loader image

आठवणीतील पाऊले

भारतीय आघाडीवरील जवानांना दिवाळीचा फराळ

१९६४च्या सुमारास भारत-पाक संघर्ष तीव्र झाला होता. भारतीय जवान राष्ट्राचे संरक्षण करण्याची पराकाष्ठा करीत होते. या युद्धात प्राण पणाला लावून भारतीय जवान पाकशी लढत होते. चीनबरोबरच्या युद्धात झालेली भारतीय सेनेची मानहानी पुसण्याचा व गमावलेली अब्रू पुन्हा मिळवून भारतीय जनतेला दिलासा देण्याचा भारतीय सेना आटोकाट प्रयत्न करीत होती.

या भारत-पाक संघर्षात भारतीय सेनेने पाकिस्तानला आपली शक्ती दाखवून त्याचा पराभव केला होता. या संघर्षात बालमोहन विद्यामंदिराचे दोन माजी विदयार्थी ले. दिलीपकुमार हेमचंद्र गुप्ते आणि ले. प्रकाशनारायण श्रीधर कोटणीस आघाडीवर लढत असताना, राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना धारातीर्थी पडले. बालमोहनलाच काय, सर्व दादरकरांना अतिशय दुःख झाले. बालमोहनने तेव्हापासून ठरवले, की केवळ बालमोहनच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर जे जवान सदर संघर्षात कामी आले आहेत, त्या सर्वांना शाळेतील दररोजच्या प्रार्थनेनंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहावी. बालमोहनच्या जवानांना तो मानाचा मुजरा होता. तेव्हापासून प्रार्थनेनंतर स्तब्धता पाळण्याची प्रथा आजही चालू आहे.

ते दिवाळीच्या सणाचे दिवस होते. संघर्ष अजून तसा संपुष्टात आला नव्हता. दादांच्या आणि श्री. प्रकाश मोहाडीकरांच्या मनात आले, की आपण येथे गोडधोड खाऊन दिवाळीचा सण साजरा करीत आहोत आणि भारतीय जवान जिवाचे रान करून आघाडीवर पाकला उत्तर देत आहेत. त्या जवानांच्या दिवाळीच्या सणाचे काय? दादा आणि प्रकाशभाई लगेच कामाला लागले. दादरकर नागरिकांची एक छोटीशी सभा बालमोहनमध्ये झाली. या सभेत मीही सामील झालो होतो. आम्ही दादर नागरिक संघ निर्माण केला. सदर नागरिक संघाने जवानांसाठी एक प्रकल्प हाती घेतला. आघाडीवरील जवानांसाठी आपण दिवाळीचा फराळ पाठवला पाहिजे असे आम्हा सर्व सदस्यांना वाटत होते. आश्चर्य म्हणजे बालमोहनमध्ये फराळ करण्यासाठी स्त्रियांची नुसती रीघ लागली. ही गोष्ट शिवाजी पार्कच्या घराघरात वाऱ्याच्या गतीने पोहोचली. पुरुष मंडळी फराळ करण्यासाठी जे जे सामान व साहित्य लागेल ते ते पुरवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होती. दादांनी तर हा प्रकल्प यशस्वी करून दाखवण्यासाठी ५० हजार बुंदीचे लाडू, चिवडा व चकली बनवण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते शाळेतील सहकाऱ्यांच्या व दादरकरांच्या मदतीने करण्याचा चंगच बांधला होता. शाळेतील शिक्षक श्री. पुरुषोत्तम नाईक आणि मी तर चण्याचे पीठ आणण्यासाठी चक्क्या धुडाळल्या. ‘पाम’ कंपनीचे श्री. अच्युतराव नाडकर्णी यानी साखर पुरवण्याची जबाबदारी घेतली. कॉर्न प्रॉडक्ट्सचे श्री. भिकाजी सरदेशपांडे यांनी पॅकिंगचे डबे पुरवण्याची जबाबदारी घेतली. हळूहळू हा प्रकल्प एक प्रतिष्ठेचा उपक्रम होऊ लागला.

