
आठवणीतील पाऊले
शिक्षक सहकाऱ्यांशी मित्रत्वाचे नाते
मी उपअधीक्षक झालो, त्यावेळी तर काही शिक्षकांनी मला वेळापत्रक कसे करावे, वर्गात जाण्यापूर्वी अध्यापनाचे पूर्वनियोजन कसे करावे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बाबतीत कच्चे मूल आणि हुशार मूल कसे ओळखावे, मुलांचे निरीक्षण करून त्यांचा स्वभावविशेष कसा जाणून घ्यायचा, विविध उपक्रमांचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, इत्यादी बाबतीत चर्चा करून शिक्षकांनी मला घडवले आहे. त्यामुळे माझे सहकारी माझे मित्र बनायला वेळ लागला नाही.
मी मुख्याध्यापक झालो, तेव्हा काहीतरी विशेष अधिकार मला प्राप्त झाले आहेत असे माझ्या मनात चुकूनही कधी आले नाही. मला मुख्याध्यापकाची खुर्ची जरी मिळाली होती, तरी मी प्रथम शिक्षक आहे ह्याचा मी कधी विसर पडू दिला नाही. मुलांमध्ये मिसळणे, शिक्षकांशी संपर्क साधणे, आणि वाचन व चिंतन करून माझ्या ज्ञानात भर घालीत राहणे, इत्यादी गोष्टी करण्याचा मला छंद लागला होता असे म्हटले तरी चालेल. अधिकार असताना तो अधिकार मी कधीच वापरला नाही.एखादा नवीन उपक्रम मला सुचला, तर मी मोकळ्या मनाने शिक्षकांच्या खोलीत जाऊन शिक्षकांशी प्रथम चर्चा करीत असे, त्यातील त्रुटी लक्षात घेत असे आणि त्यानंतर त्या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असे.
शिक्षकसहकारी माझे मित्र कसे आणि केव्हा बनले हे मला समजलेच नाही. याला कारण माझे त्यांच्याशी मोकळेपणी आणि अनौपचारिकपणे वागणे असावे असे मला वाटते. पण त्याचे मूळ जर कशात असेल तर ते त्यांच्याशी माझी पहिली ओळख होई त्याच्यामध्ये सामावलेले आहे.
नेमणुकीच्या वेळी मी त्यांचे आदराने स्वागत करीत असे. त्यांच्या मनातली मुलाखतीच्या वेळची भीती निरनिराळ्या प्रकारे त्यांच्याशी गप्पा करून घालवीत असे. त्यांना मी प्रथम बोलू देत असे. त्यामुळे त्यांचा अनुभव, त्यांचे वाचन, त्यांचे छंद, त्यांची घरची परिस्थिती यासंबंधी मला माहिती मिळत असे. नंतर मी त्यांना शाळेची अंतर्बाह्य माहिती देत असे. शाळेच्या प्रथा आणि परंपरा यांची ओळख करून देत असे.
प्राथमिक सुसंवाद झाल्यावर मी त्यांना शाळा दाखवण्याच्या निमित्ताने अनौपचारिकरीत्या विचारांची देव-घेव करीत असे आणि शिक्षक पसंत पडला, की त्याला लगेच त्याची नेमणूक झाल्याचे सांगत असे. त्यामुळे त्या शिक्षकाला माझ्याविषयी आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली.
शिक्षकाची नेमणूक झाल्यानंतर अध्यापनाची पूर्वतयारी, ती करण्याची आवश्यकता, वर्गातील आपल्या बोलण्याचा प्रभाव, इत्यादी अनेक गोष्टींची चर्चा करण्याची माझी पद्धत होती. तसेच नवीन शिक्षकाचा पाठ पहिले काही महिने पाहू नये, असे त्याच्या वरिष्ठांना सांगण्याची माझी पद्धत असे. शिक्षकाने वर्गात मोकळेपणी शिकवावे, शिकवताना निर्माण करावयाचे वातावरण त्याला आपल्या कल्पनेने करण्याची संधी द्यावी आणि त्याने शिकवण्यातला आनंद घ्यावा अशी माझी इच्छा असे.
शिक्षकाच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्याच्या त्रुटी, त्याचा मान राखून सांगितल्या की तो समाधानी राहतो. शिक्षकाने चाकोरीबाहेर जाऊन मुलांचे अध्यापन केले असेल अगर एखादा उत्तम प्रकल्प तयार केला असेल, तर त्याचे शिक्षकसभेत कौतुक केल्याशिवाय मी राहत नसे.
