loader image

आठवणीतील पाऊले

यशस्वी झालेले काही उपक्रम

१९६० च्या मानाने माझ्या मनात आले, की शाळेतील मुलांचे सामान्यज्ञान वाढले पाहिजे. ह्यासाठी पूर्वीच्या योजनेत फरक करून सामान्य-ज्ञानाच्या योजनेला पद्धतशीर स्वरूप दिले पाहिजे.

पूर्वी निरनिराळ्या प्रकारची माहिती दर्शनी फलकांवर मुलांना समजेल अशा भाषेत, सुंदर हस्ताक्षरात लिहिली जात असे. तसेच स्वप्रयत्नाने माहिती मुलांनी मिळवावी म्हणून काही प्रश्नही फळ्यावर लिहून ठेवले जात असत.

परंतु या प्रकारच्या पद्धतीने मुले माहिती मिळवून स्वत:च्या ज्ञानात भर घालतात का याचा पडताळा घेण्याची पद्धतशीर योजना आखण्याची आवश्यकता मला वाटली, म्हणून पूर्वीच्या योजनेत बदल करावा असे वाटले. सहामाही आणि वार्षिक परीक्षेत इयत्ता आठवी ते शालान्त परीक्षा वर्गापर्यंतच्या वर्गांसाठी सामान्यज्ञानाची एकच समान प्रश्नपत्रिका असावी असे मला वाटले आणि मी त्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे तयार केला :

१. सामान्यज्ञान’ हा जादा विषय म्हणून प्रगतिपत्रकात समाविष्ट केला जाईल.
२. परीक्षा ५० गुणांची असेल आणि ५० प्रश्न निश्चित उत्तराचे असतील.
३. कालावधी १ तासांचा असेल.
४. ह्या विषयासाठी अभ्यासक्रम’ असणार नाही.

सामान्यज्ञानाच्या परीक्षेची संकल्पना माझी असल्यामुळे त्याची प्रश्नपत्रिका अनेक वर्षे मी स्वत:च काढीत असे. त्या प्रश्नपत्रिकेत सुरुवातीला ५० निश्चित उत्तराचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारत होतो. मग हळूहळू २५ गुणांचे निश्चित उत्तराचे प्रश्न यासाठी पहिला विभाग आणि टीपा लिहिण्यासाठी २५ गुणांचा दुसरा विभाग असा बदल केला. त्या प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या विभागातील प्रश्न-प्रकारांमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. उदाहरणार्थ, पहिल्या विभागात जुळणी करा हा प्रश्न घातला. गीतांची नावे देऊन गीतकार विचारणे, वर्तमानपत्रांतील सदरे विचारून वृत्तपत्रांची नावे विचारणे, नाटके, कादंबरी, लघुकथा ह्यांचे मथळे देऊन लेखकांची नावे विचारणे, शोधक देऊन शोध कोणते ते विचारणे. देश देऊन राजधान्या विचारणे, प्राचीन कवी आणि विचार अभिव्यक्त करण्याचे त्यांचे माध्यम (अभंग, ओवी, श्लोक, आर्या, इत्यादी) ह्यांची जुळणी करायला सांगणे, वगैरे.

दुसऱ्या विभागातील टीपा लिहा ह्या प्रश्नात विचारलेले काही नमुन्यादाखल विषय – दैनंदिन जीवनातील विज्ञान, जाहिराताची महती, विजयादशमीचे सामाजिक महत्त्व, ध्वनिप्रदूषण, माझी समाजसेवा, मराठी भाषादिन, मला आवडलेला दूरदर्शनवरील एक कार्यक्रम, दुष्काळग्रस्तांसाठी ‘खरी कमाई निधी’ गोळा करताना, आजचे युग- संगणकयुग, ‘खेळ’ हा आमचा आनंद आहे आणि गरजही आहे.

ही सामान्यज्ञानाची प्रश्नपत्रिका प्रश्नांच्या उत्तरासह मी तयार करत होतो आणि शिक्षकांना तपासण्यासाठी देत होतो.
पुढे, १५ वर्षांनंतर मला वाटले, की आपण शिक्षकांना सांगावे की तुम्ही प्रत्येकाने पाच प्रश्न उत्तरांसह तयार करून माझ्याकडे द्या. शिक्षकांना खूप बरे वाटले. या योजनेमुळे सामान्यज्ञानाची प्रश्नपत्रिका काढण्यासाठी शिक्षक स्वतः आपले सामान्यज्ञान वाढवू लागले आणि त्याचा उपयोग मुलांच्या सामान्यज्ञानाचा संस्कार देण्यात हळूहळू होऊ लागला.

