
आठवणीतील पाऊले
दादांचा अमृतमहोत्सव
दादांच्या वाढदिवशी आम्ही सर्व भावंडांनी दादांना वाकून नमस्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दादांनी त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शांतादुर्गा देवीला लघुरुद्र केला आणि तिचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून न्याहारी केली. न्याहारी घेताघेता आपला बालपणापासूनचा इतिहास दादांनी थोडक्यात आम्हाला सांगितला.
आम्ही लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यांनी शेवटी आम्हाला सांगितले. की माझी प्रकती एवढी चांगली कशी राहिली माहीत आहे का तुम्हाला? मालवण तालुक्यातील ‘हेदूळ’ या गावी लोकलबोर्डाच्या शाळेत शिक्षक म्हणून मी १९२१ साली लागलो. कोचरे गावापासून हेदूळ ९ मैल अंतरावर होते. तेथे मी दर आठवड्याला पायी चालत जात असे. वाटेत काही घाट्या लागत असत. त्या चढायच्या आणि उतरायच्या. त्यामुळे माझे पाय व पोटऱ्या मजबूत झाल्या. मला कसलाही रोग नाही. मी लहानपणी खूप परिश्रम घेतले. म्हणून मी प्रकृतीने आजही चांगला आहे.
हे सर्व दादांचे सांगणे एखाद्या गोष्टीसारखे आम्हाला वाटले. इतक्यात दादांचे स्नेही श्री. वसंतराव देशमुख दादांना शुभेच्छा देण्यासाठी एक भला मोठा पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र घेऊन आले. ते म्हणाले, “हे खोड चंदनाचं!” मी तर त्यांच्याकडे पाहतच राहिलो. ते मंत्रालयात सरकारी अधिकारी होते. त्यांनी दादांना अभिवादन करून नमस्कार केला. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर ते दोघेही श्री शांतादुर्गा देवीसंबंधी पुष्कळ वेळ बोलत होते.
शाळेतील शिपाई रामा बाबू देऊलकर घरी आला व त्याने दादांना सरळ सांगितले, “तुम्हाला आम्ही सर्वजण मोठा हार घालणार आहोत, नाही म्हणून नका.” शिपायावरील प्रेमामुळे दादा सत्काराला तयार झाले. आदल्या दिवशी १८ तारखेला दादांच्या स्वागतासाठी प्रत्येक वर्ग सजत होता.
दादा आणि मी शाळेत गेलो. मुले दादांची वाटच पाहत होती. मुले दादांचे दैवतच होते. आम्ही प्रथम प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना भेटलो. आम्ही वर्गात शिरताच मुले दादांना ‘शाबास! शाबास! शाबास!’ असे एकदम म्हणाली. अशी शाबासकी दादा मुलांना नेहमी देत असायचे. “बाळांनो, आनंदी राहा आणि दुसऱ्यांना आनंदी करा,” असे म्हणून दादांनी मुलांना संदेश दिला. ते म्हणाले, “बापू, पाहिलंस! शाळेतील ६ हजार मुलं माझी फार मोठी शक्ती आहे. माझ्या कार्याचं ते फळच आहे असं मी म्हणतो.” प्रकाश उपाहारगृहाच्या काकासाहेब जोगळेकरांनी शाळेतील सर्व मुलांना त्या दिवशी पेढे वाटले.
त्यानंतर दादांच्या बाळांना फुलवणाऱ्या, हसवणाऱ्या आणि विकसवणाऱ्या शाळेतील शिक्षकांची दादांनी एक सभा घेतली. त्या वेळी १५५ सहकाऱ्यांनी रंगीबेरंगी शाईने केलेल्या सह्यांचे एक मानपत्र दादांना सादर केले. त्या मानपत्रावर सहकारी आणि शिष्य या नात्याने मीही स्वाक्षरी केली होती. स्वाक्षरी करताना दादांचे शब्द माझ्या कानात घुमत होते. “माझ्या शाळेत माझा सत्कार! घरातल्या घरात का कुणी सत्कार करतं? शाळा हेच माझं घर आणि माझी बाळं, माझे शिक्षक, माझे शिपाई हेच माझं कुटुंब.” दादांना सत्काराचा कार्यक्रम करून घेणे कसेतरीच वाटत होते.
