
आठवणीतील पाऊले
तळेगावला रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन
ही जागा मिळण्याचा योग तळेगावला स्थायिक झालेले शाळेचे एक माजी विद्यार्थी श्री. विवेक क्षीरसागर यांच्यामुळे आला. शाळेचे शैक्षणिक सल्लागार आणि विश्वस्त रामभाऊ परुळेकर ह्यांचे, त्या जागेत विद्यानिकेतनाच्या स्वरूपात एक भव्य स्मारक करावे असे दादांच्या मनात आले. त्या माळरानावरील खडकाळ जमिनीत, तळेगावच्या दुष्काळी भागात शालेय इमारत आणि वसतिगृह बांधण्याचे फार मोठे धारिष्ट्य दादांनी केले.
ही जागा ताब्यात आल्यावर दादा, आम्ही दोघे बंधू (मी आणि बाळासाहेब) आणि शशिकांत नाडकर्णी असे चौघे जण ती जागा पाहायला तळेगावला श्री. बाबुकाका प्रभुदेसाई ह्यांच्या मोटारने गेलो. आम्ही जागा फिरून पाहिली. संपूर्ण जमीन माळरानाची होती. ह्या जागेत दगडाची खाण होती. जमीन चढउताराची होती. पण परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि उत्साहवर्धक होता.
दादांना त्या जागेत शाळेची इमारत आणि वसतिगृह बांधणे एक फार मोठे आव्हान होते. दादा एवढेच म्हणाले, “या धाडसामागे माझी शांतादुर्गा आणि माझी तीव्र इच्छाशक्ती आहे. सर्व काही व्यवस्थित होईल, असं मला आतून वाटत आहे.”
तळेगावच्या जागेवर शाळा व वसतिगृह कसे बांधले जावे यासंबंधी बालमोहनचे माजी विद्यार्थी श्री. शशिकांत नाडकर्णी (इंजिनीयर), श्री. शरद शिलेदार (आर्किटेक्ट) यांच्याबरोबर चर्चा करायला दादा, मी आणि माझे बंधू बाळासाहेब दादांच्या खोलीत बसलो होतो. संस्थेचा कोणताही प्रकल्प हा दादा स्वतःचाच प्रकल्प समजत आणि तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दादा पराकाष्ठेचा प्रयत्न करत असत.
तळेगावचा परिसर म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष; पण दादांची इच्छाशक्ती फार मोठी होती. दादांना वाटत होते, की या परिसरात कुठेतरी पाणी लागणारच. दादांच्या आज्ञेनुसार श्री. शशिकांत नाडकर्णी आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी १९६८च्या एप्रिलमध्ये तळेगावच्या त्या परिसराचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलो. पूर्वसूचनेनुसार पुण्याचे श्री. लिमये जलशोधक यंत्र घेऊन तळेगाव स्टेशनवर ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी आले. आम्ही विद्यानिकेतनाच्या शाळेच्या जागेवर गेलो. त्या १० एकर जागेतील पुष्कळ ठिकाणी यंत्राच्या साह्याने पाण्याचा शोध घेत फिरलो; पण कुठेच पाणी लागले नाही. श्री. लिमये ह्यांना त्या जागेच्या पश्चिमेकडील बाजूला कोपऱ्यातील जागा पाहावी असे वाटले. म्हणून आजच्या वसतिगृहाच्या बाजूच्या जागेकडे गेलो. त्यांनी आपले जलशोधक यंत्र जमिनीवर ठेवले व ते यंत्राकडे पाहून म्हणाले, “इथं ३० फुटांवर पाणी लागेल असं मला वाटतं.” आम्हाला आनंद झाला. श्री. लिमये यांचे आभार मानले आणि आम्ही मुंबईला येऊन जमिनीत पाणी लागण्याची शक्यता दादांना सांगितली. दादा एवढेच म्हणाले, की ही माझ्या शांतादुर्गेची कृपा!
काही दिवसांनी आम्ही सर्व तळेगावच्या जागेवर गेलो आणि ज्या बाजूला पाणी लागणे शक्य होते, त्या जमिनीवर दादांनी मला कुदळ मारायला सांगितले आणि आश्चर्य म्हणजे विहीर खोदताना अवघ्या १८ फुटांवर पाणी लागले. हा फार मोठा चमत्कार होता. नंतर दादांनी ३० फूट खोल व ३० फूट व्यासाची विहीर खोदून घेतली.
