loader image

आठवणीतील पाऊले

माझे एम.ए.चे शिक्षण आणि बी.टी.चे प्रशिक्षण

मी सिद्धार्थ कॉलेजमधून १९५४ साली मराठी आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन सेकंड क्लासमध्ये बी.ए. चांगल्या रीतीने पास झालो. मी रुपारेल कॉलेजच्या ‘लॉ कॉलेज’मध्ये १९५४-५५ साली एलएल.बी.चा अभ्यासही केला. पण पुढे काय करायचे या विचारात मी होतो. शेवटी ठरवले, की मी एम.ए.ला रुपारेल कॉलेजमधून बसायचे. मी रुपारेल कॉलेजमध्ये १९५५ सालीच नाव नोंदवले. एम.ए. च्या टर्म्स जरी मी रुपारेल कॉलेजमधून भरल्या तरी एम.ए.च्या लेक्चर्ससाठी निरनिराळ्या प्राध्यापकांच्या कॉलेजमध्ये व्याख्यानाला जावे लागे. मी मराठी माणि संस्कृत हे दोन विषय एम्.ए.ला घेतले होते. हा दोन वर्षांचा कोर्स करताना मला रुपारेल कॉलेज व या दोन कॉलेजांमध्ये जावे लागे. मराठीचे विविध विषयांचे ६ पेपर व संस्कृतचे २ पेपर असे एकूण आठ पेपर मी एम्.ए.च्या परीक्षेला देणार होतो. मराठीचे प्राध्यापक म्हणजे त्यांच्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती होत्या. प्रा. कृ.पां. कुळकर्णी, प्रा. वसंत बापट, प्रा. जोग, प्रा. स.गं मालशे यांची रूपारेल कॉलेजमध्ये व्याख्याने असत. विल्सन कॉलेजमध्ये प्रा. वा.ल. कुळकर्णी मराठी समीक्षेवर व्याख्यान घ्यायचे. आम्हाला ‘कादंबरी’ हा वाङ्मयप्रकार विशेष अभ्यासाला होता. भाषाशास्त्र, मराठी काव्य-प्राचीन व अर्वाचीन, मराठी साहित्याचे समीक्षण आणि मराठी वाङ्मयाचा इतिहास असे सहा विषयांचे सहा पेपर आणि संस्कृतसाठी ‘नलदमयंती आख्यान’, ‘हर्षचरित’ आणि भासाची १२ नाटके होती. ही शिकवण्यासाठी विल्सन कॉलेजमधील प्राध्यापक असायचे. मला वाटले होते, की संस्कृत मला कठीण जाईल. रुइया कॉलेजचे प्रा. डॉ.मो.दि.पराडकर यांनी या दोन पेपर्सच्या बाबतीत मला चांगली मदत व मागर्दर्शन केले आणि मी चांगल्या मार्कांनी १९५७ साली एम.ए. झालो.

त्या काळी एका वेळी दोन परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठात टर्म्स भरता येत असत. एम.ए.साठी माझा अभ्यास १९५५ साली चालू झाला होता.

माझ्या डोक्यात शाळा, शिक्षक आणि त्यासाठी आवश्यक असणारे ट्रेनिंग यासंबंधी विचारचक्र जोरात चालू झाले होते. मी एकदा दादांकडे गेलो. त्यांना आत्मविश्वासाने सांगितले, की दादा मला चांगला शिक्षक व्हायचे आहे. त्यासाठी मी काय करू? कोठे नाव नोंदवू? दादा म्हणाले, ”टू बी.टी.ला जा. शिक्षणशास्त्र, अध्यापनकला आणि बालमन यांचा सखोल अभ्यास कर. तुझं मन मुलांमध्ये रमेल. अध्यापनपद्धतीसाठी तू ‘इंग्रजी आणि भूगोल’ हे दोन विषय घ्यावेस असं मला वाटतं.” मला मनातून खूप आनंद झाला. माझ्या मनातलेच दादांनी जणू ओळखले होते. मी Secondary Training College च्या प्रवेशाचा फोर्म आणला. कॉलेज २० जूनपासून सुरू होणार होते. “त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल श्रीमती सुलभा पाणंदीकर आहेत. त्यांच्याकडे मी गेलो होतो. त्यांनी तुला प्रवेश मिळेल असं सांगितले आहे,” असे दादांनी मला सांगितले.

