loader image

आठवणीतील पाऊले

दादांचे देहावसान – जबरदस्त मानसिक तणाव

माझ्या परमप्रिय वडिलांचे, दादांचे देहावसान झाले तो प्रसंग माझ्या जीवनातील अतीव दुर्धर आणि जबरदस्त मानसिक तणाव आणणारा होता. तो दिवस ८ जून १९८२ हा होता. ते इतक्या पटदिशी आम्हाला सोडून जातील असे मुळीच वाटले नव्हते. ते नेहमीप्रमाणे सकाळी फेरफटका करून आले. पूर्वप्राथमिक विभागातील मुलांना आनंद मिळण्यासाठी माझे बंधू श्रीपाद तथा बाळासाहेब ह्याला बरोबर घेऊन टेपरेकॉर्डर, लाऊडस्पीकर, इत्यादींची व्यवस्था लावून घरी आले होते.

दुपारी शाळेतील महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्यांनी सह्या केल्या. त्यानंतर ते थोडेसे बेचैन झाले. अंगात थोडा तापही होता. अशा परिस्थितीतही माझ्याशी, माझ्या पत्नीशी (सौ. मालनशी) दादांच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आम्हा दोघा बंधूंना जवळ बोलावले व सांगितले, “मी तुमच्यावर शाळेचं फार मोठं कर्ज करून ठेवलं आहे.” संस्थेचे कर्ज हे त्यांचे स्वतःचे वैयक्तिक कर्ज आहे, अशी त्यांची भावना होती आणि तीच भावना त्यांना त्रास देत होती. ते शेवटी एकच वाक्य बोलले, “तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. माझा आशीर्वाद आहे.” त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला.

मला काय करायचे ते सुचेना. मी वेड्यासारखा या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून दुसऱ्या खोलीत एकसारखा अक्षरशः धावत होतो. दादांना अखेरचा मनोभावे नमस्कार केला. त्यावेळी मला इतके रडू आले की मी खूप भावनाप्रधान झालो.
दादांचा लगेच एक फोटो मी शोधून काढला. श्री. प्रकाश मोहाडीकरांना मी फोन केला. ते धावतच घरी आले. मी त्यांना सांगितले, की दूरदर्शनवर दादांची ही दुःखद बातमी द्या. ते लगेच गेले. दादा ६.३० वाजता गेले होते. ७ वाजता दूरदर्शनवरील बातम्यांतून दादांच्या निधनाची दुःखद बातमी सर्वांना समजली आणि दादांच्या ‘बाळांची’, त्यांच्या पालकांची हीऽऽ रीघ लागली. दादांच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात मी गुंतलो होतो. शाळेतील शिक्षक व माजी विद्यार्थी माझ्या मदतीला होतेच. मला रात्रभर रडायलाही मिळाले नाही. ही लोकांची रीघ दुसऱ्या दिवशी ९ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी लागली होती. त्या वेळी दादा किती मोठे होते ह्याची मला जाणीव झाली. दादांची अंत्ययात्रा फार मोठी होती. अंत्ययात्रेस हजारो लोक होते. असंख्य चाहते त्यात सामील झाले होते. स्मशानात दादांना अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली व मला उद्देशन सांगितले, “बापू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

दादांची ही ‘बालमोहन’ शाळा आमची आहे. दादांनी घालून दिलेल्या शाळेतील परंपरा यापुढेही अशाच चालू राहतील ह्याची आम्हा सर्वांना खात्री वाटते.” सर्वांनी दुःखित अंतःकरणाने दादांना निरोप दिला. दादांचे ‘बालमोहन’ पोरके झाले. दादांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली वास्तू भकास वाटू लागली. दादांच्या तेजाने पावन झालेले विद्यार्थी बालमोहनभोवती खालच्या मानेने त्या दिवशी फिरत होते. मुख्यमंत्री श्री. बाबासाहेब भोसले ह्यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या सभागृहात तिसऱ्या आठवड्यात शोकसभा झाली. माझ्यावर खूप मानसिक तणाव आला होता. प्रत्येकजण मला भेटत होता व मन शांत ठेवण्यास सांगत होता.