त्यानंतर विद्यानिकेतनाच्या कामास झपाट्याने सुरुवात झाली. शालागृहाची वास्तू १२ खोल्यांची व उतरत्या काँक्रिटच्या छपराची असावी असे ठरले. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्गाच्या पुढे विद्यार्थ्यांना बागकाम करण्यासाठी वर्गाच्या एवढीच जागा राखून ठेवलेली असावी. वर्गात मर्यादित विद्यार्थी घ्यावेत आणि त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन उत्तम प्रकारचे शिक्षण द्यावे यावर दादांचा कटाक्ष होता. म्हणून प्रत्येक वर्गखोली २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असावी असेही ठरले. ह्या इमारतीत शिक्षणसाहित्यासाठी, शिक्षकवर्गासाठी, चित्रकलेसाठी, विज्ञान प्रयोगासाठी आणि हस्तव्यवसायासाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात असेही त्या बैठकीत निश्चित करण्यात आले. वसतिगृहाची इमारत कशी असावी यासंबंधी आमच्या पुष्कळ बैठका झाल्या आणि आम्ही पुढीलप्रमाणे निर्णय घेतले.
वसतिगृह शालागृहापासून जरा दूर असावे. वसतिगृहाची इमारत दोन मजली असावी. तळमजल्यावर स्वयंपाकघर व भोजनगृह असावे आणि प्रत्येक हॉलमध्ये १८ विद्यार्थी याप्रमाणे प्रत्येक मजल्यावर ७२ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय सर्व सुविधांनिशी केली जावी.
ह्या दोन इमारती बांधण्याचे ठरल्यानंतर त्यांचे प्लान्स श्री. नाडकर्णी व श्री. शिलेदार ह्यांनी अल्पवेळेत तयार केले. हे दोघेही त्या वेळी मास्टर साठ्ये आणि कंपनीमध्ये काम करीत होते.
३० एकर जमिनीवरील बांधकामासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च येणार होता. या प्रकल्पासाठी मदत करायला सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक तयार झाली. बँकेचा दादांवर आणि संस्थेवर पूर्ण विश्वास होता. याअगोदर संस्थेसाठी दोन वेळेला काढलेले कर्ज दादांनी फेडले होते. दादा अर्ज घेऊन बँकेचे त्या वेळचे अध्यक्ष श्री. वसंतराव पंडित यांच्याकडे गेले. मीही दादांबरोबर होतो.
दादा त्यांना तळेगावच्या प्रकल्पासंबंधी माहिती सांगत होते. ती मी ऐकत होतो आणि अध्यक्ष श्री. वसंतराव पंडित यांच्याकडेही पाहत होतो. १९७० सालातील ५ लाख रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. त्या बैठकीला सारस्वत बँकेचे सेक्रेटरी श्री. संझगिरी आणि डेप्युटी सेक्रेटरी श्री. नी. रा. वरेरकर होते. अध्यक्षांच्या एका वाक्याने मला आनंद झाला. ते वाक्य असे होते, “दादा आहेत तेथे लक्ष्मी आहे.” मी उत्सुकतेने त्यांचे पुढील म्हणणे ऐकू लागलो. ते पुढे म्हणाले, “दादा, तुम्हाला सारस्वत बँक कर्ज देणार नाही असं होणारच नाही. व्याजातही सवलत देता येईल. तुमची ही योजना चांगली आहे.” हे अध्यक्षांचे उद्गार ऐकून दादा उल्हसित झाले आणि नंतर आम्ही शाळेत आलो.
बँकेने प्रथम १९७० मध्ये पाच लाख रुपये ७ टक्के व्याजाने दिले. त्यानंतर १९७३च्या सुमारास आणखी पाच लाख रुपये ९ टक्के व्याजाने संस्थेला दिले. बँकेने पुढे व्याजातही सवलत दिली. बँकेने दिलेल्या ह्या साहाय्यामुळेच तळेगावच्या वास्तू अल्पावधीत उभ्या राहू शकल्या.