माझा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे इंटरव्ह्यू झाला. मी जरा घाबरलोच होतो. मला पाणंदीकरबाईंनी बालमोहन विद्यामंदिराविषयी माहिती विचारली. माझे शिक्षणाच्या दर्जाचे पूर्वीचे रेकॉर्ड पाहिले व प्रवेश निश्चित केला.

आम्ही एकूण १०० प्रशिक्षणार्थी विद्यार्थी होतो. बहुतेक सगळेच कोणत्या ना कोणत्या शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते. वसंत नागपुरे नावाच्या मुलाशी माझी प्रथम मैत्री झाली. त्याची स्वतःची शाळा नाशिकला होती. त्या शाळेसंबंधीही त्यांनी मला खूप सांगितले. मी विचार करत होतो, की या विद्यार्थ्यांमध्ये मी एकटाच असा होतो, की शाळेत नोकरी करत नव्हतो. तरीही मला बी.टी.ला प्रवेश मिळाला होता. श्री. शिर्सेकर नावाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी माझे मित्र झाले. बी.टी. झाल्यावर त्यांनी वांद्रयाला ‘महात्मा गांधी विद्यालय’ नावाची शिक्षणसंस्था काढली.

आमच्या कॉलेजचे ग्रंथालय संदर्भग्रंथांनी व विविध प्रकारच्या पुस्तकांनी समृध्द होते. त्या ग्रंथालयाचे वातावरण असे होते की कोणालाही क्षणभर तेथे थांबून डोकवावेसे वाटेल.

या कॉलेजचे जी. एस. धार नावाचे एक प्राध्यापक होते. ते ‘मानसशास्त्र व यातील विविध प्रयोग’ यासंबंधी आम्हाला प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात अनुभव घेऊ देत असत. प्रिन्सिपॉल पाणंदीकरबाई आम्हाला “Educational Psychology’ शिकवीत. प्रा. श्रीमती फिगरेडो ह्या इंग्रजीची अध्यापनपद्धती आणि के.एस. वकील भूगोलाची अध्यापनपद्धती घेत असत. प्रा. न.रा. पारसनीस, प्रा. श्रीमती बॉइस, प्रा. व्ही.आर. गोखले, इत्यादी अनेक तज्ज्ञ प्राध्यापकांचा सुंदर मिलाफ तिथे होता. एका विशिष्ट शैक्षणिक ध्येयाने प्रेरित होऊन ते अत्यंत आपुलकीने कॉलेजात शिकवीत असत.

मी इंग्रजीचा पाठ घेण्याकरिता ‘चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल’ निवडले होते. मी आमची शाळा, बालमोहन विद्यामंदिर जाणीवपूर्वक घेण्याचे टाळले. कारण मला जेथे कोणीही ओळखत नाही अशा शाळेत मला पाठ घ्यावे असे वाटले.
१९५५ साली इंग्रजी शिकवण्याची एक पद्धत नुकतीच भारतात आली होती, त्या पद्धतीचे नाव ‘Structure Method’. त्या वेळी चार वर्षांचे इंग्रजी शिकन शालान्त परीक्षेला मुले इंग्रजीचा पेपर देत असत. त्याचा एक विशिष्ट अभ्यासक्रम शासनाने तयार केला होता. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीसाठी १00 structuresचा अभ्यासक्रम तयार केला होता. शाळेत नुकतेच नवीन आलेले शिक्षक श्री. शं. वि. सोहनी यांच्या मदतीने त्या अभ्यासक्रमाचा मी गाभा समजून घेतला. त्यावर आधारित शासनामार्फत पाठ्यपुस्तकही तयार झाले होते. एका वेळी एक वाक्यरचना हावभावाने मुलांना शिकवायची, मराठी बोलायचे नाही असे ठरून गेले होते. वर्गात situation निर्माण करून त्या माध्यमातून मुलांना बोलायला शिकवण्याचे वैशिष्ट्यपूर्ण तंत्र होते.