ह्या योजनेचा आणखी एक फायदा झाला. या निमित्ताने मुले स्वतंत्र वहीत फलकावरील मजकूर लिहून घ्यायला लागले. हा फलकलेखनाचा मजकूर मी स्वत: लिहून देत असे आणि शाळेतील सुंदर हस्ताक्षर असलेल्या निरनिराळ्या शिक्षकांकडून फलकावर आळीपाळीने लिहिण्यास देत असे. त्यामुळे त्या लेखनात कायमचे सातत्य राहिले. आजही ती प्रथा चालू आहे.
१९९० नंतर फलकलेखनासाठी ‘दिनविशेष’ नावाची एक पुस्तिका तयार केली. ह्या पुस्तिकेत भारतीय सण, राष्ट्रीय उत्सव, जागतिक दिन, थोर पुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या, गीत गायनांसाठी गीतांचा संग्रहविभाग, इत्यादी विषयांचे विभाग समाविष्ट केले आहेत.

१९६६ च्या सुमारास, दर आठवड्याला दोन तासिका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दिल्या जाव्या असे शासनाचे परिपत्रक शाळेत आले. सदर सांस्कृतिक तासिकांमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत कराव्यात यासंबंधी मार्गदर्शनाचा कोणताच तपशील नव्हता.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासिका विद्यार्थ्यांना विविध संस्कार देण्याच्या दृष्टीने कशा रीतीने वापरता येतील यासंबंधी मी खुद्द दादांशी आणि काही शिक्षकांशीही बोललो, चर्चा केली. त्यासंबंधी तपशीलवार योजना आखली. त्या योजनेमध्ये प्रत्येक तुकडीतील मुलांचे आठ गट करावेत आणि ती कामे १५ दिवसांनी बदलावीत, यांचा अंतर्भाव केला. तुकडीतील आठ गटांना ‘कुले’ म्हणावे आणि त्यांची नावे ‘गुणदर्शक’ असावीत. उदाहरणार्थ, निर्मल, धवल, परिमल, शीतल, स्नेहल, मंगल, उज्ज्वल आणि वत्सल. तसेच आठ कामे निश्चित केली. उदाहरणार्थ – स्वच्छता, शिस्त, अभ्यास, वाङ्मय, सजावट, वक्तृत्व, समारंभ आणि सेवा. या योजनेमध्ये मुलांना निरनिराळे संस्कार आपोआप मिळावेत हासुद्धा एक उद्देश माझ्या मनात होताच. वर निर्देश केलेली कामे करण्यात आठवडाभर मुलांनी पुढारीपण घ्यावे, तर दुसऱ्या आठवड्यात मुलींनी पुढारीपण घ्यावे. कुलांना दिलेल्या कामांपैकी समारंभ, वक्तृत्व, अभ्यास आणि वाङ्मय हे उपक्रम सांस्कृतिक तासाला ही कामे दिलेल्या कुलांनी सादर करावेत आणि उरलेले चार उपक्रम स्वच्छता, शिस्त, सजावट आणि सेवा हे आठवडाभर दररोज त्या त्या कुलांच्या मुलांनी चालू ठेवावेत. मुलांच्या मार्गदर्शनासाठी कामाचा तपशीलही तयार केला होता. तो असा होता.

स्वच्छता – वर्गातील जमिनीवरील कागदाचे कपटे, केर-कचरा वर्गातील कचरापेटीत टाकणे. खिडक्यांच्या तावदानावरील धूळ काढून ती स्वच्छ ठेवणे, वर्गातील टेबलखुर्ची, बाके, वर्गाचे दरवाजे पुसणे, आवश्यक तर जमिनीवरील केर काढणे, इत्यादी कामे.