दादांना मी म्हटले, “आपण आता घरी जाऊया. तुम्ही सर्व वर्गावर्गात फिरून आला आहात. जरा विश्रांती घ्या. तुम्हाला कोणी भेटायला आले तर ते घरी येतील.” दादांनी माझे ऐकले आणि आम्ही घरी गेलो. दादा दमले होते. ते त्यांच्या नेहमीच्या लोखंडी खाटेवर पडले. ह्या खाटेवर त्यांचे खूप प्रेम होते. याचे कारण रिफॉर्मेटरीमध्ये असताना त्यांच्या शिष्यांनी ती लोखंडी खाट बनवून दिली होती. दादांच्या डोळ्यांत मला अश्रू दिसले. दादांना मी म्हणालो, “दादा, तुम्हाला काही जुन्या आठवणी आल्या का?” दादा म्हणाले, “आठवणी तर जरूर आल्या; पण माझ्याकडून गेल्या ७५ वर्षांत जे कार्य झालं, ते मी केलं की श्री शांतादुर्गेनं माझ्याकडून करवून घेतलं, असा विचार माझ्या मनात आला. मी एक प्राथमिक शिक्षक. माझ्या कार्यात जे मला यश मिळालं ते माझं श्रेय नव्हे. मी एवढंच सांगतो, की जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती । चालविशी हाती धरुनिया।।’ करताकरविता वेगळाच. या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वसाक्षी परमेश्वराला मी आजच्या दिवशी विनम्रपणे नमस्कार करतो.” असे म्हणून दादांनी माझ्या हातावर एक पेढा ठेवला.
दादांचा जाहीर सत्कार करावा असे सर्वश्री पु. रा. बेहरे (नवशक्तीचे संपादक), सुधाकर प्रभुदेसाई (शाळेचे निष्ठावान पालक) आणि प्रभाकर हळदणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एक ज्येष्ठ अधिकारी ह्यांच्या मनात आले. त्यांनी ही योजना शाळेच्या माझ्या खोलीत मला सांगितली. मी म्हटले, की सत्कार करून घ्यायला दादा तयार होतील का? ते तिघेही म्हणाले, की आपण दादांच्या कानावर आपल्या मनातली इच्छा तर सांगूया. पाहूया दादा काय म्हणतात ते. आम्ही नंतर आमच्या घरी दादांना भेटलो. दादांच्या जाहीर सत्काराची कल्पना दादांना सांगितली. दादांच्या चेहऱ्यावरून प्रथम आम्हाला वाटले, की दादा आमच्या इच्छेला नाही म्हणतील. पण दादा म्हणाले, “माझ्यासाठी पैसे जमवणार नसाल, तर माझी काही हरकत नाही. कारण समाजाचं माझ्यावर पुष्कळ ऋण आहे.” आम्हाला आनंद झाला. श्री. पु.रा. बेहरे म्हणाले, की आपण खासदार श्री. स. का. पाटील ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करूया. दादा लगेच म्हणाले, की माझ्या सत्काराच्या वेळी थैली न घेण्याची माझी इच्छा पाटीलसाहेबांना सांगा. आम्ही उल्हसित होऊन शाळेत परत आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही शांती कुटीर’मध्ये, ५ एप्रिल १९८१ रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाटीलसाहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटण्यास गेलो.