जून १९७० पासून पाचवी ते सातवीचे वर्ग एकदम सुरू करावेत असे दादांनी ठरवले. डिसेंबर १९६९च्या सुमारास या तीन वर्गांच्या परवानगीसाठी सरकारकडे अर्ज केला. दादा परवानगीची वाट पाहत होते. नवीन कामाला प्रारंभ करण्यापूर्वी देवीचे दर्शन घेऊन तिचा कौल घेण्याची दादांची फार जुनी पद्धत होती. म्हणून दादा आपल्या जन्मदिनी, १९७० साली गोव्याला श्री शांतादुर्गा देवीकडे लघुरुद्र करण्यासाठी गेले होते. देवीने उत्तम कौल दिला. दादा उत्साहाने मुंबईला परतले.
दादा गोव्याला गेलेल्या मुदतीत शिक्षणखात्याने सदर तीन इयत्ता सुरू करण्याची परवानगी नाकारल्याचे पत्र माझ्या हाती पडले. त्या वेळी मी मुंबईत होतो. मला धक्काच बसला. दादा गोव्याहून आल्यावर मी ते पत्र दादांना दाखवले. दादा म्हणाले, की असे नकाराचे पत्र येणे शक्यच नाही. चमत्कार म्हणजे दुसऱ्या दिवशीच सचिवालयातून या तिन्ही वर्गांना परवानगी दिल्याचे पत्र आले. दादांनी सचिवालयातही अर्ज केला होता. अर्थात दादांच्या अर्जाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन हे तीनही वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली असे मागाहून समजले.
हे योगायोग मी प्रत्यक्ष घडताना पाहत होतो. दादांनी एखादी इच्छा मनात आणावी आणि ती प्रत्यक्षात आपोआप उतरावी. बालमोहनच्या पाठीमागे दैवी अधिष्ठान असल्याशिवाय अशा गोष्टी होणार नाहीत.
त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये शिक्षकांसाठी जाहिरात दिली. श्री. वसंत भा. परुळकर आणि श्री. र. स. गायतोंडे, मी आणि माझे बंधू बाळासाहेब अशा चार व्यक्तींनी शिक्षकांची निवड केली. बाळासाहेबांना मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरात बारा वर्षांचा शिक्षकी पेशाचा अनुभव मिळाला होता, म्हणून त्यांची रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनात प्रमुख म्हणून नेमणूक करण्याचे विश्वस्त मंडळाने निश्चित केले.
विद्यानिकेतनाचा प्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आनंदाने जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर एकदा ते दादांना म्हणाले, की आपण प्रथम निवासी शाळा पाहिल्या आणि तेथील सुविधांचा विचार केला तर, विद्यानिकेतनात आपल्याला योग्य वातावरणाने हे विद्यानिकेतन चालवता येईल. मीही बाळासाहेबांच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हटले, की अगदी नवीन क्षेत्रात आपण पाऊल टाकत आहोत. म्हणून यशस्वीपणे चालू असलेल्या निवासी शाळा पाहिल्या, तर आपणाला कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली दिशा मिळेल. त्यानंतरच्या दादांच्या शब्दांनी आम्हाला एक निराळा मार्ग दाखवला. ते म्हणाले, “आपणास मूल ओळखता येईल. प्रथम तुमच्या दृष्टिकोनातून वसतिगृहयुक्त शाळेला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे तुम्ही लिहून काढा. आपल्याला शिक्षक कोणत्याकोणत्या मनोवृत्तीचे पाहिजेत, चोवीस तास मूल गुंतण्यासाठी कोणकोणते उपक्रम कार्यान्वित करता येतील यासंबंधीची टिपणे तयार करू आणि मगच आपण दुसऱ्या निवासी शाळा पाहण्यास जाऊ.”
मी बाळासाहेबांना सांगितले, की दादा सांगताहेत ते अगदी बरोबर आहे. आपण दादांनी सांगितल्याप्रमाणे कामाला लागूया. दादांच्या शब्दांनी आम्हाला मोठा आत्मविश्वास दिला होता. आम्ही तयार केलेली टिपणे दादांना दाखवली आणि त्यांच्या परवानगीने आम्ही शाळा पाहायला सुरुवात केली. आम्ही प्रथम काही शासकीय विद्यानिकेतने पाहिली. नंतर साताऱ्याची एक निवासी शाळा पाहिली. नाशिकची ‘बॉइज टाउन’ नावाची निवासी शाळा पाहिली. वसतिगृह शाळा कशा चालतात, त्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारचे असते, वसतिगृह चालविण्यात कोणत्या अडचणी येणे शक्य आहे यासंबंधीची माहिती घेतल्यानंतर त्या शाळांचे अभ्यासक्रम, विविध उपक्रम, दिनक्रम आणि त्यांचे व्यवस्थापन यांची माहिती घेतली आणि शैक्षणिक विचारांशी सुसंगत अशी एक योजना तयार केली.
