आठवणीतील पाऊले
विकासाच्या संधी
त्यानंतर जवळच असलेल्या दादर हिंदू जिमखान्याच्या क्रिकेटच्या पीचकडे माझे लक्ष वळले. प्रथम नेट पॅक्टिस लांबून अगर नेटच्या मागे उभा राहून पाहत असे. मी एकदा धीर करून जिमखान्याच्या सेक्रेटरींना विचारले, की मला जिमखान्याचा मेंबर व्हायचे आहे. ते म्हणाले, “अवश्य; पण तुमची टेस्ट घ्यावी लागेल.” मी ‘चालेल’ असे म्हणालो. दुसऱ्या दिवशी नेटमध्ये मला पंचवीस बॉल्स टाकले गेले. मला चांगले खेळता आले. नंतर बोलिंगचीही माझी टेस्ट झाली. त्यातही मला निवडले गेले. त्या सेक्रेटरीने माझी निवड झाल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवसापासून संध्याकाळी मी नेट प्रॅक्टिसला सुरुवात केली.
हळूहळू जिमखान्याने मला प्रथम ‘बी’ टीममध्ये व नंतर ‘ए’ टीममध्ये मॅचसाठी घेतले. नेट पॅक्टिसमध्ये मी एम.एस.पाटील, अंकुश वैद्य, सुभाष गुप्ते, विजय मांजरेकर, चंदू कोरगावकर यांसारख्या उत्तमोत्तम खेळाडूंचे बॉल्स खेळलो आहे.
मला आठवते, एका मॅचमध्ये मला ओपनिंग बॉलर म्हणून गोलंदाजी करायला आमच्या कॅप्टनने सांगितले. मी उत्तम बोलिंग करायची या ईर्ष्येने बोलिंग टाकायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे मी ३७ धावांत ७ विकेट्स घेतल्या. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. त्या दिवसापासून क्रिकेटचा खेळाडू म्हणून माझे नाव शिवाजीपार्कमध्ये पसरले. माझ्याकडे बॅट नव्हती. चंदू कोरगावकरच्या हे लक्षात आले. त्याने दुसऱ्याच दिवशी त्याच्या मित्राकडून ‘नॉन् जर’ बॅट मला आणून दिली आणि सांगितले, की ह्या बॅटची किंमत ७० रुपये आहे मनातून मी हबकलो; परंतु ती बॅट घेऊन मी घरी आलो. दादा रात्री ८ वाजता जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांना ती बॅट दाखविली व म्हटले, “दादा, मला ‘ए’ टीममधून क्रिकेट खेळायला घेतलं आहे. मी स्वतःच्या बॅटनं खेळावं म्हणून माझ्या मित्रा ने ही बॅट दिली आहे. ही बघा किती चांगली आहे ती.” थोडा वेळ दादा काहीच बोलले नाहीत. ते माझे म्हणणे शांतपणे ऐकत होते. ते म्हणाले, “एवढी महाग बॅट विकत घेण्याची आपली ऐपत नाही रे बापू.” मी हिरमुसला झालो. गला वाईट वाटले. मी काही बोललो नाही. त्यानंतर मी जेवलो व तसाच झोपी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना दादांनी मला संध्याकाळी ऑफिसमध्ये बोलाविले. मी घाबरतघाबरत त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी मला जवळ घेतले व ते म्हणाले, “तुला वाईट वाटलं का? तुझी इच्छा मी पुरी करायचं ठरवलं आहे.” दादांनी माझ्याकडे ७० रुपये पाकिटात घालून दिले आणि सांगितले, की हे बॅटचे पैसे तुझ्या मित्राकडे दे. माझ्या डोळ्यात पाणी आले, दादांनी माझ्यासाठी हे पैसे कसे आणले असतील? मी विचार करत होतो.तितक्यात ते म्हणाले, “बापू, तू नशीबवान आहेस. कालच मला गणिताच्या पुस्तकाचे पैसे आले आहेत. त्यातलेच पैसे तुला मी देत आहे.” मी दादांना बिलगलो आणि न बोलताच त्यांचे मनात आभार मानले. खरोखरच, दादांनी माझी हौस भागविण्यासाठी बॅटकरता पैसे देऊन जे मला उत्तेजन दिले होते, ते माझ्या हृदयात अजूनही आहे.