शिस्त – दोन तासिकांमधील वेळेत आलटूनपालटून मुलांनी मुले बाकांच्या रांगेसमोर उभे राहून मुलांवर लक्ष ठेवणे. खेळासाठी मैदानात जाताना, विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी जाताना, सभागृहात एखाद्या कार्यक्रमासाठी जाताना, मुले रांगेचा नियम पाळतील याची दक्षता घेणे, इत्यादी.

सेवा – वर्गातील फळा शिक्षक वर्गात येण्यापूर्वी डस्टरने स्वच्छ पुसणे, शिक्षकांसाठी शिक्षणसाहित्य (नकाशे, तक्ते, भूमितीचे साहित्य, विज्ञानाचे साहित्य, इत्यादी) शिक्षणसाहित्याच्या खोलीतून आणणे, वर्गातील मुलांच्या निबंधाच्या वह्या पर्यवेक्षकांच्या खोलीतून घेऊन येणे, शाळा सुटल्यावर एखादा मुलगा आपली वस्तू घरी नेण्यास विसरला असल्यास ती दुसऱ्या दिवशी आठवणीने त्यास देणे, इत्यादी.

वाङ्मय – अनुपस्थित शिक्षकाच्या तासिकेला एखादी कथा अगर एखादी कविता वाचून अगर गाऊन दाखवणे, वार्ताफलकावर वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्या अगर मजकूर निवडून तो लिहिणे, तसेच वाढदिवस असलेल्या दिवशी त्या त्या मुलांना वर्गातर्फे शुभेच्छा देऊन त्याच्याविषयी दोन मिनिटांचे भाषण करणे, इत्यादी.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला मुलांनी करावयाची कामे अशी आखली-
समारंभ – सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासिकेच्या कालावधीला समारंभाचे स्वरूप देऊन विविध साहित्य सामुग्रीने वर्गातील वातावरण आनंददायी करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन करणे, मुलांचे मनोरंजन करणे, इत्यादी.

सजावट – फळ्यावर सुंदरसा सुविचार लिहिणे, सांस्कृतिक कार्यक्रमाला मुलांचे आणि शिक्षकांचे, रांगोळी काढून स्वागत करणे, टेबलावर विविध प्रकारची रांगोळी काढून सुस्वागतम्, जयहिंद, वन्दे मातरम् यासारखे विविध प्रकारचे शब्द वेलबुट्टीमध्ये काढून मुलांचे स्वागत करणे. त्यासाठी रांगोळीची पावडर, वनस्पतींची पाने, फुले, निरनिराळ्या आकारांचे छोटे दगड, इत्यादी साहित्याचा वापर करणे.

वक्तृत्व – गेल्या शनिवारी वक्तृत्वासाठी दिलेल्या दोन विषयांवर तीन मिनिटे बोलण्याची तयारी करून, निवडलेल्या विषयावर वक्तृत्व करणे आणि कुलातील प्रमुखाने पुढील आठवड्यासाठी दोन विषय घेणे, कुलातील प्रत्येक विद्यार्थ्याने दोन-तीन मिनिटे बोलणे, इत्यादी.

अभ्यास – हे काम ज्या कुलाकडे आहे त्या कुलातील प्रत्येक विद्यार्थ्याने दोन सामान्यज्ञानाचे प्रश्न (उत्तरासह) काढून, सर्व मुलांना पुढील आठवड्यात उत्तरे काढण्यास सांगून, ती उत्तरे पुढील शुक्रवारी त्या कुलातील मुलांना तपासण्यास द्यावीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासिकांना सामान्यज्ञानाची गेल्या आठवड्यातील प्रश्नांची योग्य उत्तरे मुलांना सांगावीत. हे काम करणाऱ्या कुलातील मुलांनी त्याच शनिवारी सामान्यज्ञानाचे नवीन प्रश्न मुलांना द्यावेत.

या योजनेमध्ये वर्गशिक्षकाचा सहभाग आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी ही ‘कुलपद्धती’ सतत चालू ठेवण्यासाठी मुलांना शाबासकी देणे, उत्तेजन देणे या गोष्टी वेळोवेळी कराव्यात. ‘कुलपद्धती’ची योजना कार्यरत राहण्यासाठी वर्गशिक्षकांचे लक्ष आठवडाभर निरनिराळी कुले दिलेल्या कामगिरीप्रमाणे कार्य करत राहतात की नाही ह्याकडे असले पाहिजे. तरच शिक्षकाला विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे संस्कार दिल्याचे समाधान लाभेल. या कुलपद्धतीच्या योजनेमुळे मला ‘बालसेवा’ केल्याचे समाधान लाभले आहे.

