्रजीतून वहीत लिहिण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असे. या पद्धतीची मी सवय केली. व्याख्यानाच्या नोट्स वर्गात लगेच घेणे मला हळूहळू जमायला लागले. अर्थात दोन महिन्यांनंतर व्याख्यानाचा सारांश, व्याख्यान चालू असतानादेखील मला लिहिता येऊ लागला.

 

काही वेळा माझ्या मनातले विचार इंग्रजीतून अभिव्यक्त करणे सोपे वाटेना. मी विचार केला, की आपण अजून जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. खूप वाचन झाले पाहिजे, इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतीत मी दादांशी बोललो. दादा लगेच म्हणाले, की मी तुझ्या इंग्रजी प्राध्यापकांशी बोलतो. ते तुला नक्की मार्गदर्शन करतील. मी दादांना सांगितले, “तुम्ही अन्य कोणताही मार्ग सांगा. प्राध्यापकांकडे जायला मला कसंतरीच वाटतं,’ दादांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वर्तमानपत्र सुचवले. ते म्हणाले, “हे वृत्तपत्र तुला उपयोगी पडेल. त्यातील पृष्ठापृष्ठावरचे ठळक मथळे वाच. पण लक्षात स, ते मथळे पूर्ण वाक्यात नसतात. बातमीचा सारांश मथळ्याच्या रूपानं लिहिलेला असतो.’ असे सांगून दादा आपल्या कामाला गेले. मी लगेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ घेतला आणि वाचायला सुरुवात केली. मथळे वाचताना त्यातील काही शब्द मला अडत होते. म्हणून मी इंग्रजी-मराठी-इंग्रजी शब्दकोश वापरायला सुरुवात केली. हळूहळू मी बातम्याही वाचू लागलो. मला ‘स्पोर्ट्स’चे पृष्ठ आवडायचे. त्या पृष्ठावरील क्रिकेटसंबंधीची माहिती मी दररोज प्रथम वाचू लागलो. मी रोज इंग्रजी पेपर वाचतो हे पाहिल्यावर दादांनी माझी पाठ थोपटली.

माझे इंग्रजी सुधारण्यासाठी दादांनी मला आणखी एक गोष्ट करायला सांगितली. ते म्हणाले, “टाइम्स ऑफ इंडियातील कोणत्याही दहा ओळींचे वाचन कर. मोठ्यानं वाच आणि नंतर त्याचे मराठीत भाषांतर, असे फक्त सहा महिने आठवड्यातून तीन दिवस नियमाने कर. त्यासाठी एक मोठी वही कर. त्यापुढील सहा महिने अग्रलेखातील दहा ओळींचं वाचन कर. तो मजकूर एका वहीत चांगल्या अक्षरांत लिही.”

दादांनी सांगितले तसे मी करण्याचे ठरवले. पहिल्या दिवशी दहा ओळींचे भाषांतर करायला मला दीड तास लागला. मला भाषांतर करायचा कंटाळा यायला लागला. मी दादांना सांगितले, की मला भाषांतर करणे जमत नाही. “भाषांतर का नाही जमणार? तुझं इंग्रजी चांगलं झालं पाहिजे, तर तुला भाषांतराचा सराव चिकाटीनं व परिश्रमपूर्वक केला पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेव.” मी काहीच बोललो नाही; पण मी भाषांतर करायला सुरुवात केली. त्यांनी आणखी एक गोष्ट मला सांगितली, “बापू, तुला शब्दशः भाषांतर कठीण जात असेल तर वाक्याचा अर्थ स्वैरपणे लिही.” दुसऱ्या दिवसापासून मी स्वैर भाषांतर करू लागलो आणि मला आत्मविश्वास यायला लागला. मी एकदोन आठवड्यांनी दादांना सहज विचारले, की मी इंग्रजी वाक्यांचे मराठीत भाषांतर करताना माझे इंग्रजी कसे सुधारणार? ते म्हणाले, “मराठीत भाषांतर करण्यापूर्वी तू इंग्रजी मजकूर वाचतोस ना? तुला इंग्रजी वाचनाची सवय लागली, की हळूहळू इंग्रजीतील लकबी तुझ्या लक्षात येतील आणि तुला इंग्रजी भाषा कालांतरानं चांगली येईल. त्यासाठी छोटीछोटी इंग्रजी पुस्तकंही तुला वाचली पाहिजेत. मधूनमधून रेडिओवरील इंग्रजी बातम्या ऐकणंही चालू ठेवलं पाहिजे. अशा विविध मार्गांनी इंग्रजी सुधारतं हे लक्षात ठेव.” या गोष्टीचा मी मनापासून प्रयत्न केला व त्यात यशस्वी झालो.