दादरचे ‘बालमोहन विद्यामंदिर’ आणि तळेगावचे ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ या दोन संस्था अखिल भारताला भूषणावह ठरतील अशी ज्ञानतीर्थे दादांनी उभारली आणि त्यातून केवळ सुशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत नागरिक ह्या देशाला दिले. या महान कार्यासाठी दादा स्वतः चंदनासारखे तर झिजलेच, पण ज्ञानार्जनाचे हे व्रत पार पाडताना फार मोठी आर्थिक धग त्यांनी स्वतः सोसली अन् तीही त्याची वाच्यताही कधीही कोणाकडेही न करता. अनेक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना, दादांना कधी पैशांची चणचण आहे असे वाटलेच नाही. त्याला कारण दादांनी एखाद्या वटवृक्षाप्रमाणे स्वतः आर्थिक उन्हाचे चटके सोसून हजारो बालकांना आपल्या मायेच्या सावलीत फुलवून त्यांच्या जीवनाचे नंदनवन केले.

ज्ञानाचा डोंगर उभा करताकरता दादांनी उभारलेला कर्जाचा डोंगर दादांना अखेर भेडसावू लागला होता. दादांनी तळेगावच्या वसतिगृहासाठी काढलेले दहा लाख रुपयांचे कर्ज व्याजावर व्याज चढून पंधरा लाख रुपये झाले होते. दादांनी प्रत्येक प्रकल्प उभारण्यासाठी जे कर्ज काढले होते, त्याची परतफेड केली होती. परंतु पंधरा लाख रुपये कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या मनाला रुखरुख होती; पण ती त्यांनी कोणाकडेही बोलून दाखवली नव्हती. संस्थेच्या विकासासाठी उभे केलेले कर्ज आपल्या हयातीत फेडणार आणि कर्जमुक्त होऊन इहलोकीची यात्रा संपवणार अशी त्यांची जबरदस्त तळमळ होती. परंतु दुर्दैवाने तसे घडू शकले नाही.

दादांची अपुरी इच्छा, अखेरची खंत मला बोचू लागली. माझ्या मनात एकच विचार होता, की बालमोहनचे कर्ज एका वर्षाच्या आत फिटले पाहिजे, तरच दादांना खरी श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल. मी विश्वस्त मंडळ सदस्यांचा सल्ला घेतला आणि कामाला लागलो.

मी आजी-माजी विद्यार्थ्यांची सभा गटागटाने घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी शाळेचे ऑडिटर कुळकर्णी-खानोलकर कंपनीचे श्री. मोहनराव परुळेकर उपस्थित राहत असत. हजारो आजी-माजी विद्यार्थी पुढे आले. दादांची खंत त्यांची प्रत्येकाची झाली होती.

मला मंगेशकर कुटुंबाची आठवण झाली. उपमुख्याध्यापिका श्रीमती सुधा जाधव ह्यांच्याबरोबर मी मंगेशकर कुटुंबाकडे गेलो. मीना खडीकर आणि उषा मंगेशकर ह्यांना भेटलो. त्यांच्याबरोबर काही बैठकाही झाल्या. एकदोन सभांना श्रीमती लतादीदीही बैठकीला आल्या होत्या. मी लतादीदींच्या भावंडांना सांगितले, की तुमच्याप्रमाणे मीही बालमोहनचा माजी विद्यार्थी आहे. आपण माजी विद्यार्थ्यांतर्फे एक भव्य ‘कृतज्ञता समारंभ’ शिवाजीपार्क मैदानात आयोजित करूया. हा केव्हा आयोजित करावा? यावर तिन्ही भगिनी म्हणाल्या, की २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी ‘कृतज्ञता समारंभ’ माजी विद्यार्थ्यांतर्फे साजरा करूया. मी त्यांना म्हटले, की मैदानावरील प्रेक्षकांची सोय, स्टेज, इत्यादींची व्यवस्था मी करतो. साऊंड सिस्टिमसंबंधी तुम्ही सांगा. खर्च शाळा देईल. मी पुढे म्हटले, “मला एक विनंती करायची आहे.

या कृतज्ञता समारंभासंबंधी पालकांना एक विनंतीपत्र तुम्हा सर्वांच्या सहीनं काढलं, तर गीतगायनाच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल.” मंगेशकर कुटंबीय लगेच कबूल झाले. त्यानी मसुदा मलाच लिहून आणण्यास सांगितले. दोनतीन दिवसांनी झालेल्या बैठकीच्या वेळी मी मसुदा घेऊन गेलो व त्यावर मीनाताई, उषाताई, हृदयनाथ यांनी सह्या केल्या. मला पुढील काम करायला उत्साह आला. त्याच पत्रावर मी अमोल पालेकर, विनय मांडके, राजन भोसले आणि संदीप पाटील ह्या माजी विद्यार्थ्यांच्याही सह्या घेतल्या आणि पालकांना उद्देशून एक पत्रक काढले. त्या पत्रकात एक स्मरणिकाही काढली जाईल असे लिहिले होते.

