
आठवणीतील पाऊले
भारतीय आघाडीवरील जवानांना दिवाळीचा फराळ
अशीच एक संधी १९६९ साली मला मिळाली होती. शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षणाची राष्ट्रीय परिषद (National Council of Educational Research and Traning) या संस्थेने क्रमान्वित अध्ययनाचा महिन्याभराचा एक कोर्स १९ मे ते १७ जून १९६९ या कालावधीत पुणे येथील राज्यस्तरीय शिक्षणशास्त्र संस्थेत आयोजित केला होता. ह्या कोर्ससाठी माझी निवड करण्यात आल्यामुळे मला अध्ययनपद्धतीमधील नवीन बदलाची ओळख होईल म्हणून मी अगदी आनंदात होतो.
मी पुण्याला शिक्षणशास्त्र संस्थेत पोचलो त्यावेळी एक व्यक्ती अगदी नम्रपणे प्रशिक्षकांचे स्वागत करायला उभी होती. मागाहून समजले, की ती व्यक्ती Programmed Learning Course चे डिरेक्टर डॉ. एस.एस. कुळकर्णी होते.
ह्या कोर्सला ठिकठिकाणाहून सुमारे ४० प्रशिक्षणार्थी आले होते. सभेच्या आरंभी प्रथम, डॉ. एस.एस. कुळकर्णी ह्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. ते N.C.E.R.T मध्ये Programmed Learning च्या अध्ययनपद्धतीचे तज्ज्ञ होते. सदर अध्ययनपद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखिल भारतात आणि परदेशात, भारतातर्फे जाऊन या नवीन शिक्षणक्रमाची माहिती देणे, शिबिरे घेणे, परिसंवाद आणि चर्चा आयोजित करणे, इत्यादी कामे ते करत असत.
हा कोर्स इंग्रजी भाषेतून होता. ह्या क्रमान्वित अध्ययनाच्या आगळ्यावेगळ्या स्वयंअध्ययनाच्या पद्धतीसंबंधी प्रथम डॉ. कुळकर्णी यांनी आम्हाला आपल्या प्रास्ताविक भाषणात ओळख करून दिली. त्यानंतर सदर अध्ययनपद्धतीसंबंधी चर्चा, सुसंवाद यांच्या माध्यमांतून सदर अध्ययन पद्धतीचे तंत्र, वैशिष्ट्य, मर्यादा, इत्यादींसंबंधी आम्हाला माहिती मिळत होती.
माणूस शिकताना घडणारे वर्तनबदल आणि त्याची मानसशास्त्रीय कारणे यासंबंधी अनेक प्रयोग, निरीक्षणे केली गेली. मानसशास्त्रज्ञांनी विसाव्या शतकात प्राणी आणि पक्षी यांवर अनेक प्रयोग केले. त्यातूनच श्री. बी.एफ. स्कीनर यांनी क्रमान्वित अध्ययनाची पद्धत विकसित केली. पद्धतशीर आखणीद्वारे विद्यार्थ्यांना क्रमाने उद्दिष्टांप्रत नेणारी स्वयंअध्ययनाची पद्धत, असे क्रमान्वित अध्ययनाचे थोडक्यात वर्णन करता येईल.
कोणताही पाठ्यविषय अगदी लहानसहान घटकांमध्ये विभागला, त्यातील प्रत्येक उपघटकावर चौकटी तयार केल्या की विद्यार्थी या चौकटीचा उपयोग करून नवीन ज्ञान मिळवतात. मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून ते ज्ञान पक्के करतात. चौकटीमध्ये एक किंवा अधिक विधाने असतात आणि त्यावर आधारित एखादा लहानसा प्रश्न असतो. विद्यार्थी या विधानाच्या किंवा विधानांच्या मदतीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. हे प्रश्न बहुतेक वस्तुनिष्ठ असतात. अनेक चौकटींच्या साहाय्याने एक क्रमपाठ (Programme) तयार होतो. क्रमपाठामध्ये असलेले लहान लहान प्रश्न विद्यार्थी स्वत: सोडवतो आणि नवीन विषय शिकतो. प्रत्येक चौकटीचा पुढील आणि मागील चौकटीशी स्वाभाविक आणि तर्कशुद्ध संबंध जोडलेला असतो. म्हणूनच या तंत्राला किंवा पद्धतीला क्रम असलेले ‘क्रमान्वित अध्ययन’ असे म्हणतात.
