
आठवणीतील पाऊले
शिक्षकांशी हितगूज
माझी तयारी पूर्ण झाल्यावर मी एका महिन्याच्या अखेरच्या दिवशी, अर्ध्या दिवसाची शाळा सुटल्यानंतर मी सभा घ्यायचे ठरवले. मी शिक्षकांशी सुसंवादाच्या स्वरूपात बोललो. त्या सभेतील भाषणाचा गोषवारा मला येथे नमूद करावासा वाटतो.
मित्रहो,
तुमच्याशी हितगूज करण्यासाठी आज मी आपणा सर्वांना एकत्रित बोलावले आहे. माझे काही शिक्षणविचार आपणापुढे मांडून आपणास विचारप्रवृत्त आणि कार्यप्रवृत्त करावे या उद्देशाने आयोजित केलेली ही सभा आहे. मी आपले मनापासून स्वागत करतो.
आपण शिक्षकीपेशा मनापासून पत्करला आहे असे मी समजतो. शिक्षक होणे सोपे नाही. त्याला शिक्षणशास्त्र आणि अध्यापनकला अवगत असली पाहिजे. तसेच बालमानसशास्त्र आणि बालमन जाणून घेण्याची तीव्र इच्छा शिक्षकाच्या मनात निर्माण झालेली असली पाहिजे. सर्व पेशांमध्ये शिक्षकीपेशा पत्करणाऱ्या व्यक्तीची तात्त्विक बैठक लवकर तयार होते आणि तो अप्रत्यक्षपणे मुलांची मानसिक उन्नती साधतो.
शाळेत महत्त्वाचे स्थान मुलाला आणि अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान मुलांच्या संस्कृतिसंवर्धनाला, याची जाणीव ठेवूनच शिक्षक आपल्या कार्याची रूपरेषा आखतो आणि त्याचप्रमाणे कार्यवाही करतो आणि मुलांचा सर्वांगीण विकास साधतो. आज ‘शिकणे’ ह्या संकल्पनेला महत्त्व येत आहे. मुलांनी कोणकोणत्या प्रकारे स्वत: शिकावे याचे मार्गदर्शन आपण शिक्षकांनी मुलांना दिले पाहिजे.
आज समाजाला ‘धडपडणारा’ शिक्षक पाहिजे आहे. धडपडणारा शिक्षक म्हणजे उपक्रमशील शिक्षक होय.
नवनवीन उपक्रम बालविकासासाठी कार्यान्वित करणारा शिक्षक खऱ्या अर्थाने मुलांचे हित साधू शकेल. तो प्रयोगशील असावा. ‘शिक्षक’ ह्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘शिकवणारा आणि शिकणारा’ असा आहे. जो उत्तम विद्यार्थी असतो तो प्रभावीपणे, उत्तम रीतीने शिकवतो. तसेच जो उत्तम शिक्षक असतो तो उत्तम विद्यार्थी असतोच असतो. अध्यापनात साधन आणि साध्य याचा खरा अर्थ जेव्हा शिक्षकाला कळेल, तेव्हाच त्याला खरे समाधान मिळेल.
शिक्षकाने काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. स्वत:वर काही बंधने घालून घेणे जरुरीचे आहे.
या बाबतीत शिक्षक दक्ष असला तर तो आनंदमय वातावरणात मुलांचे शैक्षणिक जीवन सुखाचे आणि प्रगतीचे करू शकेल. या सर्व गोष्टी साधण्याकरता विद्यार्थी आणि शिक्षक यांची एकमेकांवर निष्ठा वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी एकमेकांनी एकमेकांना पूर्णपणे ओळखले पाहिजे. तरच त्याला खरे समाधान लाभेल. म्हणूनच काही मुद्दे मी आपणापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
१. विद्यार्थी हा अनुकरणप्रिय असतो. याकरता शिक्षकाचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व, बोलणे, चालणे, बारीकसारीक हालचाली, कृती यांना एक निश्चिती असली पाहिजे व सदोदित मुलांना आनंद मिळेल अशी शिक्षकाची चर्या व मातृत्वाची वृत्ती असली पाहिजे. यातूनच मूल चारित्र्यवान बनेल व कर्तृत्ववान होईल यावर निष्ठा ठेवा.