ते १९५० साल होते. नॅशनल स्काऊट ऑर्गनायझिंग कमिशनरच्या पदावर असलेले श्री. डी.पी. जोशी शाळेत दादांना भेटायला मधूनमधून येत असत. ते १ एप्रिलच्या सुमारास शाळेत आले आणि दादांना म्हणाले की, मी बदलापूरला शिक्षकांसाठी स्काऊट शिक्षणाचा आठ दिवसांचा कॅम्प ६ मे पासून घेतो आहे. मला वाटते त्या कॅम्पला बापूने यावे आणि शिक्षण घ्यावे. दादा लगेच तयार झाले, त्यांना स्काउटिंगच्या शिक्षणाचे फार आकर्षण होते. त्यांनी ही गोष्ट माझ्या कानावर घातली. माझ्याबरोबर शाळेतल्या दोन शिक्षिकांनाही दादा पाठवायला तयार झाले. श्रीमती इंदुताई मराठे आणि श्रीमती ताराबाई देसाई ह्या कॅम्पला बायला तयार झाल्या. मी त्यावेळी १९ वर्षांचा होतो. मलाही एका निराळ्या वातावरणात आठ दिवस जायला मिळणार म्हणून मी अगदी खूश होतो.
६ मे रोजी आम्ही तिथे रेल्वेने बदलापूरला गेलो. कॅम्पसाइट पायी जाण्याइतकी जवळ होती. स्काऊटचे शिक्षण घेण्यासाठी इतर शाळांतील सुमारे १५ जण आले होते. आम्हाला डी.पी.नी एकत्र केले आणि सांगितले, की तुम्हाला तंबूत राहायचे आहे. तंबू तुम्ही बांधायचे आहेत, प्रत्येक तंबूमध्ये चार व्यक्ती राहतील. इतके सांगून त्यांनी आम्हाला अर्धवर्तुळाकार उभे करून स्काउटचे निशाण फडकावले. स्काउटिंगचे गीत श्रीमती निर्मला ओझा व श्री. जेकब ह्यांनी सांगितले आणि आम्ही त्यांच्या पाठीमागून ते गीत म्हटले. झेंडावंदनाचा हा दररोजचा कार्यक्रम असल्यामुळे ते गीत माझे आपोआप पाठ झाले.
आम्ही, ह्या आठ दिवसांच्या कॅम्पमध्ये पुष्कळ नवीन गोष्टी शिकलो. डी.पी.सोबत आलेल्या मदतनीसांनी आम्हाला तंबू कसे उभारायचे, मोठ्या खिळ्यांनी दोरखंड ताणून घेऊन, खिळे जमिनीत हातोडीने कसे घालायचे, हे काम त्यांनी आमच्याकडून करवून घेतले. तसेच तंबूभोवती एक फूट रुंदीचा सलग एक लांबलचक खड्डाही आमच्याकडून खोदून घेतला.
त्यानंतर डी.पी.नी पुन्हा आम्हाला एकत्र बोलावले. कॅम्पचे नियम सांगितले. आम्ही काय शिकणार आहोत यासंबंधीही सांगितले. तसेच, कॅम्पसाइटच्या बाजूने जी नदी वाहते त्या नदीचे पाणी कळशीने आणायला सांगितले. तुम्ही प्रत्येकाने कामे वाटून घ्या म्हणत, शिटीचे प्रकारही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रथमोपचारासंबंधी माहिती देण्यास सुरुवात केली. बोलता बोलता डी.पी. धाडकन जमिनीवर पाठच्या पाठी एकदम पडले. आम्ही काहीजण लगेच त्यांच्याजवळ गेलो. तोच ते पटकन उडी मारून उभे राहिले आणि त्यांनी सांगितले, की असे जर कोणाला झाले तर काय करायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आमच्यामध्ये हशा पिकला. डी.पी.नी गंभीरपणे प्रथमोपचार म्हणजे काय, कोणती औषधे त्या पेटीत असणे आवश्यक आहेत, बॅण्डेज कसे बांधायचे, इत्यादीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
खरोखरच, आम्ही काहीतरी नवीन शिकतो आहोत असे आम्हाला वाटले. सकाळी खाली उतरून नदीवर जायचे आणि पाणी आणायचे हा नित्यक्रम चालू झाला. या कालावधीत आम्ही आमचे जेवण आम्हीच बनवायचे असे सांगितले होते. आम्हाला दररोज तीन ते चार तास जेवण बनवण्यासाठी जात असत. आम्ही केलेल्या जेवणाची चव काही निराळीच असायची. हे स्वावलंबनाचे धडे आम्ही कॅम्पमध्ये घेतले.