त्यानंतर महाराष्ट्रातील मुलांसाठी सुरू होणाऱ्या या विद्यानिकेतनाची वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. त्यातून मुलांच्या व पालकांच्या मुलाखती घेऊन ३२ निवासी मुलांची निवड केली आणि त्यांना २२ जून १९७० रोजी शाळा सुरू होणार असे सांगितले.
एकीकडे इमारतीचे बांधकाम चालू होते. दुसरीकडे फर्निचरचे काम जोरात चालू होते. तिसरीकडे शैक्षणिक वातावरण विद्यानिकेतनात कसे निर्माण करता येईल आणि वसतिगृह आधुनिक साहित्य सुविधांनी आणि घरगुती वातावरणाने सज्ज कसे करता येईल यासंबंधीच्या सभा एकामागून एक भराभर होत होत्या.
हा शैक्षणिक प्रकल्प सुरू करण्याचा दिवस जवळ येऊ लागला, तसे सदर प्रकल्पाला नाव कोणते असावे ह्यासंबंधी विचारविनिमय करण्यास सुरुवात झाली. शाळेचे शैक्षणिक सल्लागार व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शिक्षणतज्ज्ञ श्री. रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ परुळेकर ह्यांचे नाव ह्या शैक्षणिक प्रकल्पाला देऊन त्यांचे स्मारक करावे असे दादांच्या मनात आले आणि त्याप्रमाणे संस्थेच्या ह्या महान प्रकल्पाला ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ असे नाव द्यावे असे मी सुचविले. दादांना ते पसंत पडले. त्या नावास विश्वस्त मंडळाने मान्यता दिली. विद्यानिकेतनाच्या नावाच्या पाट्या शाळेच्या दर्शनी भागात, तळेगाव स्टेशनच्या बाजूला आणि हायवेवर अशा तीन ठिकाणी मोठ्या अक्षरांत लावल्या.
अगदी शेवटीशेवटी त्यांनी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलाविले. दादा नवीन प्रकल्पाची माहिती पाटीलसाहेबांना सांगत होते. मी ती फक्त ऐकत होतो. दादा पंधरा मिनिटे बोलत होते. इतक्यात नामदार श्री. राजाराम पाटीलसाहेबांनी घंटा वाजविली. राजारामबापूंनी दादांच्या या विनंतीला मान दिला आणि वीज पुरवठ्याला लागणाऱ्या खर्चामध्ये पूर्णपणे सूट देऊन वीज उभारण्याचे काम एक आठवड्यात पूर्ण झाले पाहिजे असा आदेश पुण्याच्या वीज मंडळाला तातडीने पाठवला आणि २२ जूनच्या आत विद्यानिकेतनमध्ये वीज आली.
विद्यानिकेतनाच्या वास्तू पूर्ण होत असताना त्या वास्तूंचे अंतरंग म्हणजेच शाळेला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य याची यादी कशी तयार करावी, या बाबतीत कोणाकोणाचे साहाय्य घ्यावे यासाठी दादांनी आम्हा दोघांना शाळेतील त्यांच्या खोलीत बोलाविले. अगदी नव्याने शाळेची सुरुवात करताना शाळेला लागणाऱ्या स्टेशनरीच्या बारीकसारीक वस्तूंपासून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या गरजेप्रमाणे लागणारे फर्निचर आणि शिक्षणसाहित्य, इत्यादी बाबींपर्यंत सर्व गोष्टींची यादी करण्याचे काम दादांनी आम्हा दोघांवर सोपविले. मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर नजरेसमोर असल्यामुळे साहित्य जसे आठवेल तसे लिहीत गेलो आणि मग गटवार पद्धतीने त्याची निराळी यादी केली. तसेच शिक्षकांच्या नोकरीचा अर्ज कसा असावा यासंबंधी आम्ही छापील अर्जाचा नमुना तयार केला. मुलांचे प्रवेशपत्र दोन पद्धतींनी तयार केले. एक प्रवेशपत्र गावातील विद्यार्थ्यांसाठी आणि एक वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यावरील माहितीमध्ये पालकांची सर्व प्रकारची माहिती. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधीचा तपशील आणि विद्यार्थ्याचे दोन फोटो या बाबींचा अंतर्भाव केला. ह्या प्रवेशपत्रांचा आजही अतिशय उपयोग होत आहे.