क्रमान्वित अध्ययनपद्धतीची वैशिष्ट्ये –
१. क्रमान्वित अध्ययनामध्ये ‘एका वेळी एक पाऊल’ ह्या तत्त्वाचा उपयोग केला जातो. विद्यार्थी एका वेळी ज्ञान अगर कौशल्य यांचा एक ‘लहानसा’ भाग आत्मसात करतो व नंतर आपल्या कुवतीनुसार पायरीपायरीने पुढे जातो आणि निवडलेल्या घटकामध्ये पारंगत होतो. क्रमपाठाचे लहानपण किंवा मोठेपण हे विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर अवलंबून असते, हे क्रमपाठ तयार करणाऱ्याने लक्षात ठेवले पाहिजे.
२. प्रत्येक विद्यार्थ्याला एक क्रमपाठ दिला जातो. क्रमपाठात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्येकास स्वतंत्र कागद दिलेला असतो. क्रमपाठात दिलेले बरोबर उत्तर झाकण्यासाठी प्रत्येकास एक आच्छादन पुठ्ठा अथवा कागद (mask) दिलेला असतो. विद्यार्थ्याने प्रश्न वाचून दिलेल्या कागदावर स्वत: प्रथम उत्तर लिहावयाचे असते व नंतरच आच्छादन पुठ्ठा अथवा कागद सरकावून बरोबर उत्तर पाहावयाचे असते. असे केल्याने त्यास आपण लिहिलेले उत्तर बरोबर की चूक याचा पडताळा पाहता येतो. आपले उत्तर बरोबर आले, तर त्याला आनंद होतो. त्याला प्रेरणा मिळते, त्याचा उत्साह द्विगुणीत होतो व तो कार्यरत राहतो.
३. प्रत्येक चौकटीत फारच थोडी माहिती दिलेली असते. त्यामुळे विद्यार्थी
क्षणाक्षणाला क्रमाक्रमाने ज्ञान मिळवत असतो.
४. या अध्ययनपद्धतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी क्रियाशील (Active) राहतो. तो स्वप्रयत्नाने शिकत असतो. त्यामुळे त्याचे स्वअध्ययन चालू असते. या पद्धतीमध्ये क्रमपाठ हाच त्याचा अध्यापक असतो.
५. या पद्धतीने वैयक्तिक शिक्षण होते.
६. प्रत्येकास स्वतंत्र क्रमपाठ दिला असल्याने प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार शिकतो. यामध्ये वेळेचे बंधन नसते. पण अंतिम कसोटी देण्याच्या वेळेपूर्वी विद्यार्थ्याने आपला क्रमपाठ पूर्ण करायचा असतो.
७. विद्यार्थ्यांनी संपूर्ण क्रमपाठ पूर्ण केल्यानंतर त्यांना तो विषयघटक चांगल्या प्रकारे आकलन झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांना एक कसोटी (Test) दिली जाते. त्या कसोटीत फक्त प्रश्नच असतात. ती एक लहानशी प्रश्नपत्रिकाच असते. या कसोटीस ‘अंतिम वर्तन कसोटी’ म्हणतात.
या अध्ययनपद्धतीचे फायदे –
१. विद्यार्थ्यास अध्यापकाच्या मदतीशिवाय शिकता येते.
२. तो स्वावलंबनाने शिकतो. त्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. त्याला स्वअध्ययनाची सवय लागते.
३. विद्यार्थी स्वअध्ययनाने शिकलेला विषय दीर्घ काळ त्याच्या लक्षात राहतो. ४. मोठ्या संख्येच्या वर्गात ही पद्धती अत्यंत उपयुक्त आहे.
५. अध्यापकाला लागणाऱ्या वेळेत बचत होते.