परीक्षा लेखनाची असल्यामुळे वार्षिक परीक्षेची पूर्वतयारी, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, पाठ्यपुस्तकांचे वाचन, लेखनसराव, पाठांतर, इत्यादींचा अवलंब केला आणि वार्षिक परीक्षा दिली. एफ.वाय. आर्ट्सचे पेपर्स मी इंग्रजीतून व्यवस्थित लिहू शकलो व चांगला पास झालो आणि इंटर आर्टच्या वर्गात गेलो.

एफ.वाय. आच्या निकालासंबंधी १९४८च्या एप्रिल महिन्यातील एक प्रसंग मला प्रकर्षाने आठवतो. मी सबंध वर्षभर मनापासून अभ्यास करून फर्स्ट इयरची वार्षिक परीक्षा दिली. मला पेपर चांगले गेले होते. सदर परीक्षेचा निकाल एप्रिलच्या सुरुवातीस लागला. नोटिस बोर्डावरील निकालाच्या यादीत माझा सीट नंबर दिसेना. मी, माझा मित्र राजा कारळे याला बोलावले. त्याने त्याचा निकाल पाहिला. त्या निकालात त्याचाही सीट नंबर नव्हता. आम्ही तो नोटिस बोर्ड पुन्हा एकदा पाहिला. त्या वेळी आमचे लक्ष फूटनोटकडे गेले. ती फूटनोट आमच्या दोघांच्या एफ.वाय.च्या निकालासंबंधी होती. आमच्या दोघांचा निकाल कॉलेजने राखून ठेवला होता. आम्हाला धक्काच बसला. आम्ही चर्चा करीत बाहेर पडलो. आपण नापास तर झालो नाही? पण नापास झालो असतो तर ती ‘फुटनोट’ निकालाच्या शेवटी दिलीच नसती. आम्ही दोघांनी खूप विचार केला व घरी गेलो, घरी मी दादांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी मला धीर दिला. “बापू, तू कसलीही काळजी करू नकोस. दिलेले मार्क लिहिण्यात चूक झाली असेल. मी यासंबंधी तुझ्या प्राध्यापकामार्फत चौकशी करतो.” दादा जवळच राहणाऱ्या प्राध्यापक वि.ह. कुळकर्णी यांच्याकडे गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी दादांनी मला सांगितले, की तू दुसऱ्या विद्यार्थ्याची कॉपी केल्याच्या संशयावरून तुमचे दोघांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. मी दादांना सांगितले,की कॉपी केलेली नाही. वाटलं तर प्रिन्सिपलसाहेबांनी आम्हा दोघांना आपल्या बोलीत बोलवावं आणि ज्या प्रश्नांच्या उत्तराची कॉपी आहे असं परीक्षकांना वाटतं तो प्रश्न त्यांनी आम्हाला त्यांच्या खोलीत त्यांच्या समोर बसवून लिहायला सांगावा.” दोन-तीन दिवसांनी आम्हा दोघांना प्रिन्सिपॉलसाहेबांनी भेटण्यास बोलाविले. त्यांनी आम्हा दोघांची एकेकट्याची मुलाखत घेतली आणि सांगितले, ‘मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्यासमोर आताच्या आता लिहा.” त्यांनी आम्हाला त्वरित पुरवण्या दिल्या आणि आम्ही तासभर सदर प्रश्नाचे उत्तर लिहीत होतो. उत्तर लिहून झाल्यावर आम्ही आमच्या उत्तरपत्रिका प्रिन्सिपॉलसाहेबांकडे दिल्या व घरी गेलो.

आठ दिवसांनी नोटिस बोर्डावर आमचे राखून ठेवलेले निकाल जाहीर झाले. आम्ही दोघेही पास झालेले होतो. खरा घोटाळा असा झालेला होता, की राजा आणि मी एकाच गाइडवरून मराठीचा अभ्यास केलेला असल्याने आमची उत्तरे ततोतंत जुळत होती. अशा रीतीने कॉलेजचा आमच्यावरील संशय दूर झाला. आम्ही निर्दोष आहोत हेही सर्वांना समजले. याचा मला आणि राजा कारळे याला खूप आनंद झाला. आमच्याविषयी परीक्षकांचा गैरसमज झाला हे आमचे दुर्दैव!

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.