मी शिक्षकांना पुष्कळदा त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाहून माझ्या स्वभावाप्रमाणे मदत केली आहे. काही वेळा त्यांच्या घरच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या कौटुंबिक आपत्तीच्या वेळी धावून गेलेलो आहे. ह्या गोष्टी मी माझ्या स्वभावानुसार, नैसर्गिक प्रवृत्तीनुसार करत असे. त्यामुळे शिक्षक आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी घेत असतात.
मला काही शिक्षक आठवतात ते, शाळेत त्यांची नेमणूक करतानाच्या वेळचे. मी मुख्याध्यापक झालो त्यावेळी सुरुवातीला जूनमध्ये श्री. अरविंद नारायण रानडे ह्यांची माध्यमिक शाळेत नेमणूक झाली. १९७० च्या मार्च महिन्यात समजले, की एस.टी. कॉलेजातील एक उत्तम शिक्षक बी.एड.ला बसले आहेत. मी त्यांची एस.टी. कॉलेजमधून माहिती काढली आणि त्यांना भेटायला ठाकूरद्वार येथील हेमराज वाडीतील त्यांच्या घरी गेलो. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मी माझी माहिती दिली आणि त्यांचीही माहिती ऐकली. त्यांचा बी.एड.चा निकालही त्यावेळी लागला नव्हता. त्यांना शाळेत एक दिवस बोलावले आणि त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्यांना नेमणूकपत्रही देऊन टाकले आणि ते बी.एड.चा निकाल लागल्यावर ८ जून १९७० रोजी शाळेत रुजू झाले. त्यांना सबंध शाळा दाखवली. शाळेसंबंधी माहिती सांगितली आणि ते शाळेचे विज्ञान शिक्षक म्हणून शाळेचे झाले. ते शाळेत ३१ वर्षे, ३१ ऑगस्ट २००१ पर्यंत विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित शिकवीत. त्यांनी विद्यार्थ्यांना संगणकशिक्षण दिले आहे. त्यांनी पर्यवेक्षकपदही भूषविले आणि संस्थेला व्यवस्थापनात साहाय्य केले. हा घरी जाऊन शिक्षकाची नेमणूक करण्याचा माझा पहिला अनुभव होता.
श्रीमती मंगला शिर्के ह्या सुन्दत्त हायस्कूल, ग्रँट रोड येथील शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षिका होत्या. शाळेला अशा शिक्षकाची अत्यंत जरुरी होती. त्या चांगल्या शिक्षिका असल्यामुळे त्यांना शाळेत घेण्याच्या उद्देशाने मी सदर हायस्कूलमध्ये ऑक्टोबर १९८६ मध्ये गेलो आणि मुख्याध्यापकांना भेटलो. मी शाळेत गेलो तेव्हा त्या बाई खालच्या हॉलमध्ये मुलांची कवायत घेत होत्या. मी मुख्या-ध्यापकांच्या खोलीत गेलो आणि शाळेत येण्याचा माझा हेतू सांगितला. प्रथम मुख्याध्यापक त्या बाईंना सोडायला तयार नव्हते. परंतु त्यांना शाळेची गरज सांगून त्यांच्याकडे मी विनंतीपत्र दिले. आमचे एकमेकांशी बोलणे झाल्यावर, ते शिर्के बाईंना सोडायला तयार झाले. लगेच मी त्यांचे आभार मानले आणि बाईंना शाळेत बोलावले. मुलाखत घेतली आणि २४ ऑक्टोबर १९८६ पासून शाळेत त्यांची नेमणूक केली. शिर्केबाई मुलांत रमल्या आणि विद्यार्थीप्रिय झाल्या.