शाळेतील कुलपद्धतीसंबंधी महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. ना.के. उपासनी यांनी १२ नोव्हेंबर १९६९ रोजी दादांना पाठवलेल्या पत्रातील त्यांची प्रतिक्रिया येथे नमूद करावीशी वाटते.

“आपण स्वीकारलेली कुलपद्धती अभिनव वाटली, ती कुलांना सद्गुणांची नावे देण्यात दाखवलेल्या औचित्यामुळे. या कुलांकडे सोपवलेल्या कामातही आपण विद्यार्थी जीवनातील प्रमुख अंगाचा समावेश केला आहे. त्यावरून आपले शैक्षणिक तत्त्वज्ञानातील मूलगामी द्रष्टेपण दिसून येते.”

अभ्यासक्रमाला पूरक अशा रीतीचे, मुलांच्या विकासाला आवश्यक असे निरनिराळे उपक्रम शाळेत चालू असतात. मूल उत्सवाच्या कार्यक्रमाकडे अधिक आकर्षिले जाते. म्हणून काही शैक्षणिक सप्ताह उत्सवाच्या स्वरूपात आयोजित केले, तर त्या सप्ताहाकडे मुलांचे लक्ष जाईल आणि मुले आनंदाने त्या सप्ताहात भाग घेतील असे माझ्या मनात आले. शाळेत ‘मराठी हस्ताक्षर सप्ताह’ साजरा करावा आणि त्याद्वारे मुलांचे लक्ष सुलेखनाकडे कसे जाईल यासंबंधी मी विचार करू लागलो.
बालमोहन विद्यामंदिरातील उत्तम हस्ताक्षर असलेले श्री. लक्ष्मण सखाराम रावले, श्री. लक्ष्मण हरी ठाकूर ह्यांच्याशी मी प्रथम बोललो. श्री. रावले ह्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून हस्ताक्षर काढण्याचे नकळत शास्त्रच तयार केले होते.

माझी कल्पना त्या दोघांना एकदम पसंत पडली. लगेच आम्ही दादांकडे हा नवीन उपक्रम कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने अधिक मार्गदर्शनासाठी गेलो. दादांचे स्वत:चे हस्ताक्षर चांगले होते. प्रत्येक शिक्षकाचे अक्षर वळणदार असले, की मुले अनुकरणप्रिय असल्याने, ती आपल्या शिक्षकांसारखे अक्षर काढण्याचा प्रयत्न करतात असे दादांचे पूर्वीपासून मत होते. दादांना अशासाठी आनंद झाला, की त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी आम्ही तिघे प्रयत्न करणार होतो.

त्यानंतर आमच्या अनौपचारिक बैठका झाल्या आणि ठरले, की ४ ते ११ नोव्हेंबर १९६१ या दिवसांत ‘हस्ताक्षर सप्ताह’ साजरा करायचा. ह्या सप्ताहासाठी शिक्षकांनी काही तक्ते तयार केले आणि त्याचे प्रदर्शन दर्शनी भागात भरवायचे असे ठरवले. तसेच त्या सप्ताहात मुलांची सभा घेऊन त्यांना उत्तम हस्ताक्षर हे आपल्याजवळ कायम टिकणारे एक बहुमोल ‘भूषण’ कसे आहे, उत्तम हस्ताक्षरात मांडलेले विचार, लिहिलेली प्रश्नांची उत्तरे याचा वाचणाऱ्याच्या मनावर चांगला व अनुकूल परिणाम कसा होतो, चांगले हस्ताक्षर वाचकाच्या मनावर लेखकाविषयी कसा आदरभाव निर्माण करतात, इत्यादी गोष्टी सांगून मुलांच्या मनाची तयारी प्रथम करण्यात आली.

तक्त्यांमध्ये अक्षराचे अवयव, त्याचा क्रम, अक्षरांची वळणे, अक्षरांची प्रमाणबद्धता, अक्षराचा गोंडसपणा, बाराखडीच्या खुणा जोडण्याची पद्धत, ओळीचे स्थान, अक्षराचे शब्दात स्थान, दोन शब्दांमधील योग्य अंतर, इत्यादी बारकावे प्रत्यक्ष दर्शवलेले होते.