सप्टेंबर १९८२च्या मानाने मी ‘जी’ नॉर्थ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर ह्यांना, शिवाजीपार्कमधील स्काउट हॉल समोरची जागा बालमोहनच्या माजी विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी १९८३ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालमोहन विद्यामंदिराचे संस्थापक, गुरुवर्य स्वर्गस्थ शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे ह्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ‘कृतज्ञता समारंभ’ आयोजित करण्याकरिता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने द्यावी अशी विनंती करून, नामवंत माजी विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम निधी उभारण्यासाठी केले जाणार आहेत असेही विनंतीपत्रात नमूद केले होते. सदर पत्र मी स्वतः वॉर्ड ऑफिसरांच्या हातात दिले. सुमारे २० दिवसांनी असे समजले, की ते माझे पत्र कार्यालयात कोठे सापडेना. हे कळल्यावर मी पूर्वीचे पत्र व नवीन पत्र अशी दोन्ही पत्रे घेऊन वॉर्ड ऑफिसरांकडे गेलो व त्यांना सांगितले, की आपण ह्या पत्रावर शिफारस करा. मी स्वतः ते पत्र आयुक्तसाहेबांकडे घेऊन जाणार आहे. ते म्हणाले, की मैदानात तिकिटे लावून कार्यक्रम करता येणार नाही.

मी त्यांना सांगितले, की मी प्रयत्न तर करून पाहतो. त्यांनी माझ्या पत्रावर शिफारस केल्याचा शेरा लिहिला आणि ते पत्र घेऊन मी आयुक्त, श्री. द. म. सुकथनकर ह्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष त्यांना भेटलो. मी त्यांना दादांच्या ‘कृतज्ञता समारंभा’संबंधी थोडक्यात माहिती सांगितली. श्री. सुकथनकरसाहेबांनी खास बाब म्हणून कार्यक्रम करण्यासाठी जागा द्यावी असे लाल शाईने त्या पत्रावर शेरा मारून ते पत्र वॉर्ड ऑफिसरांना द्यायला सांगितले. ही घटना फार महत्त्वाची होती. मी ‘कृतज्ञता समारंभा’च्या आयोजनाच्या कामाला उत्साहाने लागलो.

आजी-माजी विद्यार्थ्यांनाही निधीसंकलनासाठी एक पत्रक काढले होते. स्मरणिकेसाठी प्रत्येक पालकाने कमीत कमी एक तरी जाहिरात पाठवावी असे पालकांसाठी मी एक विनंतीपत्रक काढले. आश्चर्य म्हणजे सुमारे ७०० जाहिराती रकमेसह एका आठवड्यात आल्या. शाळेच्या कर्जफेडीसाठी त्या वेळचे मुख्यमंत्री नामदार बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांनाही मुख्यमंत्री निधीतून साहाय्य करावे असे पत्र मी ‘वर्षा’वर मुख्यमंत्रीमहोदयांना दिले. मी माझ्या खोलीत बसलो असताना बाबासाहेबांच्या वैयक्तिक सचिवांचा फोन आला. बाबासाहेब स्वतः फोनवर होते. ते म्हणाले, “तुमचे विनंतीपत्र माझ्या लक्षात आहे. तुम्ही एक तासात ‘वर्षा’वर दोन पत्रे घेऊन या. एक पत्र ‘बालमोहन विद्यामंदिरा’तर्फे आणि दुसरे पत्र तळेगावच्या ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतना’तर्फे. माझ्या मनावर तणाव निर्माण झाला. एवढ्या अल्पावधीत दोन पत्रे तयार करण्याचा माझ्यावरील पहिलाच प्रसंग. मी त्याच मन:स्थितीत दोन पत्रे लिहिली. त्यात जास्तीत जास्त रकमेच्या देणग्या द्याव्यात असेही बाबासाहेबांना विनवले होते. ती पत्रे घेऊन मी तातडीने ‘वर्षा’वर गेलो. ते म्हणाले, “बापूसाहेब, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.

