आठवणीतील पाऊले
सिमेंटच्या चाळीतील बालपण
मला दादांनी, माझ्या वडिलांनी माझ्या जन्माविषयीची एक गोष्ट सांगितलेली आठवते. आईच्या पोटात दुखते म्हणून दादा आईला घेऊन वाडिया हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी सांगितले, की बाळंत व्हायला अजून काही दिवस जावे लागतील. दादा घरी आले. आईच्या बाबतीत ते निश्चिंत होते आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी आईच्या पोटात जास्त दुखू लागले आणि ती घरीच बाळंत झाली! तिच्या बाळंतपणाच्या वेळी माझी एक आत्या, ‘बायामामी’ हिने आईचे बाळंतपण केले (जुन्या काळी बाळंतपण करण्यात काही स्त्रिया प्रवीण असत.) आणि मी जन्माला आलो. त्या वेळी दादांची कशी धावपळ झाली असेल ह्याची कल्पना करवत नाही. पण मुलगा जन्माला आला याचा त्यांना आनंद निश्चितच झाला असावा.
माझ्या आजोबांनी मला ‘बापू’ म्हणायला सुरुवात केली. आजोबांची आई लहानपणीच वारली. तेव्हापासून त्यांचा सांभाळ व पालनपोषण त्यांच्या चुलत चुलत्यांनी केले. त्या चुलत्यांना ‘बापू’ म्हणत. मी जन्मल्यावर आजोबांनी त्या बापूंच्या नावानेच मला हाक मारायला सुरुवात केली आणि मग मला सगळेच बापू म्हणू लागले.
माझे ठेवलेले नाव मोरेश्वर. माझ्या आजोबांची गणपतीवर खूप भक्ती होती. त्यामुळे त्यांनी मोरेश्वर हे नाव मला आवडीने ठेवले होते.
आमच्या घरात आजी-आजोबा, आई-वडील, माझे तीन काका (यशवंत तथा दाजीकाका, नारायण तथा भाऊकाका, गणपती तथा गंपूकाका), दाजीकाकांच्या पत्नी मामीबाई, भाऊकाकांच्या पत्नी सुशीलाकाकी, माझी सर्वांत धाकटी आत्या यशवंती, माझा धाकटा भाऊ श्रीपाद तथा बाळ, माझ्या दोन बहिणी सुधा आणि सिंधू, दोन चुलत बहिणी कमल आणि सुमन, अशा १५ व्यक्ती एकत्र राहत होत्या. मधूनमधून आजी-आजोबा आमच्या कोचरे गावी जात असत. इतकी नाती जरी त्या घरात वावरत असली, तरी नात्यांच्या पलीकडे असलेली जवळीक व प्रेम आमच्या कुटुंबात नेहमी असायचे. माझे वडील (मी त्यांना ‘दादा’ म्हणत असे) घरातील कर्तापुरुष होते. ते व माझे थोरले काका दाजी हे दोघेच घरात मिळवते होते. दाजी म्युनिसिपल शाळेत शिक्षक होते, तर दादा माटुंग्याच्या डेव्हिड ससून इंडस्ट्रियल अॅण्ड रिफॉर्मेटरी स्कूल’मध्ये बालगुन्हेगारांच्या शाळेत १९२३ पासून शिक्षकाचे काम करीत. ह्या मुलांची फार मोठी जबाबदारी शिक्षकवर्गावर असे.
बालगुन्हेगार मुलांच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांसाठी राहण्याकरिता शाळेजवळच १८ बिहाडे राहतील अशी एकमजली सिमेंटची चाळ सरकारने विनामूल्य दिली होती. त्या जागेतील एक बिहाड होते रेगे मास्तरांचे ह्न आम्हा रेगे कुटुंबीयांचे. तळमजल्यावरील या जागेत १२’ह्न १५’च्या दोन खोल्या आणि एक छोटेसे स्वयंपाकघर आणि दर्शनी भागात ओसरीवजा एक मोकळी जागा, आणि घराच्या मागे छोटेसे अंगण होते. त्यात काही फुलझाडे आणि तुळशीवृंदावन होते.