डी.पी.नी आणखी एक गोष्ट सांगितली. या आठ दिवसांत दररोज सकाळी ९ ते ११ या वेळात प्रत्येकाने पोहायला जायचे आणि पोहायला शिकायचे. मी पूर्वी पाण्यात उतरलो नव्हतो. मला पाण्याची भीती वाटायची. पाण्यात खाली गेलो तर वर येईन का? पण नियमाप्रमाणे मी दररोज पोहायला जात असे. आम्हाला प्रत्येकाला पोहताना हात आणि पाय कसे मारायचे हे शिकवत शिकवत आम्हाला पोहायला शिकवले. डी.पी. स्वत: आपला वेळ देत असत. चार दिवसांनी मला तरंगण्यास यायला लागले. हळूहळू तरंगत पुढे जाता येऊ लागले. मला खूप आनंद झाला. ‘पोहण्याची कला’ ह्या स्काउट कॅम्पमुळेच शिकलो.
एक दिवस, रात्री ११ वाजता आपण आजुबाजूच्या परिसरात टेकडीवर जायचे आहे असा डी.पी.चा हुकूम आला. त्यांनी आम्हाला एकत्र बोलावून बॅटरी सोबत घेण्यास सांगितले. बरोबर लाठी घेण्यास विसरायचे नाही असेही बजावले. कमरेला चाकू आणि जाड दोरी लावून निघायचे आहे. मागाच्या खुणा लक्षात ठेवायच्या. त्याचा उपयोग टेकडी चढता-उतरताना, जंगलातून जाताना होईल असे त्यांनी सांगितले. आम्ही रात्रौ ११ वाजता लाँगमार्चला गटागटाने चालू लागलो. ती रात्र अमावास्येची असल्यामुळे एकदम काळोखी होती. आम्ही धडपडत जंगलातून टेकडी चढून जात होतो. एकमेकांना सांभाळत जात होतो. मी एका लहानशा खड्डयातही एकदा पडलो. दोनदा टेकडी उतरताना घसरलोदेखील. सकाळी ५ वाजता आम्ही परत कॅम्पवर आलो. जरा विश्रांती घेतली. चांगलेच दमलो होतो. आमच्या बरोबर डी.पी. आणि त्यांचे सहकारीही होते. नंतर आम्ही आमच्या तंबूकडे गेलो आणि पाहातो तो काय! आमच्या तंबूतल्या काही वस्तूंची चोरी झाली होती. आम्ही लगेच डी.पी.च्या तंबूकडे गेलो. त्यांनी सांगितले, की घाबरायचे काही कारण नाही. अशा वेळी आपण टेहळणी करत स्काउटच्या पद्धतीने २० पावले चालतं आणि २० पावले धावत वेगाने जायचे आहे. आम्ही सांगितले, की चोरांना आपण नक्की शोधून काढूया. डी.पी.नी आम्हाला विचारले, की चोर कोणत्या दिशेला गेले असतील? आम्ही विचार करीत सांगितले, की बहुधा बदलापूर स्टेशनच्या बाजूला गेले असावेत. असे म्हटल्यावर आम्ही गटागटाने चोरांचा पाठलाग सुरू केला. आम्ही स्टेशनवर गेलो तर आम्हाला कोणीही दिसले नाही. आम्ही निराश झालो; पण आशा सोडली नाही. आही पोलिस स्टेशनवर तक्रार नोंदविली व साइटवर परत आलो. डी.पी. म्हणाले चोर बहुधा रेल्वेने पसार झाले असतील. आपण सर्वांनी खूप प्रयत्न केले याचेच आपण समाधान मानूया. काही वस्तू गेल्या तर जाऊद्या. असा हा चोरांचा पाठलाग आमच्या चांगला लक्षात राहिला आहे.
