loader image

आठवणीतील पाऊले

शाळा विश्वस्त मंडळाच्या हवाली

१९४६ साली १० वर्षांच्या कराराने महानगरपालिकेने ५१, ६१, ६३ व ६५ ह्या प्लॉटवरील भूखंडाची शाळेला दिलेली मुदत संपण्यास फक्त तीन वर्षे उरली होती. म्हणून महानगरपालिकेकडे ९९९ वर्षांच्या लीजने तोच भूखंड संस्थेला द्यावा असे मागणीपत्र घेऊन दादा महानगरपालिकेकडे गेले. महानगरपालिकेकडून यापुढे तुम्हाला एकही दिवस मुदतवाढ मिळणार नाही, एवढेच नव्हे तर तुमच्या खर्चाने इमारत पाडून मोकळी जागा महानगरपालिकेच्या हवाली करा, असा आदेश आला. ते पत्र वाचून दादांना अतिशय दुःख झाले. जी संस्था मी सुरू केली, वाढवली, नावारूपास आणली, त्या संस्थेची इमारत मी माझ्या हाताने पाडू?

त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती. भूखंडाची लीज वाढवून घेण्यासाठी दादा प्रयत्नशील होते. त्या वेळचे म्युनिसिपल कमिशनर श्री. पी.आर. नायक यांच्याकडे दादा ताबडतोब अर्ज घेऊन गेले. शाळा पाहण्याची त्यांना विनंती केली. दिनांक ११ ऑक्टोबर १९५३ रोजी त्यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी शाळा पाहून असा शेरा दिला : ‘I have no doubt that the school will continue to grow as apotential influence in the community’s future.’ श्री. नायकसाहेबांनी बाबांचा तो अर्ज विचारात घेऊन कॉर्पोरेशनपुढे ठेवला. कॉर्पोरेशनने संस्थेला १९५५ साली ९९९ वर्षांच्या कराराने विनाअट पूर्वीचेच चार प्लॉट्स सलगपणे दिले. शाळेच्या इतिहासातील ती महत्त्वाची घटना होती.

दादांच्या जीवनातील हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. दादांना आता वाटू लागले की शाळा ही आपली खाजगी मालमत्ता असू नये. दादांनी मला आणि बंधू बाळासाहेब ह्यांना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले, “आतापर्यंत शाळा खाजगी स्वरूपात होती. आता शाळेला पूर्वीचीच जागा कायमची मिळाली आहे, खाजगी शाळेचा ‘पब्लिक ट्रस्ट’ करावा असे मला वाटते.”

दादांना या वेळी काही हितचिंतकांनी पूर्वप्राथमिक विभाग तरी स्वतःकडे ठेवावा असा सल्ला दिला होता. त्या वेळी दादांनी त्यांना दिलेले उत्तर मी चांगले लक्ष्यात ठेवले आहे. ते म्हणाले, की समाजाचे माझ्यावर एवढे ऋण आहे, की ते फेडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी जो निर्णय घेतला आहे तो बदलणार नाही.

दादांना पूर्वी कायद्यासंबंधी मदत केलेले अॅडव्होकेट श्री.य.म.रेगे ह्यांच्याकडे ‘ट्रस्ट डीड’ करण्यास दादांनी दिले. त्यांनी काही दिवसांनी ट्रस्ट डीडचा मसुदा तयार करून दादांकडे आणून दिला. दादा, ॲड. य.म. रेगे आणि मी तो मसुदा पाहिला. त्यात शाळेचा इतिहास प्रथम कसा घालावा यासंबंधी आमची चर्चा झाली. त्यात शेरेबुकातील काही उतारे त्या डीडमध्ये घालावेत असे मी रेगेसाहेबांना सांगितले. वार्षिक इन्स्पेक्शन रिपोर्टमधील काही परिच्छेद ट्रस्ट डीडमध्ये असावेत असेही मी सुचवले. त्यांतील महत्वाचे वाटणारे उतारे आम्ही निवडले. त्यानंतर ट्रस्ट डीडमधील मजकूरही वाचला. त्यामुळे ट्रस्ट डीडमध्ये कोणकोणते मुद्दे आले पाहिजेत हे मला समजले.

त्यानंतर दादांनी अर्थखात्याचे निवृत्त उपसचिव श्री. विश्राम पुरुषोत्तम सबनीस आणि शिक्षणखात्याचे निवृत्त सहसचिव श्री. नीळकंठ बाळकृष्ण सबनीस आणि स्वतः दादा असे तिघांचे विश्वस्त मंडळ तयार केले. दादा विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त म्हणून स्वतः राहिले. तसेच श्री. रामचंद्र विठ्ठल परुळेकर हे शैक्षणिक सल्लागार आणि अॅड. यशवंत महादेव रेगे हे कायद्याचे सल्लागार असतील, अशी तरतूद त्या वेळी ट्रस्ट डीडमध्ये केली. पुढे ते दोघेही संस्थेचे विश्वस्तही झाले.