घरची अतिशय गरिबी होती. माझ्या वडिलांना आठ बहिणी. या बहिणींच्या लग्नात झालेला खर्च सुमारे २० हजार रुपयांपर्यंत गेलेला होता. परंतु आजोबांनी ती कर्जाऊ रक्कम कोणाकडून आणली याचे व्यवस्थित टिपण करून ठेवले होते.
दादांच्या, केवळ रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये शिकवून मिळालेल्या पगारावर कुटुंबाचा खर्च चालत नसे. म्हणून दादा, पंचेडेपोच्या दुकानातून पंचे, धोतरजोड्या, लुगडी आणीत आणि रविवारी फावल्या वेळेत निरनिराळ्या कॉलनीमध्ये विकायला जात. हा त्यांचा नित्यक्रमच होता. आमच्या गरिबीच्या काळात अनेक लोकांनी आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे आमची गरिबी असली, तरी आम्हाला कधी काही कमी पडले नाही.
आमचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे. वर्षभराचे धार्मिक सण मोठ्या उत्साहाने साजरे होत असत. सारेच माणसांचे भुकेले असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांची वर्दळ नेहमीच असायची. त्यामुळे गप्पागोष्टी, चर्चा या गोष्टी ओसरीवर कायम चालायच्या.
मला आठवते, की आमच्या ओसरीवर दादा रात्री १२ वाजेपर्यंत शिक्षक मित्रांबरोबर पुस्तके-वह्या-कागद घेऊन चर्चा करीत बसायचे.
माझी आई घरातील एक महत्त्वाची व्यक्ती होती. ती स्वयंपाक तर करीत असेच; शिवाय घरातील प्रत्येकाला काय हवे-नको ते ती स्वतः पाहायची. तिने केलेले जेवण आम्हाला चांगले लागायचे. काही वेळेला ती आम्हा मुलांना जेवणासाठी पाटपाणी घ्यायला सांगायची, खोल्यांतील केरही काढायला सांगायची. कधीकधी सतरंज्या आणि बिछानेसुद्धा घालायला सांगायची. तिने आमच्या कोणामध्ये दुजाभाव केला नाही. सर्वांना तिने आपले मानले आणि सर्वांनी तिला ‘काकीबाई’ म्हणून संबोधले.
घराच्या ओसरीवर एक कपाट होते. त्या कपाटावर ठेवण्यासाठी आई थोडे तांदूळ डब्यात घालून आजोबांकडे देत असे. कुणी भिकारी आला, की आजोबा त्यातील मूठभर तांदूळ त्याच्या झोळीत टाकत. हा आजोबांचा रोजचाच कार्यक्रम असे. मी एकदा आजोबांना विचारले, “आजोबा, तुम्ही दररोज सकाळी हे तांदूळ तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना का देता?” ते म्हणाले, “बापू, आपण खातो जेवतो. या गरीब लोकांना खायला-जेवायला मिळत नाही. त्यांना भूक लागते म्हणून ते झोळी घेऊन अन्नासाठी घराघरात जातात व अन्न मिळवतात. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. अशा लोकांना आपण थोडी मदत केली पाहिजे.” आजोबांनी हे जे मला सगळे सांगितले, त्यातले मला, ८ वर्षांच्या मुलाला त्या वेळी थोडेसे समजले होते. त्या वेळी मी आजोबांना आणखी काही न विचारता खेळायला गेलो. आजोबांनी गरिबाकडे आपण कसे पाहावे याचे प्रत्यक्ष उदाहरणच दिले होते.