श्रीमती माणिक मो. भांडारकर, विज्ञान शिक्षिका. ह्या शिक्षिकेने आपल्या छोट्या बाळासाठी शाळेतील नोकरी सोडली होती. त्यांनी १९८६ च्या मानाने शिक्षिकेच्या नोकरीसाठी पुन्हा अर्ज केला. १९८७ मध्ये एक दिवशी मी त्यांना पत्र पाठवून मुलाखतीसाठी बोलावले. त्या आल्या तेव्हा मी तिसऱ्या मजल्यावर विज्ञान प्रयोगशाळेत असल्यामुळे त्यांना तेथे बोलावले. त्यांनी प्रयोगशाळा उत्सुकतेने पाहिली. त्यांच्याशी मी गप्पा करीत होतो. त्यांची अधिक माहिती घेत होतो. मी काही प्रश्नही त्यांना मधूनमधून विचारत होतो. आमच्यातील औपचारिकपणा हळूहळू नाहीसा झाला. ती खऱ्या अर्थाने मुलाखत नव्हतीच, तर तो संवाद होता. त्या कालावधीत एन.सी.इ.आर.टी.च्या पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमावर आम्ही अर्धा तास बोललो आणि त्यांची शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणून जून १९८७ पासून नेमणूक केली.
श्री. सदाशिव पाटील, हे शिक्षक १९९१ साली प्रथम श्रेणीमध्ये बी.ए. आणि बी.टी. झाले होते. त्यांना इच्छित नोकरी मिळत नव्हती. म्हणून ते चहावाल्या व्यक्तीला पाणी पुरवणे, चहा कमिशनवर विकणे ही कामे चरितार्थासाठी स्वाभिमानाने करत. शाळेतील एक शिक्षक, श्री. भरत मोरे, त्यांना एकदा शाळेत घेऊन आले. त्यांना मी १० ऑक्टोबर १९९१ रोजी मुलाखतीस बोलावले. पण मी महत्त्वाच्या कामासाठी त्यादिवशी तळेगावला गेलो होतो. त्यामुळे ते शाळेत येऊनही माझी भेट झाली नाही म्हणून मी १८ ऑक्टोबरची पुढची तारीख त्यांना देण्यास सांगितले. त्यादिवशी ते ठीक ११ वाजता शाळेत आले. आम्ही पंधरावीस मिनिटे बोललो. त्यांना मी सांगितले, की तुम्ही माझा विश्वास सार्थ कराल अशी खात्री वाटते. आजपासून तुम्ही बालमोहन परिवाराचे सदस्य झालात. त्यांना काय बोलावे ते कळेना. ते खोलीबाहेर जाताना मी, काहीही न बोलता त्यांच्या खिशात प्रवासाच्या पैशाची रक्कम हळूच ठेवली. त्यांच्या चेहऱ्यावर मला कृतज्ञतेची भावना दिसत होती. काही दिवसांनी त्यांचे मला पत्र आले ते भावनेने भरलेले. त्यात त्यांनी लिहिले होते, की आपण मूकपणे ठेवलेली १०० रुपयांची नोट मी आठवणीच्या कप्प्यात अगदी जपून ठेवली आहे. माझी मुलाखतीची पहिली फेरी वाया गेली म्हणून प्रवासखर्च देणारे तुम्ही पहिले मुख्याध्यापक असावेत. माझ्या ७५व्या वाढदिवशी त्यांनी पाठवलेल्या पत्रात असे लिहिले होते की बालमोहनमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर माझ्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख उंचावत गेला. मी एम.ए. आणि एम.एड. झालो. मी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांत शैक्षणिक लेख लिहितो. दूरदर्शनवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखतीही देतो. आज शाळेत मी पर्यवेक्षकपदावर काम करीत आहे.
या शिक्षकांच्या नेमणुकीसंबधी मी जरा सविस्तरपणे लिहिले, कारण शाळेच्या हितासाठी, शाळेला उत्तम शिक्षक लाभावेत म्हणून मुख्याध्यापकांनी औपचारिकपणाचे नाटक न करता, जेथे चांगला शिक्षक मिळेल तेथे जाऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत, तरच शिक्षक आपले मित्र बनतील. आपणाला हवे तसे त्यांना करून घेता येईल.
बालमोहनमधील कोणाचे मन दुखावले जाऊ नये म्हणून मी काळजी घेत आलो आहे. शिक्षक आपल्या क्षमतेनुसार आणि अनुभवानुसार प्रामाणिकपणे मनापासून काम करीत असतो. त्याच्या मनावरील घरचा ताण नाहीसा केला, त्याच्या अडीअडचणीत त्याला साहाय्य केले की त्या शिक्षकाची अध्यापनक्षमता वाढते. तसेच शिक्षकसभेत शिक्षकांचे दोष न सांगता फक्त चांगले गुण सांगितले, तर शिक्षकांना अधिक उत्साहाने अध्यापन करून मुलांचा विकास साधता येतो. शिक्षकांच्या चुका वैयक्तिकरीत्या त्यांना एकांती बोलावून सांगण्याची माझी पद्धत असे. ही पद्धत मी कटाक्षाने पाळण्याची सवय मला लावून घेतली आहे.
शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्यांना उशिरा न येण्याची विनंती केली, की शिक्षक आपल्या विनंतीचा मान राखतात असा माझा अनुभव आहे. तसेच एखाद्या शिक्षकाने चांगले काम केले, तर त्याचे कौतुक शिक्षकसभेत अवश्य करण्याची माझी सवय आहे. यामुळे तो अधिक उत्साही बनतो आणि अपेक्षेपेक्षाही जास्त दर्जेदार काम करतो. खरे म्हटले, तर शिक्षकाला शाळा आपली वाटली पाहिजे, तसेच मुलेही आपली वाटली पाहिजेत. असे झाले, तर शाळेचा दर्जा उंचावत जातो.
येथे शिक्षकवर्गाच्या सहकार्यासंबंधी १९७१ मध्ये घडलेली गोष्ट सांगतो. १९७१ च्या २५ फेब्रुवारीला मला शिक्षण निरीक्षकांचा फोन आला, की १ मार्च रोजी आम्ही अधिकारी शाळेचे पॅनेल’ इन्स्पेक्शन घेण्यासाठी शाळेत येत आहोत. मी त्यांना दूरध्वनीवरूनच सांगितले, की काहीही हरकत नाही, अवश्य या. मी आपले स्वागत करीन.
माझ्या हातात फक्त चार दिवस उरले होते. मी शिक्षणखात्याचे आव्हान स्वीकारले होते. मी शिक्षकांची सभा घेतली आणि शिक्षकांना पॅनेल इन्स्पेक्शन म्हणजे कसे असते, किती शिक्षणाधिकारी शाळा तपासण्यासाठी येतात, त्यांना शाळेची माहिती कोणत्या प्रकारची लागते, इत्यादी गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. पाच-सहा शिक्षकांनी उभे राहून सांगितले, की आपण शाळेचे हे आव्हान स्वीकारले आहे त्याला आम्ही मनापासून सहकार्य करू. काही शिक्षक शाळा सुटल्यावर रात्री ८.३० वाजेपर्यंत काम करीत होते. पूर्ण झालेला अभ्यासक्रम, दोन दिवसांची तुकडीवार वेळापत्रके आणि त्यातील प्रत्येक तासिकेतील पाठ्यांशाच्या नोंदी व पाठ्यांशाला लागणारे शैक्षणिक साहित्य, तक्ते, शिक्षकांची ज्येष्ठता यादी, गेल्या तीन वर्षांचे वार्षिक आणि शालान्त परीक्षेचे निकाल, प्रश्नपत्रिकांचे नमुने, प्रत्येक इयत्तेच्या उत्तरपत्रिका, शाळेच्या उपक्रमांची माहिती, इत्यादी अनेक कामे तयार ठेवावी लागतात. आश्चर्य म्हणजे पाच-सहा शिक्षकांनी ती जबाबदारी आपुलकीने पार पाडली. एवढेच नव्हे, तर इन्स्पेक्शनच्या दिवशी एका शिक्षकाने स्वत:च्या सहीने उपस्थित मुलांचे आकडे स्वत: नोटीस काढून तयार ठेवले. एकाने मुलांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्याची आठवण चित्रकला शिक्षकांना केली. काही शिक्षक काही अधिकाऱ्यांबरोबर वर्ग दाखवण्यास गेले. एका लिपिकाने शाळेचे जनरल रजिस्टर, कॅटलॉग, इत्यादी गोष्टी तपासनीसांना दाखवण्याची जबाबदारी घेतली आणि इन्स्पेक्शन उत्तम रीतीने पार पाडले. ही मदत करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये आली कोठून? मला वाटते, शिक्षकांचे आणि माझे जे अतुट नाते तयार झाले होते, त्यातूनच शाळेने स्वीकारलेले आव्हान पूर्णत्वाला जाऊ शकले. खरोखरच, इन्स्पेक्शनच्या शेवटी झालेल्या शिक्षकसभेत तपासनीस अधिकाऱ्यांसमोर शिक्षकांनी केलेल्या मदतीसंबंधी मी मनापासून आभार मानले.
हा प्रसंग माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस ठरला.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.