प्रा. फिगरेडोबाईंची व्याख्याने ऐकूनऐकून मला नवीन अध्यापनपद्धतीचे मूळ सूत्र सापडले होते. त्या आधारावर मी लेसन नोट तयार करीत असे.
चिकित्सक हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे पाठ घेण्यासाठी इयत्ता ८वीचा वर्ग माझ्याकडे दिला होता. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिकेने मला पाठाचे युनिट दिले. मी त्यांना सांगितले, की मुलांना मी शिकवलेले इंग्रजी चांगले समजायला पाहिजे, तर मला दोन पाठ या वर्गावर घ्यावे लागतील. पहिला पाठ Exploratory lessonचा असेल. हा पाठ माझ्यासाठी असेल. माझी मुलांसाठी पाठ घेण्याची पूर्वतयारी या पाठात होईल. त्यांनी मला माझ्या म्हणण्याप्रमाणे परवानगी दिली.

मी त्या वर्गावर अंतिम पाठासाठी A Bathroomहे Picture Composition घेण्याचे ठरवले. त्याची Lesson Note काळजीपूर्वक परिश्रम घेऊन तयार केली. माझे प्रश्न व त्यांची मुलांची उत्तरे ह्यांचा समन्वयही लिहून काढला आणि सदर पाठ घेण्यास ठरलेल्या दिवशी सुरुवात केली. पाठाच्या पद्धतीप्रमाणे Introduction आणि Statement of aim झाल्यावर मुलांची मने शिकण्यासाठी तयार झाली. त्यानंतर Presentationची पायरी होती. Presentation ला सुरुवात करणार, तोच वर्गाच्या मागील दरवाजातून आमच्या प्रिन्सिपॉल श्रीमती पाणंदीकर बाईसाहेब माझा पाठ पाहण्यासाठी मागील बाकावर बसल्या. मी त्यांना पाहून जरा घाबरलो होतो; पण धीर करून Picture Compositionचा पाठ चालू ठेवला. मुले पाठात समरस झाली होती. मी प्रश्न विचारला, की पुष्कळसे हात उत्तरे देण्यासाठी वर होत होते. माझा पाठ चांगला झाला. मुलांच्या उत्तरे देण्याच्या उत्सुकतेने वर्गातील वातावरणात जिवंतपणा आला होता.

पाठ झाल्यावर मी बाईंना भेटलो. त्या एवढेच म्हणाल्या, “रेगे, तुम्ही मला माझ्या खोलीत उद्या ११ वाजता भेटा.” मला वाटले, पाठात झालेल्या चुका सांगण्यासाठी त्यांनी मला बोलावले असेल. दुसऱ्या दिवशी मी हळूच पाणंदीकरबाईंच्या खोलीत गेलो. त्यांनी मला आपल्यासमोर बसायला सांगितले. त्या बोलताबोलता म्हणाल्या, “तुमचा पाठ काल मी पाहिला. मी तुमच्या Lesson Noteवर काही सूचना लिहिल्या आहेत. त्या बारकाईनं वाचा. पण तुमचा पाठ चांगला झाला. A Good Lesson’ असं तुमच्या Lesson Noteवर मी लिहिलं आहे.”

मला हायसे वाटले. त्यानंतर त्यांनी मला त्या पाठाची पूर्वतयारी कशी केली हे विचारले. मी तपशीलवार माझ्या पूर्वतयारीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “तुम्ही ही माहिती व प्रत्यक्ष पाठ देताना तुम्हाला आलेला अनुभव इंग्लिशमधून लिहून काढा आणि चार दिवसांनी मला सकाळी याच वेळी भेटा.” मी थँक यू मॅडम’ असे म्हणून वर्गात गेलो.