वसतिगृहाच्या भोजनाच्या बाबतीत सुरुवातीस माझी पत्नी सौ. मालन हिने पुढाकार घेऊन वसतिगृहाच्या स्वयंपाकघरातील साहित्य विकत घेण्याच्या बाबतीत माझ्या आईच्या (सौ. गिरिजाबाईंच्या) मार्गदर्शनाखाली मुंबईला लोणची, पापड, मिरची पावडर, मसाला तयार करून पाठविण्याच्या बाबतीत जे जिव्हाळ्याने व आत्मीयतेने साहाय्य केले, त्यामुळेच विद्यानिकेतनात कौटुंबिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. सौ. मालनचे बाळासाहेबांच्या पत्नी सौ. श्रीलेखा हिला काही बाबतीत मार्गदर्शन झालेले आहे.
वसतिगृहाच्या पूर्वतयारीसाठी सौ. मालन आणि तिची मैत्रीण श्रीमती शकुंतला कोरगावकर ह्या दोघींची मदत दादांनी घेतली होती. वसतिगृहातील स्वयंपाकघर, भोजनगृह, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा यांमधील सर्व प्रकारची साहित्यखरेदी निरनिराळ्या ठिकाणी जाऊन करण्याचे काम या दोघींनी अत्यंत आपुलकीने केले.
मुंबईतील तांबाकाटा व दाणाबंदर येथे आम्ही चौघे (दादा, मी, मालन व शकुंतला कोरगावकर) अनेक वेळा मालखरेदीसाठी गेलो आहोत. या नवीन प्रकल्पामुळे मुंबईतील हे भाग मला बघता आले व कोठे कोणते साहित्य मिळते याचीही माहिती झाली.
न्याहारी-भोजनाचे आठवड्याचे वेळापत्रकही मालन आणि कोरगावकर यांनी आहारतज्ज्ञ डॉ. के.व्ही. पानसे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले. आजही श्रीलेखावहिनींनी न्याहारी व जेवणाचे आठवड्याचे वेळापत्रक करण्याची प्रथा चालू ठेवली आहे. तसेच या शाळेचे, वसतिगृहाचे सर्व फर्निचर बालमोहनचे माजी विद्यार्थी श्री. वसंत नाईक ह्यांनी बनवले आहे. आजही ते फर्निचर चांगल्या स्थितीत आहे.
शाळेची सुरुवात २२ जून १९७० रोजी एका छोट्याशा समारंभाने झाली. तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. नथभाऊ भेगडेपाटील यांच्या शुभहस्ते शाळा सुरू झाली. शाळेविषयी मुलांना जिव्हाळा वाटावा, प्रेम वाटावे म्हणून मधूनमधून मुलांच्या आणि शिक्षकांच्या सभा होत असत. शिक्षकसभेला मी आवर्जून उपस्थित राहत असे. सबंध परिसर कशा रीतीने आकर्षक करता येईल, यासंबंधी मुलांचीही मते दादांनी घेतली. गावातील मुले म्हणजे शेतकऱ्यांची मुले होती. त्यांच्या साहाय्याने शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील जागा भुईमूग लावून, विविध रोपटी लावून सुशोभित केली होती. वर्गामध्ये शैक्षणिक वातावरणाला उपयुक्त अशा म्हणी, तक्ते, चित्रे लावली आणि शाळा सुंदर रचनात्मक मांडणीने शिक्षकांच्या सहकार्याने उत्साहाने सुरू केली. ह्या सर्व उपक्रमांमध्ये माझा सक्रिय सहभाग असल्यामुळे विद्यानिकेतन माझे आहे, एवढेच नव्हे, तर येथे माझे असे काहीतरी आहे ही भावना सहजपणे माझ्यात रुजत आली आहे. ५ ऑक्टोबर १९७० रोजी शाळेचे पहिले इन्स्पेक्शन झाले. त्या वेळी शिक्षणाधिकारी श्री. पी. के. देशमुख आले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर १९७० रोजी, ललितापंचमीच्या दिवशी विद्यानिकेतनाला शासनाची मान्यता मिळाली.