६. पूर्वनियोजनामुळे अध्यापकाची तयारी चांगली होते.
७. शिक्षकांना त्यांच्या नेहमीच्या शालेय कामातून थोडी सवड काढून आपले ज्ञान अद्ययावत ठेवता येते.
८. शिक्षकाचे विषयज्ञान सखोल होण्यास मदत होते.
९. बहुतेक शिक्षकांना पाठाचे अध्यापन करताना बरेच बोलावे लागते. या
तंत्रामुळे शिक्षकाचे बोलण्याचे काम बऱ्याच प्रमाणात कमी होते.
१०. क्रमपाठ विद्यार्थ्याला पेलेल व पचेल एवढाच नवा भाग प्रत्येक चौकटीत असतो. क्रमपाठातील चौकटी इतक्या सुसूत्रपणे तयार केलेल्या असतात की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बिनचूक देऊ शकेल.
११. अनेक विषयघटकांचे प्रारंभिक वर्णन, अंतिम वर्णन, पृथक्करण आणि
ओघतक्ता (flo chart) तयार केल्यास शिक्षकाची अध्यापनाची दृष्टी बदलते.
१२. ही पद्धती प्रयोगाधिष्ठित आहे. त्यामुळे विश्वासार्ह आणि शास्त्रीय आहे.
१३. गणित, विज्ञान, भूगोल, भाषेचे व्याकरण, तांत्रिक विषय सैनिकी
या पद्धतीच्या काही मर्यादा :
क्रमपाठाद्वारे ‘ज्ञानात्मक’ उद्दिष्ट साध्य करता येते. काही प्रमाणात उपयोजन आणि कौशल्य ही उद्दिष्टेही साध्य करता येतात. परंतु रसग्रहण, निबंध, व्यक्तिमत्त्वाचा विकास, इत्यादी उद्दिष्टांची पूर्तता क्रमान्वित अध्यापनातून करता येणे अवघड आहे.
थोडक्यात, छोट्या छोट्या पायऱ्या, कृतियुक्त प्रतिसाद, ताबडतोब पडताळा, विद्यार्थीचाचणी आणि स्वत:च्या गतीप्रमाणे प्रगती करण्याची संधी या पाच तत्त्वांचा उपयोग करावा लागतो.
तसेच क्रमपाठ (Programme) अंतिम स्वरूपात तयार होण्यापूर्वी तो विविध पायऱ्यांतून जावा लागतो. प्रत्येक क्रमपाठ अंतिम स्वरूपात तयार करण्यापूर्वी त्याची विद्यार्थ्यावर वैयक्तिक चाचणी (Individual Tryout) आणि गटवार आणि सामुदायिक चाचणी (Group Tryout) घेणे आवश्यक आहे. याची कारणे अशी आहेत –
१. क्रमपाठ प्रत्यक्ष विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या दृष्टीने किती उपयुक्त ठरतो हे समजते.
२. क्रमपाठाची नियोजित उद्दिष्टे साध्य होतात की नाही हे पाहता येते.
३. क्रमपाठ सोडवताना विद्यार्थ्याला कोणकोणत्या अडचणी येतात ते पाहता येते.
४. चौकटीमध्ये विचारलेले प्रश्न विद्यार्थ्यांना कितपत समजतात याचा पडताळा पाहता येतो.
वरील तपशीलवार माहिती मी अशासाठी दिली आहे, की नवीन अध्ययनपद्धतीत कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, तो का केलेला आहे, सदर अध्यापनपद्धतीच्या मर्यादा कोणत्या आहेत हे महिनाभराच्या कोर्समध्ये आम्ही शिकलो. शिकताना आमच्या मनातील शंकाही मनमोकळेपणी व्याख्यात्यांना आम्ही विचारल्या व त्यांनी तितक्याच मोकळेपणी आमचे समाधान केले. उदाहरणादाखल काही दाखले येथे देतो.
१. पाठ्यक्रमाच्या कागदावर आच्छादित पुठ्याच्या खाली चौकटीतील प्रश्नांची उत्तरे असतील, तर ह्या पद्धतीत आणि विद्यार्थी गाइड्स वापरतात त्या पद्धतीत फरक कोणता?