२. याकरता शिक्षकाने वेळेवर शाळेत येणे, वर्गात जाणे, स्वत:ची कामे स्वत: करणे, विद्यार्थ्यांवर कोणती कामे सोपवावयाची हे ठरवणे, ती पूर्ण करण्याची त्यांना सवय लावणे, स्वत:चे साहित्य व विद्यार्थ्यांचे साहित्य कोठे असावे हे निश्चित करणे, मिनिटामिनिटाचा सदुपयोग करणे, तोही मुलांची गरज ओळखून स्वत:चे साध्य साधणे, याबद्दल शिक्षकाने अत्यंत दक्ष राहण्याची खबरदारी घेणे ही शिक्षकाच्या यशाची पहिली पायरी आहे.
३. शाळा सोमवार ते शनिवार असते. या दिवसांत लहान-मोठ्या सुट्ट्या मिळून शिक्षकांसाठी रोज ५० मिनिटे पूर्ण विश्रांतीसाठी असतात. बाकीचा वेळ अध्यापन, अध्ययन, अध्यापनाची पूर्वतयारी, मुलांचे लेखन तपासणे, चर्चा, निकटच्या वरिष्ठांशी संपर्क, वाचन, मुलांचे रेकॉर्डलेखन, शाळेच्या वातावरणास पूरक ठरेल अशी कार्यवाही, आपल्या ताब्यातील सामानाचा व्यवस्थितपणा व ते योग्य ठिकाणी असणे, हाताशी मिळणे, सेवक व्यक्तीची जरूर तेथे व जरूर तेव्हा मदत घेणे, शालेय वातावरण निरोगी ठेवण्यास मदत करणे यासाठी आहे महिना अखेरचा अर्धा दिवस, महिनाअखेर पूर्ण करावयाच्या कामासाठी आहे. वर्गशिक्षक नसलेल्या शिक्षकांनी शाळेत ५ वाजेपर्यंत उपस्थित राहून आपली कामे पूर्ण करण्याकरता व वरिष्ठांनी सोपवलेली कामे करण्यासाठी ह्या वेळेचा उपयोग शिक्षकाने करावा.
४. शिक्षकांनी शाळेत आल्यावर प्रथम हजेरीपत्रकावर सही करावी. आवश्यक ते साहित्य घेऊन वर्गात जावे व मुलांचे स्वागत करावे. वर्गात गेल्यावर अल्पावधीत वर्गाची रचनात्मक व्यवस्था, स्वच्छता यांचे ओझरते निरीक्षण करून शालेय कामास प्रसन्नतेने सुरुवात करावी.
५. प्रार्थना : वर्गामध्ये प्रार्थना निष्ठेने व्हावी. प्रार्थनेला नेहमी सर्व मुले उपस्थित राहतील अशी त्यांना सवय लावावी. राष्ट्रगीत म्हणताना योग्य शिष्टाचार पाळला जाईल अशी दक्षता घ्यावी. प्रार्थनेनंतर दिलेल्या सर्वसाधारण सूचनांकडे मुलांचे लक्ष वेधावे. त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून मुलांना एकाग्र होण्याची सवय दृढ होईल अशा रीतीने शाळेच्या कामाला उत्साहपूर्वक सुरुवात व्हावी. वर्गशिक्षक अनुपस्थित असल्यास परिपाठाच्या उपक्रमाने त्या वर्गावर जाणाऱ्या शिक्षकाने वर्गशिक्षकाइतक्याच जबाबदारीने वरील गोष्टी साधाव्यात.
६. पहिल्या तासाच्या आरंभी एक मिनिटातच मुलांची हजेरी घेण्यात यावी. यावेळी फक्त गैरहजर मुलांचीच नोंद व्हावी आणि बाकीच्या नोंदी मोठ्या सुट्टीच्या पूर्वी पूर्ण कराव्यात. एखादे मूल हजेरी लावल्यानंतर शाळेत आल्यास त्याची मॉनिटरकडून दखल घ्यावी. गैरहजर मुलांच्या चिठ्या घेणे व त्याबद्दल त्यांच्याशी बोलणे यात विषयाच्या तासातील वेळ खर्च करू नये. गैरहजर मुलांच्या पालकांच्या चिठ्यांची स्वतंत्र फाईल असावी व ती वेळोवेळी वरिष्ठांच्या निदर्शनास आणावी.
७. मुलांसमोरील फळ्यावर नेहमी एक सुभाषित अगर एक नैतिक वाक्य लिहिलेले असावे. त्याच्या अनुषंगाने मुलांच्या मनावर सुसंस्कार होईल, अप्रत्यक्षपणे नैतिक मूल्य मनावर बिंबेल अशी चर्चा व्हावी. त्यायोगे शिक्षणाचे महत्त्वाचे अंग जे चारित्र्यसंवर्धन त्याला योग्य आकार मिळेल.