विद्यानिकेतनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे त्या वेळचे शिक्षणमंत्री नामदार श्री. मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते १२ ऑक्टोबर १९७० रोजी झाले. या समारंभात मुलांनी दर्जेदार मनोरंजक कार्यक्रम सादर केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. चौधरी यांनी, “या संस्थेने शिक्षणक्षेत्रात एक भव्य झेप घेतली आहे,” असे गौरवोद्गार काढून, “कोकणातील ज्ञानगंगा अगदी घाटावर येऊन वाहू लागली असून तिच्या प्रवाहाने पुनीत आणि समर्थ होणाऱ्या या मानवसमाजाने ही भूमी समर्थ होवो,” असा आशीर्वाद दिला.
आज त्या माळरानावर विद्यानिकेतनाचा परिसर शैक्षणिक वातावरणात उभा आहे. ह्या आवारात १९७० साली एकही झाड नव्हते. पण या जमिनीत हळूहळू आवश्यक तेवढी मातीची भर घालून लहानलहान खाचरे तयार करून त्यात विविध प्रकारची फुलझाडे व फळझाडे लावली, तसेच या खाचरांत विविध प्रकारचा भाजीपाला मुलांच्या मदतीने तयार करण्यास सुरुवात झाली.
शाळागृहाच्या आवारातील आंबा, चिकू, गुलमोहर, नारळीची झाडे, चाफा, पारिजातक, सुबाभूळ, इत्यादी झाडे महोत्सवाने लावून सुशोभित केली. आज ती झाडे दहापंधरा फूट उंच झालेली पाहून मनाला समाधान वाटते. विद्यानिकेतनाच्या बाकीच्या परिसरात वड, पिंपळ, नीलगिरी, अशोक, इत्यादी झाडे लावून सर्व परिसर आज वनश्रीने नटलेला आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट नेहमी चालू असतो.
दादांची बालपणीची गुरे राखण्याची हौस वृद्धापकाळीही मनसोक्तपणे भागवावी म्हणून आवारात गुरांसाठी एक गोठाही तयार केला. प्रथम नांगरणीसाठी तळेगावलाच दोन बैल घेतले. त्यानंतर मुंबई येथील आरे कॉलनीमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने ४ जर्सी गाई विकत घेतल्या. एवढेच नव्हे तर चेंबूरच्या पांजरपोळातून ‘गीर’ जातीच्या चार चांगल्या गाई आणल्या. ही गोशाळा म्हणजे फावल्या वेळात अनुभव घेण्याची मुलांची एक जागाच झाली होती.
विद्यानिकेतनच्या गोशाळेजवळ पाचशे चौरस फुटांचा गोबर गॅस प्लांट १९७९ साली उभारला. म्हणूनच वसतिगृहास लागणाऱ्या वीज व जळण (गॅस) यांच्या खर्चात थोडीफार का होईना बचत होत आहे.
विद्यानिकेतनात एक बैलगाडीही होती. ही बैलगाडी हाकण्यास काही विद्यार्थी नेहमी उत्सुक असत. बैल दाव्याने ओढतओढत, सेवकाच्या मदतीने, गाडीला जुंपण्यात मुलांना मजा वाटे. ग्रामीण भागातील हा आनंद शहरातील व खेडेगावातील मुले एकत्रितपणे घेताना पाहून आम्हाला फार समाधान वाटे. मीही अधूनमधून बैलगाडी हाकण्याचा आनंद घेत असे. खेडेगावातील वातावरण मला अतिशय आवडे.
विद्यानिकेतनाच्या वसतिगृहातील आनंदमय वातावरण हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. वसतिगृहामध्ये सर्वत्र घरगुती स्वरूपाचे व खेळीमेळीचे वातावरण प्रथमपासून आहे.
आषाढी एकादशीची दिंडी हा विद्यानिकेतनचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक सोहळा प्रथमपासून साजरा होत असतो. या दिवशी मुलांची एक मोठी दिंडी निघते. काही मुले मराठी संतांच्या जीवनातील प्रसंगाचे नाट्यरूप दर्शन सजवलेल्या उघड्या ट्रकमधून गावकऱ्यांना घडवतात. दिंडी, पताका फडकवीत गावातील विठ्ठलमंदिरात जाते. तेथे मुलांना संतांच्या आठवणी सांगितल्या जातात. ह्या दिंडीत मी अनेक वेळा सहभागी होऊन आनंद लुटला आहे.