घरी गेल्यावर मी त्या पाठाची पूर्वतयारी, त्या वर्गावर घेतलेला Exploratory lesson, Picture composition घेण्याची तयारी, Lesson Note तयार करताना मी अपेक्षित केलेली मुलांची उत्तरे आणि प्रत्यक्ष पाठ घेताना मला आलेला मुलांचा अनुभव चार-पाच पृष्ठांत लिहून बाईसाहेबांना भेटायला गेलो. त्यांनी माझा तो अनुभव वाचला. त्यात काही दुरुस्त्याही केल्या. नंतर तो त्यांनी माझ्याकडून वाचून घेतला. त्या वेळी त्यांनी वाचताना जेथे क्षणभर थांबणार, तेथे पेन्सिलने उभी रेषा काढण्यास सांगितले. त्यानंतर मी तो अनुभव पुन्हा वाचला. त्या म्हणाल्या, “तुम्ही आता चांगलं वाचलंत. येत्या शनिवारी मी मुंबईतील काही शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या वरच्या हॉलमध्ये आमंत्रित केलं आहे. त्या वेळी तुमचे अनुभव वाचून दाखवा.’

शनिवारचा दिवस उजाडला. सुमारे ८० मुख्याध्यापक आले होते. पाणंदीकरबाईंनी मला स्टेजवर बोलावले. त्यांच्या शेजारी बसवले. प्रथम त्यांनी नुकत्याच आलेल्या इंग्रजीच्या Structure Method संबंधी मुख्याध्यापकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी माझी ओळख करून दिली आणि मला पाठाचा माझा तो अनुभव सांगण्याची विनंती केली. मी सावकाश, शांतपणे तो अनुभव मुख्याध्यापकांना वाचून दाखवला. त्यावर काही मुख्याध्यापकांनी मला प्रश्न विचारले, काही प्रश्नांची उत्तरे पाणंदीकरबाईंनी दिली. एका मुख्याध्यापकांनी ‘छान’ असे म्हणून माझे कौतुक करून आभार मानले.

दुसऱ्या दिवशी मी वर्गात बसलो असताना बाईंना भेटण्यासंबंधी शिपायामार्फत निरोप आला. मी लगेच बाईंच्या खोलीत गेलो. बाई म्हणाल्या, रेगे, तुम्ही काल तुमचा अनुभव छान वाचलात. मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते,” मी बाईंचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी मला सांगितले, “कालचा तुमचा कार्यक्रम Department of Extension Servicesतर्फे होता. मी त्याची डिरेक्टर आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार मी तुम्हाला मानधनाचं एक पाकीट देत आहे. त्याबरोबर माझं पत्रही आहे. हे पाकीट तुम्ही स्वीकारा.” मी ते पाकीट घेतले, बाईना खाली वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन खोलीबाहेर पडलो.

मी बाहेर जाऊन पाहिले, तर त्या पाकिटात बाईंचे पत्र व ७५ रुपयांच्या रकमेचे मानधन होते. बाईंनी दिलेले पत्र अजून माझ्या फायलीत मी जपून ठेवले आहे. ते मानधन माझ्या अविस्मरणीय आठवणींपैकी एक महत्त्वाची घटना आहे. ती मी कधीच विसरू शकणार नाही.

श्रीमती पाणंदीकरबाईंनी दिलेले ते पत्र म्हणजे माझ्या शिक्षकीपेशाला दिलेल्या शुभेच्छाच होत्या. पाणंदीकरबाईंनी दिलेले पत्र असे-

No. 14/1928
Secondary Training College,
Bombay – 1
14th October 1955.