दादांच्या गौरवसमितीचे अध्यक्ष होण्याची त्यांना विनंती केली. पाटीलसाहेबांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, “अशा महत्त्वाकांक्षी शिक्षकाचा जाहीर सत्कार जनतेपुढे झालाच पाहिजे.” ते तयार झाले; पण त्यांनी एक अट घातली, की ह्या सत्कारासाठी पैसे जमवणार नसाल, तर मी आनंदाने अध्यक्ष होईन. त्यावर मी त्यांना म्हणालो, की दादांची तशीच इच्छा आहे. ते सत्काराच्या वेळी थैली घेणार नाहीत. पाटीलसाहेबांच्या भेटीमुळे आमचा उत्साह वाढला. लगेच दुसऱ्या दिवशी श्री. प्रकाशभाई मोहाडीकरांबरोबर आमची बैठक झाली. परंतु दुर्दैवाने स. का. पाटील यांचे काही दिवसांनी दुःखद निधन झाले. आम्ही पुन्हा पेचात पडलो. शेवटी अध्यक्षांसंबंधीची जबाबदारी श्री. प्रकाश मोहाडीकरांनी आपणाकडे घेतली आणि विधानसभेचे अध्यक्ष नामदार श्री. वि.स. पागे ह्यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे १५० सदस्यांची समिती स्थापन झाली. सदर समितीच्या कार्यवाहपदाची जबाबदारी श्री. सुधीर जोशी यांनी पत्करली. सदर सोहळा शिवाजीपार्क मैदानात ५ डिसेंबर १९८१ रोजी संध्याकाळी ५ वाजता घेण्याचे ठरले. तसेच दादांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. ह्या सत्कारसोहळ्यात जो गौरवग्रंथ प्रकाशित केला जाणार होता, त्याचा खर्च कसा करायचा हा विचार माझ्या डोक्यात एकसारखा येऊ लागला. शाळेची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. शेवटी मी दादांच्या सत्कार समारंभासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त १० रुपये आणावेत, त्यांना शाळेतर्फे पावती दिली जाईल, अशा मजकुराचे पत्र मी मुलांना दिले.
काय योगायोग असतात… दादांच्या सत्कारापूर्वी एकदा श्रीमती वंदना विटणकर यांनी आपली व पतीची ओळख करून दिली होती. वंदनाताई म्हणाल्या, “माझ्या पतींनी श्री शांतादुर्गा देवीचं सुंदर तैलचित्र तयार केलं आहे. ते आपल्या अमृतमहोत्सवानिमित्त आपणाला देण्यासाठी आलो आहोत.” त्या तैलचित्रामधील देवीचे दर्शन घेत दादा त्यांना म्हणाले, “ही फ्रेम मी माझ्यासमोरच लावतो. म्हणजे नेहमी मला तिचं दर्शन घडेल.” त्या उभयतांचे आभार मानायला दादांना शब्दच सुचत नव्हते. “मी तुमचा ऋणी आहे,” एवढेच दादा त्यांना म्हणाले. श्रीमती वंदना विटणकर ह्या कवयित्री होत्या. त्यांच्या कविता वृत्तपत्रांतून, मासिकांतून येत असत. एकदा त्यांचे काव्यवाचनही मी विद्यार्थ्यांसाठी शाळेत ठेवले होते. त्या दादांच्या खोलीत असतानाच मी त्यांना म्हणालो, की दादांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कारसोहळा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या शुभहस्ते ५ डिसेंबर रोजी होणार आहे. त्या वेळी आपण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निवेदन करावे असे मला वाटते. त्यांनी लगेच होकार दिला.
५ डिसेंबर १९८१चा दिवस उजाडला. सत्कार समारंभासाठी शिवाजीपार्क मैदानातील विस्तृत जागा निश्चित केली होती. समारंभाची जागा व व्यासपीठ ६ फूट उंचीच्या कापडाने बंदिस्त केलेली जागा तयार करण्यासाठी श्री. मोहन हिंगोराणी यांनी जातीने लक्ष घातले होते. मुख्य व्यासपीठाच्या बाजूला शिक्षकांच्या सांघिक गीतासाठीही एक छोटे व्यासपीठ तयार केले होते. त्यावेळी श्री. हळदणकरसाहेबांच्या ओळखीने परळहून आणलेला भव्य अमृतकलश मोठ्या नारळासह व्यासपीठाच्या बाजूला योग्य उंचीवर ठेवला होता. त्यामुळे व्यासपीठाला आगळीच शोभा आली होती. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास १० हजार प्रेक्षकांसमोर दादांचा अमृतमहोत्सवी सत्कार संपन्न झाला. त्या वेळी कार्यवाह म्हणून श्री. सुधीर जोशी, श्री. मधुकरराव चौधरी, श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. विद्याधर गोखले, अध्यक्ष श्री. वि.स. पागे, आदी मान्यवरांनी दादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. त्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी आपल्या मनोगतामध्ये दादांचा गौरव करून दादांना उत्तम आरोग्याचे दीर्घ आयुष्य लाभो असा आशीर्वाद दिला. त्यांनी दादांचा सन्मान शाल, श्रीफळ व मानचिन्हासह मानपत्र बहाल करून केला आणि ‘दादासाहेब गौरवग्रंथ’ प्रकाशित केला. याच वेळी दादांची विद्यार्थिनी श्रीमती उषा फेणाणी हिने दादांचे स्वतः तयार केलेले तैलचित्र दादांना अर्पण केले. शेवटी दादांनी आपले मनोगत कृतज्ञतेच्या स्वरूपात व्यक्त केले. सोहळ्याचे निवेदन करणाऱ्या श्रीमती विटणकर ह्यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानल्यावर ह्या सुंदर सोहळ्याची सांगता झाली.