सर्व ट्रस्ट डीड कायदेशीररीत्या योग्य झाल्यावर तीन विश्वस्तांसमवेत रेगेसाहेब आणि मी दिनांक २८ मार्च १९५५ रोजी ओल्ड कस्टम हाऊसमध्ये गेलो आणि तेथील अधिकाऱ्यांसमोर विश्वस्तांनी अॅड. य. म. रेगे ह्यांच्यासह स्वाक्षऱ्या करून सब रजिस्ट्रारकडे ट्रस्ट डीड नोंदवले आणि त्याच दिवशी धर्मदाय आयुक्तांकडे त्याची नोंदणी केली. त्यानंतर दादा संस्थेचे काम ‘कार्यकारी विश्वस्त’ या नात्याने पाहू लागले. सुरुवातीच्या काळात श्री.भा.वि. वरेरकर यांनी आणि नंतर श्री. मोहनराव परुळेकर आणि त्यांचे चिरंजीव पद्माकर परुळेकर यांचे कुळकर्णी आणि खानोलकर कंपनीतर्फे संस्थेच्या हिशेबाच्या बाबतीत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन संस्थेला लाभले.

कॉर्पोरेशनने दिलेल्या जागेवरील इमारतीत तीन हजार मुलांची सोय होईल अशी भव्य इमारत बांधावी असे दादांनी ठरविले. त्यासाठी आर्किटेक्ट म्हणून श्री.पुरुषोत्तम विठ्ठल गाड यांची नियुक्ती झाली आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून पी. दिनशा कंपनीचे मालक श्री.फिरोजशा दिनशा भसानिया यांची नेमणूक केली. या सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने ही इमारत दोन हप्त्यांत केवळ दहा महिन्यांत पूर्ण केली.

शाळेच्या इमारतीचे काम चालू असताना अनेक हितचिंतकांनी आणि संस्थांनी विविध प्रकारची मदत केली. शाळेने नाममात्र व्याजाचे डिबेंचर्स काढले व त्यामार्फत हितचिंतकांकडून २ लाख रुपये जमवले. सारस्वत बँकेने एक लाख रुपये कर्जाऊ दिले. याच वेळी केंद्र सरकारची शाळेच्या अभ्यासक्रमात ‘मल्टिपरपज स्कीम’ कार्यान्वित झाली होती. त्यासाठी दोन मोठे हॉल बांधण्यासाठी सरकारने ३२ हजार रुपयांची देणगी दिली होती. याच सुमारास शाळेच्या बांधकामास मदत म्हणून शासनाने १ लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात दोन हप्त्यांत देऊन साहाय्य केले. विशेष गोष्ट म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळेस दोन लाख रुपयांचे १९६९मध्ये बहुमानाने संस्थेला दिले. ही इमारत सुमारे ७ लाखाची झाली. हे सात लाख कसे जमले हे सात लाख कसे जमले व काढलेले कर्ज १९६९ साली कसे फिटले हे मात्र देवालाच माहीत.

प्रथम कॉन्ट्रॅक्टरला अनेकांनी सांगितले, की हे काम घेऊ नका. कारण शाळेकडे पैसा नाही. पण दिनशाने लोकांचे ते सांगणे मनावर न घेता बांधकाम जोरात चालू केले. ते दादांकडे आले आणि त्यांनी वरील किस्सा सांगितला. ते दादांना म्हणाले, की दादा, माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि दादांनी हा विश्वास बांधकाम पूर्ण होईपर्यंत ढळू दिला नाही. त्यांनी ज्या ज्या वेळी कामे पूर्ण केली त्यात्या वेळी पैसे उभे राहिले व इमारतीच्या बांधकामाची प्रगती होत राहिली.

