आठवणीतील पाऊले
आम्ही दोघेही इंटर आर्ट्सच्या वर्गात गेलो.
रुइया कॉलेजमध्ये आम्हाला अनेक चांगले प्राध्यापक लाभले. पहिल्याप्रथम जर मला कोणाची आठवण होत असेल तर ती प्रा. वि.ह. कुळकर्णी यांची. त्यांना आम्ही व्ही.एच. ह्या नावाने ओळखत असू. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. ते वर्गात आले, की एखाद्या नटासारखे हातवारे करीत. शिकवताना ते एकाच जागी उभे राहून शिकवीत असत. ते सोप्या इंग्रजीतून शिकवीत. त्यांचे शिकवणे आम्हाला खूप आवडे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपणहून विद्यार्थ्यांशी बोलत. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला भीती नव्हे, पण आदरयुक्त भीती मात्र होती. ते मराठीतले प्रथितयश साहित्यिकही होते. रोज पायी कॉलेजमध्ये जात. एकदा त्यांनी प्लाझा सिनेमाच्या बाजूने जात असताना ‘अहो रेगे’ अशी मला हाक मारली. मी वळून पाहिले, तर आमचे प्राध्यापक कुळकर्णीसर! आम्ही दोघेही गप्पा करीत जात असताना त्यांनी मला सहज विचारले, की इंग्रजीतून विषय शिकताना कठीण जाते का? मी सांगितले, की आता हळूहळू मला सवय होत आहे. प्रथम व्याख्यान ऐकणे व त्याच्या नोट्स घेणे कठीण गेले. आता सवय झाली. त्यांनी मला आणखी एक प्रश्न विचारला, ‘रेगे, तुम्ही इंग्रजीतून बोलताना अगर लिहिताना इंग्रजीतून विचार करता का? तशी सवय लावून घ्या. म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषा सोपी वाटेल.” सरांचे हे विचार मला खूप उपयोगी पडले. मला इंग्रजी सुधारण्याची गुरुकिल्ली सापडली.
रुइया कॉलेजात प्रा. कुळकर्णीसारखे लक्षात राहणारे आणखी काही प्राध्यापक होते. प्राध्यापक मो.दि. पराडकर आम्हाला संस्कृत शिकवत असत. त्यांनी आम्हाला अभिज्ञान शाकुंतलम्’ हे कालिदासाचे नाटक इंटरला शिकवले. ते आम्हाला आमच्यातलेच वाटायचे. मित्रत्वाच्या नात्याने शिकवायचे आणि बोलायचे. त्यांचा संस्कृत भाषेचा व्यासंग दांडगा होता. ‘शाकुंतल’ हे काव्य शिकवताना ते इतके समरस होत असत की त्यामुळेच आम्हाला त्या नाटकातली सौंदर्यस्थळे चांगली लक्षात राहिली. खरे सांगायचे म्हणजे त्यांच्या शिकवण्यामुळे मला संस्कृतची गोडी लागली. मी एम.ए.ला संस्कृत घेतले होते. संस्कृतचे दोन पेपर होते. ह्या पेपरांसाठी श्रीहर्षचरितम्, नलदमयंती आख्यान आणि भासाची १२ नाटके आम्हाला अभ्यासाला होती.