१९७४ साली तळेगाव परिसरातील हायवेजवळील एक डोंगर, झाडे लावून त्यांची जोपासना करण्यासाठी एका समारंभात वनमंत्री ना. श्री. मधुकरराव चौधरी यांनी शासनातर्फे बहाल केला होता. विद्यानिकेतनातील मुले तेथे वर्षभर त्या झाडांची निगा राखत असत.
मी सुरुवातीपासून विद्यानिकेतनाचे व्यवस्थापन, अभ्यासक्रम, शिक्षकशिक्षकेतरांच्या सेवाशर्ती, विद्यानिकेतनात काही वेळा उद्भवलेल्या विविध समस्या, इत्यादी अनेक बाबतींत सक्रिय सहकार्य आणि सल्ल्याच्या स्वरूपातील मार्गदर्शन वेळोवेळी देत आलो आहे. कोणतीही कमतरता फोनवर मला माझ्या बंधूने सांगावी आणि मी तिचे निवारण करावे हे अविरत चालू होते.
दरवर्षी शिक्षकदिन, शालान्त परीक्षा वर्गाचा निरोपसमारंभ, विद्यानिकेतनमध्ये आयोजित झालेला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, ह्यांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी जात असे. तसेच वसतिगृहातील मुलांशी बोलून त्यांच्या अडचणी, नवीन उपक्रम जाणून घेण्यातही मी अनेक वेळा आनंद घेतला आहे. तसेच बालमोहनमधील ४थी ते ७वीच्या वर्गाबरोबर संतांच्या भूमीतील प्रदेश पाहण्यास शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने जाणे हा माझा नित्यक्रम होता.
आज विद्यानिकेतनात एकूण सात लहानमोठ्या इमारती असून त्यात कार्यानुभव हॉल, ग्रंथालय, शिक्षक निवास, सेवक निवास, प्राचार्यांस राहण्यासाठी सोय, इत्यादी विविध वास्तू तयार झाल्या आहेत.
माझे बंधू डॉ. बाळासाहेब यांनी दादांचे स्वप्न साकार करण्यासाठी जे परिश्रम घेतले, विद्यानिकेतनाचा शैक्षणिक दर्जा व अभ्यासक्रमानुवर्ती व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कार्य केले त्यामुळेच विद्यानिकेतन आज महाराष्ट्रात एक सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी विद्यानिकेतनाचे मुख्याध्यापकपद प्रथमपासून भूषवले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने शिक्षकदिनी ५ सप्टेंबर १९८८ रोजी आदर्श शिक्षकाचा पुरस्कार बहाल केला होता. याच वर्षी त्यांना मुंबई विद्यापीठाची ‘संस्कृत सुभाषिते’ ह्या विषयावर पीएच.डी. मिळाली.
विद्यानिकेतनाचा रौप्यमहोत्सव भारतीय योजना आयोगाच्या सदस्या, शिक्षणतज्ज्ञ श्रीमती डॉ. चित्रा नाईक ह्यांच्या शुभहस्ते ८ जानेवारी १९९५ रोजी संपन्न झाला आणि रौप्यमहोत्सवाच्या सोहळ्याची सांगता डॉ. वि. गो. कुलकर्णी, माजी संचालक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र ह्यांच्या उपस्थितीने झाली. त्या वेळी डॉ. बाळासाहेब विश्वस्त होते आणि कों.वि. टिकेकर मुख्याध्यापक होते. रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यानिकेतनाच्या वाटचालीचे समग्र दर्शन घडविणाऱ्या स्मरणिकेचे आणि ग्रंथाचे संपादन करण्याची संधी मला लाभली, याबद्दल मी धन्य समजतो.
सांगतासोहळ्याला सारस्वत बँकेचे संचालक मंडळ आवर्जून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमामध्ये संचालक या नात्याने आपले मनोगत व्यक्त करताना मानवंत श्री. एकनाथ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांसाठी संगणकसंचाकरिता ५० हजार रुपयांची रक्कम वैयक्तिक देणगीच्या स्वरूपात घोषित केली. त्यावेळी विद्यानिकेतनच्या परिवाराने टाळ्यांचा कडकडाट करून ठाकूरसाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. बाळासाहेबांनी आभारप्रदर्शन करताना त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.