अमृतमहोत्सवी सत्कारात शाळेतील दादांच्या ‘बाळांचा’ सहभाग असल्याशिवाय अमृतमहोत्सवाची सांगता झाली असे म्हणता येणार नाही. तसेच शाळेतील प्रत्येक मुलाने दादांच्या सत्कारासाठी आपला खारीचा वाटा उचललेला असल्यामुळे शिष्यगणांनी दादांचा सत्कार करणे सयुक्तिक वाटल्यामुळे मी काही वरच्या वर्गातील मुलांशी बोललो. त्यांचा आनंद त्यांनाच उत्साहित करत होता. त्यांना मी सांगितले, “तुम्ही, दादांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांच्या सत्काराचं नियोजन व आयोजन करावयाचं आहे. तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहेच.” दादांच्या बाळांच्या हस्ते दादांचा सत्कार हा दादांच्या आयुष्यातील परमोच्च बिंदू होता. दिनांक ३ डिसेंबर १९८१ रोजी सकाळपासूनच दादांच्या सत्कारास सुरुवात झाली. त्या दिवशी शाळा पताका, तोरणे यांनी सुंदर सजवली होती. दादा शाळेत आल्यावर नऊवारी साड्या नेसलेल्या मुलींनी दादांना कुंकू लावून ओवाळले व त्यांचा आशीर्वाद घेतला. १९४० सालच्या काही माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी दादांना भेटण्यास शाळेत आल्यावर दादांना किती आनंद झाला म्हणून सांगू!
त्यानंतर शाळेतील शिक्षकवर्गाचा फोटो शाळेच्या प्रवेशद्वारात दादांसमवेत काढला. त्यानंतर दादा, काही मुले आणि शिक्षक शिवाजीपार्क मैदानात महानगरपालिकेने दिलेल्या जागेत आकर्षक व्यासपीठ उभारले होते तेथे जाण्यास निघाले.
पूर्वप्राथमिक विभागापासून १०वीच्या वर्गापर्यंतचे सर्व विद्यार्थी गणवेशात दादांच्या आगमनाची वाट पाहत होते. बालकांच्या मेळाव्यात जाताना मुले दादांच्या वाटेवर दोन्ही बाजूंनी काठ्या तिरप्या धरून मानवंदना देत होते. दादांच्या पुढे काही मुले लेझीम खेळत होती. दादा व्यासपीठावर गेल्यावर मुलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मुलांनी दादा व्यासपीठावर येताच त्यांच्यावर फुलांची उधळण केली. एक मोठा हार दादांना घालून त्यांच्याविषयी प्रेम व आदर व्यक्त केला. ह्या सत्कारमंचावर दादांबरोबर दादांचे काही विद्यार्थीच बसले होते. स्मिता डोळस, आशीष पेठे, इत्यादी मुलांनी दादांसंबंधी व शाळेसंबंधी भाषणे करून, “दादा, तुम्ही आता शतायू व्हा!” अशा घोषणा देऊन शिवाजीपार्कचे वातावरण दुमदुमून टाकले. काही पालकांनीही दादांविषयी आपली मनोगते व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दादांना काय बोलावे ते सुचेना. त्यांना गहिवरून आले. त्यांनी मुलांना समाजसेवेचा आणि राष्ट्रसेवेचा संदेश दिला. त्यानंतर मुलांना खाऊ वाटण्यात आला. दादा त्या दिवशी कृतार्थ झाले होते.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.