Dear Shri. Rege,
I thank you for helping the Department of Extension Services of the College by reading a paper in the course for teachers teaching English in Std VIII according to the new syllabus. Your work is much appreciated by the Department.
We hope you will continue to take the same interest in the activities of the Department.
Shri M.S. Rege Yours Sincerely,
S. Panandikar

एस.टी.कॉलेजच्या Department of Extension Servicesतर्फे प्रिन्सिपॉल पाणंदीकरबाईंनी आम्हा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी दोन महत्त्वाचे उपक्रम द्वितीय सत्रात आयोजित केले होते. पहिला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी The Indian Institute of Mental Health and Human Relations तर्फे साडेचार महिन्यांच्या कालावधीचा (१५ नोव्हेंबर १९५५ ते ३१ मार्च १९५६) Demonstration of Child Guidance Clinicचा कोर्स चर्नीरोडच्या बालभवनमध्ये आयोजित केला होता. तो कोर्स ऐच्छिक होता. त्या कोर्सला मी नियमित जात असे. इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर निरनिराळ्या प्रकारची माहिती देत असत. या कोर्समध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, केस कॉन्फरन्सेस, नैदानिक तंत्राचे निरीक्षण आणि मुलांच्या वर्तनासंबंधीची प्रक्रिया, व्यक्तिमत्त्व विकास, इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होता. कोर्सच्या अखेरीस हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही आम्हा प्रशिक्षणार्थीना देण्यात आले. ह्या कोर्समुळे आम्हा विद्यार्थ्यांना बालमनाचे विविध पैलू तर समजलेच; त्याचबरोबर त्यांना कसे हाताळावे ह्याचे प्रत्यक्षिकही पाहता आले.

दुसरा एक उपक्रम कॉलेजने गिरगावच्या ‘राममोहन इंग्लिश स्कूल’मध्ये आयोजित केला होता. तो फक्त इंग्रजी अध्यापनपद्धती घेतलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी होता. ब्रिटिश कौन्सिलतर्फे Dr Noonan हे स्वतः इंग्लिशचा पाठ घेण्यासाठी येणार होते. ते English Structure Methodचे प्रणेते असल्यामुळे त्यांचा नमुन्याचा पाठ पाहायला आम्ही उत्सुक होतो.
पाठाचा दिवस निश्चित झाला. त्या वेळी ज्या मुलांना इंग्लिश शिकवायला सुरुवात केलेली नाही अशी राममोहन इंग्लिश स्कूलमधील एका वर्गाची मुले एका वर्गखोलीत आणून बसवली होती. आम्ही इंग्लिश अध्यापनपद्धती घेतलेले प्रशिक्षणार्थी त्या मुलांच्या मागे बसलो होतो.

पुष्कळ वेळ झाला तरी Dr Noonan आले नाहीत. ते वर्गात येण्याची नाही वाट पाहत होतो. थोड्या वेळात एक व्यक्ती वर्गात आली. ती शिक्षकांसाठी जराहील्या प्लॅटफॉर्मवर चढली. त्या व्यक्तीचा अवतार पाहून आम्हाला हसूच आले, मुलेही त्या व्यक्तीकडे पाहू लागली. त्या व्यक्तीने हॅट घातली होती. तिला एक मोरपीस अडकवले होते. बुशशर्टच्या खिशात एक फूल सर्वांना दिसेल असे ठेवले होते. पॅण्टच्या एका खिशात रुमाल खिशातून बाहेर दिसेल असा ठेवला होता. पॅण्टच्या दुसऱ्या खिशात झाडाची एक छोटीशी फांदी बाहेरून दिसेल अशी ठेवलेली होती. त्यांनी गॉगल लावला होता. हातात काठी होती. अशा विचीत्र पेहेरावात आलेले Dr Noonan होते. ते आल्यावर मुलांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. Dr Noonan इंग्रजीमधून आपल्याजवळच्या एकेक वस्तू मुलांना दाखवीत वस्तूंचा परिचय करून देत होते आणि त्या वेळी वाक्य बोलत होते. मुलेही त्यांच्याप्रमाणे इंग्रजी वाक्ये बोलत होती. त्यांची भाषा इंग्रजी होती व मुलांची भाषा मराठी होती. एकमेकांची भाषा एकमेकांना येत नव्हती, तरी मुले शिक्षक बोलतील त्याप्रमाणे बिनधास्तपणे वाक्ये बोलत होती. वाक्ये बोलताना मुले उत्सुकतेने आपल्या बाकावर चढूनही पाहत होती. काही मुले थोडी गडबड करत होती; पण ती, ऐकलेले वाक्य समजून बोलत होती. That is a flower. It is in your pocket. It is an handkerchief. It is a hat. It is on your head. It is your gogle, इत्यादी वाक्ये अस्खलितपणे बोलत होती. Dr Noonan मुलांमध्ये फिरून वाक्ये म्हणत शिकवत होते. मुले आनंदाने इंग्रजी बोलत होती. शेवटी त्यांनी Very Good, Thank you, असे म्हणत पाठ संपवला.

