
आठवणीतील पाऊले
शाळेतील अध्यापन आणि प्रशासनामध्ये सहभाग
शाळेत प्रशिक्षित शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर माझ्याकडे इयत्ता आठवी ‘ब’चा वर्ग इंग्रजी अध्यापनासाठी देण्यात आला. मी पूर्ण तयारी करून वर्गात जात असे. त्यासाठी वर्षभरात शिकवण्यासाठी किती तासिका मिळतात ह्याचा तक्ता मी प्रथम तयार केला. त्या तक्त्यात सुट्यांची नोंदही केली. त्यानंतर तासिकांच्या उपलब्धतेवर आधारित किती व कोणती Structures पहिल्या सत्रात शिकवायची आणि किती व कोणती Structures दुसऱ्या सत्रात घ्यायची ह्याचा अंदाज घेऊन तपशीलवार वार्षिक अंदाजपत्रक तयार केले. त्यानंतर अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा उद्देश, तो साध्य करण्याची साधने (विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव, पाठ्यपुस्तक, शब्दसंपत्ती, आवृत्ती, व्यवसाय, शिक्षणसाहित्य आणि शेवटी चाचणी व नंतर परीक्षा) आणि नंतर मूल्यमापन यांची योजना तयार केली. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धडा शिकवण्याची विशिष्ट पद्धत तयार केली. तसेच इंग्रजी भाषेचे शब्द आणि वाक्ये ऐकणे, वस्तू दाखवून त्या वस्तूचे इंग्रजीमधील नाव सांगणे. शब्द बोलताना त्याचे उच्चारण, वाक्य बोलताना आवाजाचा चढउतार, इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी करूनच मी वर्गात पाऊल ठेवत असे.
माझी ही पूर्वतयारी करण्याची पद्धत आमच्या शाळेतील श्री. शं.वि. सोहोनी या अनुभवी शिक्षकांना दाखवली. यामध्ये त्यांनी काही सूचना केल्या. उदाहरणार्थ पूर्वतयारीनंतर अभ्यासक्रमाचा विस्ताराचा कागद तयार करणे आवश्यक आहे. त्यामध्ये महिना व आठवडा, दिनांक, तासिकेचा क्रमांक, पाठांशाचा विषय, शिक्षण साहित्य आणि शेरा हे रकाने त्यांनी सुचवले. ते रकाने कागदावर उभ्या रेषा काढून तयार केले. अंदाजपत्रक लक्षात घेऊन अभ्यासक्रमाच्या विस्ताराचे कागद तयार केले आणि त्यानंतर आम्ही दादांकडे ‘पूर्वतयारी’ची योजना दाखवण्यास गेलो. ती योजना पाहून दादांना खूप समाधान वाटले व त्यांनी ही योजना शिक्षकसभा घेऊन सर्व शिक्षकांना सांगितली पाहिजे असे आम्हाला सांगितले. श्री. रावसाहेब सोहोनी, मुख्याध्यापक श्री. अ.रा. आठल्ये आणि मी, तिघांनी शिक्षकसभेत ही योजना सांगून ती अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या योजनेमुळे शिक्षकांना पूर्वतयारी करण्याची सवय झाली. शिकवण्यापूर्वी व्यवसाय तयार करण्याची वृत्ती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आणि मुले चाळीस मिनिटांच्या तासिकेत पूर्णपणे गुंतून राहतील असे वातावरण वर्गावर्गात निर्माण झाले.
ही योजना मला सुचली याचे कारण, शाळेत पूर्वीपासून दादांनी ‘आठवड्याच्या अंदाजपत्रकाची वही’ ठेवली होती. प्रत्येक शिक्षकाला आठवड्याच्या अंदाजपत्रकाची वही दिली जात असे. उजव्या पृष्ठावर वेळापत्रकाचे कोरे रकाने आणि डाव्या बाजूला एकेरी ओळीचे पृष्ठ. डाव्या बाजूच्या पृष्ठावर विशेष गोष्टी लिहिण्याची पद्धत घातलेली असायची. अशा रीतीने अध्यापनाची पूर्वतयारी करण्याची पद्धत शाळेत स्वीकारली गेली याचा मला आनंद झाला.
मी शाळेत इंग्रजी, मराठी आणि भूगोल हे तीन विषय घेत असे. माझे शिकवणे मुलांना आवडत असे. याला कारण मी त्यांच्याशी मित्रत्वाने वागत असे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असे. तसेच त्यांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर मला आले नाही तर त्या प्रश्नाचे उत्तर मला शोधून काढावे लागेल, संदर्भ पाहावे लागतील असे सांगून त्यांच्या प्रश्नाचे बिनचूक उत्तर मी सांगत असे. माझ्यासमोर एक तत्त्व होते. शिकवताना आपले ज्ञान, हा माझा प्रतिष्ठेचा प्रश्न मी कधीही केला नाही.