शेवटच्या दिवशी डी.पी.नी आम्हाला कोर्स पूर्ण केल्याबद्दल स्काऊटचा बॅच व प्रमाणपत्र देऊन आमचे कौतुक केले. त्यानंतर आम्ही सर्व घरी परतलो.
हा आठ दिवसांचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला हे मात्र निश्चित. त्यानंतर १९५७ साली माझी स्काऊटमास्टरचे ट्रेनिंग करून आल्यावर ‘बालमोहन स्काउटग्रूपचे’ स्काऊटमास्टर म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यानंतर १९७१ साली असिस्टण्ट स्काऊटकमिशनर (मध्य मुंबई विभाग) म्हणून मला मान मिळाला. बालवीर शिक्षण ही माणूस घडविणारी संस्कारक्षम चळवळ आहे असे मला वाटते.
दादांनी १९५०च्या दरम्यान आपल्या खोलीत बोलावून मला सांगितले, की शाळेत २० हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे, ते मला तू व्यवस्थित लावून दे. मी कबूल केले. शाळेत नव्याने आलेले श्री. जगन्नाथ परब यांच्या मदतीने ग्रंथालय लावून दिले. ग्रंथालयातील सर्व पुस्तके प्रथम विभागवार, विषयवार व भाषावार निरनिराळी काढली. त्यांना क्रमांक दिले व ती पुस्तके जनरल रजिस्टरमध्ये नोंदवून, सबंध ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित निरनिराळ्या कपाटांत लावली. ही पुस्तके लावताना मी मधूनमधून मला आवडतील ती पुस्तके वाचत असे. ललित पुस्तकांत मी खूप रमत असे. या ग्रंथालयात ग्रंथांच्या सानिध्यात मी जवळजवळ सहा महिने काढले. त्यामुळे ग्रंथालयात कोणती पुस्तके आहेत, आणखी कोणती नवीन पुस्तके हवी आहेत ते मला कळले. नवीन पुस्तकांची यादी आणि ग्रंथसूचीच्या मोठ्या वह्या दादांना मी दिल्या. त्या वेळी दादांनी माझी पाठ तर थोपटलीच; शिवाय त्यांनी मला काही दिवसांनी तीन ललित वाङमयाची पुस्तके,एक मराठी शब्दकोश आणि एक इंग्रजी शब्दकोश अशी पाच पुस्तके शाबासकी म्हणून दिली. मी ज्ञानसमृद्ध व अनुभवसमृद्ध होण्यास ग्रंथालयाची मला मदत झाली आहे.
तसेच ग्रंथपालाचे कार्य काय असले पाहिजे, त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांची मदत घेणे व त्यांना मदत करणे ह्या गोष्टीचे टिपणही मी तयार केले होते. ग्रंथपालाचे सर्वांशी वागणे असे असायला हवे, की विद्यार्थी आणि शिक्षक ग्रंथालयाकडे आपोआप आकर्षिले गेले पाहिजेत. त्यांना हवे ते पुस्तक लगेच देता आले की पुस्तक मागणारा समाधानी होतो आणि ग्रंथालयाकडे वारंवार जाण्याची संधी शोधत राहतो. तसेच पुस्तके कशी वापरावीत, त्यांचे महत्त्व, त्यांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग, इत्यादींसंबंधीचे सुविचार वाचनालयात लावण्याची कल्पना हळूहळू प्रत्यक्षात आली. आज सुमारे ७५ हजार पुस्तके ग्रंथालयात आहेत, याचा मला अभिमान वाटतो.
