loader image

आठवणीतील पाऊले

बालमोहन विद्यामंदिराची कीर्ती जगभर पसरली

१९६१ ते १९७० या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचे लक्ष दादांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाकडे गेले. शासनाचे अधिकारी इन्स्पेक्शनच्या निमित्ताने, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शाळा दाखवण्याच्या निमित्ताने येऊन गेले होते. तसेच काही मंत्र्यांची मुलेही शाळेत शिकत होती. त्यामुळे शाळा त्यांना माहीत होती. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्यांच्यातर्फे अनेक देशी-परदेशी पाहुणे, शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक शिष्टमंडळे ह्यांच्या भेटीचे एक सत्रच शाळेत सुरू झाले. १९६५ च्या ऑगस्टमध्ये एका वेळी २५ शिक्षणतज्ज्ञ अमेरिकेतून शाळेला भेट देण्यासाठी आले होते. त्या वेळी दादांची आणि माझी खूप तारांबळ उडाली. ज्या ज्या वेळी देशी-परदेशी पाहुणे शाळेला भेट द्यायला येत असत त्या त्या वेळी मुलांचे चित्रकला प्रदर्शन, दिवाळीच्या सुटीत सजवलेल्या वह्या, हस्तव्यवसायाचे काही नमुने, सहामाही आणि वार्षिक परीक्षांचे प्रश्नपत्रिका संच व मुलांचे उत्तरपत्रिकांचे नमुने हॉलमध्ये आकर्षक पद्धतीने मांडून थोडक्या वेळात शाळेची जास्तीत जास्त माहिती कशी होईल याचे आयोजन व प्रदर्शनाची मांडणी मी स्वत: काही शिक्षकांसमवेत करीत असे. पाहुण्यांना काही वर्गांतही आम्ही घेऊन जात असू.

दादांच्या खोलीत शाळेची थोडक्यात माहिती सांगण्याचे काम मी करत असे. तसेच पाहुणे आणि दादा यांचा ‘दुभाषा’ म्हणूनही मी काम करत असे.

या पाहुण्यांनी शाळेविषयी अभिप्राय देऊन गौरवले आहे. त्यांतील काही मथळे खाली उद्धृत करतो :
‘Balmohan – a solution to many educational problems’, ‘Cordial relations’, ‘Soul of India’, “A lesson for us westerners’, “A symbol of eternal spirit of India’, ‘A school with lofty vision’, “A school with marvellous planning”, “The best school throughout India and Europe’, ‘Splendid educational job’, ‘Many sided activities’, ‘The best teaching material’, An excellent education’, ‘Successful Co-education’, A very good standard of work achieved ‘, Science equipment a bright light in education’, ‘Highly creditable record of school education’, ‘The school is close-knit family.’

जगातील विविध देशांतून आलेल्या शिक्षणतज्ज्ञांमुळे शाळेची कीर्ती जगभर पसरली. सांगायला अभिमान वाटतो, की ‘युनेस्को’ ह्या आंतरराष्ट्रीय शिक्षणसंस्थेने १९६६मध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य प्रकल्पाच्या प्रयोगासाठी शाळेची निवड करून शाळा युनेस्कोशी संलग्न करून घेतली. सदर प्रयोगासाठी मला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले. या प्रकल्पाच्या निमित्ताने शाळेतील मुलांची परदेशी मुलांशी पत्रमैत्री सुरू झाली आणि एकमेकांच्या देशांतील संस्कृती, गीते, देशाचा इतिहास व भूगोल, हवामान, प्रेक्षणीय स्थळे, खाणेपिणे, खेळ, इत्यादी गोष्टी समजल्या. परदेशी लोक शाळेला भेट द्यायला आले, की शाळेतील मुले त्यांना त्यांच्या देशातील मुलांसंबंधी विचारत असत. काही वेळा आम्ही मुलांना, ‘ताजमहाल’ हॉटेलमधील परदेशी लोकांचा प्रत्यक्ष परिचय व्हावा म्हणून मधूनमधून घेऊन जात असू.

दिल्लीतील इंटरनॅशनल एज्युकेशन युनिटने आयोजित केलेल्या, युनेस्कोशी संलग्न असलेल्या शाळांच्या मार्गदर्शकांच्या चर्चासत्रास ४ मे १९७६ रोजी आमंत्रित केले होते. चर्चासत्राचे प्रमुख श्री. एन. के. गुप्ता यांनी शाळेला पाठवलेल्या पत्रात माझ्या सहभागाचा खास उल्लेख केला होता. सदर पत्र येथे नमूद करणे मला अभिमानास्पद वाटते.

International Education Unit
National Council of
Educational Research & Training
Sri Aurobindo Marg, New Delhi-110016
Dated the 22nd Nov. ’76

R. K. Gupta
Head, IEU

Dear Principal,
It was a great pleasure for me to have an opportunity to meet your representative Dr M. S. Rege, who came to participate in the seminar of UNESCO Associated Schools organized by this Unit on November 4-5, 1976. The contribution made by your representative went a long way to make the seminar a great success. Please accept my heartfelt thanks for having deputed Dr Rege to participate in the seminar.

With kind regards,

Yours sincerely,
Sd/
(R. K. Gupta)

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.