माझे आणि विद्यार्थ्यांचे आपुलकीचे नाते होते. यासंबंधी एक घडलेला प्रसंग मला आठवतो. इयत्ता आठवी ‘ब’च्या मुलांना English Composition साठी एक लहानसा विषय दुसऱ्या सत्रात लिहायला दिला होता. शरद बेडेकर नावाच्या मुलाने सुंदर हस्ताक्षरात, दिलेल्या विषयावर आठ-दहा वाक्ये छान लिहिली होती. त्या मुलाची वही पाहून झाल्यावर त्याची वही देताना त्याचे मी कौतुक केले आणि शाबासकीही दिली. त्या मुलाने पटदिशी स्वत:भोवती एक गिरकी मारली. त्यावेळी फक्त त्याची गिरकी पाहणारे नवीन मुख्याध्यापक वर्गावरून फेरी मारत होते. ते लगेच वर्गात आले आणि त्या मुलाला बेशिस्त वर्तनाबद्दल रागावले. मी त्यांना समजावून सांगितले. वर्गात मुलगा बेशिस्त वागला हेच त्यांच्या मनाने घेतले होते, पण त्या गिरकीमध्ये मी आणि विद्यार्थी ह्यांच्या समाधानाच्या भावना प्रतीत होत होत्या, हे मला आणि त्या मुलालाच माहिती.
इंग्रजी शिकवताना मी निरनिराळे प्रयोग करीत असे. नियमाप्रमाणे Structure Method ने इंग्लिश शिकवताना एका वेळी एकच Structure शिकवायला घेतले पाहिजे. पण मला असा अनुभव आला, की एखादे Structure पक्के झाले असे मला वाटले, तरी मुले पुढची Structures शिकताना पूर्वीच्या Structures संबंधी चुका करीत असत. उदाहरणार्थ – This is my book हे Structure शिकवल्यावर This is a book हे Structure शिकवले. पण मुले This is a my book असे बोलत होती. म्हणून मी माझी पद्धत बदलून मुलांना Structures, Situational Approach ने शिकवायला सुरुवात केली. मी काही Structures शिकवल्यावर त्यावर आधारित त्यांच्या आवाक्यातले Topics घेत असे. त्यामुळे Structures ची पुनरावृत्ती होऊ लागली आणि मुलांच्या चुका खूप कमी होऊ लागल्या.
एकदा मी तीन Structures एकावेळी शिकवली. मी मुलांना सांगितले, “I am here now. I will walk. I am walking.” थोडक्यात म्हणजे मुलांना Interest वाटेल आणि प्रत्यक्ष situation पाहतील, तेव्हा मुले आपोआपच शिकतील. म्हणून मी Situational Approach चा माझ्या अध्यापनात जास्त प्रमाणात अंतर्भाव करीत असे.
अशा रीतीने माझे वर्गातील अध्यापन चालू असताना मी एम.ए.चाही अभ्यास (१९५६ साली) करीत होतो आणि (१९५७ पासून) मी पीएच.डी.च्या प्रबंधाचीही तयारी करीत होतो.
मी १९६२ साली पीएच.डी. झाल्यावर विश्वस्त मंडळाने १ जानेवारी १९६३ पासून उपअधिक्षकपदावर माझी नियुक्ती केली. उपअधीक्षकपद म्हणजे ‘प्रशासकीय कार्य’ करण्याची संधी. मी हळूहळू वर्गांचे वेळापत्रक करायला शिकलो. शाळेतील शिक्षक ल.स. रावले, गो.आ. कुळकर्णी, ग.जो. पाटील आणि ना.ना. परब पहिली ते अकरावीचे वेळापत्रक करीत असत. हे शिक्षक १५ दिवसांत, शिक्षकांच्या तासिका लक्षात ठेवून शिक्षकांचे आणि वर्गांचे वेळापत्रक कसे कौशल्याने करत असत हे मी प्रत्यक्ष पाहिले. हळूहळू मी त्यांना मदत करायला लागलो. यथावकाश मला वेळापत्रक करण्याचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात होऊ लागले.