दादा माझे आदरस्थान होते. मी एक लाख रुपये बालमोहनला आणि ५१ हजार रुपये रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनला देत आहे. आपण ही पत्रे घेऊन मंत्रालयात जा. तेथे तुम्हाला सदर रकमांचे दोन धनादेश मिळतील.” मी त्यांचे आभार कसे मानू हेच मला कळेना. मी खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि मंत्रालयातून शासनाने दिलेले दोन धनादेश घेऊन शाळेत परतलो.

सारस्वत बँकेलाही एक पत्र लिहिले. सारस्वत बँकेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत वर्दे यांच्याकडे ते पत्र घेऊन गेलो. त्यामध्ये मी लिहिले होते, की सारस्वत बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने शाळेला देणगीच्या स्वरूपात साहाय्य करावे. सारस्वत बँकेने १ लाख रुपये रकमेचा धनादेश शाळेला दिला. तसेच शाळेचे जुने पालक अॅड. शामराव सामंत ह्यांनी शाळेला २० हजार रुपये मिळवून दिले. मी ह्या सर्वांचा आभारी आहे.

बालमोहनचा आर्थिक पाया भक्कम झालाच पाहिजे या भावनेने अनेकांनी देणगी-तिकिटे घेतली. त्या वर्षी १९८२ साली मी मुख्याध्यापक या नात्याने मुलांची सहामाही परीक्षा घेतली नाही. शिक्षक आणि मुले कृतज्ञता समारंभासाठी देणगी-तिकिटांच्या विक्रीसाठी शाळेच्या अगोदर व त्यानंतर दारोदार फिरत होती. हे सर्व पाहून माझे मन भरून येत होते. दादांविषयी केवढी ही आत्मीयता!

लक्ष्मी डेकोरेशन सर्व्हिसचे श्री. मोहन हिंगोराणी यांनी स्वतः गीतगायनाची बंदिस्त जागा, स्टेज व त्यातील खुर्च्या ह्यांची जबाबदारी घेतली. साऊंड सिस्टिमची व्यवस्थाही झाली. मान्यवरांना खास निमंत्रणे देऊन आमंत्रित केले होते. २६ फेब्रुवारी १९८३ रोजी १५ हजार श्रोत्यांपुढे मंगेशकर कुटुंबाच्या सहकार्याने संपन्न झालेला गीतगायनाचा कार्यक्रम अतिशय प्रभावी झाला. ‘संगीत मंच’ समर्थ आर्ट सर्व्हिसचे श्री. गुरुजी यांनी दादांचे आणि दादांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शांतादुर्गा देवीच्या भव्य तैलचित्राने व सुंदर फुलांच्या माळांनी सजवला होता. या कार्यक्रमात शाळेतील १०० मुलांनी ‘या मुलांना, या फुलांना रंग द्या अन् गंध द्या’ हे, श्री. जोगळेकरसरांच्या दिग्दर्शनाखाली बसवलेले दादांचे आवडते गीत एका सुरात म्हटले.

कार्यक्रमाचा प्रारंभ मीना मंगेशकर-खडीकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाला. कार्यक्रमात कविवर्य श्री. मंगेश पाडगांवकर, सुचेता भिडे-चापेकर, मीना, उषा, हृदयनाथ मंगेशकर, विनय मांडके, राजन भोसले, महेन्द्र कपूर, शैलेंद्र सिंग, अमोल पालेकर, संदीप पाटील इत्यादी कलाकार सहभागी झाले होते. श्री. महादेव सबनीस आणि श्रीमती तबस्सूम यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मी हा कृतज्ञता समारंभ यशस्वी करण्यासाठी ज्याज्या व्यक्तींनी आणि संस्थांनी साहाय्य केले त्यांची संस्था ऋणी आहे, असे सांगून माझे मनोगत थोडक्यात व्यक्त केले.

हा कार्यक्रम ठीक संध्याकाळी ७ वाजता सुरू झाला व रात्री १ वाजता संपला. कार्यक्रमासाठी आलेल्या श्रोत्यासाठी BEST ने ११ बसेसची सोय निरनिराळ्या ठिकाणी जाण्यासाठी केली होती.

माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता समारंभा’च्या कार्यक्रमातून शाळेचे सर्व कर्ज फिटले, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.