loader image

आठवणीतील पाऊले

एन. जी. नारळकर फाउंडेशन आयोजित | शिक्षक शिबिरात माझा सहभाग

एन. जी. नारळकर फाउंडेशनतर्फे ५ मे ते १२ मे १९८९ या कालावधीत शिबिरासाठी पुणे शहरातील सुमारे २५ माध्यमिक शाळांतील शिक्षकांना तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनामध्ये आमंत्रित केले होते. या शिबिरातील शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी पुढील वक्त्यांना निमंत्रित केले होते : श्री. वि.वि. चिपळूणकर, श्री. दि.वि. गोखले, प्रा.सौ. सरोजिनी वैद्य, प्रा. य.दि. फडके, प्रा. ग.प्र. प्रधान, श्री. मो.वि. भाटवडेकर, डॉ. ह.कृ. परांजपे, श्री. नी.र. सहस्रबुद्धे, प्रा. वसंत बापट, प्रा. केशव मेश्राम, श्री. पु.ल. देशपांडे, श्री. पु.कृ. गर्दे, डॉ. हे.वि. इनामदार, प्राचार्य व. द. देसाई, डॉ. वि.ग. भिडे, श्री. अरविंद फडके आणि डॉ. बापुसाहेब रेगे. ह्या शिक्षण शिबिराचे कार्यवाह डॉ. प्र. ल. गावडे होते. शिक्षक गुणवत्ता शिबिरासाठी मला १२ मे १९८९ रोजी व्याख्यान देण्याकरिता आमंत्रित केले होते. माझ्या व्याख्यानाचा विषय होता, ‘शिक्षक गुणवत्ता विकासाची माझी संकल्पना’.

शिक्षक गुणवत्ता शिबिरातील माझ्या सुसंवादातील काही मुद्दे मी देत आहे : गुणवत्तापूर्ण शिक्षक कसा असावा?
१. विद्यार्थिनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, पेशानिष्ठा आणि अध्ययन-अध्यापननिष्ठा बाळगणारा.
२. शोधनवृत्ती आणि प्रयोगशीलता यांची आवड असलेला.
३. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला.
४. विद्यार्थ्यांची अध्ययनप्रक्रिया आनंददायी व फलदायी करणारा.
५. बालमनाच्या अवगाहनातून विद्यार्थ्यांच्या स्वयंविकासास पोषक असे वातावरण निर्माण करणारा.
६. निसर्गाच्या अवलोकनातून स्वतःचे अनुभवविश्व विस्तारित करणारा.
७. नैतिक, सामाजिक आणि शैक्षणिक मूल्ये अंगी बाणवलेला.
८. नवनवीन कल्पना आणि विचार यांच्याकडे डोळसपणे पाहणारा.
९. दुसऱ्याच्या मनाचा आदर करून स्वतंत्रपणे निर्णय घेणारा.
१०. विद्यार्थी, पालक, सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद साधणारा.
११. स्वयंअध्ययन, अध्यापन आणि शैक्षणिक उपक्रम यांचे पूर्वनियोजन करणारा.
१२. प्रशिक्षण वर्ग, कृतिसत्रे, परिसंवाद, चर्चा, स्पर्धा, सभा-संमेलने इत्यादींमध्ये सहभागी होणारा आणि पूरकवाचन व सतत लेखन यांच्या साहाय्याने आपले ज्ञान व अध्यापन कौशल्य अद्ययावत ठेवणारा.
१३. आपल्या विकसित व्यक्तिमत्त्वाने शिक्षण सचेतन करणारा.
१४. बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणप्रक्रियेत बदल करणारा.

संकल्पनापूर्तीची क्षेत्रे आणि तपशील
१. पेशानिष्ठा
१. जगातील आणि भारतातील शिक्षकपरंपरेचा अभ्यास करणे.
२. बालमनाचा अभ्यास करून बालकांसंबंधी विकासात्मक उपक्रम तयार करणे.
३. आपले व्यक्तिमत्त्व ज्ञानाने, वर्तनाने आणि संभाषणाने अधिक दर्जेदार बनवून सामाजिक प्रतिष्ठा वाढविणे.
४. ‘माझा आनंद मीच मिळवू शकेन’ याबद्दल विश्वास बाळगून त्यासाठी धडपडणे.
५. पेशातील यश हे आर्थिक व्यवहारावर अवलंबून नाही हे मनाला पटविणे.
६. पेशाविषयी निष्ठा निर्माण होण्यासाठी, स्वतःसाठी यशदायी उपक्रम आयोजणे.
७. पेशातील आवडीचे क्षेत्र निवडणे व त्यात प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करणे.
८. अभ्यासमंडळे, प्रशिक्षणवर्ग, चर्चासत्रे, कृतिसत्रे यांत सहभागी होऊन आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार कसा करता येईल यासंबंधी कार्यप्रवण होणे.