त्याचबरोबर मी शिक्षणाचा कायदा व त्यावर आधारित नियमावली, अनुदानप्राप्त शाळांची संहिता वाचायला सुरुवात केली. त्यातील नियम, बंधने, शिक्षक-शिक्षकेतरांसाठी सेवाशर्ती, रजेचे नियम, वेतन आणि वेतनेतर अनुदान, निवृत्ती वेतन योजना, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि परीक्षा; इत्यादी गोष्टींचे ज्ञान करून घेतले. शिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणविभागाचे नियमही जाणून घेतले. याचा उपयोग मला संस्थेच्या शाळांना मार्गदर्शन करताना खूप झाला.
ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्लिशच्या अध्यापनाचा सखोल अभ्यास करण्याची मला एक चांगली संधी १९६३ च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळाली. State Institute of English ह्या शासनाच्या राज्यस्तरीय संस्थेने सदर तीन महिन्यांच्या कोर्ससाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. इंग्लिश भाषा आणि त्या भाषेचे अध्यापन ह्यांचे ब्रिटिश तज्ज्ञांकडून मार्दगर्शन मिळणार या कल्पनेने मला उत्साह आला.
आम्ही एकूण १५ प्रशिक्षणार्थी ह्या कोर्सला आलो होतो. हिंक्ले आणि बर्नुस ह्या तज्ज्ञांनी आमचे कोर्सच्या खोलीत स्वागत केले. त्यानंतर तीन महिने ह्या दोन तज्ज्ञांनी आम्हाला इंग्लिश भाषा, तिच्या लकबी, लवचीकता, उच्चारण (स्वतंत्र शब्दांचे आणि शब्द वाक्यात वापरताना बदलत असलेले शब्दाचे उच्चारण) यांची माहिती आमच्या सहभागाच्या साहाय्याने प्रात्यक्षिक रूपाने करून दिली. तसेच दररोज आकलनाचे मोठमोठे परिच्छेद दिले जायचे आणि आम्ही लिहिलेली उत्तरेही त्याच दिवशी व्यक्तिश: तपासून द्यायचे. याचा आम्हाला खूप उपयोग झाला. तसेच भाषा व्यवसायाचे विविध प्रकारही आमच्याकडून सोडवून घेतले.
शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितले, की ‘इंग्लिश ही आमची मातृभाषाच आहे, पण या भाषेविषयीचा सखोल अभ्यास परकीय भाषा म्हणून शिकणाऱ्यांनी जास्त केलेला आहे. तसेच परकीय लोक आम्हा ब्रिटिशांसारखे उच्चार करण्याचा आग्रह धरतात. पण तसे करण्याची आवश्यकता नाही. आमच्याप्रमाणे बोलणे व त्यातील उच्चारण करणे यांच्या मागे लागलात तर सहजपणे बोलण्याला मर्यादा येतील. आपापल्या पद्धतीने ‘इंग्लिश’ बोलले तरी चालेल. त्या तज्ज्ञांचे हे विचार ऐकून सहजतेने भाषा बोलण्याचा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला.
हा कोर्स केल्यानंतर शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रत्येकाला व्यवसाय संग्रह पुस्तिका आणि A.S. Hornbyचे ‘The Teaching of Structures and Sentence Patterns’ ची चार पुस्तके भेट म्हणून दिली. ही पुस्तके मला नेहमी इंग्रजीचे अध्यापन करताना खूप उपयुक्त पडलेली आहेत. तसेच प्रत्येकाला सदर कोर्स पूर्ण केल्याबद्दल Mr Hinkely ह्यांच्या सहीचे प्रमाणपत्रही दिले गेले. ही इंग्लिश भाषा शिक्षणाची संधी माझ्या स्मरणात कायमची राहिली आहे.
हा कोर्स झाल्यानंतर मात्र, मला महाराष्ट्रातून निरनिराळ्या ठिकाणी शिक्षकांसाठी इंग्लिश अध्यापनाची दोन-तीन दिवसांची कार्यशिबिरे (Workshops) घेण्यासाठी आमंत्रणे आली होती. त्यातील वसई, नाशिक, सटाणा आणि नंदूरबार ह्या ठिकाणच्या शाळांत मी साहित्य, चित्रे यांसह गेलो होतो. त्या शिबिरात मी एकेक पाठ घेऊन दाखवला व त्याच्यावर चर्चाही केली. काही ठिकाणी शिक्षकांनीही पाठ घेऊन दाखवले. वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये Filling a fountain pen ह्या विषयावर Process च्या स्वरूपाचा पाठ घेतला आणि Pen चे भाग (cap, nib-section and barrel), शाई पेनमध्ये भरण्यासाठी botle of ink and the ink-filler along with a piece of cloth to wipe the ink ह्या साहित्याचा उपयोग करून पेनमध्ये शाई कशी भरतात, यावर मुलांशी बोलत बोलत composition घेतले. शेवटी काही मुलांना टेबलाकडे बोलावून कृती परत करून बोलायलाही सांगितले. Filling a fountain pen ही Process मुलांना फार आवडली.