८. वर्गातील वार्ताफलकावर माहिती लिहिताना कोणत्याही प्रकारचे संघर्ष, मतभेद यासंबंधीचे विषय टाळावेत.
१०. हजेरीपत्रक, गुणपत्रक, प्रगतिपुस्तक, इत्यादींमधील नोंदी शिक्षकांनी स्वत: आपल्या हातानेच कराव्या.
११. खडू, डस्टर, नकाशा, ग्लोब, इत्यादी शिक्षणसाहित्य नेण्याआणण्याचे काम स्वत: शिक्षकांनी करावे. आवश्यक तेव्हा शिपायाची मदत घ्यावी.
१२. एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे आणि वर्तणुकीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे वाटल्यास त्याबाबतीत पर्यवेक्षक, मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करावी व त्यांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील अडथळा हळुवारपणे दूर करण्याची शक्य ती दक्षता घ्यावी.
१३. प्रत्येक तासाच्या आरंभी त्या तासाला लागणारे साहित्य मुलांनी काढून ठेवलेले असावे. एखाद्या शिक्षकाला काही कारणामुळे वर्गात जायला उशीर झाल्यास मुले पूर्वी झालेल्या पाठातील स्वाध्यायात गुंतलेली असतील अशी त्यांच्या अंगी सवय लावावी.
१४. मूल कोणत्याही वर्गातील असो, त्याची कृती, वर्तन शिस्तबाह्य आढळल्यास (शाळेत, शाळेच्या आवारात, वाटेत- कोणत्याही ठिकाणी) त्याला त्याच क्षणी दृष्टिक्षेपाने किंवा गोड शब्दांनी जाणीव देणे हे शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आपले कर्तव्य समजावे. मुलाच्या चुकीची, दुर्वर्तनाची चर्चा शक्यतो टाळावी. विद्यार्थ्याकडून घडलेली एखादी चूक त्याच्या नजरेस आणून दिल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्याची चूक विसरून जावी. त्याचा पुन: पुन: उच्चार अगर चर्चा करत राहू नये.
१५. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चित्रकला, हस्तकला, नाट्यकला, नृत्य, गायन, खेळ, प्रदर्शने, वक्तृत्व, पाठांतर, इत्यादींच्या स्पर्धांत आपल्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना भाग घेण्यास उत्तेजन द्यावे व त्यात विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे, प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करावी. (स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या मुलांच्या नोंदीची एक स्वतंत्र वही असावी.)
१६. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी वर्गातील फळ्यावर त्याचे नाव लिहावे व वर्गासमोर त्याच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त कराव्यात.
१७. शिक्षक पाठ देतो त्यावेळी तो काही काळ शिक्षक असतो व काही काळ तो विद्यार्थ्यांचा शिष्य होतो. या सर्व अवस्थांतून गेल्यावर अध्यापनाचे मूल्यमापन होण्याकरता, अध्यापनातील विषयाला धरून घेतलेल्या कसोट्यांमध्येच आपल्या अध्यापनाचे त्याला प्रतिबिंब दिसते. या परीक्षांतून विषयज्ञान, मूल्यमापन, बुद्धिमापन या साऱ्या गोष्टींनी शिक्षकाला व विद्यार्थ्याला आपापले दर्शन घडते आणि म्हणून या गोष्टींचा आस्थापूर्वक विचार करणे अत्यावश्यक आहे.
१८. विषयातील काही ठरावीक धडे, टप्पे, एखादे प्रकरण पुरे होत जाईल, तसतसे मुलांना स्वत:चे आत्मपरीक्षण करण्याकरता व झालेल्या भागाचे दृढीकरण होण्याकरता गृहपाठ म्हणून त्या त्या भागावर नियमित व्यवसाय दिले पाहिजेत. या व्यवसायांच्या साहाय्याने मूल, वर्गात जे सामुदायिकरीत्या शिकते, त्यावेळी राहिलेल्या काही अस्पष्ट कल्पना ते मूल या स्वाध्यायांयोगे स्वतंत्र बुद्धीने व स्वावलंबनाने साध्य करते.