शाळेचे बांधकाम चालू असतानाचा मला एक प्रसंग आठवतो. कॉन्ट्रॅक्टरने, ५० हजार रुपयांची रक्कम पहिला स्लॅब घातल्यावर हवी असल्याचे सांगितले.” दादांनी त्यांना नाही म्हटले नाही. पी.दिनशाला दादांनी दुसऱ्या दिवशी ११ वाजता चेक नेण्यास बोलाविले. मी दादांजवळ उभा होतो. मी दादांना म्हणालो की ५० हजार रुपयांचा चेक नेण्यासाठी दिनशांना तुम्ही उद्या बोलाविले आहे. एवढे पैसे बँकेत आहेत का? दादा मला म्हणाले की कॉन्ट्रॅक्टरला उद्या ११ वाजता बोलावले आहे. त्याला ११ वाजता चेक दिला, की बँकेत सोमवारी चेक टाकणार. तोपर्यंत ५० हजार रुपये नक्की उभे राहतील असा मला विश्वास आहे! मी गप्पच राहिलो. दादांचे हे केवढे मोठे धाडस. शनिवारी सकाळी ११ वाजता दादांनी पी. दिनशाला चेक दिला. तो एकदम खूश झाला नंतर आम्ही घरी गेलो. जेवून झोपलो. झोपून उठल्यावर ५ च्या सुमारास दादा मला म्हणाले, “चल तू माझ्याबरोबर. आपण हिंदू कॉलनीतील माझ्या एका स्नेह्याच्या घरी जाऊ या. त्यांनी मला शिक्षकांच्या पगाराच्या वेळी पुष्कळदा पैसे दिले आहेत.” आम्ही शाळेच्या बांधकामाकडे गेलो व नंतर फूटपाथवरून जात असताना डॉ.दिवेकर ह्यांनी शाळेच्या शाळेच्या कोपऱ्यावरून पुढे जाताना दादांना हाक मारून बोलावले. ते हॉस्पिटलमधून घरी जात होते. ती संध्याकाळची ६ची वेळ होती. त्यांनी दादांकडून शाळेच्या बांधकामाबाबतची माहिती घेतली आणि आश्चर्य त्यांनी ताबडतोब ३० हजार रुपयांचा चेक फाडून दादांच्या हवाली केला. त्यांनी ती रक्कम ५ वर्षे शाळेकडे ठेवण्यास सांगितले. पुढे ते म्हणाले, “१० हजार रुपयांवरील व्याज श्री. एस. एम. जोशींना द्या. दुसऱ्या १० हजार रुपयांचे व्याज किंग सर्कलजवळच्या अनाथाश्रमाला द्या आणि उरलेल्या १० हजार रुपयांचे व्याज माझ्या नावे पाठवा.”काय हा योगायोग!

नंतर आम्ही हिंदू कॉलनीत दादांच्या त्या स्नेह्यांच्या घरी गेलो. दादा त्यांच्या घरात गेल्यावर त्यांच्या स्नेह्यांना अतिशय आनंद झाला. ते दादांना म्हणाले,”तुम्ही काही कामासाठी माझ्याकडे आला आहात असं वाटतं.” दादा त्यांना म्हणाले, ”मला जरा पैशांची अडचण आहे.शाळेच्या इमारतीचं काम जोरात चालू आहे. मला फक्त २० हजार रुपयांची गरज आहे. कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आहेत.” दादा पैशासंबंधी बोलतात काय आणि ते स्नेही लगेच दुसऱ्या खोलीतून पैसे काय आणून देतात! हे सर्व माझ्यासमोर घडले आहे. ती व्यक्ती दादांची ही चणचण लक्षात घेऊन दादांची गरज भागवते आणि तीसुद्धा चिठीचपाती न घेता. ती व्यक्ती दादांची खरी हितचिंतक! दादांनी त्यांचे आभार मानले आणि आम्ही घराबाहेर पडलो. दादा मला सांगत होते, “आपली तीव्र इच्छाच आपल्या मनाप्रमाणे घडवून आणण्यास आपल्याला मदत करत असते. इच्छा मनात मनापासून बोलत राहावी.” दादांचे ते शब्द माझ्या कायमचे लक्षात राहिले आहेत. पी. दिनशांचा चेक सोमवारी वटला.

शाळेची सदर पक्की इमारत बांधताना सिमेंट आणि लोखंड दुर्मीळ झाले होते. शाळेच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक होते. १९५६च्या जूनमध्ये इमारतीचा अर्धा भाग तरी पूर्ण होणे जरुरीचे होते. म्हणून तातडीने दादा सचिवालयात पुरवठा खात्याचे मंत्री नामदार श्री. तपासेसाहेब यांना भेटायला गेले. पण ते काही कामानिमित्त महाबळेश्वरला गेल्यामुळे त्यांचे सचिव श्री. राजवाडे यांना दादा भेटले. त्यांनी श्री. राजवाडेसाहेबांना प्रथम थोडक्यात शाळेची माहिती सांगितली आणि शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी सिमेंट आणि लोखंड अपुरे पडले आहे, शाळेचे काम अडून बसले आहे, असे दादांनी त्यांना सांगितले.