एम.ए.ला मराठी हा माझा मुख्य विषय होता. त्याचे सहा पेपर होते. पण संस्कृतच्या दोन पेपरांच्या अभ्यासासाठी मला मदतीची आवश्यकता भासली. १९५७ साली मी एम.ए.ला बसणार होतो. त्या वर्षी मी प्राध्यापक मो. दि. पराडकर ह्यांच्याकडे ठाण्याला मार्गदर्शनासाठी जात असे. त्यांच्याकडे सकाळी ७ ते ९ या वेळात संस्कृत शिकत असे. त्यांचे शिकवणे म्हणजे आनंदाने ज्ञानसमृद्ध होणे. आम्हाला संस्कृत भाषेमधून इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील काही परिच्छेद असत. ते मला म्हणाले, की संस्कृतमध्ये ‘आरंभ’, ‘जटा’ ह्या शब्दांचे अर्थ समजतात; पण त्या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात हे लक्षात येत नाही. म्हणून आपण शंभर संस्कृत शब्दांना इंग्रजीत कोणते प्रतिशब्द आहेत ते लिहून काढू. संस्कृत शब्द आणि त्याला इंग्रजी प्रतिशब्द पराडकरसरच काढून देत होते; पण बोलताना ते म्हणत, की ‘आपण’ अशा शब्दांची यादी करूया. अशा रीतीचे मित्रत्वाचे नाते त्यांनी निर्माण केले होते. ते विद्वान असल्यामुळे मला संस्कृतमधील बारीकसारीक गोष्टी चांगल्या समजल्या. मी संस्कृत विषयात चांगल्या गुणांनी यशस्वी झालो. याचे श्रेय पराडकरसरांनाच आहे.
प्रा. श्री. पु. भागवत हे आम्हाला मराठी शिकवायचे. ते काच्याचे धोतर व कोट घालत असत. ते वर्गात शांतपणे, अगदी हळू आवाजात शिकवत असत. पण तो हळू आवाज सबंध वर्गात ऐकू जायचा. त्यांची गद्य आणि पद्य शिकवण्याची विशिष्ट पद्धत असायची. ते कवितेचेच फक्त रसग्रहण करीत नसत; तर पाठही रसाळपणे शिकवीत. त्यांच्या शिकवण्यामुळे आम्हाला मराठीचे प्राचीन व अर्वाचीन लेखक व कवी यांच्यासंबंधी माहिती मिळाली. मराठी विषय शिकतानाच मराठी वाङ्मयाचे विविध प्रकार आम्हाला समजले. मराठी विषयाची ह्यामुळे मला गोडी लागली. प्रा. बाळ सामंतही आम्हाला मराठी मनोरंजकतेने शिकवीत.
आम्हाला संस्कृत शिकवणारे प्रा. टी.के. टोपे, प्रा. रं.रा. देशपांडे, पा, श्रीमती नलिन मॅडम, इकॉनॉमिक्स शिकवणारे प्रा. जी. डी. पारेख, सिव्हिक्स शिकवणारे प्रा. मुकुंद आगासकर, जीऑग्राफी शिकवणारे प्रा. आर. डब्ल्यू. जोशी, इत्यादी नावे त्यांच्या अध्यापनामुळे माझ्या आठवणीत राहिली आहेत. निर्देश केलेल्या प्राध्यापकांनी मला घडवले आहे असे म्हटल्यावाचून राहवत नाही.
मी संस्कृत नाटकातही भाग घेतला होता. १९४९ साली मी इंटर आर्ट्समध्ये होतो, त्याच वर्षी ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स मुंबईला होणार होती. त्या निमित्ताने ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ हे संस्कृत नाटक मुंबईच्या कॉलेजमधील विद्यार्थी सपाध्यापक यांच्या सहभागाने सादर करावयाचे ख्यातनाम अभिनेते व संस्कृत विषयाचे व्यासंगी श्री. दाजी भाटवडेकर ह्यांच्या मनात होते. ते स्वतः दुष्यंताचे काम करणार होते. कॉलेजमधील विद्यार्थी ह्या नाटकात काम करण्यास निवडण्यासाठी त्यांनी विल्सन हायस्कूलमध्ये काही कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना बोलावले होते. त्या विद्यार्थ्यांमध्ये मी व राजा कारळे होतो. आम्हा विद्यार्थ्यांना त्या नाटकातील काही संस्कृत वाक्ये दाजींनी वाचण्यास सांगितली. त्या वेळी मी उसने अवसान आणून संस्कृत संवाद वाचून दाखविले आणि माझी निवड झाली. मला संस्कृत नाटकात काम करण्याची संधी मिळत आहे या कल्पनेनेच मी त्या वेळी भारावून गेलो होतो. दाजींनी मला दोन पात्रांचे काम करण्यासाठी निवडले होते. लगेच दुसऱ्या दिवशीपासून तालमींना सुरुवात झाली. या तालमींमध्ये त्यांनी केलेले दिग्दर्शन मी कधीही विसरणार नाही. संस्कृत शब्द, वाक्ये कशी म्हणावीत, ती स्मरणात कशी ठेवावीत या सर्वांचा मी त्या तालमीत अनुभव मिळवला. प्रत्यक्ष नाटक सादर होताना एक गमतीदार प्रसंग मला आठवतो. गिरगावच्या ओरिएंट हायस्कूलचे शिक्षक श्री. नेने ह्या नाटकात विदूषकाचे काम करीत होते. एका प्रसंगी त्यांनी असे काही अंगविक्षेप व कृती केल्या, की नाटक चालू असताना मला हसू आवरले नाही. त्या वेळी मीही स्टेजवर होतो. प्रसंगावधानाने मी त्या वेळी प्रेक्षकांकडे पाठ करून हसू लागलो आणि एक वाक्य जोरात बोललो ह्न ‘अलम् तवं भाषणेन ।’ मला पुन्हा हसू येईल म्हणून मी त्या सबंध प्रवेशात विदूषकाकडे पाहिले नाही आणि वेळ मारून नेली. हा प्रसंग माझ्या मनात अजून ताजा आहे. ह्या संस्कृत नाटकात काम केल्यामुळे मला संस्कृत भाषेची गोडी तर लागलीच आणि त्या भाषेबद्दल प्रेम व आदर माझ्या मनात कायमचा निर्माण झाला. याला कारण ते नाटक ‘अभिज्ञान शाकुंतलम्!’ आणि मला लाभलेले संस्कृतचे प्राध्यापक.
दादांना मी नापास झाल्याचे फार वाईट वाटले. मला तर असे वाटू लागले. की रुइया कॉलेज सोडावे व दुसऱ्या एखाद्या चांगल्या कॉलेजात जावे. पण हे मी दादांना कसे सांगणार? मुंबईत नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक कॉलेज आहे असे मला समजले होते आणि ते कॉलेज म्हणजे ‘सिद्धार्थ कॉलेज.’ ते मरीन लाइन्स स्टेशनजवळ होते. मी दादांना सिद्धार्थ कॉलेजविषयी सांगितले व पुढे म्हणालो, “दादा, ते कॉलेज सकाळचं आहे. त्याची वेळ सकाळी ७.३० ते १०.३० अशी आहे. कॉलेजातून घरी आलो की तुम्हाला शाळेच्या बाबतीत माझी मदत होईल. मी ही मदत अगदी मनापासून करीन.” दादांना माझे ते वाक्य ऐकून खूप बरे वाटले. ते मला म्हणाले, “तू चांगला अभ्यास करशील ना? तुझं एक वर्ष फुकट गेलं आहे. तू यापुढे कोणत्याही वर्षात नापास होता कामा नये.” मी कबूल झालो.
दादांनी सिद्धार्थ कॉलेजच्या प्रवेशाची तजवीज केली व जूनपासून सिद्धार्थ कॉलेजमध्ये इंटर आर्ट्सच्या वर्गात मी बसायला लागलो.
रेल्वेने सकाळी ७ वाजता मी कॉलेजमध्ये जात असे. त्या वेळी सिद्धार्थ कॉलेज लहानलहान सिमेंटच्या पत्र्याच्या इमारतीमध्ये भरत असे. तो परिसर फार छान होता. दोन इमारतींमध्ये भरपूर मोकळी जागा होती.
डॉ. एच.आर. कर्णिक हे सिद्धार्थचे व्हाइस प्रिन्सिपॉल होते. ते संस्कृत विषयात पारंगत होते. तसेच ते एन.सी.सी.चे प्रमुख अधिकारी होते.