मला खेळायला खूप आवडे. मित्र आले की त्यांच्याबरोबर गेलोच खेळायला. मित्र आमच्याच चाळीतले असायचे. आम्ही गोट्या, लंगडी, पकडापकडी, लपंडाव, इत्यादी खेळ खेळत असू. एकदा चाळीतील एका मुलाने आम्हाला गच्चीवर नेले. तो पतंग चांगला उडवत असे. त्याने आम्हाला पतंग कसा उडवायचा हेसुद्धा सांगितले. पतंगाच्या बारीक दोऱ्याला ‘मांजा’ म्हणतात हे मला त्यावेळी समजले. मांजा गुंडाळायचे मोठे रीळही त्याने आम्हाला दाखवले. हा हा म्हणता पतंग आकाशात उंच उंच जाऊ लागला. त्याने मला जवळ बोलावले व उडवलेल्या पतंगाचा मांजा माझ्या हातात दिला. तो मांजा मी हातात घेतल्यावर मला पतंग जड भासू लागलेला आठवतो. पतंग उडवण्यातली गंमत मला खूप आनंद देऊन गेली.
मला रेल्वेगाडीचे फार आकर्षण वाटत असे. माटुंगा स्टेशन आमच्या घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर होते. आमच्या ओसरीतून रेल्वेचे फाटक दिसायचे. गाडीचा आवाज ऐकला, की वाटे धावतधावत त्या फाटकाकडे जावे आणि गाडी धावताना पाहावी. माझी चुलत बहीण, कमा हिला मी एकदा सांगितले, की आपण रेल्वे फाटकाकडे जाऊ या ना! तिचे माझ्यावर खूप प्रेम होते. ती लगेच ‘चल’ म्हणाली आणि आम्ही दोघे रेल्वेच्या फाटकाच्या जवळ गेलो. थोडा वेळ थांबलो; पण गाडी आली नाही. इतक्यात गाडीच्या शिटीचा आवाज झाला. थोड्या वेळाने स्टेशनवरून गाडी सुटली आणि आमच्या समोरून गेली. मी तर टाळ्या वाजवून कमाचा हात धरून नाचत होतो. त्यानंतर मधूनमधून ती आणि मी तिकीट ऑफिसच्या कठड्याकडे जात असू. कमा मला कठड्यावर बसवायची. तेथून जाणाऱ्यायेणाऱ्या गाड्या मला व्यवस्थित पाहायला मिळायच्या. गाडीचा तो आवाज आणि गाडीची शिटी मला अजूनही आठवते. ते दिवस पुन्हा यावेत असे कधीतरी मला अजूनही वाटते.
मी दादांच्या शेजारी बसून जेवत असे. दादांनी मला लाल पाट आणला होता. त्यावर बसून जेवणे मला आवडायचे. दादा जसे मांडी घालून जेवायला बसायचे, तशी मांडी घालून मी बसायचो. ते ताटाभोवती प्रथम चित्रावत घालत. मीही त्याचे अनुकरण करी. आमचे जेवण गप्पा करीत व्हायचे. “बापू, जेवताना प्रथम वरणभात जेवावा. भात कालवायचा कसा ते बघ हं.” मी दादांकडे पाहत असे व तसा भात कालवत असे. “मधूनमधून चवीसाठी कोशिंबीर खावी, तोंडात घास घालताना आपली सर्व बोटे तोंडात घालू नयेत, जेवताना तळहाताला भाताचे शीत लागता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे, जेवताना तोंडाचा आवाज करू नये, मधूनमधून थोडेथोडे पाणी प्यावे,” इत्यादी गोष्टी सांगून जेवावे कसे ह्याचे प्रात्यक्षिक ते मला देत असत. त्यांचे अनुकरण मी श्रद्धेने आणि निष्ठेने करी. त्या वेळी जी मला पद्धतशीर जेवणाची सवय लागली, ती कायमचीच. हा जेवतानाचा आनंद आठवला, की माझे मन भरून येते.