त्यानंतर सदर पाठासंबंधी आमची Dr Noonan बरोबर चर्चा झाली. आम्ही पाठासंबंधी काही प्रश्न विचारले, तर काहींनी ‘Structure Method’ ह्या इंग्रजी अध्यापनपद्धतीविषयी प्रश्न विचारले. त्यांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे देऊन आमचे समाधान केले.

हा पाठ पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले, की Dr Noonan एका वेळी एकच structure शिकवायचे आणि ते मुलांना समजले व बोलता आले, की दुसरे structure शिकवायला घ्यायचे. हा इंग्रजी शिकवण्याचा approach आहे. इंग्रजी भाषा शिकवताना Direct Methodच त्यांनी वापरली होती. फक्त शिकवण्याचा approach बदलला. त्या approachला Structural approach म्हणता येईल.

अशा रीतीने Structural approachने Dr Noonan यांनी घेतलेला नमुन्याचा पाठ पाहण्याची संधी मिळाली. तो भाषा अध्यापनपद्धतीचा एक आगळावेगळा पाठ होता.

१९५५-५६ची सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजची बॅच खरी भाग्यवान! हे वर्ष कॉलेजचे सुवर्णवर्ष होते. या वर्षी कॉलेजने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. शिक्षणावर व्याख्याने, खेळांचे सामने, निबंध स्पर्धा हे उपक्रम तर होतेच; परंतु प्रा. वा. रा. गोखले ह्यांच्या मनात आले, की या महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे एक नाटक बसवावे.

त्यांनी एकदा आम्हा काही विद्यार्थ्यांना आपल्या खोलीत बोलावले व सांगितले, की आपण कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एक नाटक सादर करूया. त्यात मीही भाग घेणार आहे. आपण आचार्य प्र. के. अत्रे यांचे ‘कवडीचुंबक’ हे नाटक करूया. मी दिग्दर्शन करीन. मी आणि माझा मित्र वसंत नागपुरे, दोघांना सरांनी नाटकात काम करण्यासाठी निवडले होते. ते स्वतः पंपूशेट’ झाले होते. मला पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका सरांनी दिली होती. आमच्या तालमींना जोरात सुरुवात झाली आणि शेवटी नाटक सादर करण्याचा दिवस उजाडला. आमच्या गॅदरिंगमध्ये सर्वांना ह्या नाटकाचे कुतूहल होते. नाटक छान झाले. पाणंदीकरबाईंनी प्रा. गोखले व आम्ही सहभागी झालेले विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

मी दुसऱ्या टर्ममध्ये आमच्या कॉलेजची सहल औरंगाबादला प्रा. जी.एस. धार यांच्या सहकार्याने आयोजित केली होती. बालमोहनच्या सहली दरवर्षी औरंगाबादला जात असत. या सहलींच्या आयोजनात दादांना मी मदत करीत असे. त्या अनुभवाच्या जोरावर ही सहल मी यशस्वी केली. औरंगाबादहून आल्यानंतर ह्या सहलीची वार्ता प्रा. धार यांच्या कानावर गेली. त्यांनी मला बोलावून घेतले व सांगितले, “रेगे, तुमचं मी अभिनंदन करतो. सहल छान झाली असं प्राध्यापक श्रीमती फिगरेडो आणि प्रा. वकील यांच्याकडून समजलं. तुम्ही आता एक काम करा. ह्या सहलीचा एक रिपोर्ट मला लिहून द्या. आपल्या लायब्ररीत बसा. मला संध्याकाळपर्यंत तो रिपोर्ट पाहिजे.” सहलीचा रिपोर्ट मी त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत लिहून धारसाहेबांकडे दिला.