हळूहळू त्यांची आणि माझी ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितले, “तुम्ही एन.सी.सी.मध्ये आलं पाहिजे. याल ना?” मी त्यांना ‘हो’ म्हणून सांगितले. आमच्या परेड्स सुरू झाल्या. मला कॅडेटचा युनिफॉर्म मिळाला. आठवड्यातून दोन दिवस कॉलेजच्या ग्राऊंडवर परेड्स असायच्या. मला हळूहळू एन.सी.सी.मधील शिस्त व नियम पाळणे यांची सवय झाली. आमचे देवळालीला एन.सी.सी.चे आठ दिवसांचे कॅम्प्सही असायचे. एन.सी.सी.चे दोन वर्षांचे ट्रेनिंग होते. या कॅम्प्समुळे मी खूप स्वावलंबी झालो. अंगात शिस्त बाणली. कॅम्प्स नोव्हेंबरमध्ये असल्यामुळे देवळालीला खूप थंडी असायची. आमची राहण्याजेवण्याची कॅम्पमध्ये उत्तम सोय असायची. आम्हाला एन.सी.सी.चे चांगले अधिकारी लाभले होते. डॉ. एच.आर. कर्णिक, डॉ. एल.बी. केणी, प्रा. टी.ए. बापत ऑफिसर माझ्या चांगले लक्षात आहेत. एन.सी.सी. कॅम्पमध्ये रोज परेड करणे, रायफल शूटिंग, क्रॉलिंग, कॅमुफ्लाज, नकाशा वाचन, इत्यादी अनेक विषय आम्हाला प्रशिक्षणासाठी होते. या एन.सी.सी.मुळे माझ्या जीवनाला एक निराळी कलाटणी मिळाली. वक्तशीरपणा, नियमितपणा, व्यवस्थित टापटिपीने राहणे ही काही मुल्ये एन.सी.सी.मळे माझ्या अंगात बाणली. दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर मला एन.सी.सी.च्या सीनिअर डिव्हिजनचे ‘बी’ प्रमाणपत्र मिळाले.
सिद्धार्थ कॉलेजातील प्राध्यापकही आम्हाला चांगले लाभले होते. प्रा. रा. भि. जोशी, प्रा. फ्रँक डिसोझा (इंग्रजी), प्रा. अनंत काणेकर, प्रा. स. गं. मालशे, प्रा. रमेश तेंडुलकर (मराठी), प्रा. के. व्ही. बेलसरे व प्रा. श्रीमती गजेंद्रगडकर (लॉजिक आणि सायकॉलॉजी), प्रा. दळवी (अर्थशास्त्र) हे प्राध्यापक आपापल्या विषयांत निष्णात होते. त्यांचे शिकवणे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचे असे. त्यांचे विद्यार्थ्यांशी नाते अगदी मित्रत्वाचे होते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांमध्ये आणि त्या प्राध्यापकांमध्ये चांगला सुसंवाद असे. सिद्धार्थ कॉलेजचे ग्रंथपाल श्री. शां. शं. रेगे यांच्याकडे मी आठवड्यातून दोन दिवस पुस्तके घेण्यासाठी जात असे. ते विद्वान ग्रंथपाल होते. या सर्वांचा मी ऋणी आहे. ह्यांनी मला घडवले आहे.
मी बी.ए.ला मराठी आणि मानसशास्त्र हे दोन विषय घेतले होते. दोन्ही विषय माझे आवडते असल्यामुळे त्या विषयांचा सखोल अभ्यास करणे हे नैसर्गिक झाले. तसेच हे दोन्ही विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी त्या त्या विषयाची मला गोडी लागावी असेच शिकवले. बी.ए.च्या परीक्षेच्या अभ्यासासाठी मराठी विषयाचा अभ्यास करताना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मी भरपूर उपयोग केला आहे. त्यामुळे आदरणीय श्री. अ.का. प्रियोळकर यांच्याशी माझी ओळख झाली आणि ती मला माझ्या भावी जीवनात अत्यंत उपयोगी पडली.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.