असाच लहानपणचा आणखी एक प्रसंग मला आठवतो. त्या वेळी मी लेडी हार्डिंग्ज रोडच्या म्युनिसिपल शाळेत इयत्ता तिसरीमध्ये होतो. मला अभ्यासापेक्षा ‘मास्तर’ ह्या व्यक्तीसंबंधी विशेष कुतूहल होते. ते दिसतात कसे, फळ्यावर लिहितात कसे, ते टेबलावर ‘छडी’ का ठेवतात, ते मुलांना का मारतात, इत्यादी विचार माझ्या मनात येत असत. आमच्या शिक्षकांच्या टेबलावर नेहमी एक वेताची छडी ठेवलेली असायची. शिकवताना आम्हा मुलांना गप्प बसवण्यासाठी आमचे शिक्षक त्या छडीचा उपयोग करीत. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकले, की ते मुलाला हात पुढे कर’ असे सांगून छडी मारत असत. कोणी गडबड केली, की त्या वेळी ते छडीचा आवाज करीत. मारलेल्या छडीने आम्हाला थोडेसे दुखे; पण छडी खावी लागली याचे मनाला अधिक वाईट वाटत असे आणि तेच आमच्या मनाला जास्त लागायचे.
टेबलावरील त्या छडीकडे माझे नेहमी लक्ष जाई. जसे मारणाऱ्या गुरुजींसंबंधी मला भीती होती, तशी त्यांच्याविषयी मला आपुलकी व प्रेमही होते. त्या छडीविषयीही माझी तशीच भावना होती. त्या चकचकीत छडीचे मला जसे आकर्षण होते, तशीच ती छडी माझ्या हातावर बसणार नाही ना, याची भीतीही माझ्या मनात होती. अशी संमिश्र भावना उराशी घेऊन मी वर्गात शिकत असे.
एकदा माझ्या मनात आले, की त्या छडीला आपण हात लावून पाहावे. एकदा शिक्षक काही कामासाठी वर्गाबाहेर गेले होते. मी लगेच हळूच उठलो आणि टेबलाकडे गेलो. त्या छडीला हात लावला. छडी क्षणभर हातातही घेतली. इतक्यात मास्तरांचा आवाज झाला. ते वर्गात येण्याअगोदर मी धावत जागेवर जाऊन बसलो. इतके त्या बालवयात मला छडीचे आकर्षण होते.
त्या दिवशी मी घरी आलो, तेव्हा माझ्या मनात निरनिराळे विचार चालूच होते. मी मास्तर केव्हा होईन व छडी हातात घेऊन, ती टेबलावर मारून आवाज केव्हा करीन असे मला झाले. मी ठरवले, की दादा घरी आले की त्यांना माझ्या मनातले विचार सांगायचे. दादा घरी आल्यावर मी त्यांना सांगून टाकले, “दादा, मी मास्तर होणार. मला छडी आणून द्या. मला सगळे घाबरले पाहिजेत.” दादा म्हणाले, “बापू, छडी तुला जरूर आणून देईन; पण तुला ‘मास्तर’ म्हटले पाहिजे ना? मास्तर फळ्यावर खडूने लिहितात आणि मुलांना शिकवतात. मी तुला छानसा फळा आणून देतो आणि खडूही देतो. मग तर झाले!” दादांचे ते शब्द ऐकून मी आनंदून गेलो. फळा व खडू मिळणार या कल्पनेनेच मला किती आनंद झाला म्हणून सांगू!
दुसऱ्या दिवशी दादांनी माझ्यासाठी एक छोटासा फळा आणून दिला. खडूही माझ्याकडे दिले. घरात फळ्याची जागा दादांनी निश्चित केली. दादांनी मला अख्खे खडू आणले होते. मी त्या खडूंमधला एक खडू हातात घेतला. त्या पांढऱ्या खडूचा स्पर्श मला अजूनही आठवतो. तो खडू मी जमिनीवर हळूच टाकून पाहिला. त्याचा ‘टण्’ असा आवाज झाला. मी दुसऱ्या खडूचाही तसा आवाज होतो की नाही हे पाहिले. पुन्हा ‘टण्’ असाच आवाज आला. मी एक उडी मारली आणि एक खडू मी माझ्या सदऱ्याच्या खिशात ठेवला. अख्ख्या खडूचा तो आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे.