१९. अभ्यासक्रमात शिक्षकाच्या दृष्टीने काही कमी असले तरी शिक्षक ही स्वत: फार मोठी शक्ती आहे. तो अभ्यासक्रमही आहे आणि तो पुस्तकही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून शिक्षकाने पुढे चालले पाहिजे. त्यासाठी-
१. अध्यापनाची पूर्वतयारी; २. पाठातील पायऱ्या व क्रम याची निश्चिती, ३. साहित्याचा अवश्य वापर; ४. विद्यार्थ्यांनी मिळवण्याच्या ज्ञानाची बिनचूक कल्पना; ५. मागील ज्ञानाची नवीन ज्ञानाशी जोड देण्यासाठी जरूर ते आवृत्ती प्रश्न; ६. अभ्यासपुस्तकाचा उपयोग करण्याची सवय; ७. उत्तम हस्तक्षरात नमुनेदार उत्तरे लिहिण्याची कला साध्य होण्यासाठी द्यावयाची दृष्टी; ८. दृढीकरणासाठी मुलांना
द्यावयाचे तोंडी व लेखी स्वाध्याय आणि ९. कसोट्यांचे आधुनिक तंत्र, या सर्व गोष्टी शिक्षकाच्या अंगवळणी पडल्या पाहिजेत.
२०. बारीकसारीक बाबतीत आपल्या मुलांचे गुन्हे वरिष्ठांपुढे सारखे नेत जाऊ नये. आपल्या व्यक्तिमत्त्वाने, सहृदयतेने अशा मुलांना अपराधाची जाणीव द्यावी.
२१. वर्गातील एखादा मुलगा विशेष आजारी असल्याचे कळल्यास त्याची जातीनिशी चौकशी करावी.
२२. नुकत्याच आजारातून उठलेल्या मुलाला शाळेतील कोणत्याही कामाने ताण पडू नये याकडे लक्ष ठेवावे. विशेषत: शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत त्याला काही दिवस सवलत द्यावी. मुलींना काही वेळा शारीरिक शिक्षणाची सूट मिळणे आवश्यक असते. याबाबतीत विशेषतः स्त्री शिक्षकांनी त्यांच्याकडे आपुलकीने लक्ष घालावे.
२३. शिक्षकाने कोणत्याही कारणाने मुलांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा बिलकूल करू नये. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनाला लागेल असे बोलू नये. त्याची चूक अवश्य दाखवावी; पण त्याच्या स्वाभिमानाला बिलकूल धक्का न लागेल याबद्दल दक्ष असावे.
२४. शाळेच्या वाचनालयात शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त विविध प्रकारची पुस्तके आहेत. शिक्षकांनी ग्रंथालयाचे खरेखरे दर्शन घेत जावे. स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करण्याकरता व मनाच्या विरंगुळ्याकरता शिक्षकाच्या पेशाला आवश्यक असा बहुश्रुतपणा येण्यासाठी पुस्तकांचे वाचन सातत्याने करावे.
२५. आजचा विद्यार्थी जगाच्या बदलत्या कालाप्रमाणे सर्व त-हेने ज्ञानाने पूर्वीपेक्षा सशक्त वाटेल. इतकेच नव्हे, तर हे काय?’ ‘ते काय?’ असे प्रश्न वडील माणसे, गुरू यांना विचारण्याइतका तो निर्भय बनत चालला आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊनच सध्या शिक्षणाची वाटचाल चालू आहे, हे शिक्षकांनी लक्षात ठेवावे.
शिक्षणाचे जग व व्यवसायाचे जग यांमधील पूर्वी निर्माण झालेली दरी यापुढे दिसणार नाही. नवे वैज्ञानिक शोध व उत्पादानाचे आधुनिक तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने एकदा का शिक्षणाने मूळ धरले, की शिक्षणातील विफलतेची भावना कायमची दूर होईल.
आपल्या शाळेने या सर्व गोष्टी विचारात घेऊनच बदलत्या अभ्यासक्रमात पूरकता साधली आहे.
शाळेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, दिनविशेष, बालमेळावे व शालेय वातावरण यांद्वारे आधुनिक शैक्षणिक मूल्ये साधून अभ्यासक्रमास पूर्तता आणण्यास तुम्ही शिक्षक जे तळमळीने कार्य करत आहात त्यामुळेच खरे शिक्षण मुलांस मिळत आहे असा आत्मविश्वास बाळगण्यास हरकत नाही.
पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, अधीक्षक हेच निव्वळ शाळेचे चालक नसून ते शिक्षकांना सर्वस्वी मदत करणारे आहेत. शाळा शिक्षकच चालवतो. शिक्षक हा खरा अधिकारी आहे. म्हणून शिक्षकांनी आत्मविश्वासाने स्वत:चा अधिकार जाणून तो गाजवावा अशी प्रत्येक शिक्षकाला माझी विनंती आहे.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.