उत्तर – येथे स्वयंअध्ययनाला महत्त्व आहे. विद्यार्थी स्वत:वर विश्वास ठेवून त्या अध्ययनपद्धतीचा अवलंब करत असतात. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत नाही, तर स्वत:चे स्वतः विषयज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसेच त्याचे उत्तर बिनचूक येणार असा विश्वास ह्या क्रमपाठाने त्याला दिलेला असतो.
२. आच्छादित पुठ्ठयाखालचे चौकटीतील प्रश्नांचे उत्तर प्रथम पाहून नंतर चौकटीतील प्रश्न लिहिला तर तो कॉपीचाच प्रकार होऊ शकेल. विद्यार्थी सर्व गुण मिळवण्यासाठी या पद्धतीने उपयोग करू शकतील, हे नाकरता येत नाही. याबद्दलची प्रतिक्रिया कोणती?
उत्तर – आम्ही जे प्रयोग केले आहेत त्यामध्ये असे आढळून आले आहे, की मुले कॉपी करत नाहीत अथवा स्वत:चे उत्तर लिहिण्यापूर्वी बरोबर उत्तरेदेखील पाहत नाहीत. कारण त्यांना प्रामाणिकपणे अध्ययन करायचे असते. ही सवय क्रमान्वित अध्ययनपद्धतीच करू शकते.
३. एखादा क्रमपाठ सर्व दृष्टींनी निर्दोष आहे हे कसे ओळखावे?
उत्तर – अंतिम कसोटीत फक्त प्रश्न असतात. हे प्रश्न वस्तुनिष्ठ अगर लघुत्तरी असू शकतात. या अंतिम कसोटीतील साधारणत: ९० टक्के प्रश्नांची उत्तरे शेकडा ९० टक्के विद्यार्थ्यांना बरोबर देता आली, तरच तयार केलेला क्रमपाठ योग्य आहे असे समजले जाते.
आम्ही ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत ‘क्रमान्वित अध्ययना’वर व्याख्याने ऐकत होतो, चर्चा करत होतो, त्यासंबंधी लिहिणे, मनन व चिंतन करणे या गोष्टी होतच असत. पण त्याही पलिकडे जाऊन मला असे सांगावेसे वाटते, की मोकळ्या वेळेतही, क्रमान्वित अध्ययनावर गप्पा, चर्चा, वादविवाद, इत्यादी गोष्टी आमच्यामध्ये चालत असत आणि आम्ही आनंद मिळवत असू.
या पद्धतीने मी Active and Passive Voice हा पाठ तयार केला होता. लहान लहान घटकांवर क्रमपाठ तयार करून संपूर्ण क्रमपाठ पूर्ण केला व नंतर अंतिम कसोटीही तयार केली. हा कोर्स संपल्यावर मी शाळेत गेलो आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक व सामुदायिक चाचणी घेतली. त्यामुळे काही त्रुटी माझ्या लक्षात आल्या व त्यानंतर सदर पद्धतीला अंतिम स्वरूप दिले.
सदर कोर्सच्या सांगता समारंभाच्या दिवशी आम्ही आमचा अनुभव मनोगताच्या स्वरूपात सादर केला.
कोर्सचा दुसरा भाग N.C.E.R.T. मध्ये दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात १५ दिवसांच्या कालावधीचा होईल, त्यावेळी सर्व प्रशिक्षणार्थीनी तयार केलेली ‘क्रमान्वित अध्ययनपुस्तिका’ अवश्य आणावी असे कोर्सचे डिरेक्टर डॉ. एस्.एस्. कुळकर्णी ह्यांनी आम्हाला सांगितले. शेवटी आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आणि मार्गदर्शक यांचा ग्रुप फोटो शिक्षणशास्त्र संस्थेचे उपसंचालक डॉ. वा.ना. दांडेकर ह्यांच्या समवेत काढला. तो फोटो मी जपून ठेवला आहे.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.