त्यानंतर मी त्या खडूने फळ्यावर लिहायला लागलो. मी फळ्यावर एक रेघ काढली. उभ्याआडव्या रेघाही मारल्या. एक चित्रही काढले. मग हातातील खडूकडे पाहिले. खडू थोडासा लहान झाला होता. मला गंमत वाटली. मी त्या खडूकडे पाहिले आणि फळ्याकडेही पाहिले. माझ्या हाताकडेही माझे लक्ष गेले. खडूच्या रंगाने पांढरी झालेली हाताची बोटे अजूनही आठवतात. त्या खडूचा स्पर्श मला आजही जाणवतो आणि वाटते, की आपण लहान व्हावे आणि फळ्यावर खडूने त्याच उत्सुकतेने लिहावे.
एवढे मात्र खरे, की माझ्या मनातील मास्तर आणि छडी हे समीकरण कसे गेले ते मला कळले नाही. दादांचे मला छडी विसरायला लावण्याचे ते कौशल्य प्रभावी होते. छडी न मारण्याचा हा जो संस्कार दादांनी मला लहानपणी दिला, तो माझ्या शिक्षकी पेशात मी कायमचा लक्षात ठेवला. मी कधीच कोणत्याही मुलाला मारले नाही. त्यांच्या मनाला लागेल, मुले अपमानीत होतील, असे वागलो नाही याचा मला अभिमान वाटत आलेला आहे.
दादांचे माझ्यावर अतोनात प्रेम होते. ते घरी आले, की मी दिसलोच पाहिजे. ते कोचऱ्याला गेले की मला घेऊन जायचे. ते सोलापूरला माझ्या मोठ्या आत्याकडे तिला भेटायला गेले, की मला बरोबर न्यायचे. माझ्या सर्वात मोठ्या आत्याचे आडनाव शिवापूरकर. सोलापूरला ‘टांगा’ हे माझे मोठे आकर्षण असे. शिवापूरकरांचा एक टांगा होता. तो टांगा दशरथ नावाचा त्यांच्याकडे राहत असलेला टांगेवाला हाकीत असे. त्या टांग्यात बसून मी दशरथबरोबर खूप फिरलो आहे. मला दशरथ आवडायचा तसा टांगा हाकताना तो वापरत असलेला ‘चाबूक’ही आवडायचा. टांग्यातून जाताना काही वेळा मी चाबूक घेऊन उगीचच घोड्याला मारीत असे. मी घोड्याचे लगामही हातात घेतले आहेत. दशरथ मला घोड्यासंबंधी माहिती सांगत असे. टांगा, घोडा, घोड्याचा तबेला, घोडा हाकताना लागणारा घोड्याचा लगाम आणि चाबूक यांसंबंधी तो मला सांगत राहायचा. तो माझा मित्रच बनला होता. त्याच्याबरोबर टांग्यातून फिरताना मला खूप गंमत वाटायची.
माझी मोठी आत्या (तिला आम्ही ‘आकामामी’ म्हणत असू) स्वतंत्र बंगल्यात राहायची. तिचे पती विष्णू शिवापूरकर यांना आम्ही ‘मामा’ म्हणत असू. त्या मामांना सोलापुरात फार मोठा मान असे. ते लक्ष्मी विष्णू मिल्स ह्या औद्योगिक संस्थेचे कॅशियर होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब अत्यंत सुखवस्तू होते. आकामामी ज्या ज्या वेळी मुंबईला आमच्या घरी यायची त्या त्या वेळी आम्हा मुलांना ती आपुलकीने नवीन कपडे घेऊन यायची. एवढेच नव्हे, तर ती मुंबईहून सोलापूरला परत जाताना आम्ही मुले त्यांना बोरीबंदरला स्टेशनवर सोडायला जात असू, त्या वेळेला गाडी सुटताना ती आम्हाला प्रत्येकाला बोलावून चार चार आणे हातावर ठेवीत असे. आकामामीने दिलेले पैसे घेताना आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत असे.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.