शाळेचे ग्रंथालय लावता लावता ग्रंथपाल आणि ग्रंथालय यांच्यासंबंधी सुचलेले विचार ‘ब्रिटिश कौन्सिल’च्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिसंवादात Norms of an Efficient School Library Service या विषयावर बोलताना १९६५ साली मला उपयोगी पडले आहेत.
ते १९५१ साल असावे. दादांना एक दिवस मी सहज विचारले, “दादा, रजेवर असलेल्या शिक्षकांच्या वर्गावर मी जाऊ का? मला आवडेल.” दादा हणाले, “तू पूर्वतयारी चांगली केली पाहिजेस.” मी म्हटले, “दादा, मी नुकतेच शाळेचं ग्रंथालय लावलं आहे. त्यामुळे मुलांना वाचून दाखवण्यासारखी कोणती पुस्तक आहेत ते मला माहीत आहे.” दादांनी वर्गावर जाण्याची परवानगी दिल्यामुळे जी खूश झालो.
मी ना.सी. फडके यांचे ‘लघुकथा- तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक घेतले. त्यातील गंगाधर गाडगीळांची ‘किडलेली माणसं’ ही लघुकथा मी निवडली आणि वर्गावर एक दिवस जाण्याचे धाडस केले. तो माझ्या शिक्षकी जीवनातील मुलांसमोर उभे राहण्याचा पहिला प्रसंग होता.
एकदा प्रकाश मोहाडीकरांनी ठरवले की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना शिवाजीपार्कमध्ये आणायचे. त्यांनी १४ नोव्हेंबर १९५४चा दिवस ठरवला व नेहरूंचे दर्शन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असलेल्या छोट्या मुलांना घडवायचे ठरविले. संगीतदिग्दर्शक वसंत देसाई ह्यांच्या सहकार्याने प्रकाशभाई शाळाशाळांत गेले व मुलांना ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत एका सुरात, एका तालात म्हणण्याचा सराव दिला. ह्या तालमी दोन महिने चालल्या होत्या.
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लाखो कंठांतून बाहेर पडणारे एका सुरातले आणि एका तालातले राष्ट्रगीत ऐकवावे हा सदर बालक मेळाव्याचा एक महत्त्वाचा उद्देश होता. या मेळाव्यासंबंधीच्या पूर्वयोजना करण्यासाठी ‘बालमोहन विद्यामंदिर’ हे प्रकाशभाईंनी केंद्रस्थानी ठेवले होते. कार्यकर्त्यांच्या सभा व चर्चा बालमोहनमध्येच होत असत. मी प्रकाशभाईंच्या बरोबर सतत असे. शाळाशाळांत तालमीला जाणे, त्यांच्या चर्चेत भाग घेणे, काही नवीन कल्पना सुचवणे, इत्यादींमध्ये मी सहभागी होत असे.
ह्या कार्यक्रमाला पंडितजी आले. त्यांचे स्वागत करायला दादांचीच मुले निश्चित केली होती. एका बाजूला बालमोहनची मुले व दुसऱ्या बाजूला दादांच्या ‘रिफॉर्मेटरी स्कूल’मधील, बालगुन्हेगार समजून सुधारगृहात टाकलेली मुले. दादांना या योगायोगाचा अतिशय आनंद व अभिमान वाटला. जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणानंतर व मुलांच्या राष्ट्रगीतानंतर एकटेच धावतधावत मुलांमध्ये शिरले. ते धावत जात असताना एका मुलीने त्यांना पुष्पहार दिला. तो त्यांनी हातात घेतला व सर्व मुलांमध्ये फिरून परत येताना तोच पुष्पहार त्याच मुलीला दिला, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. हा आनंदसोहळा म्हणजे मुलाच्या जीवनातील उच्च आनंदाचा क्षण होता.
अशा प्रकारचे पाचसहा बालकमेळावे शिवाजीपार्कवर आम्ही भरवले होते. या मेळाव्यांत विविध समरगीते आणि सांघिक गीते एका सुरात आणि एका तालात मुले गात असत. ‘देश हमारा’, ‘जिंकू किंवा मरू’, ‘महाराष्ट्र गीत’, ‘शिवगौरव गीत’, ‘जय जवान, जय किसान’, इत्यादी अनेक गीते लाखलाख मुले गात असत. समूहाने गायल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार मुलांवर सहजपणे होत असे.