तसेच, सप्ताहाच्या कालावधीत, दररोज दहा मिनिटे वर्गशिक्षकांनी मुलांना पाठ्यपुस्तकातील चांगल्या मजकुराचे अनुलेखन आठवडाभर स्वतंत्र कागदावर करण्यासाठी द्यावे. वर्गशिक्षकांनी मुलांच्या हस्तक्षरातून तुकडीतील तीन चांगली हस्ताक्षरे असलेले मजकूर त्याच दिवशी निवडावेत आणि अठरा चांगली हस्ताक्षरे असलेले मुलांचे कागद अंतिम स्पर्धेसाठी मुख्याध्यापकांकडे पाठवावेत. अशी प्रत्येक इयत्तेची स्वतंत्र हस्ताक्षर स्पर्धा घेतली, चांगल्या हस्ताक्षराची निवड केली आणि त्यांचे प्रदर्शन दर्शनी भागात भरवले. उत्तम हस्ताक्षर ठरलेल्या मुलांना पेन बक्षीस म्हणून दिले. त्यामुळे मुलांवर आणि शिक्षकांवर या उपक्रमाचा फार चांगला परिणाम झाला. मुलांची अक्षरे हळूहळू सुधारू लागली आणि चांगल्या हस्ताक्षराची मुले बालमोहनची असतात, अशी शाळेला प्रसिद्धी मिळाली. हळूहळू अनुलेखनाची प्रथा दररोजची झाली.

अशा प्रकारचे प्रत्येक वर्षी निरनिराळ्या विषयावरील सप्ताह शाळेत दुसऱ्या सहामाहीमध्ये साजरे होऊ लागले आणि निरनिराळ्या विषयांकडे मुलांचे लक्ष जाऊन मुलांची त्या त्या विषयाची आवड निर्माण झाली. दरवर्षी सप्ताहाचे निरनिराळे विषय होते. उदाहरणार्थ, श्रुतलेखन सप्ताह, पाठांतर सप्ताह, व्याकरण सप्ताह, भूगोल सप्ताह, इतिहास सप्ताह, विज्ञान सप्ताह, इत्यादी.

अशा सप्ताहांचे उत्साही वातावरण निर्माण होण्यासाठी त्या त्या विषयासंबंधी माहितीचे फलकलेखन आणि मोठे तक्ते बनवून ते शाळेच्या निरनिराळ्या भागांत मांडले जाऊ लागले. गटवार मुलांच्या सभा घेऊन सप्ताहाचे महत्त्व आणि त्या त्या विषयाची माहिती, त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून सांगण्याचा उपक्रम आयोजित होऊ लागले. सप्ताहातील शेवटच्या दिवशी स्पर्धा ठेवून उत्तम यश मिळवणाऱ्या मुलांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येऊ लागली. अर्थात, यासाठी शिक्षकांनी आणि मुलांनी खूप सहकार्य करून, शैक्षणिक सप्ताहाच्या उपक्रमांत सहभाग घेतला, म्हणून ह्या सप्ताहांना एका निराळ्या प्रकारची प्रतिष्ठा लाभली.

विशेष हस्तलिखिते आणि भित्तिपत्रिका हा खास माझा उपक्रम आहे. वर्गवार मुलांची हस्तलिखिते शाळेच्या स्थापनेपासून (१९४० सालापासून) चालू आहेत. ह्यामुळे जे विद्यार्थी लेखक, कवी, चित्रकार, उत्कृष्ट हस्ताक्षर असणारे आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी ‘हस्तलिखित आणि भित्तिपत्रिका’ ही दोन माध्यमे अत्यंत उपयोगी पडली आहेत. आचार्य प्र.के. अत्रे यांनी १५ जानेवारी १९४२ रोजी शाळेच्या हस्तलिखितासंबंधी असा अभिप्राय दिला होता, की मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास अशा हस्तलिखित मासिकांची शाळेत आवश्यकता आहे.

या उद्देशाने ‘हस्तलिखित’ ह्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारे भर घातली गेली. शाळेतील साहित्यिक आणि कलाकार विद्यार्थ्यांना वाव मिळण्यासाठी ‘हस्तलिखित आणि भित्तिपत्रिका’ हे दोन उपक्रम महत्त्वाचे ठरले.

