
आठवणीतील पाऊले
दादांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
दिल्लीला आम्ही घरची सर्व मंडळी दादांबरोबर गेलो होतो. आम्ही सेकंड क्लासने दिल्लीला २३ तारखेला पोहोचलो. महाराष्ट्र भवनमध्ये आम्ही उतरलो होतो. २५ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्लीच्या विज्ञानभवनात राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दादांना देण्यात येणार होता.
दिनांक २४ तारखेला पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या शिक्षकांचे मनोगत सांगण्याचा कार्यक्रम होता. दादांना मनोगत सादर करण्यासंबंधी पूर्वी कळवले असल्याने त्यांनी ते चार-पाच पृष्ठांत मराठीत लिहिले होते. ते घेऊन दादा व मी डॉ. मो.दि. पराडकरांकडे गेलो. त्यांनी मनोगत हिंदीमध्ये लिहून दिले. सदर मनोगत दादांनी आदल्या दिवशी इतर काही शिक्षकांसमोर वाचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची रंगीत तालीम त्या विज्ञानभवनाच्या सभागारात घेतली गेली. पुरस्कारप्राप्त शिक्षकाच्या माहितीचे निवेदन त्याचे नाव पुकारल्यापासून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारेपर्यंत संपले पाहिजे याची ती तालीम होती.
२५ ऑक्टोबरचा दिवस उजाडला. त्या दिवशी प्रथम राष्ट्रपतींसमवेत पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचा ग्रुप फोटो काढण्यात आला. दादांना ग्रूप फोटोत पहिल्या रांगेत बसवले होते. त्यानंतर प्रत्यक्ष सोहळ्यास सुरुवात झाली.
आम्ही दादांबरोबर राष्ट्रपतीभवन पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घरीही त्यांना भेटण्यास गेलो होतो. त्यांना शिक्षक भेटल्याचा मनापासून आनंद झाला होता. त्यांनी सुमारे अर्धा तास, शिक्षक विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे सांगून शिक्षकाच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तसेच राष्ट्राची सेवा किती प्रकारे करता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले.
दादांच्या दिल्लीतील वास्तव्यात दादांविषयीची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्रात आली होती. प्रि. टी.के.एन. मेनन ह्यांनी ती दिली होती. ती माहिती अशी होती, की आज पुरस्कारासाठी आलेल्या शिक्षकांत श्री. दादासाहेब रेगे ही अशी व्यक्ती आहे, की त्या व्यक्तीला आपल्या शाळेतील तीन हजार विद्यार्थ्यांची नावे माहीत आहेत आणि मथळा होता, ‘Believe or not.’ अशा रीतीने दादांचे नाव दिल्लीतही प्रसिद्ध झाले.
दिल्लीचा दादांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सोहळा आमच्या कायमच्या लक्षात राहण्यासारखा झाला. आम्ही सर्वांनी तो सोहळा उत्सुकतेने पाहिला.
दिल्लीहून परत आल्यावर दादांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. दादांच्या चाहत्यांनी दादासाहेब रेगे अभिनंदन सत्कार समिती’ स्थापन केली आणि शाळेमध्ये रेल्वेमंत्री, मानवंत श्री. स. का. पाटील ह्यांच्या शुभहस्ते दादांचा सत्कार सोहळा २० एप्रिल १९६३ रोजी आयोजित केला होता. त्या सोहळ्याला माझे आजोबा आणि माझी आई, दोघेही आवर्जून उपस्थित होते. ह्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनात प्रसिद्ध वृत्तपत्रकार श्री. शं. नवरे आणि डॉ. ग. द. पुसाळकर यांनी पुढाकार घेतला होता. या सत्काराची बातमी वृत्तपत्रांमध्ये छायाचित्रासह छापून आली होती.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.