संगीतदिग्दर्शक श्री. वसंत देसाईंना ‘पद्मश्री’ हा किताब राष्ट्रपतींनी बहाल केल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिवाजीपार्कवरच एक मोठा बालकमेळावासुद्धा आम्ही आयोजित केला होता. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून बालकांवर पुष्पवृष्टी करण्याचीही योजना केली होती.
असे बालकमेळावे श्री. प्रकाशभाईंच्या बरोबर राहून आयोजित करताना मी खूप शिकलो. बालमोहनमधील सहा हजार विद्यार्थी तर विविध भाषांतील सांघिक व गीते ‘बालदिना’च्या दिवशी एका सुरात म्हणू लागले. याबाबतीत संगीत दिग्दर्शक सोमनाथ परब ह्यांचेही बालमोहन शाळेला नेहमीच साहाय्य मिळत असते.
१९५४ साली, शाळेची पूर्वीची जागा ९९९ वर्षांच्या कराराने देण्याचे आश्वासन म्युनिसिपल कमिशनरांकडून घेऊन दादा शाळेत आले आणि ही आनंदाची बातमी दादांनी सगळ्या शिक्षकांना सांगितली. पण या त्यांच्या आनंदाला दुखाची झालर होती. १९४६ साली कर्ज काढून, स्वकष्टाने उभारलेली, तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शाळेची इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधावी लागणार, त्यावेळी जुनी पत्र्याची बांधलेली बैठी शाळा तोडावी लागणार या कल्पने दादांना दुःख होत होते. कारण दादांचे त्या इमारतीवर प्रेम होते. खूप कष्ट घेऊन दादांनी ती उभारली होती. त्या जागेत नवनवीन संस्कारक्षम उपक्रम कार्यान्वित केल्यामुळे शाळा नावारूपाला आली होती. ती शाळा पाडावी लागणार ह्याचे त्यांना अतोनात दुःख होत होते. त्या शाळेच्या इमारतीची आठवण म्हणून विविध प्रकारचे फोटो होतेच; पण दादांच्या मनात आले, की त्या शाळेच्या इमारतीतील विविध दालने, विविध उपक्रम यांचा चलच्चित्रपट काढावा व तो संग्रही ठेवावा. ही आपली इच्छा दादांनी शाळेतील कलाकार शिक्षक श्री.व्यंकटेश सिन्नरकर यांच्या आणि माझ्या कानावर घातली. आम्ही दोघे मित्रच होतो. आम्ही दादांना सांगितले, की शाळेचा चलच्चित्रपट करण्याची जबाबदारी आम्ही दोघे घेतो. आम्ही दोनतीन दिवस विचार केला आणि ठरवले, की श्री. गुप्ते नावाचे एक पालक आहेत त्यांना भेटावे. आम्हाला असे कळले होते, की त्यांच्याकडे मुव्ही कॅमेरा आहे. आम्ही त्यांना भेटलो व ठरवले की शाळेतील विविध उपक्रमांची मुव्ही वर्षभर जसे उपक्रम होतील त्याप्रमाणे काढायची. मी सिन्नरकरांना सांगितले, की मी चलच्चित्रपटाचे हस्तलिखित (manuscript) लिहितो आणि तुम्ही मुव्हीसाठी दिग्दर्शन करा. ही मुव्ही पूर्ण झाल्यावर मी निवेदन तयार केले. ते वाचण्यासाठी निवेदक म्हणून योगायोगाने आम्हाला एक भरदार आवाजाचा अभिनेताही निवेदक म्हणून मिळाला. वर्षभराच्या विविध उपक्रमांचे टिपलेले प्रसंग कॅमेऱ्याच्या माध्यमातून दादांनी आणि मी पाहिले तेव्हा आम्हा दोघांना खूप आनंद झाला. त्यांमध्ये राष्ट्रीय उत्सव, सांस्कृतिक सण, बालदिन, मातृदिन, श्रावणशुक्रवारचे चणे वाटप, कैरीचे पन्हे व कलिंगड खाण्याचा मुलांचा सामुदायिक आनंद, मुलांना तिळाचे लाडू व ऊस मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा कार्यक्रम, काही सहलींचे प्रसंग, शिक्षक अध्यापनाचे पाठ घेताना, श्री.जोगळेकरसरांनी शिकविलेली हावभावयुक्त गाणी मुले म्हणताना, श्री.गो.आ.कुळकर्णी दोन हजार मुलांची सांघिक कवायत घेताना, चित्रकला-हस्तव्यवसाय मुलांना शिकवताना, मुलांच्या शर्यती चालू असताना, दादा मुलांशी बोलताना असे अनेक उपक्रम त्या फिल्ममध्ये टिपले होते. त्या फिल्ममध्ये मी नववीच्या वर्गावर भूगोलाचा पाठ घेतानाचेही दृश्य आहे. ती फिल्म अजून शाळेत जपून ठेवली आहे. जुन्या शाळेच्या आठवणींची जपणूक माझ्याकडून अशा प्रकारे झाली याचे मला समाधान आहे.
