loader image

आठवणीतील पाऊले

पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या भेटीचे आयोजन

मी १९६९च्या ऑक्टोबरमध्ये N.C.E.R.T. तर्फे आयोजित Programmed Learning च्या कोर्सच्या १५ दिवसांच्या दुसऱ्या कार्यशिबिराला गेलो होतो. डॉ. एस.एस. कुळकर्णी यांनी काही प्रोग्रॅम्स तयार करून, त्याची वैयक्तिक चाचणी (Individual Tryout) आणि सामुदायिक चाचणी (Group Tryout) घेऊन, अंतिम स्वरूपाचा Programme दुसऱ्या कोर्सला आणायला सांगितले होते. त्यानुसार मी Active and Passive Voice क्रमपाठाची निर्मिती करून तयारीत दिल्लीला प्रशिक्षणासाठी गेलो होतो. तेथे दररोज आमच्या तज्ज्ञांबरोबर विविध प्रकारांनी चर्चा होत असत, त्यांची व्याख्याने होत असत आणि ह्या नवीन स्वयंअध्ययनाच्या पद्धतीविषयी अधिक माहिती मिळत असे. मला त्याचा खूप फायदा झाला.

मी ह्या कोर्सला जाणार हे पूर्वी निश्चितच झाले होते. ऑक्टोबर महिन्यात इयत्ता ११वीची (शालान्त परीक्षा वर्गाची) शैक्षणिक सहल दिल्लीला येणार हेही नक्की ठरले होते. दादा मला म्हणाले, की तू दिल्लीला काही दिवस आहेस, तर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींचे दर्शन मुलांना घडवण्याच्या दृष्टीने त्यांना पत्र लिहून अगर भेटून, त्यांच्या भेटीचा दिवस ठरवता आला तर पाहा. एकूण २०० मुले आणि १५ शिक्षक सहलीला येणार आहेत.

मी दिल्लीला गेल्यावर पंतप्रधानांच्या सेक्रेटरींना भेटून शाळेची माहिती आणि पत्र दिले आणि त्यांना सांगितले, की महाराष्ट्रातील मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरातील इ. ११वीतील मुलांना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे दर्शन घडवण्यासाठी भेट हवी आहे. त्यांना सहलीचा कालावधीही मी पत्रात नमूद केला होता. सेक्रेटरींनी माझे ते पत्र घेतले आणि तुम्हाला दोन दिवसांत त्यांच्या भेटीचा दिवस समजेल असे मला सांगितले. आश्चर्य म्हणजे दोन दिवसांनी त्यांचे पत्र आले, की सोमवारी सकाळी ११ वाजता बंगल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना भेटण्याचा दिवस निश्चित केला आहे. मला किती आनंद झाला हे शब्दांत सांगता येणार नाही. मी लगेच दादांना मुंबईला फोन लावला. दादांनाही सदर भेटीच्या निश्चितीमुळे खूप समाधान झाले.

ठरलेल्या दिवशी त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर सेक्रेटरीसाहेबांनी ५० मुलांचा एक गट असे चार गट करण्यास सांगितले. बंगल्याच्या आवारात चार ठिकाणी सतरंजा घालून त्या ठिकाणी इंदिराजींसाठी एक खुर्ची ठेवली होती. आम्ही ठरवून दिलेल्या जागेवर विद्यार्थ्यांना बसवले. पंतप्रधानबाईसाहेब चारही ठिकाणी मुलांमध्ये खुर्चीवर बसल्या. फोटोच्या वेळेस सर्व मुलांना इंदिराजींना जवळून पाहण्याची संधी मिळाल्यामुळे मुले अगदी खूश होती.

नंतर ती सर्व मुले एकत्र केली. प्रथम दादांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींचे मुलांतर्फे आणि शाळेतर्फे स्वागत केले व बालमोहनची थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर इंदिराजींनी सुमारे अर्धा तास मुलांना राष्ट्राची अस्मिता, राष्ट्रसेवा, विज्ञानाची होत असलेली प्रगती व त्यात मुलांनी सहभाग कसा घ्यावा यासंबंधी आपले विचार सांगितले आणि मुलांना आशीर्वाद देऊन शाळेला शुभेच्छा दिल्या. इंदिराजींची ही भेट त्या मुलांच्या कायमची स्मरणात राहण्यासारखी झाली.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.