वर्षाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला कोणताही एक प्रोजेक्ट तयार करून सादर करावा लागतो. मी ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ या भूगोलाच्या महत्त्वाच्या भागावर एक प्रोजेक्ट केला होता. जगाचा नकाशा सपाट पृष्ठभागावर काढला व वर्तुळाकार प्लायवूडवर चिकटवला. प्लायवूडच्या कडेवरील पट्टीवर १ ते १२ व १२ ते १ असे आकडे लिहिले आणि दिवस व रात्र दाखवण्यासाठी पांढरा व काळा रंग वापरला. ह्या आकड्यांच्या पट्टीवर तारखा असलेली एक छोटी चौकोनी पारदर्शक डबी तयार केली व तिने ० रेखावृत्त ओलांडले, की तारीख बदलायची, अशा प्रकारची योजना केली. मुलांना जो भाग कठीण वाटतो तो ह्या शिक्षणसाहित्याने सोपा होता, त्यानंतर पाठ देताना ही वाररेषा महासागरातूनच का गेली आहे याचे विवेचन करून मुलांना अधिक विचार करण्यास लावता येईल.

या प्रोजेक्टची भूगोलाचे प्रा. वकील यांनी मनापासून प्रशंसा केली. मला खूप समाधान वाटले.
वर्षाच्या शेवटी पाणंदीकरबाईंनी चहापाण्यासाठी आम्हाला आपल्या बंगल्यावर बोलावले होते. आमची त्यांनी प्रत्येकाची विचारपूस केली आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्हा प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा आपकांसमवेत कॉलेजच्या आवारात ग्रूप फोटो काढला.

कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवाचा सांगतासमारंभ कॉलेजच्या मोठ्या हॉलमध्ये संपन्न झाला. सोहळ्याला अनेक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ आमंत्रित म्हणून आले. जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ श्री. जे.पी. नाईक निमंत्रित पाहणे म्हणन आले होते, त्यांनी आपल्या भाषणात शिक्षण, शिक्षक व अध्यापनपद्धती यांविषयी आपले विचार मांडले आणि उद्याचे शिक्षण कसे असले पाहिजे यासंबंधीची दिशा दाखवली. त्यांच्या भाषणातला शिक्षक-प्रशिक्षणासंबंधीचा एक विचार मला मनापासून भावला. ते म्हणाले, की मुख्याध्यापकांसाठी कमीत कमी तीन महिन्यांचे प्रशिक्षण हवे. ते प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्या व्यक्तीला मुख्याध्यापक’ म्हणून कायमची मान्यता देऊ नये. शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींचा या शिक्षणात अंतर्भाव झाला पाहिजे. ही कल्पना माझ्या हृदयात घर करून राहिली आणि यासंबंधी माझा विचार चालू झाला. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रायोगिक स्वरूपात का होईना, पण मी बालमोहनमध्ये सुरू केले. पण ते प्रशिक्षण बालमोहनमधील पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी मर्यादित होते. या प्रशिक्षणाचा शाळेला निश्चितच फायदा झाला.

माझ्या बी.टी.च्या वर्षात भावी शिक्षक’ म्हणून मी खूप शिकलो. अध्यापनाचे हा आणि मंत्र प्रत्यक्षात उपयोगात आणताना मी जो अनुभवसमृद्ध झालो त्याला तोड नाही. या वर्षात ‘गुणवत्तापूर्ण शिक्षक’ या माझ्या संकल्पनेला आकार मिळाला.
ह्या सर्व अनुभवाचा फायदा मला बी.टी.च्या वार्षिक परीक्षेत निश्चितच झाला. १९५६ साली चांगल्या मार्कानी हायर सेकंड क्लासमध्ये मी उत्तीर्ण झालो.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.