१९५९च्या डिसेंबरमध्ये दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी मला आमंत्रण आले होते. त्या वेळी मी शिक्षक होतो. अशा आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी मी प्रथमच जात होतो. प्रथम मी माझे मेहुणे, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. मनोहर वरेरकर ह्यांच्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परिषदेच्या ठिकाणी गेलो. तेथे विविध शैक्षणिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली होती. शाळेशी संबंधित विषयांच्या चर्चासत्रांना मी आवर्जून उपस्थित राहिलो. तेथे पुस्तकांचे एक मोठे प्रदर्शनही भरले होते. ते प्रदर्शन पाहताना त्या परिषदेला आलेले जुने शिक्षक व मला इंग्रजी सातवीमध्ये विज्ञान व गणित या विषयांत मार्गदर्शन करणारे डॉ. भा. के. सोहनी भेटले. आम्हा दोघांना एकमेकांना भेटताना अतिशय आनंद झाला. परिषद आणि शिक्षण यांवर आमची त्या वेळी थोडीफार चर्चाही झाली. सदर परिषदेला विविध देशांतील प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या देशांत शिक्षणव्यवस्था कशी आहे, एका वर्गातील मुलांची संख्या किती असते, शिकवण्याचे माध्यम आणि विशेष प्रकल्प यांविषयी आमचे बोलणे होत असे. तसेच निरनिराळ्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानेही ऐकायला मिळाली. परिषदेत खूप शिकायला मिळाले. इतर देशांतील शिक्षणासंबंधीही माहिती मिळाली.
परिषदेच्या कालावधीत आम्ही राष्ट्रपतीभवन पाहण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी मला राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील मोठा योग होता.
‘लेस्ली सोनी ट्रस्ट’तर्फे १९७४ ते १९७८ या काळात बालमोहनमधील नववीच्या विद्यार्थ्यांना नेतृत्व शिबिराची संधी मिळाली, ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. याबाबतीत लेस्ली सोनी ट्रस्टचे श्री. मिनू मसानी, श्री. अविनाश देशपांडे आणि श्री. प्रभाकर हळदणकर ह्यांनी मला नेतृत्व शिबिराच्या कोर्सचे संचालकपद सांभाळण्यासाठी विनंती केली. मीही चालून आलेली ती संधी आनंदाने स्वीकारली.
हे नेतृत्व शिबिर देवळाली येथील कॅम्पसाईटवर आयोजित करायचे होते. जुने रुबी हॉटलचे कॅम्पसाइटमध्ये रुपांतर करून ती जागा सर्व सोयींनी युक्त अशी केली होती. तेथील प्रमुख श्री. मिनू मसानीच्या भगिनी होत्या. ही कॅम्पसाइट मिलिटरीच्या आवारात असल्यामुळे तेथील शिस्त, स्वच्छता, राहण्या-जेवण्याची व्यवस्था उत्तम असायची. सदर ट्रस्टचा नियम असा होता की शाळेने देवळाली येथे मुलांना आणण्या-नेण्याची सोय करावी. बाकी सर्व खर्च देवळालीमधील ट्रस्टची संस्था करील.