२. अध्यापन कौशल्य
अध्यापन परिणामकारक होण्यासाठी शिक्षकाला पुढीलप्रमाणे पूर्वतयारी व पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे :
विषयाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास, त्याची उद्दिष्टे, ती साध्य करण्याची साधने (विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव, पाठ्यपुस्तके, अध्यापनपद्धती, शिक्षणसाहित्य, संदर्भ, व्यवसाय, चाचणी, कसोट्या, परीक्षा यांचे आधुनिक तंत्र, इत्यादी), प्रत्यक्ष अध्यापनातील पायऱ्या व क्रम यांची निश्चिती करणे, गृहपाठाची योजना तयार करणे, वार्षिक कामाचे अंदाजपत्रक, आठवड्याचे अंदाजपत्रक तयार करणे, इत्यादी.

३. पाठ्यांशाचे प्रत्यक्ष अध्यापन
अ. पाठ्यांशाच्या अध्यापनाची पूर्वतयारी : विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाची माहिती करून घेणे, पाठ्यविषयाचे बिनचूक ज्ञान करून घेणे, आवश्यक ते शिक्षणसाहित्य जमवणे, पाठ्यांशाच्या अनुषंगाने प्रश्न, व्यवसाय, चाचणी यांचे नियोजन करणे.
ब. वातावरणनिर्मिती : पाठ्यांशाची प्रस्तावना, हेतुकथन आणि संभाषण यांतून विद्यार्थ्यांचे पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी वर्गात वातावरण निर्माण करणे.
क. विषय प्रतिपादन : पाठ्यांशाच्या अध्यापनाचे कल्पनापाठ, स्पष्टीकरणपाठ, आवृत्तीपाठ, व्यवसायपाठ आणि कसोटीपाठ असे प्रकार पाडून विद्यार्थ्यांना सोप्या व सुलभ रितीने शिकण्यासाठी निवेदन, प्रश्न, शिक्षणसाहित्य, संदर्भग्रंथ यांचा उपयोग करणे.
ड. पाठ्यांशाची आवृत्ती : शिकलेल्या पाठ्यांशाकडे निराळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आवृत्तीपर प्रश्न, आकृत्या, व्यवसाय यांचा उपयोग करणे.
ई. उपयोजन : पाठ्यांशाच्या विषयज्ञानाची दैनंदिन जीवनाशी सांगड घालणे.
उत्कृष्ट पाठाचे गमक त्याच्या बाह्यलक्षणात नसून तो पाठ शिक्षकाला आणि त्याच्या विद्यार्थ्यांना कोणती नवी अनुभूती आणून देतो यामध्ये सामावलेले असते.

४. व्यासंग
१. शिक्षणशास्त्र व अध्यापनकला या विषयांवरील ग्रंथ, चरित्रे, आत्मचरित्रे, लेख, निबंध, प्रबंध आणि इतर अवांतर वाचन करणे.
२. पेशातील स्वानुभवाचे प्रकटीकरण, विद्यार्थ्यास उपयुक्त असे स्वाध्यायलेखन, शैक्षणिक लेख, निबंध, प्रबंध, पुस्तके यांचे लेखन, पेशातील आनंद व त्रुटी याच्या प्रसंगनोंदीतून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करणे.
३. प्रशिक्षणवर्ग, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्याने, आकाशवाणी व दूरदर्शन यात सहभागी होणे. ४. विविध शाळा, शैक्षणिक व संशोधन केंद्रे, पुस्तकालये यांस भेटी देणे.

५. समाजाभिमुख दृष्टिकोन ।

१. परिसरामधील समाजाच्या चालीरीतींचे अलिखित नियम, गरजा, समस्या, श्रद्धास्थाने, आशास्थाने, अपेक्षा यांचे निरीक्षण व माहिती करून घेणे.
२. वरील निरीक्षण व माहिती लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना समाजपरिचय करून देणे आणि त्यामध्ये योग्य तो बदल घडवण्यास व चांगले ते स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे.
३. परिसरातील व्यवसाय आणि शालेय अभ्यासक्रम यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना उद्योजक व समाजाभिमुख करणे.
शिक्षक असा असावा ?
१. शिक्षक मनाने निरोगी असावा.
२. तो खिलाडू वृत्तीचा असावा.
३. त्याच्या मनात विद्यार्थ्यांबद्दल अपार सहानुभूती असावी.
४. त्याला उत्तम विनोदबुद्धी असावी.
५. तो आशावादी असावा.
६. शिक्षणाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन शास्त्रीय असावा.
७. स्वतःच्या पेशावर त्याची निष्ठा असावी.
८. तो नेहमी विद्यार्थी असावा.
९. त्याच्या कार्यात संशोधनाची बैठक असावी.

असा शिक्षकाकडून बालकाचा खराखुरा विकास साधला जाईल आणि त्यायोगे भरीव राष्ट्रकार्य केल्याचे समाधान मिळविता येईल.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.