दादांच्या बोलण्याचा योग्य तोच परिणाम झाला. त्यांनी शाळेच्या अर्जावर, ‘मागणी खरी आहे. सरकारी कोट्यातून १५० टन सिमेंट आणि १५० टन लोखंड शाळेला ताबडतोब द्यावे,’ असा शेरा लिहिला. तो आदेश पाहताच खात्याच्या प्रमुखांना आश्चर्य वाटले. दादांनी राजवाडेसाहेबांचे आभार मानले आणि ते ऑर्डर घेऊन शाळेत परत आले.

“एका दिवसात एक लाख रुपये जमा करायचे आहेत, त्याच्याशिवाय सिमेंट आणि लोखंड आणता येणे कठीण होईल,’ दादा आपल्या खोलीत शाळेतील काही शिक्षकांना बोलावून सांगत होते. मीही त्या शिक्षकांबरोबर दादांकडे गेलो होतो. ते म्हणाले, “मला आता माझ्या काही मित्रमंडळींकडे जायला पाहिजे.” आणि दुसऱ्या दिवशी पैशांसाठी दादा वणवण फिरत होते. शाळेतील काही शिक्षक पैसे जमवत होते. काही पालकही पुढे आले. त्यांनाही शाळेची अडचण समजल्यामुळे पालकबाई सौ. सुधा कुळकर्णी आणि शाळेतील शिक्षिका श्रीमती अनसूया पालेकर यांनी तर स्वतःचे दागिने गहाण ठेवून दादांना पैसे दिले. असा पालकांनी आणि शिक्षकांनी शाळेला मदतीचा हात दिला.

एका दिवसात एक लाख रुपये उभे राहिले आणि सिमेंट, लोखंड आणून बांधकाम पूर्ण करून घेतले. एकदा तर दादांनी सिमेंटच्या गोण्या ठेवलेल्या लॉरीत बसून शाळेसमोर लॉरी उभी केली. मी दादांना म्हटले, “दादा, तुम्ही स्वतः सिमेंट आणलंत?” दादा म्हणाले, “होय बापू, काही वेळा ठरावीक ठिकाणी लॉरी थांबवली जाते व सिमेंटच्या गोण्यांतून सिमेंट काढले जाते असं मला समजलं होतं. म्हणून मी स्वत: लॉरीबरोबर आलो.” दादांची ती व्यावहारिक दृष्टी मला समजली.
तसेच शाळेमध्ये हॉल असला पाहिजे ही दादांना नंतर सुचलेली कल्पना. म्हणून कॉन्ट्रॅक्टरने हॉलच्या बाल्कनीसाठी लोखंडी तुळया दुसऱ्या मजल्यावर चढवल्या. हॉलची बाल्कनी मजबूत केली. हे सर्व मी आर्किटेक्ट श्री. गाडांच्या बरोबर इमारतीमागील डहाणूकरांच्या प्लॉटमध्ये जाऊन पाहत होतो. इमारत प्रथमपासून कशी बांधली जाते हे मला प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

शाळेच्या ह्या तीन मजली पक्क्या इमारतीचे उद्घाटन म्युनिसिपल कमिशनर पी, आर, नायक ह्यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट १९५७ रोजी मोठ्या थाटात साजरे झाले. प्रवेशद्वाराच्या लोखंडी दरवाजाला चांदीचे कुलूप त्या दिवशी लावले होते. दादांनी त्याची चावी माझ्याकडे दिली होती. आम्ही दोघे नायकसाहेबांचे स्वागत करायला त्यांच्या कारकडे गेलो. मी ती चावी नायकसाहेबांना देण्यासाठी दादांच्या हवाली केली. सनई-चौघड्याच्या निनादात नायकसाहेबांनी कुलूप उघडले आणि आम्ही प्रवेशद्वारातून आत आलो. दादांनी नायकसाहेबांना ते चांदीचे कुलूप चावीसह देऊन त्यांचा सन्मान केला आणि आम्ही मोठ्या सभागृहात गेलो. तेथे पालक व विद्यार्थी बसले होते. दादांबरोबर संस्थेचे विश्वस्त श्री. वि.पु. सबनीस आणि श्री. नी. बा. रांगणेकर, आर्किटेक्ट श्री.पुरुषोत्तम विठ्ठल गाड व कॉन्ट्रॅक्टर श्री. पी. दिनशा भसानिया व्यासपीठावर अध्यक्षांबरोबर बसले होते. दादांनी प्रथम प्रास्ताविक भाषण करून अध्यक्षांसह व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला, अध्यक्षीय भाषणात कमिशनरसाहेबांनी दादांचा आणि शाळेचा विशेष गौरव केला आणि इमारतीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.