मी शिबिराची तपशीलवार माहिती काढली आणि नेतृत्व शिबिरामध्ये कशा प्रकारचे शिक्षण असते, यासंबंधीचे मुंबईच्या लेस्ली सोनी ट्रस्टच्या कार्यालयात जागा माहिती मिळविली. काही संदर्भासाठी पुस्तकेही वाचावयास मिळाली.
मी नववीच्या मुलांची सभा घेऊन त्यातील तीस मुलांची निवड केली आणि सदर नेतृत्व शिबिरासंबंधी माहिती सांगितली. एस्.टी.ची. बस निश्चित केली आणि आम्ही देवळालीला सकाळी सुमारे अकरा वाजता पोहोचलो. तेथील प्रमुखांना भेटून तेथील आयोजनासंबंधी मुलांच्या राहण्या-जेवण्यासंबंधी माहिती विचारून ती मुलांना सांगितली. प्रत्येकाला स्वतंत्र कॉट होती. राहण्याच्या सुखसोयींनीयुक्त अशी निवासाची सोय होती. भोजनाचा लहान हॉलही पाहिला.
आठ दिवसांच्या कालावधीत मुलांना नेतृत्वाचे शिक्षण कशाप्रकारचे द्यावे याचे मी पूर्वनियोजन केले होते. ह्या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, लोकशाही, भारताची राज्यघटना, व्यक्तिमत्त्व विकास, पब्लिक स्पीकिंग, हे विषय शिकण्यासाठी होते. तसेच शिबिरातील दैनंदिन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जी प्रथम कृतिकार्यक्रम निश्चित केला.
त्याचा तपशील असा-
१. व्याख्यान सुरू होण्याची वेळ आणि संपण्याची वेळ यांची घंटा वाजवून सूचना देणे.
२. मुलांची उपस्थिती घेणे.
३. व्याख्यात्यांची ओळख करून देणे.
४. व्याख्यानांचा सारांशरूपाने अहवाल लिहिणे.
५. एखाद्या क्षेत्रसहलीला गेलो, तर त्याचा वृत्तांत लिहिणे. न्याहरी, भोजन ह्यांच्यासंबंधी मुलांना सूचना देणे.
६. शिबिराच्या कालावधीत झालेली व्याख्याने एकत्रित करून त्यांचे हस्तलिखित तयार करणे.
७. मनोरंजक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि निवेदन.
वरील कामांप्रमाणे प्रत्येक मुलाला स्वतंत्ररीत्या काम करण्याची संधी मिळेल अशा वेळापत्रकाची आखणी केली. मुले आठवडाभर गुंतून राहिली. तसेच आपण नेतृत्वाची जबाबदारी घेऊन काहीतरी करू शकतो यासंबंधी आत्मविश्वास आला. अशी चार वर्षे इयत्ता नववीच्या मुलांना नेतृत्वाचे प्रशिक्षण प्रात्यक्षिक स्वरूपात देण्याची संधी मला मिळाली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मिलिटरी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी एकदा ग्लायडिंगचा अनुभव मुलांना दिला. ग्लायडर हे दोन व्यक्तींचे छोटे विमान. त्याला इंजिन, वगैरे काहीही नसते. हवेचा दाब आणि प्रवाह यावर त्या विमानाने आकाशात सुलभतेने उडण्याचे कार्य होत असते. एकावेळी एकच मुलगा, सोबत असलेल्या व्यक्तीबरोबर बसत असे. ते ग्लायडर सुमारे पंधरा मिनिटांनी आपोआप खाली उतरत असे. हा मिळालेला अनुभव मुलांना आयुष्यभर स्मरणात राहील असाच होता.
लेस्ली सोनी ट्रस्टमुळे बालमोहनच्या मुलांना एका आगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेता आले याबद्दल सदर ट्रस्टचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले पाहिजेत.
© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.