दादरकर महिला तर ‘बालमोहन’मधील पटांगणाकडे फराळ करण्यासाठी जाण्यात धन्यता मानू लागल्या. ह्या महान प्रकल्पात अनेक मंडळी सहभागी झाली होती. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉ. चेरियन यांचे कुटुंबही बालमोहनमध्ये आले. श्रीमती चेरियन यांनीही बुंदीचे लाडू वळण्यास मदत करायला सुरुवात केली. शिक्षणमंत्री श्री. मधुकरराव चौधरी, श्री. नामजोशी, आचार्य प्र. के. अत्रे, श्री. वसंत देसाई, इत्यादी मान्यवरही प्रकल्पाला भेट देऊ लागले. वृत्तपत्रकार, छायाचित्रकार यांची त्या वेळी खूप मदत झाली. हा हा म्हणता ही गोष्ट मिलिटरी विभागापर्यंत पोहोचली. त्यांचे प्रतिनिधी फराळ करण्याच्या जागी प्रत्यक्ष फराळाचा दर्जा पाहण्यासाठी आले होते. तीन दिवसांत (दि. १८, १९ आणि २० ऑक्टोबर १९६५) हा जवानांसाठी फराळ बनवण्याचा प्रकल्प पुरा झाला. काही महिलांनी स्वतः स्वेटरही विणून आणले होते. अखेर मिलिटरीचे खास विमान मुंबईच्या विमानतळावर ह्या ‘दिवाळीच्या फराळाचे’ पॅकबंद डबे जवानांसाठी घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले. काही मंडळी विमानापर्यंत फराळ पोहोचवण्यासाठीही गेली होती. फराळाचे सर्व डबे विमानात प्रत्यक्ष जाईपर्यंत दादा, प्रकाशभाई, श्री. भिकाजी सरदेशपांडे आणि आम्ही दोघे बंधू (मी आणि बाळासाहेब) विमानापर्यंत गेलो होतो. विमानाने आकाशात झेप घेतली आणि समाधानाने व आनंदाने दादरकर मंडळीचे प्रतिनिधी परतले.

एका महिन्याने आघाडीवरून रजेवर आलेले बालमोहनचे दोन जवान श्री. शशिकांत पवार (माजी विद्यार्थी) व श्री. नारायण परुळेकर (शिक्षक) दादांना भेटायला शाळेत आले. त्या दोघांचा सभागृहात जमलेल्या विद्यार्थ्यांसमोर गौरव व सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुलांना जेव्हा आघाडीवरील जीवन व अनुभव कथन केले, तेव्हा मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मुलांच्या मनातील राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा बळावली. “दिवाळीच्या फराळाचे डबे आम्हाला पोहोचले. आम्ही आघाडीवर तुम्ही पाठवलेला फराळ खाऊन दिवाळी साजरी केली,” असे त्यांनी सांगताच दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत होता. दादा कृतार्थ झाले आणि त्यांनी राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी जवानांना सुयश चिंतिले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हे गीत म्हटले व कार्यक्रमाची सांगता झाली.

असा होता तो रोमांचकारी काळ! शाळेच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळी (१९६७) शाळेने ले. दिलीपकुमार गुप्ते व ले. प्रकाशनारायण कोटणीस यांचे उठावाचे ब्राँझचे पुतळे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावले. मुलांना राष्ट्रप्रेमाचा संस्कार देण्यासाठी त्या दोन्ही वीरांची घरी आलेली शेवटची पत्रे मी त्यांच्या घरून आणली आणि त्यातील त्यांच्या अखेरच्या मनोगतातून त्या राष्ट्रवीरांची राष्ट्रप्रेमाने भारलेली वाक्ये त्यांच्या पुतळ्याखाली लिहिली आहेत.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.