त्यानंतर शिक्षकांशीही माझी चर्चा झाली. त्यामध्ये शब्दांचे उच्चारण, वाक्य बोलताना आवश्यक असलेली fluency ह्या गोष्टींकडे लक्ष वेधले. अशा रीतीने ब्रिटिश कौन्सिलतर्फे झालेल्या तीन महिन्यांच्या इंग्लिश कोर्सचा उपयोग मला इंग्लिशच्या अध्यापनात बऱ्याच प्रमाणात झाला.
इंग्रजीच्या अध्यपनामध्ये First Year of English ला मी जास्त महत्त्व देत असे. १९६० नंतर पाचवीपासून इंग्रजी भाषा शिकवण्यास सुरुवात झाली होती. त्यापूर्वी इयत्ता आठवीपासून इंग्रजी शिकवले जात असे. पाचवीमधील छोट्या मुलांना इंग्रजी शिकवायचे असल्यामुळे छोटी छोटी वाक्ये बोलताना, मी फार काळजी घेत असे. मुलांचे उच्चारण योग्य प्रकारे व्हावे आणि नवीन शिकवले जाणारे प्रत्येक Structure समजण्यासाठी निरनिराळे प्रसंग (Situations) त्यांच्यापुढे उभे करून त्या त्या प्रसंगातील Structures चा अर्थ समजला पाहिजे याची काळजी मी जाणीवपूर्वक घेत असे. ऐकणे आणि बोलणे ह्या कृती मुलांकडून जास्त वेळा करवून घेत असे. त्यानंतर यथावकाश वाचन आणि लेखन, शास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवीत असे. यासाठी मी मनापासून खूप प्रयत्न केले आहेत.
आपण काढलेली प्रश्नपत्रिका शास्त्रशुद्ध असावी; तसेच ती सोडवताना मुलांनी आनंद घेतला पाहिजे ह्या गोष्टी प्रश्नपत्रिका काढताना मी नजरेसमोर ठेवीत असे.
एकदा मी अशीच एक प्रश्नपत्रिका दुसऱ्या सत्रासाठी काढली होती. त्यात आवश्यक ती चित्रे घालून त्या चित्रातील प्रसंगावर प्रश्नपत्रिकेतील व्यवसाय तयार करीत असे. १९६५ च्या सुमारास मी तयार केलेली प्रश्नपत्रिका इंग्लंडला Teaching ह्या त्रैमासिकात पाठवण्याचे ठरवले. अगोदर ब्रिटिश कौन्सिलमध्ये चौकशी केली होती. त्या प्रश्नपत्रिकेतील चित्रांचे ब्लॉक्सही छापण्याकरता पाठवले. आश्चर्य म्हणजे, चित्रांच्या साहाय्याने नवनवीन Situations तयार केलेली माझी प्रश्नपत्रिका जशीच्या तशी छापून आली. ती पाहिल्यावर मला झालेला आनंद मी शब्दाने व्यक्त करू शकणार नाही. पुढील त्रैमासिकाच्या अंकात Letter Box च्या सदरात एक प्रश्न विचारलेला होता. तो असा होता-
“प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक मुख्य प्रश्न विचारल्यानतर ‘For example’ म्हणून प्रश्न सोडवून दाखवला आहे आणि त्यानंतर चित्रांच्या आधारे प्रश्न विचारले आहेत. अशा रीतीने उदाहरणादाखल सोडवून दाखवलेले प्रश्न, प्रश्नपत्रिकेत असल्यामुळे सदर प्रश्नपत्रिकेला प्रश्नपत्रिका म्हणावी की व्यवसाय संच म्हणावा?”
सदर मासिकाच्या पुढील अंकात संपादकाने, विचारलेल्या सदर प्रश्नासंबंधीचे आपले मत उत्तर पुढीलप्रमाणे दिले होते.
“प्रश्नपत्रिकेत जर एखाद्या नवीन situation मध्ये मुलांना टाकले, तर त्या situation ची ओळख होण्यासाठी नमुन्यादाखल प्रश्न सोडवून दाखवणे आवश्यक आणि योग्य आहे. सदर प्रश्नपत्रिकेत निरनिराळ्या प्रकारच्या situations असल्यामुळे ‘For example’ या नावाने नवीन Situation ची ओळख करून दिली आहे.”
ही प्रश्नपत्रिका शास्त्रीय आहे हे Teaching Magazine मधील उत्तर जगभर गेले आणि माझ्या प्रश्नपत्रिकेला प्रतिष्ठा मिळाली.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.