हस्तलिखिताच्या माध्यमातून एखादा प्रकल्पही कसा निर्माण होऊ शकतो याचा अनुभव बालमोहनांनी घेतला आहे. मुले शैक्षणिक सहलीला जातात, तेथील भौगौलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दर्शन घेतात. अशाच एका सहलीला ‘महाबळेश्वर’ येथे गेलो असताना विशेष हस्तलिखित अंकांची निर्मिती मुलांनी शाळेत गेल्यावर केली. हा पहिला प्रयोग १९७० साली झाला. अर्थात यामध्ये वरच्या वर्गातील मुलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मुलांनी प्रवासाच्या मार्गाच्या ‘नकाशाची’ भर घातली. चित्रे आणि छायाचित्रे यांनी सहलीचा प्रकल्प सजवला. वर्गाची तुकडीवार सहल प्रकल्पाची हस्तलिखिते प्रदर्शनासारखी दर्शनी भागात मांडल्यामुळे मुलांच्या प्रयत्नांना प्रतिष्ठा मिळाली. त्यानंतर ती ‘प्रथा’च पडली. हल्ली शिक्षक मुलांना संगणकाच्या साहाय्याने विविध प्रकारचे प्रकल्प निर्माण करण्यास, उत्तेजन देत आहेत. इंटरनेटवरून कोणत्याही विषयाची माहिती काढायची आणि आपल्या भाषेत त्याचे अभिव्यक्तीकरण करायचे. त्यामध्ये संगणकाच्या साहाय्याने चित्रे, आकृत्याही मुले काढू लागली आहेत.

‘भित्तिपत्रिका’ तयार करणारे विद्यार्थी भित्तिपत्रिकेच्या सहा खास कागदांवर लेख, कविता, सुविचार, चुटके, चित्रे (रंगचित्रे, रेखाचित्रे, डिझाइनचे प्रकार) आणि आकृत्या काढून भित्तिपत्रिका सजवतात. एक मोठी फ्रेम एका इयत्तेसाठी दिलेली असते. प्रत्येक आठवड्याला एक तुकडी ‘भित्तिपत्रिका’ तयार करते. आपल्या वर्गाच्या भित्तिपत्रिकेला मुले स्वतंत्र नावे देतात. शिक्षक त्याच्यावर नजर टाकतात आणि ती ग्रंथपालाकडे देतात. यामुळे पाचवी ते नववीच्या सहा इयत्तांच्या भित्तिपत्रिका जिन्या जवळील भिंतीवर लावल्या जातात. मुलेही जाता-येता अभिमानाने त्या पाहतात.

अशा रीतीच्या खास उपक्रमांनी शाळेचे वातावरण अधिक आकर्षक होते हे निश्चित.

दिवाळीच्या मोठ्या सुटीमध्ये मुलांना दहा दिवसांच्या स्वाध्याय देण्याची प्रथा शाळेत पूर्वीपासून चालू होती. मुले तो गृहपाठ एका वहीत सुंदर हस्ताक्षरात सोडवतात आणि ती वही चित्रे, सुविचार लिहून सजवून शिक्षकांकडे आणून देतात. शिक्षक ती वही सर्वसाधारणदृष्ट्या तपासतात आणि सजावट, टापटीप, पूर्ण अभ्यास या दृष्टीने गुण देऊन मुलांना बक्षिसे दिली जातात.
पण दिवाळीच्या मोठ्या सुटीचा आणि उन्हाळ्याच्या दीड महिन्याच्या सुटीचा सदुपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन पत्रकाद्वारे मुलांना द्यावे असे मला वाटले आणि सुटीत मुलांनी आपल्या आवडत्या उपक्रमात स्वत:ला कसे गुंतवून घ्यावे, पालकांबरोबर आपला वेळ कसा घालवावा, आपल्या छंदामध्ये कसे रमून जावे, मित्रांबरोबर खेळणे, फिरायला जाणे, इत्यादी मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचे टिपण केले आणि मी ते दादांना आणि माझ्या काही सहकारी मित्रांना दाखवले. त्यांना माझ्या या मोठ्या सुटीतील नवीन उपक्रमाची योजना खूप आवडली. १९६० मध्ये ही योजना अंमलात आली. मुलांना सुटीच्या सदुपयोगाची पत्रके देण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे दरवर्षी भर घातली जाऊ लागली. मुले विविध उपक्रमांतून विविध प्रकारचे संस्कार आपोआप मिळवू लागली. २००८ साली मुलांना दिलेली पत्रके नमुन्यादाखल पुढे उद्धृत करीत आहे-

विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रथम सत्र परीक्षा नुकतीच संपलेली आहे. आता तुम्हाला दिवाळीची भरपूर सुटी आहे.
तुम्हाला सुटीमध्ये करण्यासाठी अभ्यास दिला आहे. सकाळी ८ ते ९ वेळात वाचन, दुपारी ३ ते ४ या वेळात लेखन, संध्याकाळी ७ ते ८ या वेळात कविता व श्लोक म्हणणे अगर पाठांतर करणे याप्रमाणे अभ्यास करा. वैयक्तिकरीत्या तुम्हाला प्रकल्प करावयाचा आहे. त्याचे विषय तुम्हाला दिले आहेत. अत्यंत अभ्यासपूर्वक व सुंदर प्रकल्प तयार करा. या दिवसांत तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे. म्हणून घर स्वच्छ व सुंदर ठेवणे, रांगोळ्या काढणे, दिव्यांची आरास करणे, आकाशकंदील करणे, किल्ला बनविणे, इत्यादी आवडत्या गोष्टी उत्साहाने करा.

तुम्ही घरातील खोली अगर भाग स्वतंत्रपणे नियमित स्वच्छ करा. आपल्या कपड्यांपैकी हातरुमाल, टॉवेल, सदरा, फ्रॉक, इत्यादी कमीत कमी एक कपडा रोज स्वच्छ धुण्याची सवय करा.

या सुटीतील दिवसांत तुम्ही रोज शाळेत शिकविलेली गाणी व कविता म्हणा. चित्रे काढा. छोट्या भावंडांना गोष्टी सांगा. शिवाय चित्रे, शिंपले, पोस्टाची तिकिटे, पक्ष्यांची पिसे, पाने, यांपैकी जमतील त्या व मिळतील त्या वस्तूंचा संग्रह करा. एक-दोन लहान कुंड्या घेऊन त्यात तुम्हाला आवडतील त्या वनस्पतींची रोपे, फुलझाडे, इत्यादी लावून त्यांची वाढ करा. त्याचे निरीक्षण करा. ते वहीत लिहून ठेवा. घरातील टाकाऊ वस्तूंपासून शाळेमध्ये शिकविल्याप्रमाणे तुम्हाला जमतील तशा निरनिराळ्या वस्तू बनवा. शाळेत शिकविलेल्या मातीच्या वस्तू बनवा. जमल्यास, घरच्या घरी मित्र व नातलगांच्या मदतीने, तुम्ही काढलेल्या चित्रांचे छोटेसे प्रदर्शनही भरवा. आई-वडिलांबरोबर बाजारात जाण्याची संधी दवडू नका. तेथे निरनिराळ्या वस्तूंचे दर, चालू हंगामातील फुले, फळे, भाज्या यांचे निरीक्षण करा. दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी तुमच्या प्रकल्पांचे प्रदर्शन शाळेत भरविले जाणार आहे. म्हणून एक प्रकल्प उत्तम तयार करा. त्यातूनच बक्षिसांसाठी प्रकल्प निवडले जातील.

पुष्कळ मुले दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांसाठी हट्ट करतात. सुटीतील बराचसा वेळ फटाके उडविण्यात घालवितात. इतकेच नव्हे, तर काही मुले भाजतातही. त्यामुळे त्यांची दिवाळी मजेत जात नाही. यासाठी फटाक्यांचा हट्ट करू नका. त्याऐवजी चांगली पुस्तके घेऊन वाचा.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसांत तुम्ही दुपारी उन्हात खेळू नका. दुपारच्या वेळी भरपूर विश्रांती घ्या. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मनसोक्त खेळा.

सर्वांस दिवाळी सुखाची व आनंदाची जावो.

– डॉ. मो.शि. रेगे
अधीक्षक आणि कार्यकारी विश्वस्त

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.